Maharashtra News Updates, 09 August 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारी लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनीही नुकताच दिल्ली जाऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक घेतली. याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरेदेखील महाराष्ट्र दौऱ्यावर असून पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. दरम्यान, आता विधानसभा निवडणुकीच्या रणनीती संदर्भात महायुतीच्या नेत्यांमधेही खलबंतं झाली आहेत. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या रणनीती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. महायुती २० ऑगस्ट रोजी कोल्हापूरमधून प्रचाराचा रणशिंग फुकणार आहे. याबाबत अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. याशिवाय इतरही घडामोडींवर आपले लक्ष असणार आहे.

Live Updates

Marathi News Live Today, 09 August 2024 : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ बंगल्यावर महायुतीच्या नेत्यांमध्ये खलबतं; नेमकी काय झाली चर्चा?

13:57 (IST) 9 Aug 2024
वसईत १२ ऐवजी ७ उड्डाणपूल होणार, सर्वेक्षणानंतर रचनेत बदल, ३ पूल एकमेकांना जोडणार

वसई- शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या १२ उड्डाणपुलांच्या रचनेत आता बदल करण्यात आला आहे. सलग वाहतूक करता यावी यासाठी १२ पैकी ३ उड्डणपूल एकमेकांना जोडण्यात येणार असून उर्वरित २ उड्डाणपूल आता रेल्वे उड्डाणपुलात रुपांतरीत केले जाणार आहे. यामुळे १२ उड्डाणपुलांऐवजी शहरात ७ उड्डाणपूल होणार आहेत.

सविस्तर वाचा….

13:22 (IST) 9 Aug 2024
पुणे : वीस मिनिटे पाण्याचा मारा, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, हडपसर येथे खाजगी बसला आग

पुणे : तब्बल वीस मिनिटे पाण्याचा फवारा करून अग्निशमन दलाच्या जवानांनी खासगी बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले. हडपसर येथे कदम बाग वस्तीलगत (सोलापूर महामार्ग) येथे एका बसला आग लागल्याची घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली. माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून हडपसर आणि पीएमआरडीए येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते.

सविस्तर वाचा….

13:07 (IST) 9 Aug 2024
शिंदे गटाच्या आणखी एका खासदाराच्या निवडीला आव्हान

मुंबई : पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या निवडणुकीला पराभूत अपक्ष उमेदवार राजू पाटील यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शिंदे गटाचे नवनियुक्त खासदार रवींद्र वायकर, नरेश म्हस्के यांच्या खासदारकीलाही उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून त्याबाबतच्या याचिका प्रलंबित आहेत.

सविस्तर वाचा….

12:59 (IST) 9 Aug 2024
उरण तहसील कार्यालयावर ठाकरे गटाचा मोर्चा

उरण : तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या आणि मागण्यांसाठी गुरुवारी शिवसेना ठाकरे गटाने उरण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. हा मोर्चा शिवसेना शहर शाखेपासून सुरू करण्यात आला. त्यानंतर खिडकोळी नाका, जरीमरी मंदिरमार्गे उरण तहसील कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चात महाराष्ट्र सरकार हाय हाय, नागरिकांना वैद्याकीय सुविधा द्या, इत्यादी घोषणा देण्यात आल्या.

या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यात रस्त्यांवर केलेल्या डांबरीकरणामुळे रस्ते खड्डेमय झाले असून १५ मेनंतर रस्त्यांवर डांबरीकरण केलेल्या अभियंत्यांवर कारवाई करा, खोपटे-कोप्रोली रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी करण्यात आली. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या अनधिकृत वाहनतळावर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

12:46 (IST) 9 Aug 2024
कल्याण रेतीबंदरमध्ये बेकायदा इमारतीमधील घरांची विक्रीकरून १० जणांची फसवणूक

कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी रेतीबंदर भागातील कल्याण डोंबिवली पालिकेच्या बेघरांसाठी घरे, खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या राखीव भूखंडावर भूमाफियांनी पालिकेच्या बनावट बांधकाम परवानग्या तयार करून युसुफ हाईट्स ही १० माळ्याची बेकायदा इमारत उभारली.

