Maharashtra Politics Updates : मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. विधान परिषदेतील शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे येथील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी शिंदे गट-भाजपा तसेच महाविकास आघाडी यांच्यात स्पर्धा लागली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांतील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्यामुळे ते आज परळी न्यायालयात हजेरी लावणार आहेत. त्यामुळे आज परळी तसेच औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. या यात्रेदरम्यान पत्रकार परिषदांच्या माध्यमातून राहुल गांधी मोदी सरकार तसेच भाजपावर निशाणा साधत आहेत. त्यामुळ आजदेखील या यात्रेदरम्यान राहुल गांधी महत्त्वाचे भाष्य करण्याची शक्यता आहे.

Live Updates

Maharashtra Latest News Live : राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर!

19:19 (IST) 18 Jan 2023
‘ते’ करत होते बिबट्याच्या अवयवांची तस्करी, अडकले वनखात्याच्या जाळयात

बिबट्याची शिकार करुन त्याचे अवयव वेगवेगळे करुन तस्करी होत असल्याची माहिती नागपूर वनविभागाला मिळाली. वडसा वनविभागासह संयुक्त पथक तयार करुन सापळा रचत गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील रामगडचे रहिवासी विनायक टेकाम, मोरेश्वर बोरकर, मंगलसिंग मडावी यांना ताब्यात घेण्यात आले.

सविस्तर वाचा...

18:34 (IST) 18 Jan 2023
पालिकांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, सर्वोच्च न्यायालयात फेब्रुवारीत सुनावणी

मुंबई : मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात प्रलंबित असलेल्या याचिकांवर आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. स‌र्वोच्च न्यायालयाने पुढील महिन्यात निवडणुकांना हिरवा कंदील दाखविला, तर एप्रिल-मे मध्ये त्या होऊ शकतील. अन्यथा पावसाळ्यामुळे त्या आणखी लांबणीवर जाण्याची चिन्हे आहेत.

सविस्तर वाचा...

18:09 (IST) 18 Jan 2023
सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून जिल्हा काँग्रेसमध्येच दुफळी

नगरः विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे व त्यांचे पुत्र निवडणुकीतील अपक्ष उमेदवार, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी घेतलेल्या भूमिकेवरून जिल्हा काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. डॉ. सुधीर तांबे यांच्यावर प्रदेश काँग्रेसने केलेल्या कारवाईला आव्हान देत पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला आहे. जिल्हाध्यक्ष साळुंखे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक समजले जातात.

सविस्तर वाचा..

17:28 (IST) 18 Jan 2023
नागपूर : दैनदिन प्रवसी संख्या एक लाखावर जाताच मेट्रोने घेतला ‘हा’ निर्णय

नागपूर : मेट्रोचे सर्व मार्ग वाहतुकीसाठी खुले होताच मेट्रोमध्ये प्रवाशांची संख्या दिवसाला एक लाखावर गेल्याने महामेट्रोने करोनाळात लागू केलेली तिकीट दरातील सवलत मागे घेतली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहे.

सविस्तर वाचा...

17:19 (IST) 18 Jan 2023
ठाणे : कर्जत- कसारा मार्गावरील रेल्वेगाड्यांचा विलंब सुरूच ; प्रवासी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

गेल्याकाही दिवसांपासून कर्जत आणि कसारा मार्गावरील उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतूक विविध कारणांमुळे विलंबाने होत आहे. या रेल्वेगाड्या दररोज सकाळी आणि रात्रीच्या गर्दीच्या वेळेत २० ते २५ मिनीटे उशीराने धावत असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भाच्या तक्रारी प्रवाशांकडून आल्यानंतर उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाने मध्य रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून आंदोलनाचा इशारा दिला आहे. सविस्तर वाचा…

17:13 (IST) 18 Jan 2023
यवतमाळ : देशी दारू दुकान हटवण्याची तक्रार मागे घेण्याचा मोह नगरसेवकाच्या अंगलट

यवतमाळ : देशी दारूचे दुकान हटवण्यासंदर्भात तक्रार मागे घेण्याच्या मोबदल्यात ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मारेगाव येथील प्रभाग क्र. १३ मधील नगरसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला. अनिल उत्तम गेडाम, असे आरोपी नगरसेवकाचे नाव आहे. यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज बुधवारी दुपारी मारेगाव-कान्हाळगाव मार्गावर ही कारवाई केली. या कारवाईने मारेगावात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा...

16:59 (IST) 18 Jan 2023
बुलढाणा : ...अन् वृद्ध कलावंत उतरले पैनगंगेच्या नदीपात्रात

मनमानी पद्धतीने करण्यात आलेल्या वृद्ध कलावंत निवड यादीच्या निषेधार्थ अन्यायग्रस्त वृद्ध कलावंतांनी आज पैनगंगा नदीपात्रात ठिय्या आंदोलन केले. यामुळे नदीकिनारी दाखल झालेल्या समाज कल्याण विभागाच्या पथकाने दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. सविस्तर वाचा…

16:42 (IST) 18 Jan 2023
मुंबई : म्हाडाच्या बाळकुम गृहप्रकल्पातील घरांच्या किंमतीत १६ लाखांची वाढ, पात्र विजेत्यांची न्यायालयात धाव

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २०१८ च्या सोडतीतील बाळकुम गृहप्रकल्पातील घरांच्या किमतीत १६ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली असून, या पार्श्वभूमीवर सुरू झालेला वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे.

सविस्तर वाचा...

16:29 (IST) 18 Jan 2023
डोंबिवलीत विद्यार्थ्याला बेदम मारहाण

डोंबिवली जवळील खंबाळपाडा येथील मंजुनाथ महाविद्यालयाच्या बाहेर एका विद्यार्थ्याला या भागातील दोन तरुणांनी मंगळवारी संध्याकाळी बेदम मारहाण केली. अचानक झालेल्या या प्रकाराने विद्यार्थी घाबरला होता. फरदीन पटेल, मोहीत अशी आरोपींची नावे आहेत. क्रीश मिश्रा असे तक्रारदार विद्यार्थ्याचे नाव आहे. सविस्तर वाचा…

16:07 (IST) 18 Jan 2023
ठाणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची कार्यालयांना पुन्हा टाळे; महापालिकेच्या प्रशासनाची कारवाई

पंचवार्षिक मुदत संपल्यामुळे गेल्या वर्षभरापासून प्रशासकीय राजवटीत कारभार सुरु असलेल्या ठाणे महापालिका मुख्यालय इमारतीमधील माजी पालिका पदाधिकाऱ्यांचा कार्यालयांमध्ये वावर सुरु असल्याचे चित्र होते. या मुद्द्यावरून टिका होऊ लागताच खडबडून जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने ही सर्वच कार्यालये बुधवारी पुन्हा बंद केली.

सविस्तर वाचा…

15:57 (IST) 18 Jan 2023
नागपूरमध्ये कॉंग्रेसचा घोळ काही संपेना, देशमुख यांचा शिक्षक भारतीला पाठिंबा

नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत कॉग्रेसचे समर्थन देण्यावरून घोळ काही संपलेला नाही. काल माजी मंत्री व आमदार सुनील केदार यांनी विमाशिचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना समर्थन जाहीर केले. पण त्या नेत्यांना तो अधिकार नाही, असे सांगत भाजपमधून कॉंग्रेसवासी झालेले माजी आमदार आशिष देशमुख  शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांना पाठिंबा जाहीर केला. सविस्तर वाचा…

15:32 (IST) 18 Jan 2023
नागपूरमध्ये भाजप अंतर्गत धुसफूस 

शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत भारतीय जनता पक्षात सर्वच काही आलबेल आहे,असे चित्र नाही. शिक्षक परिषदेचे उमेदवार व विद्यमान आमदार नागोराव गाणार यांना पाठिंबा देण्यास भाजपच्या एका मोठ्या वर्गाचा विरोध होता, पण शिक्षक परिषदेने आधीच उमेदवार जाहीर केल्याने पक्षाची अडचण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सविस्तर वाचा…

15:31 (IST) 18 Jan 2023
डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूती विभागातील महिलांचे एक हजार दिवस समुपदेशन

डोंबिवली-येथील कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला प्रसूती विभागातील महिला रुग्णांचे समुपदेशन करण्याचा उपक्रम डोंबिवली विमेन्स वेल्फेअर सोसायटीच्या सदस्यांनी मागील १०० दिवस राबविला. या उपक्रमाला शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टर, परिचारिका, रुग्ण नातेवाईकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहून हा उपक्रम एक हजार दिवस राबविणार आहोत. सविस्तर वाचा…

15:16 (IST) 18 Jan 2023
कसबा पेठ, पिंपरी-चिंचवड मतदारसंघांसाठी २७ फेब्रुवारी पोटनिवडणूक

कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड या मतदारसंघांसाठी विधानसभा मतदारसंघांसाठी २७ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

15:03 (IST) 18 Jan 2023
विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण खंडणी प्रकरणाचा तपास जळगाव पोलिसांकडे

पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी (बीएचआर) गैरव्यवहार प्रकरणातील एका आरोपीच्या जामीन अर्जास विरोध न करण्यासाठी एक कोटी २२ लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा जळगाव पोलिसांकडे तपासासाठी सोपविण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

14:43 (IST) 18 Jan 2023
राज्याची शैक्षणिक गुणवत्ता खालावली, पाचवीतील ८० टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी, तर आठवीतील ६५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येईना

मुंबई : करोना काळानंतर राज्यातील ग्रामिण भागातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती खालावल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. प्रथम एज्युकेशन फाउंडेशनने देशभर केलेल्या ‘अ‍ॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट’ (असर) या सर्वेक्षणात पाचवीतील साधारण ८० टक्के विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्येची वजाबाकी आली नाही तर ६५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकाराचे गणित सोडवता आले नाही.

सविस्तर वाचा...

14:33 (IST) 18 Jan 2023
चांदवड : राहुड घाटात धावत्या एसटी बसने घेतला पेट, चालकाच्या सतर्कतेमुळे ३५ प्रवाश्यांचे वाचले प्राण

शहादा ते मुंबई जाणाऱ्या एसटी बसला चांदवड तालुक्यातील राहुड घाटात आग लागली. बस चालकाने सतर्कता दाखवत बस महामार्गाच्या कडेला उभी करत, बसमधील ३५ प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढले.

सविस्तर वाचा...

14:00 (IST) 18 Jan 2023
पुणे : ३० कोटींच्या कर्ज मंजुरीच्या आमिषाने व्यावसायिकाची फसवणूक, मुंबईतील एकाच्या विरोधात गुन्हा

पुणे : व्यवसायासाठी ३० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची दीड काेटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

13:59 (IST) 18 Jan 2023
पुण्याच्या ऐतिहासिक वारशाची विदेशी पाहुण्यांना भुरळ; जी-२० परिषदेसाठी आलेल्या प्रतिनिधींचा शहरात 'हेरिटेज वॉक'!

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर विविध देशांचे प्रतिनिधी पुण्यात दाखल झाले. भारतासह ऑस्ट्रेलिया आणि ब्राझिल यांच्यातर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले. दर्जेदार पायाभूत सुविधा उभारणे, गुंतवणुकदारांसाठी अशा सुविधांचे पर्याय उपलब्ध करून देणे, त्यासाठी आवश्यक आर्थिक गुंतवणूक आणणे, या उद्देशाने जी २० सदस्य देश आणि इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप यांमध्ये या परिषदेत चर्चा झाली. वाचा सविस्तर

13:57 (IST) 18 Jan 2023
विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार- एकनाथ शिंदे

दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. या करारांमुळे देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास असल्याचे दिसते असे सांगून या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असून उत्तम पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ आहे. त्यामुळे उद्योजकांना मॅग्नेटिक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची संधी असून दावोस मध्ये महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी पसंती दर्शविल्याचे शिंदे यांनी सांगितले.

13:42 (IST) 18 Jan 2023
मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनसवरही आरामदायक पाॅड हाॅटेल उभे राहणार, येत्या १५ दिवसांत फेरनिविदा मागविणार

मुंबई : लांबपल्ल्यांच्या गाड्यांमधून प्रवास करून आलेल्या किंवा प्रवासासाठी निघालेल्या, मात्र काही कारणास्तव गाडीला विलंब होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांसाठी टर्मिनसवर तात्पुरता निवारा असावा या उद्देशाने सीएसएमटी स्थानकात आरामदायक अशा पाॅड हाॅटेलची (कॅप्सूलच्या आकाराप्रमाणे खोल्या) उभारणी करण्यात आली आहे. आता लोकमान्य टिळक टर्मिनसवरही (एलटीटी) अशा प्रकारचे हॉटेल उभारण्यात येणार असून त्यासाठी मागविलेल्या निविदांना प्रतिसाद मिळू शकला नाही. परिणामी, येत्या १५ दिवसांत या कामासाठी फेरनिविदा मागविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सविस्तर वाचा...

13:24 (IST) 18 Jan 2023
उद्या मुंबईत मोदींची जाहीर सभा, सभास्थळाची फडणवीसांकडून पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या मुंबईतील बीकेसी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने येथे जय्यत तयारी केली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभास्थळाची पाहणी करण्यासाठी पोहोचले आहेत.

