Mumbai-Maharashtra Breaking News Today, 13 Oct 2022 : शिवसेनेचं नाव आणि चिन्ह यासंदर्भातला वाद निवडणूक आयोगाच्या अंतरिम आदेशांमुळे तात्पुरता बाजूला झाला असला, तरी आता अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीवरून राजकारण रंगू लागलं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामधील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारण तापलं असून दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे.
Maharashtra Latest News Updates : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
पिंपरी : श्रीक्षेत्र वढू व श्रीक्षेत्र तुळापूर यांना विशेष तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी स्वराज्य संघ शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. बातमी वाचा सविस्तर...
आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपा दोन तृतियांश बहुमताने विजय मिळवून सत्ता कायम ठेवेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. गुजरातमधील जनता अनेक काळापासून भाजपावर विश्वास ठेवत आहे. पक्षानेही त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत, असे शाह यांनी म्हटले आहे.
गुंतवणूक केल्यास रक्कम तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवून ५ कोटी ८४ लाख रूपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी एका महिलेसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बातमी वाचा सविस्तर...
महसूल विभागाच्या पथकाने पकडलेले मालवाहू वाहने (डंपर) सोडविण्यासाठी दीड लाखाची लाच घेताना अमळनेर येथील तलाठ्यासह मंडळ अधिकार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी सापळा रचत रंगेहात अटक केली . बातमी वाचा सविस्तर...
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त षण्मुखानंद सभागृहात ‘अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह उद्धव ठाकरेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी भुजबळांनी शिवसेना सोडल्यानंतर कुटुंबाला झालेला त्रास याची आठवण करुन देताना, त्यांच्या कारकिर्दीचं कौतुकही केलं. तसंच मुख्यमंत्रीपदावरुन मिश्कील टोलाही लगावला.
मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेने ऋतुजा लटके यांच्या पालिका नोकरीचा राजीनामा मंजूर करावा असा आदेश दिला आहे. तसेच उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत राजीनामा स्वीकारल्याचे पत्र ऋतुजा लटके यांना द्यावे, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या याच निर्णयावर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच विधान केले आहे. आता मर्दांच्या हातात मशाल देण्याची गरज आहे. हीच नियतीची इच्छा असावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. वाचा सविस्तर
उद्धव ठाकरे यांनी दोन्ही गटातील या संघर्षावर थेट भाष्य केले. आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात जावे लागत आहे. मैदानात या. मी तर लढाईच्या क्षणाची वाट पाहात आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते मुंबईत छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. वाचा सविस्तर
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत बेसुमार बेकायदा बांधकामे उभी करण्याची कामे भूमाफियांकडून सुरू आहेत. डोंबिवलीत पालिकेच्या बनावट बांधकाम परवानग्या तयार करुन ६५ बेकायदा इमारती माफियांनी बांधल्या असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पालिकेचे प्रभाग साहाय्यक आयुक्त, विभागीय उपायुक्त, नगररचना अधिकारी यांच्या संगनमताने ही बांधकामे उभी राहून त्यामध्ये घरे घेणाऱ्या नागरिकांची माफियांनी फसवणूक केली आहे. सविस्तर वाचा…
नागपूर : प्रेमविवाह केल्यानंतर काही महिन्यांतच पती-पत्नीत वादाची ठिणगी पडली. पतीच्या रागावर जन्मदात्या आईनेच अकरा महिन्यांच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत बुडवून खून केला. ही खळबळजनक घटना टाकळघाट शहरात उघडकीस आली. बातमी वाचा सविस्तर...
करोनानंतर आता गृहसजावटीमध्ये नवे कल येऊ लागले आहेत. स्वयंपाकघर अधिक सुविधांनी सुसज्ज, जागा वाचवणारे फर्निचर, गॅलरीमध्ये सजावटीला विशेष पसंती दिली जात असून, घरातून काम करण्याची गरज लक्षात घेऊन त्यासाठीच्या सुविधाही निर्माण केल्या जात असल्याचे निरीक्षण व्यावसायिकांनी नोंदवले. सविस्तर वाचा…
मध्य रेल्वेला प्रवाशांच्या रोषामुळे वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या. मात्र असे असले तरीही पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या वातानुकूलित लोकलला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. वातानुकूलित फेऱ्यांमध्ये १ ऑक्टोबरपासून वाढ़ झाली असून दैनंदिन तिकीट विक्रीतही वाढ़ झाली आहे. सविस्तर वाचा…
ठाणे : तीन हजार डाॅलर असे मासिक वेतनाचे अमीष दाखवून ठाण्यातील वागळे इस्टेट येथील एका तरुणाला थायलँड या देशात डांबण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच त्याच्या सुटकेसाठी कुटुंबियांकडून तीन हजार डाॅलरची मागणी करण्यात आली आहे. बातमी वाचा सविस्तर...
कांजूर परिसरातून जाणाऱ्या पूर्व द्रुतगती महामार्गावर बुधवारी मध्यरात्री भरधाव वेगात आलेल्या मोटारगाडीने झाडाला धडक दिली. या अपघातात चालकासह दोघांचा मृत्यू झाला, तर सात प्रवासी जखमी झाले. जखमींवर राजावाडी आणि वीर सावरकर रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बुलढाणा : सायबर गुन्हेगारांनी आता आयुष्याच्या संध्याछायेत राहणाऱ्या सेवानिवृत्तीधारकांना लक्ष्य केल्याचे दिसते आहे. निवृत्तांशी संपर्क साधून निवृत्तीवेतन संचालनालयातून बोलत असल्याचे भासवून त्यांचा ‘ओटीपी’ मिळवायचा आणि खात्यातील संपूर्ण रक्कम क्षणार्धात ‘गायब’ करायची, अशी पद्धत या निष्णात सायबर गुन्हेगारांनी अवलंबिली आहे. बातमी वाचा सविस्तर...