वाचा सविस्तर…

12:46 (IST) 9 Aug 2024
आरटीई प्रवेश मोफत तरी, इतर उपक्रमाच्या नावाखाली शाळांकडून पैसे उकळण्याचे काम सुरु; पालक आक्रमक

ठाणे : आरटीई अंतर्गत निवड झालेले विद्यार्थ्यांची कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पालक जेव्हा शाळेत प्रवेश घेण्यास जात आहेत. तेव्हा शाळा प्रशासनाकडून पालकांकडे शाळेतील इतर उपक्रमांच्या नावाखाली पैशांची मागणी केली जात आहे. हे पैसे भरले नाही तर, शाळेत विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही, असे पालकांना सांगण्यात येत आहे.

वाचा सविस्तर…

12:44 (IST) 9 Aug 2024
आली नागपंचमी! सापांची पुजाच नव्हे तर प्रेमही करा, पशुप्रेमींचा सल्ला

वर्धा : भारतीय संस्कृतीत सणावारास विशेष महत्व आहे. त्यात नागपंचमी श्रध्येने साजरी केल्या जाते. त्यामागे प्राणीमात्रंवार प्रेम करा, सापाच्या उपकारांची जाणीव ठेवा, त्यांची हत्या टाळा असे उद्देश असतात. पण गैरसमजातून ते होत नाही. पौराणिक साहित्य तसेच आधुनिक चित्रपट, साहित्य यातून सापाबाबत लोकरंजन करीत सापाविषयी अंधश्रद्धा व भीती बळकट केली असल्याची खंत पशु अनाथालय असलेल्या ‘करुणाश्रम’ चे संचालक आशिष गोस्वामी व्यक्त करतात.

वाचा सविस्तर…

12:35 (IST) 9 Aug 2024
जयंत पाटील आणि अमोल कोल्हे क्रेनमधून पडता पडता थोडक्यात बचावले

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे क्रेनमधून पडता पडता थोडक्यात बचावले आहेत. शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना हा प्रकार घडला. यावेळी क्रेनवर रक्षा खडसे तसेच महबुब शेख देखील होते. महत्त्वाचे म्हणजे यात कोणालाही दुखापत झाली झाली नाही.

12:35 (IST) 9 Aug 2024
के. भो. नाट्यगृहाच्या पुनर्उभारणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मदत – हसन मुश्रीफ

कोल्हापूर : येथील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह काल रात्री लागलेल्या आगीत भस्मसात झाले. कोल्हापूरकरांच्या तोंडी असलेले ‘केभो ‘ नाट्यगृह भस्मसात झाल्याने कला प्रेमींमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. काल मुंबई येथे असलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ आज सकाळी कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी तातडीने केशवराव भोसले नाट्यगृहाकडे धाव घेतली. तेथील जळीतकांडाची त्यांनी माहिती घेतली.

सविस्तर वाचा…

12:19 (IST) 9 Aug 2024
सोलापुरात काँग्रेसपुढे पेच

सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करून निवडून आलेल्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी याअगोदर सलग तीनवेळा प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात त्यांचे उत्तराधिकारी म्हणून संधी मिळण्यासाठी काँग्रेसमध्ये मोठी भाऊगर्दी झाली आहे.

सविस्तर वाचा….

11:48 (IST) 9 Aug 2024
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेची अटक कायदेशीरच उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

मुंबई : घाटकोपर येथील महाकाय फलक दुर्घटनेप्रकरणी इगो मीडियाचा मालक भावेश भिंडे याला करण्यात आलेली अटक कायदेशीरच असल्याचे उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. तसेच, अटक बेकायदा ठरवून तातडीने जामिनावर सुटका करण्याचे आदेश द्यावेत या मागणीसाठी भिंडे याने केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली.

सविस्तर वाचा….

11:45 (IST) 9 Aug 2024
घोडबंदर परिसराला होतोय अपुरा पाणी पुरवठा

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होत असला तरी नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर परिसरात पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने त्याठिकाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. या परिसराला दररोज २० दशलक्षलीटर इतक्या वाढीव पाण्याची गरज असल्याची बाब भाजपचे आमदार संजय केळकर यांनी गुरुवारी पालिका अधिकारी आणि गृहसंकुलांच्या रहिवाशांसोबत घेतलेल्या बैठकीत समोर आली. वाढीव पाण्यासाठी संबंधित विभागांकडे पालिकेचा पाठपुरावा सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

वाचा सविस्तर…

11:34 (IST) 9 Aug 2024
“….म्हणून काँग्रेसने वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध केला”; देवेंद्र फडणवीसांचं टीकास्र!

काँग्रेसला वक्फ बोर्डाशी काहीही घेणं देणं नाही. त्यांना त्याच्या जमिनीशी घेणं देणं आहे. त्या जमिनींवर ताबा घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मोदी सरकारने यासंदर्भात जे विधेयक आणलं होतं. पारदर्शकता आणणारं होतं. त्याद्वारे जमिनी लुटणाऱ्यांना आळा बसणार होता. म्हणून काँग्रेसने त्याचा विरोध केला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

10:55 (IST) 9 Aug 2024
ठाण्यातील डंम्पिंग विरोधात भाजपाचे आंदोलन

ठाण्यातील डंम्पिंग ग्राऊंड प्रकरणी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. याप्रकरणी ठाण्यात आंदोलन करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात येत आहे.

10:55 (IST) 9 Aug 2024
राज्यातील साडेचारशे जणांची दिव्यांग प्रमाणपत्रे बोगस? आमदार बच्चू कडू यांच्याकडून शोध अभियान

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) फसवणूक करून पूजा खेडकरने पद मिळवल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता राज्यातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय, निमशासकीय नोकरी मिळवलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आमदार बच्चू कडू यांनी राबवलेल्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियानातून सुमारे साडेचारशे जणांची यादी तयार झाली आहे.

सविस्तर वाचा…

10:54 (IST) 9 Aug 2024
बहिणीच्या उपचारासाठी शेअर बाजारातून मोठा नफा मिळविण्याचा प्रयत्न, पण सायबर भामट्यांनी केली फसवणूक

मुंबई : बहिणीच्या मुत्रपिंडाच्या आजारावर उपचार करण्यासाठी शेअर बाजारातून मोठा नफा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेची सायबर भामट्यांनी सुमारे ११.५० लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या फसवणुकीमुळे आजारी बहिणीने स्वतः साठवलेले पैसेही गेले.

वाचा सविस्तर…

10:53 (IST) 9 Aug 2024
पुणे : दारुसाठी पैसे मागण्याच्या वादातून अल्पवयीनांकडून गुंडाचा खून, रामटेकडी परिसरातील घटना

पुणे : दारूसाठी पैसे मागण्याच्या वादातून अल्पवयीनांकडून गुंडाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना मध्यरात्री हडपसर परिसरातील रामटेकडी परिसरात घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी पाच अल्पवयीनांना ताब्यात घेतले.

सविस्तर वाचा….

10:53 (IST) 9 Aug 2024
डाॅ. अजय तावरेची कारागृहात चौकशी करण्यास परवानगी

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्तनमुन्यात बदल केल्याप्रकरणी ससूनमधील डाॅ. अजय तावरे याची येरवडा कारागृहात जाऊन चौकशी करण्यास न्यायालयाने गुन्हे शाखेला परवानगी दिली. डाॅ. तावरेला रक्तनमुने बदल प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोेलिसांनी नुकतेच ९०० पानी आरोपपत्र दाखल केले. अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल आणि त्याची पत्नी शिवानी यांच्या सांगण्यावरून ससूनमधील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचा प्रमुख डाॅ. अजय तावरे, डाॅ. श्रीहरी हाळनोर यांनी रक्तनमुन्यात बदल केले. अल्पवयीन मुलाबरोबर असलेल्या दोन मित्रांच्या रक्तनमुन्यात बदल करण्यात आले.

अपघातानंतर विशाल अगरवालने बांधकाम व्यावसायिक मित्राशी संपर्क साधला. बांधकाम व्यावसायिक मित्राची सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याशी ओळख होती. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यामार्फत अगरवाल डाॅ. तावरेच्या संपर्कात आला. ससूनमधील शिपाई अतुल घटकांबळेला बाल न्याय मंडळाच्या आवारात तीन लाख रुपये देण्यात आले. त्यापैकी अडीच लाख रुपये डाॅ. हाळनोरला देण्यात आले. घटकांबळेने ५० हजार रुपये स्वत:कडे ठेवले. अगरवालचे परिचित अश्फाक इनामदार आणि अमर गायकवाड यांनी याप्रकरणात मध्यस्थाची भूमिका पार पाडली होती. मुलाला वाचविण्यासाठी शिवानीने तिचे रक्त दिल्याचे तपासात उघडकीस आले होते.

