Maharashtra News: आज नवीन वर्षाची (२०२५) सुरुवात झाली आहे. तसेच कोरोगाव भीमा (Koregaon Bhima Shaurya Din) या ठिकाणी आज (१ जानेवारी) २०७ वा शौर्य दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा या ठिकाणी विजयस्तंभाला लाखो अनुयायींनी अभिवादन केलं आहे. याबरोबरच गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील मस्सोजग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरु आहे. या घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे तर काही आरोपी अद्याप फरार आहेत, त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत. तसेच खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. त्यानंतर कराडला केजच्या न्यायालयात दाखल करण्यात आलं असता १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. यासह राज्यातील राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Marathi News Live Updates : राज्यातील राजकीय आणि इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
वंचित बहुजन आघाडीचे जागरण गोंधळ आंदोलन आदिवासींच्या जमिनीवर होणारा प्रकल्प इतरत्र हलवला
कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू शिवारातील गट नंबर 143 आणि 144 या गायरान जमिनीमध्ये राहत असलेल्या आदिवासी पारधी समाजाचे घरे काढून त्या ठिकाणी सोलर प्रकल्प उभा करण्याचा घाट घातला आहे या झालेल्या अन्याया विरोधात व कर्जत येथील भुमी अभिलेख कार्यालय मध्ये कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबत वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने कार्यालयाच्या बाहेर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या दणक्यानंतर सौर प्रकल्प आदिवासींच्या घरी असलेल्या जागेमध्ये न करता इतरत्र हलवण्यात आला. यावेळी या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता अँड अरुण (आबा) जाधव यांनी उपस्थित राहून भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा चांगलेच धारेवर धरले होते. या आंदोलनामध्ये तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे, जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे आणि जिल्हा महासचिव तुकाराम पवार , जिल्हा उपाध्यक्ष दीपक ससाने, लखन पारसे ,निमगाव डाकू येथील अन्यायग्रस्त परिवारांसह राजु शिंदे, राहुल पवार, राहुल काळे, शुभांगी गोहेर, शितल काळे, विजया काळे, सुनीता काळे, कौसाबाई काळे, उज्वला काळे, पुनम काळे,दिशेना पवार,सर्वेनाथ काळे, सागर पवार, निलेश काळे पिंटू पवार यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गडचिरोलीच्या विकासाचे नवे पर्व सुरू…. मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने…..
वर्षाच्या पहिल्या दिवशी गडचिरोलीमध्ये अनेक प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली गेली. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातला शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा म्हणून आता ओळखला जाणार आहे. गडचिरोलीपासूनच महाराष्ट्राची सुरूवात होते. सविस्तर वाचा…
२१ दिवस, ३०० किलोमीटर आणि तीन राज्यातून वाघिणीचा प्रवास…आता तिला…..
महाराष्ट्र ते ओडिशा असे कृत्रिम स्थलांतर आणि ओडिशा ते पश्चिम बंगाल व्हाया झारखंड असा नैसर्गिक प्रवास करणारी ‘झीनत’ या वाघिणीला मंगळवारी मध्यरात्रीनंतर ओडिशाच्या सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्पात परत आणण्यात आले. सविस्तर वाचा…
अमरावती : पाच गुंडांकडून युवकाची तलवारीने हत्या….सरत्या वर्षाच्या अखरेच्या दिवशी…
अवैध व्यवसाय करणाऱ्या पाच गुंडांनी एका युवकाची तलवारीने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना पथ्रोट पोलीस ठाणे हद्दीतील शिंदी बु. येथे सरत्या वर्षाच्या रात्री घडली. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदविला असून मारेकरी अद्याप गवसलेले नाहीत.
निवडणूक होताच सरकारला आश्वासनाचा विसर…वैमानिक प्रशिक्षणार्थींसमोर मोठे संकट…
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (महाज्योती) राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील युवकांना वैमानिक प्रशिक्षण देण्याची महत्त्वपूर्ण योजना सुरू केली. देशभरातून या योजनेचे कौतुकही झाले. सविस्तर वाचा…
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या……
नागपुरात ३१ डिसेंबर २०२४ च्या तुलनेत १ जानेवारी २०२५ रोजी सोन्याच्या दरात किंचित वाढ झाल्याचे दिसत आहे. ही वाढ २४ कॅरेटमध्ये ६०० रुपये, २२ कॅरेटमध्ये ५०० रुपये, १८ कॅरेटमध्ये ५०० रुपये, १४ कॅरेटमध्ये ४०० रुपये प्रति दहा ग्राम इतकी आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन, सरकारचा मोठा निर्णय
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. यादरम्यान महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली आहे.
