Marathi News Live Updates : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सुमारे एका महिन्यांनी पालकमंत्र्यांच्या नियुक्त जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, महायुतीतील घटक पक्षांमध्ये या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून मतभेद असल्याचे समोर आले. त्यानंतर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला सरकारने स्थगिती दिली आहे.
दुसरीकडे राज्यात गेल्या महिन्याभरापासून गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्याकांडानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या हत्याकांडात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे निवटकवर्तीय वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेतेही करत आहेत. यावरून त्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आपण या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून पाहाणार आहोत.
चिरनेरमध्ये बर्डफ्लूची साथ, ९ फेब्रुवारीपर्यंत कोंबड्यांच्या खरेदी-विक्रीवर बंदी
उरण : तालुक्यातील चिरनेर येथील बर्डफ्ल्यू रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पक्षी मारण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रविवारपासून कारवाई सुरू करण्यात आली आहे. चिरनेरमध्ये कुक्कुटपालकाच्या कोंबड्या बाधित होऊन मृत झाल्या होत्या. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून बर्डफ्ल्यू आढळल्याने ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
वारजे भागात सराईताकडून तरुणावर कोयत्याने वार, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सराईत अटकेत
पुणे : सराइताने तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना वारजे भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. नागेश आनंदा वांजळे (वय ३४, रा. देवगिरी कॉलनी, गणपती माथा, एनडीए रस्ता, वारजे माळवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
निवडणुकीतील विजयाचे अंतर मतदारांच्या सहभागावर अवलंबून; ‘आयसर पुणे’ने विकसित केले मॉडेल
पुणे : भारतासह जगभरात होणाऱ्या निवडणुकांमध्ये एक समान गुणधर्म संशोधनात आढळून आला आहे. निवडणुकीत मतदारांनी केलेल्या मतदानाची टक्केवारी ही विजयी अंतराच्या सांख्यिकीय वितरणाच्या अंदाजासाठी पुरेशी असल्याचा निष्कर्ष या संशोधनातून स्पष्ट झाला असून, या संशोधनासाठी पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर पुणे) शास्त्रज्ञांनी खास प्रारूप (मॉडेल ) विकसित केले.
भाजप मोर्चेबांधणीत व्यस्त, काँग्रेस सुस्तच! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पूर्वतयारी
चंद्रपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तयार राहा, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत येऊन आमदारांना दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तीन ते चार महिन्यात पालिका निवडणुका होतील, कामाला लागा, असा मंत्र दिला.
रायगड, रेवदंडा येथे डिझेल तस्करीचा पर्दाफाश
अलिबाग : अलिबागजवळच्या रेवदंडा येथील कुंडलिका खाडीत आज पहाटे सीमाशुल्क विभागाच्या (कस्टम ) पथकाने मोठी कारवाई करत डिझेल तस्करीचा पर्दाफाश केला आहे. यात ५ टँकर आणि२ बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणात ५ जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
किसन महाराज साखरे यांचे निधन
पुणे : संतसाहित्य व ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आणि राज्य सरकारच्या ज्ञानोबा तुकोबा पुरस्काराचे मानकरी किसन महाराज (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. साखरे यांच्या पार्थिवावर आळंदी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
लोकजागर : सांस्कृतिक म्हणजे काय?
अनेक चळवळींचे उगमस्थान असलेल्या पुणे शहरात चांगल्या वाचण्याची, ऐकण्याची, पाहण्याची, मने समृद्ध करण्याची एकही सांस्कृतिक चळवळ आत्ताच्या काळात का उभी राहू शकत नाही? का आपल्याला ‘सांस्कृतिक’ म्हणजे काय, या प्रश्नालाच बगल द्यायची आहे?
काही दिवसांपूर्वी महायुती सरकारने पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या केल्या आहे. यावरून सध्या महायुतीमध्ये धूसफूस सुरू आहे. यानंतर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर टीका केली आहे. एक्स वर केलेल्या एका पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले की, "पालकमंत्री पदासाठी हावरटपणा करणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. हा हावरटपणा बरा नाही."
भांडुपमधील ड्रीम मॉलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
मुंबई : भांडुप पश्चिम येथील एलबीएस मार्गावर असलेल्या ड्रीम मॉलमध्ये मंगळवारी सकाळी पोलिसांना एका महिलेचा मृतदेह मिळाला आहे. याबाबत भांडुप पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे.
तानसा जलवहिनीला गळती, दादर, सांताक्रुझ, अंधेरीसह भांडुपमधील पाणीपुरवठा खंडित
मुंबई : पवई येथील जोगेश्वरी - विक्रोळी जोड रस्त्यावरील पुलाजवळ तानसा पश्चिम जलवाहिनीची मंगळवारी पहाटे अचानक गळती सुरू झाली. पालिकेच्या जलअभियंता खात्याने आता जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले असून त्या कामासाठी तानसा वाहिनीचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे दादर, सांताक्रुझ, अंधेरीसह भांडुपमधील पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
ठाणे रेल्वे स्थानकात आढळली अमली पदार्थाने भरलेली बेवारस बॅग, लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ९ आणि १० मधील पादचारी पुलाच्या जीन्याजवळ एका बेवारस बॅगेत अमली पदार्थ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या ६१ शाळांमध्ये ५०२ सीसीटीव्ही कॅमेरे, विद्यार्थी, शाळेच्या सुरक्षिततेचा विचार
कल्याण : विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शाळेतील गैरकृत्य रोखणे, शाळेची सुरक्षितता या सर्व बाबींचा विचार करून कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने पालिकेच्या कल्याण, डोंबिवली शहरातील ६१ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.
