Maharashtra Politics LIVE Updates: बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सध्या चालू असून प्रमुख आरोपी वाल्मिक कराडवर सध्या सगळ्यांचंच लक्ष केंद्रीत झालं आहे. वाल्मिक कराडचं एक सीसीटीव्ही फूटेज नुकतंच समोर आलं असून त्यात खंडणी मागण्यासाठी जाताना वाल्मिक कराडसोबत इतर आरोपीही दिसत आहेत. एकीकडे या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असताना दुसरीकडे सैफ अली खानवरील हल्ला आणि त्याचा हल्लेखोर यासंदर्भात मोठी चर्चा सध्या पाहायला मिळत आहे.
Marathi Live News Update Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
‘बांगलादेशींचे संकट दारापर्यंत’- नागरिकांनी सतर्क रहावे; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
पुणे : ‘चित्रपट अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेला हल्ला, तसेच आपल्या आजुबाजूला वावरणारे फेरीवाले बांगलादेशी असू शकतात. बांगलादेशींचे संकट आपल्या दारापर्यंत पोहोचले असून, नागरिकांनी सतर्क रहावे. संशयितांची माहिती त्वरीत पोलिसांना द्यावी’, असे आवाहन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केले.
Aaditya Thackeray on Davos: काही गोष्टी लवकरच समोर येतील - आदित्य ठाकरे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असून तिथे होत असलेल्या करारांबाबत राजकीय वर्तुळात चर्चा पाहायला मिळत आहे. त्याबाबत बोलताना आदित्य ठाकरेंनी सूचक वक्तव्य केलं आहे. "दावोसच्या काही घडामोडींवर आमचा अभ्यास चालू आहे. त्यावर लवकरच तुमच्यासमोर काही गोष्टी येतील", असं ते म्हणाले आहेत.
Aaditya Thackeray on Fadnavis Government: जेवढे आमदार हवेत तेवढे घ्या, पण जनतेची कामं करा - आदित्य ठाकरे
विरोधी पक्षातील काही आमदार सत्ताधारी गटात जाणार असल्याच्या चर्चा चालू असताना त्यावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. "जेवढे आमदार तुम्हाला घ्यायचेत तेवढे घ्या. पण जनतेची कामंही करा. ईव्हीएमनं एवढं बहुमत दिलं आहे. पण काम कधी करणार तुम्ही? महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कधी इतकी घाणेरडी नव्हती. फोडाफोडीचं राजकारण केलं गेलं. महाराष्ट्रात भाजपानं फक्त विषाचं, फोडाफोडीचं राजकारण आणलेलं आहे. फोडाफोडीचं राजकारण करायचं तर करा. पण जनतेला तुम्ही जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करा", असं ते म्हणाले.
‘बांगलादेशींचे संकट दारापर्यंत’- नागरिकांनी सतर्क रहावे; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
पुणे : ‘चित्रपट अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेला हल्ला, तसेच आपल्या आजुबाजूला वावरणारे फेरीवाले बांगलादेशी असू शकतात. बांगलादेशींचे संकट आपल्या दारापर्यंत पोहोचले असून, नागरिकांनी सतर्क रहावे. संशयितांची माहिती त्वरीत पोलिसांना द्यावी’, असे आवाहन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केले.
पुणे पोलिसांच्या पश्चिम प्रादेशिक विभागाकडून विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला तीन कोटी ८४ लाख रुपयांचा ऐवज ३०० तक्रारदारांना परत करण्यात आला. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी मुंबई-पुणे शहरातील बांगलादेेशी घुसखोर, त्यांच्या समस्येबाबत सूचक भाष्य केले.
त्र्यंबकेश्वरात उद्यापासून संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव
नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पौषवारीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून प्रशासनासह, देवस्थान, पोलीस आदींच्या नियोजनाने वेग घेतला आहे. निवृत्तीनाथांची पौषवारी अर्थात निवृत्तीनाथ यात्रा उत्सव २३ ते २७ जानेवारी या कालावधीत त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे.
