Maharashtra News Updates, 12 August 2024 : आगामी विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. या अनुषंगानेच अजित पवारांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून प्रचाराचा नारळही फोडल्याचं बोललं जात आहे. सध्या सर्वच नेते, राज्याचा दौरा आणि मतदारसंघाचा आढावा, पदाधिकाऱ्यांच्या बैठका, सभा, मेळावे घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यातच महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल? यावरही खलबतं सुरु आहेत. दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे राज्यभर दौरे करत आहेत. आता त्यांच्या शांतत रॅलीचा दुसरा टप्पा सुरु आहे. तसेच त्यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा इशाराही दिलेला आहे. तसेच आज शरद पवार यांच्या घराबाहेर मराठा आंदोलकांकडून आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी या आंदोलकांनी केली आहे. दरम्यान, यासह अशा घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Live Updates

Marathi News  Today, 12 August 2024

19:13 (IST) 12 Aug 2024
दहावी, बारावीची परीक्षा यंदा लवकर; राज्य मंडळाकडून संभाव्य तारखा जाहीर

पुणे : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत यंदा आठ ते दहा दिवस लवकरच घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षांच्या तारखांबाबत हरकती, सूचना मांडण्यासाठी २३ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

वाचा सविस्तर...

18:03 (IST) 12 Aug 2024
"एकत्र बसण्याची गरज काय? सरकारला सर्व...", मनोज जरांगेंचा सवाल

आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने आंदोलन करण्यात आलं. यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. आमची समन्वयाची भूमिका राहील. तसेच बैठकीला मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांनाही बोलवावं, असं शरद पवार म्हणाले होते. यानंतर आता मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देत एकत्र बसण्याची गरज काय? असा सवाल त्यांनी केला आहे. "एकत्र बसण्याची गरज काय आहे? सरकारला माहिती आहे की आरक्षण कुठे आहे. सरकारला हे देखील माहिती आहे की फक्त बैठका आणि चर्चा कधीपर्यंत. हे बैठकीला आले नाही आणि ते बैठकीला आले नाही, अशा प्रकारची ढकलाढकली कधीपर्यंत? मराठा आणि कुणबी एकच आहे. हे सर्वांना माहिती आहे, मग एकत्र बसण्याची काय गरज आहे?", असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

18:00 (IST) 12 Aug 2024
बनावट तिकिटाच्या आधारे विमान प्रवास करण्याचा प्रयत्न करणारा तरुण गजाआड

पुणे : बनावट तिकिटाच्या आधारे विमान प्रवास करण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी तरुणाला विमानतळ पोलिसांनी अटक केली. विमानतळावर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्याने तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले. तरुणाला विमान तिकीट काढून देणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका एजंटाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर...

17:10 (IST) 12 Aug 2024
"अनेकजण संपर्कात, पण ते बरोबर...", जयंत पाटील यांचं मोठं विधान

"अनेकजण संपर्कात आहेत. पण ते आमच्याबरोबर येतील असा गैरसमज मी करणार नाही. कारण त्यांचं तिकडे व्यवस्थित सुरु आहे. त्यामुळे त्यांना आता इकडे येणं योग्य वाटत नसेल असं मला वाटतं. त्यामध्ये ईडीची टांगती तलवार आहे, त्यामुळे आमच्याकडे येण्यास जास्त कोणी उत्सुक नाही", असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

16:03 (IST) 12 Aug 2024
"...तर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते", जयंत पाटील यांचं मोठं विधान

महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महायुती असा मुख्य सामना रंगण्याची चिन्ह आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या अनुषंगानेच जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु आहेत. मात्र, महाविकास आघाडी आणि महायुतीचं मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. "उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाविकास आघाडीत असते तर नक्कीच मुख्यमंत्री झाले असते", असं जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

