Marathi News Live Update : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. युत्या आणि आघाड्यांमध्ये जागावाटपावर चर्चा चालू आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी भाजपाने त्यांच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत भाजपाने अनेक दिग्गजांचं तिकीट कापलं आहे, तर नव्या चेहऱ्यांना संधीदेखील दिली आहे. अशातच आता काँग्रेससह इतर पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या समोर येतील. वेगवेगळे पक्ष देशभर निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करू लागले आहेत. दिवसभर याबाबतच्या राजकीय बातम्यांवर आपलं लक्ष असेल. तसेच दिल्लीच्या वेशीवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Breaking News Live 04 March 2024 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या
वर्धा : सेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख म्हणून नीलेश धुमाळ यांची नियुक्ती झाली आहे. नियुक्ती पासूनच त्यांचा कारभार वादग्रस्त असल्याचा आरोप प्रमुख निष्ठावंत सेना नेते करीत आहे.
यवतमाळ : देखरेख आणि सनियंत्रण करणाऱ्या प्रकल्प अधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांना चक्क नोटांचा हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला.
नागपूर : भारतात मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ करण्यात येणार आहे. त्यावरून अबू आझमी यांनी टीका केली. मुलगा किंवा मुलगी १८ वर्षांचे झाले की त्यांना मतदानाचा अधिकार आहे.
नागपूर : शासकीय अनुदान प्राप्त शाळांमध्ये नोकरी देताना लिंग आधारित भेदभाव करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे मुलींच्या शाळांमध्ये पुरुषांना नोकरी नाकारणे चुकीचे ठरेल, असे मत एका प्रकरणाचा निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केले.
भंडारा : निवडणूक जातीच्या गणितांवर होऊ नये, असे कितीही म्हटले जात असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीत जातकारण येतेच. याबाबत भंडारा-गोंदिया मतदारसंघ अधिक संवेदनशील आहे. या मतदारसंघात कुणबी, पोवार, तेली आणि अनुसूचित जातीचा प्रभाव असून विकासाच्या नाही तरी जातीच्या आधारावर येथील निवडणुकीची समिकरणे जुळविली जातात.
पुणे : मानाची पालखी, फुलांची उधळण आणि मिरवणूक असे दृश्य सण-उत्सवांना पाहावयास मिळते. मात्र, इतिहास प्रेमी घडविणारे पुण्यातील रमणबाग शाळेतील शिक्षक मोहन शेटे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकाची चक्क पालखीतून मिरवणूक काढली.
नागपूर : शहरातील तरूण टेबलटेनिसपटू जेनिफर वर्गीसने आंतरराष्ट्रीय टेबलटेनिस स्पर्धेत अंडर-१७ आणि अंडर-१९ वयोगटात रौप्य पदकाची कमाई केली आहे.
मुंबई : राज्यात १७ हजार पोलिस शिपायांची भरती करण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती. परंतु भरती जाहीर होत नसल्याने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांची धाकधुक वाढली होती. अखेर सरकारने भरती जाहीर केली आहे. राज्यभरात पोलिस शिपाई पदासाठीची अर्ज प्रक्रिया मंगळवारपासून (ता. ५) सुरू होत आहे.
नागपूर : महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा लवकरच संपणार असून येत्या ८-१० दिवसात याबाबत निर्णय होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे सांगितले.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय परिसराजवळील विद्यापीठाच्या मैदानावर भारतीय जनता युवा मोर्चाच्या ‘राष्ट्रीय नमो युवा संमेलन’ सोमवारी होत आहे. शैक्षणिक परिसरातील मैदानात राजकीय पक्षाचा कार्यक्रम होत असल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
नागपूर : महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात राज्यातील महावितरण, महानिर्मिती, महापारेषणमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी दोन दिवस संप केला. त्यानंतरही त्यांच्या मागणीकडे कुणी लक्ष दिले नसल्याने हे कर्मचारी ४ मार्चच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जात आहे.
नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरून निलंबित करण्याच्या कारवाईला व विभागीय चौकशीकरिता निर्धारित दोषारोपांना डॉ. सुभाष चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते.
नागपूर : नागपूरसह राज्यात सोन्याचे दर वाढण्याचा क्रम थांबत नाही. २७ फेब्रुवारीच्या तुलनेत नागपुरात ५ मार्चला सोन्याच्या दरात २४ कॅरेटमध्ये तब्बल १ हजार २०० रुपये प्रति दहा ग्राम वाढ झाली.