डाॅ. तावरेने पुराव्यात छेडछाड केली. डाॅ. तावरेच्या सांगण्यावरुन डाॅ. हाळनोरने रक्तनमुन्यात बदल केले. अगरवाल कुटुंबीयांनी रक्तनमुन्यात बदल करण्यासाठी चार लाख रुपये दिल्याचे सांगितले. अडीच लाख रुपये डाॅ. हाळनोर याने घेतले. ५० हजार रुपये शिपाई घटकांबळने स्वत:कडे ठेवले. उर्वरित एक लाख रुपयांचे काय केले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

10:42 (IST) 9 Aug 2024
पुण्याच्या आयसिस मॉड्युलशी संबंधित असलेल्या दहशतवाद्याला दिल्लीत अटक

पुण्याच्या आयसिस मॉड्युलशी संबंधित असलेला मोस्ट वॉंटेड दहशतवाही रिझवान अब्दुलला अटक करण्यात आली आहे. त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. रिझवान हा राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मोस्ट वाँटेड यादीत होता. त्याच्यावर तीन लाख रुपयांचे रोख बक्षीस ठेवण्यात आले होते.

10:40 (IST) 9 Aug 2024
मर्सिडीज-बेंझचे प्रमुख म्हणाले, वाहतूक कोंडीमुळे कर्मचाऱ्यांचा रोज एक तास वाया जातोय

पुणे : चाकणमधील वाहतूककोंडीमुळे कर्मचाऱ्यांच्या प्रवासाचा रोजचा सुमारे एक तास वाढला आहे. त्यामुळे कंपनीला बसच्या वेळापत्रकात बदल करावा लागला आहे. प्रवासात एक तास अधिक वाढल्याने कर्मचाऱ्यांना कुटुंबाला वेळ देता येत नाही. त्याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आणि व्य़ावसायिक जीवनाच्या संतुलनावर होत आहे, अशी माहिती मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अय्यर यांनी गुरुवारी दिली.

वाचा सविस्तर…

10:40 (IST) 9 Aug 2024
पिंपरी : पवना बंदिस्त जलवाहिनीसाठी नव्याने आराखडा; खर्च किती कोटींवर?

पिंपरी : मावळातील पवना धरणातून निगडीपर्यंत बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याच्या प्रकल्पावरील राज्य शासनाने स्थगिती उठविल्यानंतर वर्षभराने महापालिकेने बंदिस्त जलवाहिनीसाठी नव्याने आराखडा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे १६ वर्षांपूर्वी ३९८ कोटीत होणारा हा प्रकल्प आता एक हजार कोटींपर्यंत जाणार असल्याचा अंदाज आहे.

वाचा सविस्तर…

10:39 (IST) 9 Aug 2024
मेघेंचा रामराम, अग्रवालही रांगेत, बालेकिल्ल्यातच भाजपला धक्के

नागपूर : बालेकिल्ला असलेल्या पूर्व विदर्भात भाजपला विधानसभा निवडणुकीपूर्वी धक्के बसायला सुरुवात झाली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे उदय मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर गोंदिया जिल्ह्यातील भाजप नेते व फडणवीस यांचे निकटवर्तीय गोपाल अग्रवाल हे सुद्धा काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. याशिवाय शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरचे काही नेतेही काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे.

वाचा सविस्तर…

10:36 (IST) 9 Aug 2024
“महाराष्ट्रातल्या घाणेरडं राजकारणाचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस”; संजय राऊतांची टीका

महाराष्ट्रात घाणेरडं राजकारण सुरु झालं आहे. या राजकारणाचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस, भाजप आणि अमित शाह आहे, अशी संजय राऊत यांनी केली आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रात घाणेरडं राजकारण सुरु झालं आहे. या राजकारणाचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस, भाजप आणि अमित शाह आहे, अशी संजय राऊत यांनी केली आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

 

गुरुवारी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महायुतीचे इतर नेतेही उपस्थित होते.