15:09 (IST) 12 Aug 2024
'मविआच्या काळात मला अडकवण्याचा प्रयत्न, पण योग्य वेळी...", मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्यासाठी दबाव टाकला होता, असा आरोप माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे, यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “ही वस्तुस्थिती आहे. देवेंद्र फडणवीस हे तर विरोधी पक्षात होते. गिरीश महाजन विरोधी पक्षात होते. एक वेळेस विरोधी पक्षांना अडचणीत आणणं हे आपण हे समजू शकतो. मात्र, मी तर त्यांच्या सरकारमध्ये सहकारी होतो, तरीही अशा प्रकारचा मला अडकवण्याचा प्रयत्न केला गेला ही वस्तुस्थिती आहे. मी याबाबतीत योग्य वेळी बोलेन”, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.

15:04 (IST) 12 Aug 2024
डोंबिवलीतील श्री गणेश मंदिराला नांदेडच्या युवा उद्योजकाकडून ३० किलो चांदीचे दान

डोंबिवली : डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील श्री गणेश मंदिराच्या गर्भगृह नुतनीकरणाच्या कामासाठी नांदेड येथील वारकरी संप्रदायाचा वारसा असलेल्या घराण्यातील युवा उद्योजक सुमित मोगरे यांनी शनिवारी ३० किलो ९०० ग्रॅम वजनाची चांदीची वीट श्री गणेश मंदिर संस्थानला दान दिली. बाजारभावाप्रमाणे या चांदीची किंमत २५ लाख रूपये आहे.

वाचा सविस्तर...

15:03 (IST) 12 Aug 2024
वडपे ते ठाणे जलद आणि वाहतूक कोंडीमुक्त प्रवास मे २०२५ पासून

मुंबई : मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपे ते ठाणे दरम्यानच्या २३ किमीच्या महामार्गाच्या वाहतूक कोंडीला आणि खड्ड्यांना त्रासलेल्या प्रवाशांची आता यातून मे २०२५ मध्ये सुटका होणार आहे. वडपे ते ठाणे दरम्यानच्या महामार्गाच्या आठ पदरीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरु आहे.

वाचा सविस्तर...

14:15 (IST) 12 Aug 2024
पुणे: पोलीस आयुक्तांकडून शस्त्र बाळगणाऱ्या सराइतांविरुद्ध कारवाईचे आदेश, पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला पकडले

पोलिसांच्या पथकाने सापळा लावून चोरडेला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल सापडले.

सविस्तर वाचा...

13:49 (IST) 12 Aug 2024
"राज ठाकरेंनी कारण नसताना दोन-तीन वेळा...", शरद पवारांचं प्रत्युत्तर

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्यावेळी टीका करताना शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे जातीपातीचं राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, कारण नसताना राज ठाकरेंनी २ ते ३ वेळा माझं नाव का घेतलं? माहिती नाही. पण मी या रस्त्याने कधी जात नाही. मला महाराष्ट्र थोडासा कळतो. मी कधीही असं राजकारण केलं नाही. मी देखील मराठवाड्यात येतो, मलाही लोकांनी अडवलं. मलाही लोकांनी निवेदन दिलं. मग हेही मीच केलं का? मला आडवा असं मी म्हटलं का?, असं म्हणत शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

13:38 (IST) 12 Aug 2024
अहमदनगर: लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच नव दाम्पत्याची आत्महत्या, संगमनेर तालुक्यातील धक्कादायक घटना

पुण्यात नोकरीला असलेल्या नव दाम्पत्याने संगमनेर तालुक्यातील साकुर या आपल्या मूळ गावी येत गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा...

13:06 (IST) 12 Aug 2024
धुळे जिल्ह्यात बनावट विदेशी मद्याचा साठा ताब्यात

जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाकपाडा शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला.

सविस्तर वाचा...