प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन
नाशिक : प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी शेतकरी संघर्ष संघटनेच्या वतीने नि:शुल्क कर्जमुक्ती अभियानानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मोठ्या उद्योगपतींना कर्जप्रकरणी दिलासा देण्यात येतो, त्याचप्रमाणे छोट्या उद्योग, व्यावसायिकांनाही दिलासा द्यावा, सक्तीची कर्ज वसुली थांबवावी, वसुली अधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण देऊ नये, कलम १४ चे आदेश देणे त्वरीत बंद करावे, कर्जदारास कर्जमुक्त करावे, कर्ज खात्याच्या अनुषंगिक छुप्या खर्चावर पूर्णत: बंदी घालावी, सरफेसी कायदा २००२ मुळे तीन हप्ते न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाते. यामुळे बरेच लोक बेघर होत आहेत. या कायद्यामुळे अनेक जण आत्महत्या करत आहेत. हा कायदा रद्द करण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
कंपनीची साडेतीन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा
मुंबई : दादर येथील कंपनीची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली शिवाजी पार्क पोलिसांनी कंपनीच्या एका अधिकाऱ्यासह दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तक्रारदार वैशाली धोटे यांची सोना इंडस्ट्रीज लि. नावाची कंपनी असून त्यामार्फत छपाईसाठी वापरण्यात येणारा डाईज व पिगमेंट्सची निर्मिती केली जाते.त्यासाठी कंपनीकडून कॉपर स्क्रॅपची आयात करण्यात येते. ते त्रयस्थ कंपन्यांना पाठवून त्याद्वारे कंपनीसाठी आवश्यक कच्चा माल तयार करून तक्रारदारांच्या कंपनीला पाठवण्यात येतो. तक्रारीनुसार, आरोपी खरेदी व्यवस्थापक व बगळुरू येथील व्यक्तीने संगनमत करून ८० मेट्रीक टन कॉपर स्क्रॅप मालदिव येथून मुंबईत आलेला नसतानाही बनावट कागदपत्रांद्वारे तो मुंबईतील बंदरात आल्याचे भासवले. त्या बदल्यात तक्रारदार कंपनीकडून साडेतीन कोटी रुपये घेतले. त्यानंतर कच्चा माल व त्याबदल्यात घेतलेली रक्कम दिली नाही, असा आरोप आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस अधिक तपास करीत आहेत.
‘वाल्मिक कराडच्या आश्रयदात्यांची चौकशी करा’, शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून पोलिसांना निवेदन
पुणे : बीडमधील पवनचक्की उद्योजकाकडे खंडणी मागितल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराड याच्या पुण्यातील आश्रयदात्यांची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेकडून (उद्धव ठाकरे गट) करण्यात आली आहे. याबाबत पक्षाच्या शिष्टमंडळाने विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांना निवेदन दिले.
खंडणी प्रकरणात गेले २२ दिवस पसार झालेला कराड मंगळवारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या ( सीआयडी ) पुणे कार्यालयात हजर झाला. बीडमधील केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता. त्यानंतर तो अनेक दिवस पुण्यातच वास्तव्याला होता. सीआयडी कार्यालयात कराडला घेऊन बीडमधील नगरसेवक आले होते. पसार झालेल्या कराडला आश्रय देणाऱ्यांची चौकशी व्हायला हवी, असे निवेदनात म्हटले आहे.
बसस्थानकावरच महिलांमध्ये हाणामारी…केस धरून ओढत….
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी बसस्थानक परिसरात चार महिला आणि तरुणींमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. या घटनेची चित्रफीत सध्या समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे.
"शरद पवार-अजित पवार एकत्र आले तर...", प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
आता नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी विठूरायाला दोन्ही पवार एकत्र येऊ दे असं साकडं घातलं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "आम्ही शरद पवारांना सदैव दैवत मानत आलेलो आहोत. आम्ही राजकीय वेगळा मार्ग स्वीकारला असला तरीही आम्हाला शरद पवारांबद्दल सदैव आदर राहिलेला आहे आणि जर शरद पवार व अजित पवार एकत्र आले तर आम्हाला आनंदच वाटेल", असं खासदार प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे.
जहाजांवरील सहा कोटींच्या साहित्याचा अपहार, शिवडी पोलिसांकडून ११ जणांविरोधात गुन्हा
मुंबई : नवी दिल्लीतील कंपनीच्या दोन जहाजांवरील साहित्याचा अपहार करून कंपनीचे सहा कोटींचे नुकसान झाल्याच्या आरोपाखाली शिवडी पोलिसांनी ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
निवडणूक होताच सरकारला आश्वासनाचा विसर…वैमानिक प्रशिक्षणार्थींसमोर मोठे संकट…
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (महाज्योती) राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील युवकांना वैमानिक प्रशिक्षण देण्याची महत्त्वपूर्ण योजना सुरू केली. देशभरातून या योजनेचे कौतुकही झाले. सविस्तर वाचा…
राज्यभरात कुत्रे, मांजर, माकडांमुळे नागरिक त्रस्त… चावा घेतल्याने…
राज्यातील अनेक भागात कुत्रे, मांजर पाळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कुटुंबातील सदस्या प्रमाणेच या प्राण्यांना सांभाळले जाते. परंतु राज्यातील अनेक भागात कुत्रे, मांजर, माकडांसह इतर प्राण्यांमुळे नागरिक त्रासले आहे. मागील तीन वर्षांची आकडेवारी बघता या प्राण्यांनी चावा घेतलेल्या नागरिकांची संख्या तिप्पट वाढली आहे. सविस्तर वाचा…
नागपूरकरांना नवीन वर्षाची भेट, महापालिकेकडून ‘या’ महत्वाकांक्षी योजनेला सुरुवात
नागपूरकर जनतेला नागपूर महापालिकेद्वारे नवीन वर्षाची अनोखी भेट देण्यात येत आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात पाणी देयकामधील ८० टक्के विलंब शुल्क माफ करण्याची महत्वाकांक्षी योजना महापालिकेने सुरू केली आहे. सविस्तर वाचा…
धक्कादायक! नापास का होतोस? असे विचारले म्हणून मुलाने आई-वडिलांनाच संपवले..
इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारा मुलगा वारंवार नापास होत असल्यामुळे आई-वडिलांनी त्याला याबाबत विचारणा केली. आईवडिलांचे हे विचारणे सहन न झाल्याने मुलाने आईवडिलांचा खून केला. अगदी क्षुल्लक कारणावरुन मुलाने धक्कादायक पाऊल उचलल्यामुळे आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. सविस्तर वाचा…
उच्च न्यायालयात सफाई कामगाराची जागा, पगार तब्बल ५२ हजार…
मुंबई उच्च न्यायालय परिसराची स्वच्छता करण्यासाठी सफाई कामगाराच्या जागेबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या मुख्य खंडपीठाचा परिसर तसेच शौचालय स्वच्छ करण्याचे कार्य यात दिले जाणार आहे. सविस्तर वाचा…
नवीन वर्षाचा पहिलाच दिवस अन् मुख्यमंत्र्यांचा पहिला दौरा .. दुर्गम भागातील..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवीन वर्षात पहिल्याच दिवशी नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्यात गेले. एका शाळेतील मुलांशी त्यांनी संवादही साधला. आपल्याला गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायला आवडेल, असे फडणवीस म्हणाले होते. सविस्तर वाचा…
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे…‘या’ गाड्यांमध्ये आजपासून झाले बदल
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून धावणाऱ्या पॅसेंजर व मेमू विशेष गाड्या आता नियमित क्रमांकासह चालवल्या जात आहेत. या बदलाची अंमलबजावणी आज, १ जानेवारीपासून सुरू करण्यात आली. मध्य रेल्वे मार्गावरील पॅसेंजर व मेमू रेल्वे गाड्यांना आजपासून नियमित क्रमांक प्राप्त झाले. सविस्तर वाचा…
चंद्रपूर – नागपूर मार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघे ठार
नातेवाईकांची भेट घेऊन, हॉटेलात जेवण करून वणी या स्वगावी परत जात असतांना समोरून येणाऱ्या ट्रकवर दुचाकी आदळून सतीश भाऊराव नागपुरे (५१), मंजुषा सतीश नागपुरे (४७) व माहिरा राहुल नागपुरे या तीन जणांचा मृत्यू झाला. अपघाताची ही दुर्देवी घटना नागपूर – चंद्रपूर मार्गावरील डाली पेट्रोलपंप समोर मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. सविस्तर वाचा…
सायबर सुरक्षेसाठी आता ‘यूजीसी’चे अभियान, महाविद्यालयांना…
डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला असताना त्याचे धोकेही समोर आले आहेत. विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या युगात संगणक हाताळताना सुरक्षित राहता यावे, वेळीच त्याचे चांगले-वाईट परिणाम ओळखता यावे, यासाठी देशभरातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी सायबर सुरक्षेसाठी अभियान राबवावे, असे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत. सविस्तर वाचा…
नाशिकमध्ये सराईत गुन्हेगाराची हत्या, तीन जण ताब्यात
नाशिक : शहरातील उंटवाडी येथे सराईत गुन्हेगाराची मंगळवारी रात्री हत्या करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत गुन्ह्यातील संशयितांना ताब्यात घेतले.
घाटकोपरमध्ये २१ लाख रुपयांचा अनधिकृत गुटखा जप्त, दोघांना अटक
मुंबई: गुजरातमधून गुटखा घेऊन मुंबईत आलेले दोन टेम्पो टिळकनगर पोलिसांनी घाटकोपरच्या छेडा नगर परिसरातून ताब्यात घेतले. या दोन्ही टेम्पोमधून पोलिसांनी २१ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला असून याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही टेम्पो चालकांना अटक केली.
पुन्हा तीन महिन्यांसाठी टँकर बंदी! प्रदूषण रोखण्यासाठी पुन्हा सोप्या पर्यायाची निवड
अंबरनाथ: नैसर्गिक नदी, नाल्यांमध्ये थेट सोडले जाणारे प्रक्रिया न केलेले रासायनिक सांडपाणी आणि प्रदूषण रोखण्यात कायमच अपयशी ठरलेल्या प्रशासनाने अनेकदा सोपे मार्ग निवडले आहेत. यापूर्वी असे प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासन १२ तास टँकर बंदीचा मार्ग अवलंबला होता.
मयताचे शीर घेऊन मारेकरी पोलीस ठाण्यात हजर
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ननाशी दूरक्षेत्र येथे भरवस्तीत बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून एकाची कुऱ्हाडीचे वार करुन हत्या करण्यात आली. हत्येनंतर संशयित मयताचे शीर घेऊन कुऱ्हाडीसह पोलीस ठाण्यात पोहोचल्याने पोलीसही हादरले.
घाटकोपरमध्ये २१ लाख रुपयांचा अनधिकृत गुटखा जप्त, दोघांना अटक
मुंबई: गुजरातमधून गुटखा घेऊन मुंबईत आलेले दोन टेम्पो टिळकनगर पोलिसांनी घाटकोपरच्या छेडा नगर परिसरातून ताब्यात घेतले. या दोन्ही टेम्पोमधून पोलिसांनी २१ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला असून याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही टेम्पो चालकांना अटक केली.
शहरातून ७४ नायलाॅन मांजा विक्रेते हद्दपार, पोलीस आयुक्तांची कारवाई
नाशिक : नायलाॅन मांज्यामुळे होणारे अपघात लक्षात घेत पोलीस आयुक्तांच्या आदेशाने आयुक्तालय हद्दीत ७४ नायलॉन मांजा विक्रेत्यांविरुध्द प्रथमच हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. मकरसंक्रांतीला शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पतंगबाजी केली जाते. संक्रांतीला अजून काही दिवसांचा अवधी असतानाही पतंगप्रेमी पतंगी उडवू लागले आहेत.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची दर्शनासाठी गर्दी; मध्यभागात कोंडी
पुणे : नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली. शहर, तसेच उपनगरातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आल्याने छत्रपती शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता तसेच परिसरातील गल्ली बोळात कोंडी झाली.
पुणे स्टेशन परिसरात प्रवासी तरुणाला लुटले; रिक्षाचालकासह साथीदाराविरुद्ध गुन्हा
पुणे : प्रवासी तरुणाला धमकावून रिक्षाचालक आणि साथीदारांनी सहा हजारांची रोकड लुटून नेल्याची घटना घडली. पुणे रेल्वे स्थानक परिसरातून रिक्षाचालकाने तरुणाला सोडण्याच्या बहाण्याने त्याला निर्जन ठिकाणी नेऊन लुटल्याचे उघडकीस आले आहे .याप्रकरणी रिक्षाचालकासह साथीदारांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.