13:19 (IST) 18 Jan 2023
पटोले यांच्या हकालपट्टीची मागणी करणाऱ्या आशीष देशमुख यांच्या भेटीला शिक्षक भारतीचे झाडे

शत्रूचा शत्रू मित्र या उक्तीप्रमाणे काँग्रेसने ऐनवेळी समर्थन नाकारलेले शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांनी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची भेट घेतली. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हेच सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीला कारणीभूत आहेत. यापूर्वीदेखील अनेक निवडणुकात घोळ घालण्यात आला, असा आरोप करीत नाना पटोले यांची हकालपट्टी करण्याची मागणी राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांच्याकडे केली होती.

सविस्तर बातमी

12:23 (IST) 18 Jan 2023
पुणे : जिल्हा नियोजन समितीवर भाजप, शिंदे गटाचे वर्चस्व; पदाधिकारी, माजी आमदारांचे पुनर्वसन

पुणे : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) बरखास्त करण्यात आली होती. या समितीवर नव्याने २० सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार समितीवर सत्ताधारी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनाचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, माजी आमदार यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

11:58 (IST) 18 Jan 2023
अध्यक्षांकडून झाडाझडती, नंदुरबार जिल्हा परिषदेतील हजेरी पुस्तिकेची तपासणी

नंदुरबार – जिल्हा परिषदेत उशिरा येणारे, तसेच हजेरी लावून गायब होणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी झाडाझडती घेतली.

सविस्तर वाचा -

11:51 (IST) 18 Jan 2023
राज ठाकरेविरोधील अटक वॉरंट रद्द, परळी कोर्टाचा निर्णय

राज ठाकरे यांचं अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे. २००८ साली चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

11:48 (IST) 18 Jan 2023
जळगाव : ट्रॅक्टरने चिरडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, वाळूमाफियांवर नातेवाईकांचा आरोप

जळगाव – शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकर्‍याच्या अंगावरून वाळूने भरलेले ट्रॅक्टर गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे घडली. या मृत्यूस वाळूमाफिया जबाबदार असल्याचा आरोप संतप्त नातेवाइकांनी केला असून, दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी मृतदेह थेट तहसील कार्यालयात नेण्यात आला. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सविस्तर वाचा...

11:47 (IST) 18 Jan 2023
नाशिक : त्र्यंबकेश्वरात संत निवृत्तीनाथ यात्रोत्सवास सुरुवात; वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण

त्र्यंबकेश्वर येथे बुधवारपासून श्री निवृत्तीनाथ यात्रेला सुरूवात झाली असून निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आठहून अधिक मानाच्या दिंड्या दाखल झाल्या आहेत. वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. नाशिक महानगर परिवहन सेवेच्या सिटीलिंकने त्र्यंबकेश्वरसाठी बुधवार आणि गुरुवारी जादा बससेवा सुरु केली आहे.

सविस्तर बातमी

11:47 (IST) 18 Jan 2023
मुंबई : “नगरसेवकांची संख्या कायद्याने निश्चित, लोकसंख्येनुसार कमी-जास्त करण्याचा प्रश्नच नाही”, महाधिवक्त्यांचा न्यायालयात दावा

मुंबई : नगरसेवकांची संख्या किती असावी हे कायद्याने निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे, जनगणनेचा आधार घेऊन लोकसंख्या वाढल्याच्या कारणास्तव प्रभागसंख्या वाढवता किंवा कमी करता येणार नाही, असा दावा राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात केला.

सविस्तर वाचा -

11:42 (IST) 18 Jan 2023
“देवेंद्र फडणवीस असं काही करतील असं वाटत नाही, ते बदला…”, तैलचित्राच्या निमंत्रणावरून संजय राऊतांचं सूचक विधान; म्हणाले, “महाराष्ट्रात…”

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी म्हणजेच २३ जानेवारीला विधीमंडळात त्याचं तैलचित्र लावलं जाणार आहे. मात्र, या उद्घाटन कार्यक्रामाच्या निमंत्रणपत्रिकेत उद्धव ठाकरेंचं नाव नसल्याने ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. दरम्यान, यावरून खासदार संजय राऊत यांनीही टीकास्र सोडलं आहे. महाराष्ट्रात सध्या सूड आणि बदला घेण्याचं राजकारण सुरू असल्याचे ते म्हणाले. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी संदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा

Maharashtra News Live Updates

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लाइव्ह

राजकीय, आर्थिक, मनोरंजन तसेच अन्य क्षेत्रातील सर्व बातम्यांचा आढवा वाचा एका क्लिकवर.