12:59 (IST) 12 Aug 2024
कृत्रिम प्रज्ञेद्वारे पाच महिन्यात १०१ शस्त्रक्रिया; केईएम रुग्णालयात उपक्रम

केईएम रुग्णालयात गुडघा रोपण शस्त्रक्रियेसाठी आणण्यात आलेल्या रोबोटद्वारे मागील पाच महिन्यात १०१ रोबोटीक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून, रुग्णांनाही अल्पावधीत रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सविस्तर वाचा…

12:43 (IST) 12 Aug 2024
डोंबिवली: कोपर ते दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान प्रवासी लोकलमधून पडून गंभीर जखमी

प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लोकलमधील दरवाजात उभा असलेला एक प्रवासी रेल्वे मार्गात पडून गंभीर जखमी झाला आहे.

सविस्तर वाचा...

12:41 (IST) 12 Aug 2024
गोंदिया: अवैध फलकामुळे अपघात, शिक्षिकेचा जागीच मृत्यू

गोंदिया शहरातील रामनगर पोलीस ठाण्यां अंतर्गत येत असलेल्या कुडवा जवळील राणी अवंतीबाई चौकात एक शिक्षिकेच्या दुचाकी वाहनाला एका भरधाव ट्रकने  धडक दिल्याने  शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी  सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

सविस्तर वाचा…

12:08 (IST) 12 Aug 2024
"…तर आमची समन्वयाची भूमिका", शरद पवारांनी आरक्षणाबाबत स्पष्ट केली भूमिका

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. आता मराठा आरक्षणासंदर्भात नेत्यांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने आंदोलन करण्यात आलं. यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. आमची समन्वयाची भूमिका राहील. तसेच केंद्राने ५० टक्यांवरील आरक्षणाचं धोरण बदललं पाहिजे. जर केंद्राने ही भूमिका घेतली तर आमची समन्वयाची भूमिका राहील, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

12:01 (IST) 12 Aug 2024
कल्याण: टिटवाळ्यात विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासू-सासर्‍यांसह तीन जण अटकेत

गेल्या काही महिन्यांपासून सासरच्या मंडळींकडून सुनेचा माहेरहून २० लाख रूपये आण, लग्नात मानपान केला नाही अशा कारणांवरून तिला छळले जात होते.

सविस्तर वाचा...

11:47 (IST) 12 Aug 2024
मराठा क्रांती ठोक मोर्चाचा आंदोलनाचा इशारा, पुण्यातील शरद पवार यांच्या मोदी बागेतील ऑफिससमोर पोलीस बंदोबस्त

मागील वर्षभरापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील लढा देत असून राज्यभरात जनजागृती आणि शांतता रॅली काढत आहेत.

सविस्तर वाचा...

11:46 (IST) 12 Aug 2024
“मी कधी-कधी विसरतो मी राष्ट्रवादीत आहे, मी शिवसेनेत असल्यासारखाचं वागतो”, शरद पवारांच्या खासदाराचे वक्तव्य

मला एक -दोन वेळा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सांगावे लागले. तुम्ही राष्ट्रवादीत आहात, बाळ्या मामांच्या या वक्तव्याने शिवसैनिकांमध्ये हशा पिकली.

सविस्तर वाचा...

11:19 (IST) 12 Aug 2024
शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आंदोलन

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. आता मराठा आरक्षणासंदर्भात नेत्यांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने आंदोलन करण्यात आलं आहे. रमेश केरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु असून शरद पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांच्यावतीने करण्यात आली आहे.

11:04 (IST) 12 Aug 2024
कल्याणमध्ये आयडियल शाळेतील विद्यार्थ्याची शिक्षिकेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

चिठ्ठीत त्याने शाळेतील त्याच्या एका शिक्षिकेकडून त्रासाची माहिती देऊन त्याला कंटाळून ही आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

सविस्तर वाचा...