भंडारा : स्पर्धा परीक्षेत अधिक गुण मिळवून यादीत नाव नसल्याने अन्याय झालेल्या भंडारा जिल्ह्यातील अड्याळ येथील एका विद्यार्थ्याने निवड प्रक्रियेवर आक्षेप नोंदवित संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे येथे थेट तक्रार दाखल केली आहे.
वर्धा : बोर प्रकल्पच्या बफर झोन मध्ये रेहकी गावात बिबट्याने हैदोस माजविला आहे. गत दोन दिवसात चार वासरांचा बळी गेला.
मुंबई : गिरण्यांच्या जमिनीवर साकारण्यात येणाऱ्या गृहयोजनेत १ ऑक्टोबर १९८१ पर्यंत काम करणाऱ्या गिरणी कामगारांना सामावून घ्यावे अशी मागणी गिरणी कामगार कर्मचारी निवारी आणि कल्याणकारी संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. त्यासाठी गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितीसाठी १ ऑक्टोबर १९८१ अशी पात्रता मुदत ठेवण्याची मागणी आहे.
पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीवरून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले असतानाच डॉ. कोल्हे यांनी पवार यांना डिवचले आहे.
डोंबिवली : येथील पूर्व भागातील मानपाडा रस्त्यावरील शंखेश्वर गृहसंकुलात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याचा प्रकार ठाणे येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या अधिकाऱ्यांनी उघडकीला आणला आहे. या प्रकरणात नवी मुंबईतील उलवे येथील मसाज केंद्र चालविणाऱ्या महिले विरुध्द पोलिसांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.
नागपूर : शहरातील सर्वाधिक अपघात प्रवणस्थळ नावाने ओळखल्या जाणारा रस्ता म्हणजे अशोक चौक. हा चौक दररोज अपघाताला निमंत्रण देतो.
नागपूर: देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सत्ताधारी भाजपने त्यासाठी तयारी यापूर्वीच सुरू केली आहे. दोनच दिवसांपूर्वी पक्षाने १९५ उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. नेत्यांचे दौरे वाढले आहे. पाचच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याला भेट दिली होती.
मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अमरावती येथील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव नजीकच्या पुलाला मोठा खड्डा पडला आहे. या खड्डयाच्या दुरुस्तीचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतले आहे, तर दुसरीकडे या खड्डयाच्या तांत्रिक चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंबंधीचा अहवाल सादर झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात म्हणजेच शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) मोर्चेबांधणी चालू केली आहे. याअंतर्गत त्यांनी मतदासंघात आज सभा घेतली. या सभेत अजित पवार म्हणाले, अभिनेता धर्मेंद्र, गोविंदा निवडणुकीला उभे राहतात, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा उभे राहतात, यांचा राजकारणाशी काय संबंध? या नटनट्यांचं राजकारणात काय काम? अमिताभ बच्चनदेखील निवडणुकीला उभे राहिले आणि निवडून आले. नंतर त्यांना वाटलं, हे राजकारण आपलं काम नाही आणि त्यांनी राजीनामा दिला. सगळं सोडून दिलं. शेवटी त्यांना त्या भागातली विकासाची कामं करायची आवड आहे का हे महत्त्वाचं असतं. एखादा नवीन माणूस आला तर सुरुवातीला थोडे दिवस आपल्याला बरं वाटतं. दिसायला चांगला… मिशांना पिळ दिला… राजबिंडा गडी पाहिला की आपण त्याला मत देतो. उमेदवारी देऊन, प्रचार करून त्यात आमच्याही चुका झाल्या आहेत. आम्हाला काही लोकांच्या मनातलं ओळखता आलं नाही. आम्हाला वाटलेलं की हा (खासदार अमोल कोल्हे) चांगला निघेल. पण त्याच्या डोक्यात काय चाललंय. हे कळायला काही मार्ग नाही. आता शिवजयंतीच्या दिवशी ते मला भेटले. मी त्यांना विचारलं, का हो डॉक्टर.. तुम्ही मागे म्हणाला होता की तुम्हाला राजीनामा द्यायचा आहे. आता तुम्ही परत दंड थोपटले? तर मला म्हणाले, ‘दादा जरा वाटायला लागलंय की आपण परत उभं राहावं.’ पण असं कसं चालेल? मुळात आपल्या मतदारसंघातील प्रश्न सुटले पाहिजेत. आपल्यासमोर महत्त्वाचे प्रश्न आ वासून उभे आहेत.