"पुष्पक एक्स्प्रेस मुंबईला जात असताना जळगाव स्टेशन सोडल्यानंतर परांडा स्टेशनच्या आधी गाडीनं ब्रेक दाबला. तेव्हा चाकांमधून थोड्या ठिणग्या उडाल्या. दारात बसलेल्या प्रवाशांना वाटलं की आग लागली. त्यामुळे लोकांनी बाहेर उड्या टाकल्या. पण समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत होती. त्याखाली काही लोक चिरडले गेले. नेमके किती लोक होते माहिती नाही. पण काही लोकांनी सांगितलं की अंदाजे ९ ते १० लोक होते", अशी माहिती पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवास करणारे बाबा जाधव यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
ठाणे रेल्वे स्थानकात ८० हजार रुपयांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न; चोरट्याला पोलीस पथकाने केली अटक
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वेगाडीच्या डब्यात प्रवेश करत असताना गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवाशाच्या खिशातील ८० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरी करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. कल्याण वेलाप्पु (२१) असे अटकेत असलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
राज्यात एकाच दिवशी दोन वाघांचा मृत्यू
नागपूर : राज्यात वाघांच्या मृत्यूदरात झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी दोन वाघांच्या मृत्यूच्या घटना उघडकीस आल्या. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर वनपरिक्षेत्राअंतर्गत गिरड सहवनक्षेत्रात समुद्रपूर-गिरड महामार्गावर धोंडगावजवळ पहाटेच्या सुमारास जड वाहनाच्या धडकेत चार महिन्याच्या मादी बछड्याचा मृत्यू झाला.
तपासणीच्या नावाखाली लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केल्यास… अनिल देशमुखांचा इशारा
नागपूर : लाडक्या बहिणींचे मानधन २१०० रुपये कधी करणार ? असे विचारणा करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेले आहे.
गणराज्य दिन संचलनाचे विदर्भातील ५१ जण होणार साक्षीदार
नागपूर : गणराज्य दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथ होणाऱ्या संचलनाचे (परेड) साक्षीदार होण्यासाठी विदर्भातील ५१ जणांना संधी मिळणार आहे. त्यांंना केंद्र सरकारतर्फे विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.
कल्याणमधील वालधुनी येथील रेल्वेच्या जागेवरील शाळेला कारवाईची नोटीस; २८ जानेवारीपर्यंत शाळा रिकामी करण्याची सूचना
कल्याण - कल्याणमधील वालधुनी येथे रेल्वेच्या जागेवर मागील अनेक वर्षापासून एक इमारतीत एका संस्थेकडून शाळा चालविली जाते. ही शाळा रेल्वेच्या जागेत असल्याने रेल्वे प्रशासनाने शाळेला २८ जानेवारीपर्यंत शाळा रिकामी करण्याची नोटीस दिली आहे. या नोटिसीमुळे शाळा चालक, पालक, विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
'कोल्ड प्ले'साठी मुंबई-अहमदाबाद विशेष रेल्वेगाड्या
मुंबई : गेल्या आठवडाअखेरीस नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्पोर्ट्स स्टेडियममध्ये 'कोल्ड प्ले' कार्यक्रम पार पडला. आता २५, २६ जानेवारी रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने मुंबई - अहमदाबाददरम्यान चार विशेष वातानुकूलित रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
Supriya Sule Appeal to CM Devendra Fadnavis: महिलेचे चित्रीकरण, सुप्रिया सुळेंचा संताप!