11:02 (IST) 12 Aug 2024
शिवसागर जलाशयात शिवप्रताप तराफा दाखल; कोयनेतील दळणवळण होणार सोयीचे; संभाजी शिंदेंच्या हस्ते पूजन

सातारा-कोयनेच्या शिवसागर जलाशयात सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने नवीन शिवप्रताप तराफा दाखल झाला आहे. या तराफ्यामुळे कोयनेतील बामणोली, तापोळा, दुर्गम कांदाटी खोऱ्यातील दळणवळण सोयीचे होणार आहे. सविस्तर वाचा…

11:02 (IST) 12 Aug 2024
मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून उमेदवारांची चाचपणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते तसेच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून उमेदवाराची चाचपणी सुरु करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…

10:49 (IST) 12 Aug 2024
पुणे: विवाहाच्या आमिषाने बलात्कार करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार करणाऱ्या एकाविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुजीतसिंह शिवराजसिंह जाधवराव (वय २५, रा. सकाळनगर, बाणेर) असे गु्न्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधवराव आणि पीडित महिलेची गेल्या वर्षी ओळख झाली होती. त्याने महिलेला विवाहाचे आमिष दाखविले. विवाहाच्या आमिषाने त्याने महिलेवर वेळोवेळी बलात्कार केला. महिलेने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. अखेर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक कारंडे तपास करत आहेत.

10:46 (IST) 12 Aug 2024
सातारा: शिव्यांच्या भडिमारात साताऱ्यातील बोरीचा बार उत्साहात

या दिवशी दोन्ही गावांतील महिला एकत्र येऊन एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहतात.

सविस्तर वाचा...

10:46 (IST) 12 Aug 2024
अमरावती : मान्यता नाकारली! शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…

राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये अमरावतीसह दहा वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते.

सविस्तर वाचा...

10:45 (IST) 12 Aug 2024
पुणे: मराठा आरक्षण शांतता फेरीत चोरट्यांचा सुळसुळाट, रोकड, सोनसाखळी लंपास

मराठा आरक्षणासाठी रविवारी शहरातून काढण्यात आलेल्या शांतता फेरीत चोरट्यांनी सोनसाखळी, मोबाइल संच, रोकड चोरल्याच्या घटना घडल्या.

सविस्तर वाचा...

10:45 (IST) 12 Aug 2024
पहिले विरोध, आता तंत्रज्ञानाचा अभ्यास; इव्हीएमवर असाही यू टर्न

प्रत्येक निवडणुकीच्या पूर्वी ईव्हीएमच्या पारदर्शकतेवर विरोधीपक्षाकडून शंका घेतली जाते. मतपत्रिकेवरच मतदान घ्यावे, अशी मागणी केली जाते.

सविस्तर वाचा...

10:44 (IST) 12 Aug 2024
Jayakwadi Dam: जायकवाडीसाठी नाशिकमधून आतापर्यंत १७ टीएमसी पाणी, धरणांतील विसर्ग मंदावला

गंगापूर, दारणा आणि पालखेड धरण समुहातील पाणी नांदूरमध्यमेश्वरमार्गे पुढे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे मार्गस्थ होते.

सविस्तर वाचा...

10:43 (IST) 12 Aug 2024
हिंजवडी ‘आयटी’ नव्हे, ‘खड्डा पार्क’!

हिंजवडीतील कोंडी सोडविणार कोण? लाडका भाऊ, लाडकी बहीण आणि आता लाडका इन्फ्लुएन्सर! आम्ही कधी होणार लाडके, विचारतोय कर देणारा आयटी इंजिनीअर! ‘एक्स’वरील ही एक प्रतिक्रिया साऱ्या समस्यांचे मूळ सांगणारी आहे.

सविस्तर वाचा...

"मी नांदेड शहरात काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून अनेकदा आलो. २४ फेब्रुवारीला नांदेडला स्वातंत्र्य मिळालं. आता २४ फेब्रुवारी का? हे मी सांगण्याची तुम्हाला आवश्यता नाही. भारतीय जनता पक्षाची दुसऱ्यांची घर फोडण्याची सवय आहे. उद्धव ठाकरेंचं घर फोडलं, शरद पवारांचं घर फोडलं. मात्र, आता नांदेडमध्ये काँग्रेस पक्षात येणाऱ्यांची सख्या वाढली आहे", असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली.

Nana Patole

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले