Maharashtra News Updates, 09 August 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारी लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनीही नुकताच दिल्ली जाऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक घेतली. याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरेदेखील महाराष्ट्र दौऱ्यावर असून पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. दरम्यान, आता विधानसभा निवडणुकीच्या रणनीती संदर्भात महायुतीच्या नेत्यांमधेही खलबंतं झाली आहेत. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या रणनीती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. महायुती २० ऑगस्ट रोजी कोल्हापूरमधून प्रचाराचा रणशिंग फुकणार आहे. याबाबत अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. याशिवाय इतरही घडामोडींवर आपले लक्ष असणार आहे.
Marathi News Live Today, 09 August 2024 : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ बंगल्यावर महायुतीच्या नेत्यांमध्ये खलबतं; नेमकी काय झाली चर्चा?
पुणे : शासकीय सेवेच्या माध्यमातून समाजातील लोकांसाठी काम करता येते. धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार सरकारला असतात. त्यामुळे सर्वाधिक बदल घडवायचा तर राजकारणात जाण्याचा पर्याय आहे. तसेच बदल घडवण्यासाठी आधी मतदान केले पाहिजे, असा सल्ला सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी तरुणांना दिला.
अमरावती येथील औद्योगिक वसाहतीत सुरू असलेला बनावट देशीदारू कारखाना पोलीस प्रशासनाच्या वतीने उद्ध्वस्त करण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना व देशभरात मासेमारी बंदीच्या कालावधीमध्ये एक समानता आणण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने २०१८ पासून पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी ७३ दिवसांवरून ६१ दिवसांवर मर्यादित ठेवला. याकामी केलेल्या बंदी कालावधीचे परिणाम मच्छीमारांना दिसून आल्याने यंदाच्या वर्षी पालघर व ठाणे जिल्ह्यातील मच्छीमाराने स्वयंस्फूर्तीने मासेमारी बंदी कालावधी वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यात हिवतापाचा जोर वाढत असून गेल्या पाच महिन्यांत कोरची तालुक्यात तीन चिमुकल्यांसह ६ जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे.
शासकीय योजनाचा लाभ न घेता विद्यार्थी आर्थिक भार सहन करतात. त्यामुळे खाली देण्यात आलेली एका महत्त्वाच्या योजनेसंदर्भातील माहिती सविस्तर वाचा.
सायबर गुन्हे रोखायचे असतील तर जनजागृती होणे गरजेचे आहे. विशेषत: महाविद्यालयीन युवक व युवतींमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती आवश्यक आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व नेते अनिल देशमुख, शेकाप नेते जयंत पाटील व खासदार अमर काळे यांची पण हजेरी लागणार आहे.
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीतील १३२७ घरे निर्माणाधीन प्रकल्पातील आहेत. या घरांचे काम पूर्ण होऊन त्यांना डिसेंबर २०२४ पर्यंत निवासी दाखला मिळण्याची शक्यता आहे. या घरांसाठी विजेते ठरणाऱ्यांना त्याचा ताबा २०२५ मध्ये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोडतीनंतर विजेत्यांना घराच्या ताब्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
महायुती सरकारकडून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरात जवळपास १ कोटी ५ लाख महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. तर रक्षाबंधनाच्या दिवशी लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचा हप्ता मिळणार आहे. या योजनेवरून विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.
यवतमाळ : येथील प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणीच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आले असताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीसह शिवसेना उबाठाचा खरपूस समाचार घेतला.
चंद्रपूर : या जिल्ह्यात बंदुका, काडतुसे, गावठी बनावटी अग्निशस्त्र, तलवार तथा इतर शस्त्र सर्रास मिळत आहे. पोलिस विभागाने मंगळवारी लखमापूर येथे दीपक उमरे व विक्रम जुनघरे या दोघांना अटक करून त्यांच्याकडून गावठी बनावटी अग्निशस्त्र व तलवार जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान छत्तीसगड, मध्यप्रदेश व बिहार या तीन राज्यातून मोठ्या प्रमाणात बंदुका, काडतुसे व तलवारी येत असल्याची पोलिसांची माहिती आहे.
मुंबई : आजारांपासून संरक्षण करणारी रोगप्रतिकारशक्तीच जेव्हा शरीराविरोधातच काम करण्यास सुरुवात करते, त्यावेळी सर्वात प्रथम ती मेंदू आणि मज्जासंस्थेवर आघात करते. अशा या न्यूरोइम्युनोलॉजीचा आजाराच्या रुग्णांवर उपचारासाठी नायर रुग्णालयात सुरू केलेल्या बाह्यरुग्ण विभागात मोठ्या संख्येने रुग्ण येऊ लागले आहेत.
मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून महाराष्ट्रातील गल्लोगल्ली आणि घरोघरी तयारीची लगबग सुरू आहे. गणेशोत्सव काळात मुंबईतील विविध मंडळे आणि कोकणातील घरोघरी भजनांचा नाद कानावर पडत असतो. गेली काही वर्षे आपल्या नोकऱ्या, व्यवसाय सांभाळून तरुणांची भजनी मंडळे सुरू करण्याकडे कल आहे.
नाशिक – भूसंपादनात काही बांधकाम व्यावसायिकांचे भले होत असून शेतकऱ्यांना डावलले जात असल्यावरून महापालिकेत रणकंदन उडाले असताना आता मनपाच्या ५५ कोटींच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
जळगाव – मुकादमपदावरून दिलेली स्थगिती हटविण्यासाठी व त्याबाबतचा सहायक कामगार आयुक्तांकडे असलेल्या सुनावणीचा निकाल आपल्या बाजूने लावून देण्यासाठी तडजोडीअंती ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील कामगार निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
तक्रारीनुसार, चेंबूर सुभाष नगर म्हाडा कॉलनी इमारत क्रमांक २१ चा पुनर्विकास करण्याबाबत करार झाला होता.