पुण्यात एका महिलेचं तिच्या परवानगीशिवाय करण्यात आलेलं चित्रीकरण चर्चेचा विषय ठरला असून त्यावर सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केलं आहे. " पुण्यातील शुक्रवार पेठ परिसरात राहणाऱ्या एका महिलेचे एका व्यक्तीने तिच्या परवानगीशिवाय चित्रण करुन ते समाजमाध्यमांत अपलोड केले. यामुळे सदर महिला अतिशय तणावाखाली आहे. त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. हे व्हिडिओ अपलोड करणाऱ्या व्यक्तीला लोकांनी पकडून पोलीसांत हजर केले असता त्याच्यावर कसलीही कारवाई करण्यात आली नाही. या व्यक्तीने अशा पद्धतीने इतरही काही महिलांचे व्हिडिओ अपलोड केले आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून हे घटनेने नागरीकांना दिलेल्या मुलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे.तरी मुख्यमंत्री महोदयांनी कृपया यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून पिडीतांना न्याय मिळवून द्यावा"
https://x.com/supriya_sule/status/1881992480532394422
आगामी निवडणुका युती म्हणूनच लढणार; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे स्पष्ट संकेत
दापोली : राज्यात महायुतीत नाराजी असल्याचे चर्चा सध्या रंगल्या आहेत. पालकमंत्रीपदावरून धुसफूस सुरू आहे. मात्र या सगळ्या नाराजीच्या चर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळल्या आहेत. अशातच शिवसेनेचे युवानेते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दापोली मतदार संघातील एका कार्यक्रमात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका या युती म्हणूनच एकत्र लढवल्या जातील असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुका आपण एकत्रच लढू आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही युतीचे पालन करून लढवल्या जातील. यामध्ये कोणतीही व कोणीही शंका बाळगण्याचं कारण नाही. पण तिथे देखील सगळं तोलून मापून मोजणी होणारच आहे. कोणी काम केलेय कोणी काम नाही केलेय आणि या सगळ्याचा रिपोर्ट मी द्यायच्या अगोदरच आपल्या पक्षामार्फत वरती पोहोचलेला आहे, असं सांगत उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांचे कामाचे योगेश कदम यांनी कौतुक केले.
‘स्मार्ट कार्ड’विना ‘एसटी’ प्रवास अडचणीचा
पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि इतर सवलतपात्र प्रवाशांना देण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट कार्ड’ यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना तात्पुरते कागदी पास देण्यात येत असून, अनेक ज्येष्ठ प्रवाशांकडे पास नसल्याने त्यांना प्रवासामध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पुणे: प्लास्टिक पिशव्या वापराचा दंड कमी करा, कोणी केल्या महापालिकेला सूचना ?
पुणे: प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांकडून वाढीव दराने दंड वसूल करण्यापेक्षा नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करु नये, यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरासाठीचा दंड कमी करण्याची आवश्यकता आहे, अशी सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे (एमपीसीबी) अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी महापालिका आयुक्तांना केली.
उपाययोजनांमुळे डिसेंबर महिन्यात अपघातामध्ये घट; प्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी हेमांगिनी पाटील
ठाणे : ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ज्या ठिकाणी सर्वाधिक अपघात होतात. त्याठिकाणांचे सर्वेक्षण केले. त्यानंतर २०२४ मध्ये डिसेंबर महिन्यात वाहतुक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) भरारी पथके संबंधित ठिकाणी तैनात करण्यात आले.
डोंबिवलीतील ६५ महारेरा प्रकरणातील बेकायदा इमारत नियमितीकरणाचे सहा प्रस्ताव फेटाळले
कल्याण - डोंबिवलीतील ६५ महारेरा प्रकरणातील सहा बेकायदा इमारतींमधील रहिवासी, विकासकांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाकडे इमारत नियमितीकरणासाठी अर्ज दाखल केले होते. इमारत नियमितीकरणासाठी लागणारी अत्यावश्यक कागदपत्रे रहिवासी नगररचना विभागात वेळ देऊनही दाखल करू शकले नाहीत.
मुंबईतील नायगाव पूर्व येथे वैयक्तिक वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. एक जण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांचे पथक तपासासाठी घटनास्थळी रवाना झाले आहे.
https://platform.twitter.com/widgets.jsMumbai, Maharashtra: A firing incident occurred in Naigaon East, reportedly due to a personal dispute. One person was injured and hospitalized. A team from the Crime Branch and local police has been dispatched to the site for investigation pic.twitter.com/aiwfTSmdDi
— IANS (@ians_india) January 22, 2025
तीर्थक्षेत्र दर्शनासाठी राज्याला अतिरिक्त रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा; कुंभमेळ्यामुळे गाड्यांची कमतरता
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या गाड्यांचे वेळापत्रक मार्च महिन्यापर्यंत पुन्हा पुढे ढकलले आहे.
‘महाकुंभ’ मेळ्यातील वाढत्या गर्दीमुळे महाराष्ट्रातील ट्रॅव्हल कंपन्यांकडून नियोजनाऐवजी मार्गदर्शन
मुंबई : भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या ‘महाकुंभ’ मेळ्याला उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये सुरुवात झाली असून देशातील विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. महाराष्ट्रातूनही प्रयागराजला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. महाकुंभ मेळ्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या ठिकाणी सोयी-सुविधांचा पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांवरही ताण येत आहे.