नागपूर: नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय मेळावा आज सोमवारी दुपारी होत आहे. त्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित राहणार होते.
मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अमलीपदार्थ तस्कर अली असगर शिराझी विरोधात आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. शिराझीसह इतर साथीदार व त्यांच्याशी संबंधीत कंपन्यांच्या नावांचाही समावेश आरोपपत्रात करण्यात आला आहे. विशेष न्यायायलय आज या प्रकरणाची दखल घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नागपूर : सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली असून, तब्बल ३४ वर्षांनंतर देशात नवे शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून नवे शैक्षणिक धोरण लागू केले जाणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदलही करण्यात आले आहेत.
बुलढाणा : आमदार संजय गायकवाड म्हणजे राजकीय क्षेत्रातील अजब रसायनच. वादग्रस्त विधाने, वादंग आणि आता थेट मारहाण याची जोड, ही त्यांच्या राजकारणाची तऱ्हा राहिली आहे आणि त्यात सुधारणा होण्याची शक्यतचा कमीच आहे. कारण आहे त्यांचे आक्रमक राजकारण.
पुणे : भरधाव दुचाकी घसरून दुचाकीवरील सहप्रवासी शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगदा परिसरात घडली.
वसई : भूमाफियांसोबत पब मध्ये केलेली पार्टी आणि तरुणींसोबत केलेले नृत्य पालिकेच्या दोन अभियंतांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालिकेने त्यांची तडकाफडकी हकालपट्टी केली आहे.
नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांच्या नवनव्या करामती दररोज समोर येत आहेत. या व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील प्राचीन रामदेगी मंदिरात नेहमीच वाघोबा हनुमानाचे दर्शन घेताना दिसून येतात.
“सुनेत्रावहिनी तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर अब्रू नुकसानीचा खटला दाखल कराच”, ‘या’ कारणामुळे ठाकरे गटाचा सल्ला
अजित पवार यांनी जुलै २०२३ या महिन्यात महायुतीसह जात सत्तेत सहभागी होणं पसंत केलं. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक आमदारही गेले. त्यांचं हे बंड यशस्वी ठरलं आणि राष्ट्रवादीत फूट पडली. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाने सामनामध्ये भाजपाच्या मांडीवर या शीर्षकाखाली अग्रलेख लिहून अजित पवारांवर आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. एवढंच नाही तर सुनेत्रा वहिनींनी देवेंद्र फडणवीसांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा असंही म्हटलं आहे.
राज्य बँक घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांना तुरुंगात चक्की पिसायला पाठवणार होते. त्यांनी तो आत्मनिर्धारच केला होता. त्या घोटाळ्याचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुंडाळला. अजित पवारांविरोधात पोलिसांना काहीही ठोस सापडलं नाही. अजित पवारांच्या कथित बँक घोटाळ्यावर फडणवीस यांनी तांडव केले होते. महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा पवारांनी आणि त्यांच्या गँगने लुटल्याचा आरोपच नाही तर आपल्याकडे पुरावे असल्याचे ते सांगत होते. आता या पुराव्यांचे काय झाले? हे पुरावे गिळून ढेकर दिला की आणखी काही केले?
भ्रष्टाचार-भ्रष्टाचार असे ओरडत राहून जमिनीवर काठ्या आपटायच्या आणि माहौल निर्माण करायचा हे यांचे धंदे आहेत. तिसरा पर्याय म्हणजे समाजसेविका सुनेत्रा पवार यांनी त्यांचे पती अजित पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी, कुटुंबास मनस्ताप देऊन काकांच्या पाठीत सुरा खुपसण्यास भाग पाडल्याच्या सबबीखाली देवेंद्र फडणवीस व त्यांच्या लोकांवर अब्रू नुकसानीचा खटलाच चालवायाला हवा. कुणीही उठायचे आणि बदनामीचा चिखल उडवायचा हे बरे नाही. असा उल्लेख सामनात करण्यात आला आहे.