नागपूर : पोलीस आयुक्तांकडून शहरात मोठा गाजावाजा करून ‘ड्रग्स फ्री नागपूर सीटी’ अभियान राबविण्यात आले. अनेक महाविद्यालयात ड्रग्स मुक्तीसाठी मोठमोठे फलक लावून कार्यक्रम घेण्यात आले. आता शहरात ड्रग्स तस्करांचे धाबे दणाणून खरोखरच ड्रग्सची तस्करी आणि विक्री थांबेल, असा विश्वासही नागपूरकरांमध्ये निर्माण झाला. मात्र, प्रसिद्धी आणि गाजावाजा आटोपताच ड्रग्स तस्करांच्या टोळ्या नागपुरात पुन्हा सक्रिय झाल्या आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांच्याच आशीर्वादाने ड्रग्स विक्री करून तरुण पिढीला नशेच्या दरीत ढकलत आहेत.
चंद्रपूर : महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेटाळा तथा मीराबाई कांबळे नर्सिंग कॉलेज, ब्रम्हपूरी, मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग, घोडपेठ, नवजीवन नर्सिंग स्कुल, चंद्रपूर या तीन नर्सिग कॉलेजसह एकूण नऊ कॉलेजकडे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे ५०० पेक्षा अधिक अर्ज प्रलंबित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
शरद पवार यांनी ज्या नागांना गेली वीस वर्षे दूध पाजले, त्या नागांनी फणा काढला अन् दूध पाजणाऱ्या शरद पवार ते डसले. त्यानंतर बारामतीच्या जनतेने दाखवून दिलं की लाडकी बायको नसते तर लाडकी बहीणचं असते. म्हणून मग या सरकारला लाडकी बहीण आठवली, असा टोला शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी लगावला. ते शरद पवार गटाच्या 'शिवस्वराज्य यात्रे'त बोलत होते.
मुंबई : प्रेयसीच्या डोक्यात लोखंडी सळीने प्रहार करून हत्या केल्याच्या आरोपाखाली एमएचबी पोलिसांनी २४ तासांमध्ये २४ वर्षीय तरूणाला अटक केली. आरोपीने ३१ जुलै रोजी केलेल्या हल्ल्यात महिलेला गंभीर दुखापत झाली होती.
माजी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुरुवारी (८ ऑगस्ट) बंडगार्डन पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कल १८६, ५०४ व ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पुण्याच्या पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. पूज खेडकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात काम करत असताना दिलीप खेडकर हे या कार्यालयात जाऊन पूजा खेडकरांना वेगळी केबिन मिळावी यासाठी तिथल्या अधिकाऱ्यांशी वाद घालायचे, असा त्यांच्यावर आरोप आहे.
आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांची जारी सभा होणार आहे. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना दिव्यांग तसेच शेतकऱ्यांसंदर्भात विविध मागण्या सरकार पुढे मांडणार असल्याचे सांगितले. तसेच सरकारकडे आमच्या मागण्या पूर्ण करायला पैसे नसतील, तर राज्यपालांचा बंगला विका आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
कोल्हापूर : मनसे नेते राज ठाकरे यांनी राज्यात विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू केली असताना कोल्हापुरात इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आहेत. जिल्ह्यात दहा मतदारसंघांत निवडणूक लढवण्याची तयारी मनसेने सुरू केली असली तरी सक्षम उमेदवाराचा शोध घेण्यातच पक्षाची खरी कसोटी लागणार आहे. दोन दिवसांपूर्वी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांना पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण, खंडणीप्रकरणी अटक झाल्याने पक्षाची प्रतिमा डागाळली आहे.
नागपूर : कुठलाही हॉटेल व्यवसायिक किंवा फुटपाथवर चहा विक्रीचा व्यवसाय करणारा असो, दररोज सकाळी दुकान उघडल्यानंतर चहा किंवा नाश्ता तयार केल्यावर तो प्रथम रस्त्यावर टाकतो. नमस्कार करतो आणि त्यानंतर ग्राहकांना चहा देत असतो. या मागे अंधश्रद्धा आहे की काही शास्त्रीय कारण आहेत.
कल्याण : कल्याणमधील आधारवाडी येथील तुरूंगात दोन कैद्यांमध्ये हाणामारी झाली होती. या वादामध्ये अन्य एका कैद्याने मध्यस्थी केली. आमच्यामध्ये मध्यस्थी केल्याच्या रागातून एका कैद्याने मध्यस्थी केलेल्या कैद्यावर गुरुवारी दुपारी आधारवाडी तुरुंगात धारदार पातेने हल्ला करून त्याला जखमी केले. या प्रकाराने काही वेळ तुरूंगात खळबळ उडाली.
नवी मुंबई : पामबीच येथे एका युवकाने मैत्रिणीची गळा दाबून हत्या करून स्वत: खाडीत उडी घेतल्याची घटना बुधवारी घडली होती. मात्र या घटनेतील आत्महत्या करणाऱ्या युवकाचा मृतदेह अद्याप सापडला नसून पोलिसांचे शोधकार्य सुरूच आहे.
ठाणे : मुंब्रा येथील अमृतनगर भागात काही दिवसांपूर्वी पाचव्या मजल्यावरून पाळीव श्वान इमारती खालून जाणाऱ्या मुलीच्या अंगावर पडल्याने मुलीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुलीच्या आईने मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर जहर सय्यद (२४) याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे.
गुरुवारी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महायुतीचे इतर नेतेही उपस्थित होते.