सविस्तर वाचा
भाईंदरच्या मलनि:सारण केंद्रात पडून एका कामगाराचा मृत्यू
भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेच्या मलनि: सारण केंद्रात पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात नवघर पोलिस ठाण्यात अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
१७ अभ्यासक्रमासाठी मॉक टेस्ट, मॉक टेस्टसाठी भरावे लागणार ५०० रुपये
मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देताना अनेक अडचणींचा सामाना करावा लागतो. यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षांसाठी यंदा प्रथमच १७ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मॉक टेस्टची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे परीक्षेच्या स्वरुपाबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळण्यास मदत होऊन त्यांच्या मनातील शंका व भीती दूर होण्यास मदत होणार आहे.
मुंबईतील जोगेश्वरी परिसरात अवैध अतिक्रमण हटवताना दगडफेकीची घटना घडली आहे. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
https://platform.twitter.com/widgets.js#breaking: A stone-pelting incident occurred in Mumbai's Jogeshwari area during the removal of illegal encroachments. Heavy police forces have been deployed, and efforts are ongoing to bring the situation under control pic.twitter.com/NJrBfB0UWC
— IANS (@ians_india) January 22, 2025
डोंबिवलीत कुंभारखाणपाडा येथे जलकुंभाच्या प्रस्तावित भूखंडावर बेकायदा बांधकामे
कल्याण : डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर, सरोवरनगर, कुंभारखाणपाडा, राजूनगर भागातील नागरिकांना दररोज पुरेसा पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून कुंभारखाणपाडा येथे तीन वर्षापूर्वी जलकुंभासाठी एक जागा स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून पालिकेकडून निश्चित करण्यात आली होती.
पुणे: पुढील २० वर्षांच्या प्रदूषणाचे नियोजन करा, प्रदूषण महामंडळाच्या सूचना !
पुणे : पुणे शहरातील पुढील २० वर्षांची प्रदूषणाची स्थिती नक्की कशी असेल, त्यावर महापालिका प्रशासनानचे नियोजन काय असेल, याचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला मंगळवारी केल्या आहेत.
उल्हासनगरात आणखी दोन बांगलादेशी पकडले,गुन्हे शाखा आणि विठ्ठलवाडी पोलिसांची कारवाई
उल्हासनगरः सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई महानगर प्रदेशातील बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न ऐरणीवर आला असून स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या झाडाझडतीत अनेक बांगलादेशी छुप्या पद्धतीने कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय राहत असल्याचे समोर येते आहे. नुकतेच उल्हासनगरात गुन्हे शाखा आणि विठ्ठलवाडी पोलिसांनी दोन बांगलादेशींना अटक केली असून दोघेही येथे काम करत वास्तव्यास होते.
कल्याणमध्ये इमारतीवरील सौरपट्ट्या साफ करताना तोल जाऊन मजुराचा मृत्यू
कल्याण - कल्याण पश्चिमेत एका इमारतीच्या गच्चीवर असलेल्या धुळीने भरलेल्या सौरपट्या साफ करण्याचे काम सोमवारी एक मजूर करत होता. ही साफसफाई करत असताना सौरपट्ट्यांच्या बाजुला उभा असलेला मजूर तोल जाऊन अचानक जमिनीवर कोसळला.
‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे रुग्ण आढळलेल्या भागात विहिरीतून पाणी ?
पुणे : ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे संशयित रुग्ण आढळलेल्या भागात पुणे महापालिकेच्या वतीने शुद्धीकरण केलेले पिण्याचे पाणी दिले जात नसल्याची माहिती समोर आली आहे. या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी धरणातून पाणी उचलून ते एका विहिरीत सोडले जाते. त्यानंतर हे पाणी नागरिकांना पुरविले जाते.
पुणे: मद्यालयात झालेल्या वादातून ग्राहकांना बेदम मारहाण; खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मद्यालयातील कामगारांविरुद्ध गुन्हा
पुणे : मद्यालयात बिल देण्यावरुन झालेल्या वादातून तीन ग्राहकांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मद्यालयातील १२ कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अभिनेता सैफ अली खान. (Photo- PR Handout)