झाडाणी प्रकरणाची आता हरीत लवादाकडून दखल, अनधिकृत वीज जोडणी, वृक्षतोडीबद्दल महावितरणला नोटीस
सातारा: झाडाणी (ता. महाबळेश्वर) गाव, पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात येते. येथे बेकायदेशीररित्या जमीन खरेदी करून त्याठिकाणी पर्यावरणीय कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने स्वतःहून दखल घेत याचिका दाखल करत गुजरातचे जी.एस.टी. आयुक्त चंद्रकांत वळवी व त्यांचे कुटुंबीय आणि मित्र यांना दिलेल्या अनधिकृत वीज जोडणी प्रकरणी नोटीस बजावली आहे. याप्रकरणी ११ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
लातुरातून चालणार गोंदिया जिल्ह्याचा कारभार; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व
राज्य मंत्रिमंडळात गोंदिया जिल्ह्याला स्थान मिळाले नाही, त्यावेळीच जिल्ह्याला बाहेरील पालकमंत्री मिळणार, हे निश्चित झाले होते. नवे पालकमंत्री हे लातूर जिल्ह्यातील असून तिथून ते आता जिल्ह्याचा कारभार पाहणार आहेत.
मुंबईमध्ये 'या' भागांतील पाणीपुरवठा २४ तासांसाठी खंडित
आज सकाळी पवई येथील तानसा पश्चिम जलवाहिनीवरील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड पुलाजवळ मोठी गळती सुरू झाली आहे. परिणामी, तानसा पाईपलाईनमधून होणारा पाणीपुरवठा तात्काळ बंद करण्यात आला आहे. या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले असून, ते पूर्ण होण्यासाठी अंदाजे २४ तास लागतण्याची शक्यता आहे. दुरुस्तीच्या कामादरम्यान, पाईपलाईनद्वारे पवई ते धारावीला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी, एस वॉर्ड, के-पूर्व वॉर्ड, जी-उत्तर वॉर्ड आणि एच-पूर्व वॉर्डमधील काही भागात पाणीपुरवठा खंडित होईल. याबाबत मुंबई महानगरपालिकेने एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेतील अनुकंपा तत्वावरील ८८ कामगारांची प्रारूप यादी प्रसिध्द, मागील १५ वर्षातील अनुकंपाची प्रकरणे मार्गी
कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेतील अनुकंपा तत्वावरील मागील १५ वर्षाच्या काळातील ८८ कामगारांची अनुकंपा तत्वावरील प्रकरणे मार्गी लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी घेतला आहे. अनेक वर्ष नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनुकंपा तत्वावरील कामगारांनी या निर्णयामुळे समाधान व्यक्त केले आहे.
ठाण्यात बांगलादेशींचे तळ ? वर्षभरात ६७ बांगलादेशी अटक
ठाणे : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सैफ अली खान यांच्यावरील हल्लेखोर हा बांगलादेशी असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता घुसखोर बांगलादेशींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ठाणे पोलिसांनी मागील वर्षभरामध्ये केलेल्या कारवाईत ६७ बांगलादेशींना अटक केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सैफ अली खानच्या प्रकरणानंतर आता कंपन्यांमधील स्वच्छता कामगार, बांधकाम विभागातील कामगार तसेच इतर क्षेत्रातील मजूरांची पोलीस मोठ्याप्रमाणात तपासणी करू लागले आहेत.
ऑनलाईन, दूरस्थ पद्धतीने एमबीए करण्याची संधी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रवेश परीक्षेसाठीची नोंदणी सुरू
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त आणि दूरस्थ अध्ययन प्रशाळेतर्फे व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी (एमबीए) अभ्यासक्रम दूरस्थ आणि ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू करण्यात आली असून, २४ जानेवारी ही अंतिम मुदत आहे. प्रवेश परीक्षेची तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक क्षेत्र आता भयमुक्त, पोलिसांकडून औद्योगिक तक्रार निवारण पथकाची स्थापना
पिंपरी : उद्योगस्नेही वातावरण निर्मिती व उद्योजकांच्या अडीअडचणींवर तत्काळ कार्यवाही होण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत आता औद्योगिक तक्रार निवारण पथकाची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. या पथकाचे प्रमुख सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात लवकरच इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे.
मी नाराज नाही – एकनाथ शिंदे
सातारा : सध्याच्या सरकारमध्ये मी नाराज नाही किंवा या नाराजीतून मी गावी आलेलो नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सोमवारी दिले. तसेच रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून झालेल्या पेचातून लवकरच मार्ग निघेल, असेही शिंदे या वेळी म्हणाले.
तानसा अभयारण्यात पक्षी गणना, ७५ पक्ष्यांची नोंद
शहापूर : इंटरनॅशनल वेटलँड आणि वनविभागाच्या माध्यमातून अभयारण्यातील तानसा, मोडकसागर तलावांसह पाणवठ्यावर पक्ष्यांची गणना करण्यात आली. या पक्षी गणनेत ३५ पाणपक्ष्यांसह ७५ पक्ष्यांची नोंद झाली आहे. दरवर्षी हिवाळ्यात करण्यात येणाऱ्या पक्षी गणनेत स्थलांतरित पक्ष्यांसह स्थानिक पक्ष्यांची नोंद करण्यात येते.
Marathi Live News Update Today : जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इंडियन पॅव्हेलियनचे उद्घाटन
Maharashtra Politics LIVE Updates : दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इंडियन पॅव्हेलियनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, तामिळनाडूचे मंत्री टी आर बी राजा याचबरोबर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1881532134357098498