हुंड्यासाठी कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत असून उच्च न्यायालयात येण्यासाठी पक्षकार जोडपी, त्यांच्या नातेवाईकांना अन्य शहरे आणि खेड्यांतून मुंबईला यावे लागते. न्यायालयीन लढाईसाठी होणारा खर्चही अफाट असतो या सगळ्या त्रासाची उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. सविस्तर वाचा…
पुणे महानगर प्रदेश क्षेत्राने दरवर्षी होणाऱ्या आर्थिक लेखापरीक्षण आणि देखरेख प्रणालीच्या धर्तीवर ‘कार्बन अकाऊन्टिंग आणि बजेट कक्ष’ स्थापन करण्याला विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मान्यता दिली आहे. बातमी वाचा सविस्तर...
ऋतुजा लटके यांचा राजीनामा तातडीने स्वीकारण्याचे न्यायालयाचे पालिकेला आदेश. उद्या सकाळी ११ पर्यंत याबाबतचे पत्र लटके यांना देण्याचेही दिले निर्देश!
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिंदे गटाकडून चिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबत आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. रणनिती उघड केल्याचा आरोप करत ठाकरे गटानं निवडणूक आयोगाला १२ मुद्द्यांचं पत्र लिहिलं आहे. या पत्रातील आरोपांना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मराठी सणांपैकी उत्साही प्रकाशोत्सव असा दीपावलीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दोन वर्षांपूर्वी ठप्प झालेली सुक्या मेव्याची मागणी आता वाढत असून एन दिवाळी सणात सुक मेवा महागला आहे. खारीक आणि पिस्ता प्रतिकिलो १०० रुपयांनी महागला असून मनुका ही वधारला आहे. सविस्तर वाचा…
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाची उमेदवारी मिळालेल्या ऋतुजा लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई महानगरपालिकेला आपला राजीनामा स्वीकारण्याचे आदेश देण्यात यावेत अशी त्यांची मागणी आहे. सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने पालिकेला खडसावलं असून तुमच्याकडे विशेषाधिकार असताना अशी प्रकरणं आमच्याकडे येता कामा नयेत असं सांगितलं आहे. न्यायालयाने पालिकेला राजीनामा स्वीकारणार की नाही? याबद्दल २.३० वाजता भूमिका मांडण्यास सांगितलं आहे.
आम्ही राजीनामा स्वीकारण्याचे आदेश देतो, परंतु निर्णय घेण्यासाठी एक आठवडा लागेल- पालिकेची भूमिका
नोटीस कालावधी माफ करण्याचा पालिकेला विशेषाधिकार असताना राजीनामा का स्वीकारला जात नाही. अशी प्रकरणे न्यायालयात येता काम नये - उच्च न्यायालय
अंधेरी पोटनिवडणुकीतील ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा राजीनामा मुंबई महानगर पालिका स्वीकारणार की नाही, हे अडीच वाजता पालिकेनं सांगावं, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
जिल्ह्यातील पवनी तालुक्यांतर्गत येणाऱ्या सावरला जंगलात एका गुरख्याला एकाच वेळी चार वाघांचे दर्शन झाले. या चारही वाघांचे कुटुंब एकत्र फिरत असल्याच्या दुर्लभ क्षणांचे चित्रीकरण त्याने त्याच्या भ्रमणध्वनीमध्ये केले. बातमी वाचा सविस्तर...
बुधवारी दिवसभरात जिल्ह्यातील ९३ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली. बातमी वाचा सविस्तर...
नागपूर : मराठी पदार्थ सातासमुद्रापार नेणारे बल्लवाचार्य, शेफ विष्णू मनोहर दिवाळीच्या आधी सहा हजार किलोच्या कढईत १६ ऑक्टोबरला जागतिक खाद्यान्न दिनी दोन हजार किलो चिवडा तयार करणार आहेत. बातमी वाचा सविस्तर...
नागपूर : शालेय विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत आधार कार्ड तयार होताना आपण बघितलेच आहे. परंतु आता नवजात बाळांचेही आधार कार्ड काढले जात आहे. जन्मत: आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया कशी केली जाते याची सगळ्यांना उत्सुकता असते. बातमी वाचा सविस्तर...
गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नाबाबत सरकार आणि म्हाडा गंभीर नसल्याचा आरोप करीत बुधवारी मोठ्या संख्येने कामगारांनी आझाद मैदानावर आंदोलन केले. गृहनिर्माण विभागाच्या सचिव वत्सा नायर-सिंह यांनी कामगारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी त्यांनी गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच संबंधित विभागाची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
नायर रुग्णालयाच्या विस्तारासाठी तीन दशकांपूर्वी राखीव ठेवण्यात आलेला सुमारे १ हजार ५५९ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड मुंबई महापालिकेने खासगी बिल्डरला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या या कारभारावर मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.
Maharashtra Latest News Updates : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!