Mumbai-Pune Latest News , 18 Oct 2022 : आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना औरंगाबादहून एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडलेली होती. काल(सोमवारी) दुपारी त्रास जाणवू लागल्याने त्यांना औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज सकाळीच त्यांना तातडीने एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आलं आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थक खासदारांपैकी एक असलेल्या राजन विचारे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं पत्र महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. तसेच आपली पोलीस सुरक्षा कमी करण्यात आली असून जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील असंही विचारे यांनी म्हटलं आहे. हा विषयही दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

Live Updates

Maharashtra Breaking News Updates : राज्यातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचा वेगवान आढावा

18:27 (IST) 18 Oct 2022
परतीच्या पावसाने लोणावळ्याला झोडपले; शहरातील रस्ते पाण्याखाली

परतीच्या पावसाने लोणावळ्याला सोमवारी दुपारी झोडपले. विजांचा कडकडाट, गडगडासह मुसळधार पाऊस झाला. लोणावळा शहर आणि खंडाळा परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले. लोणावळा परिसराला दुसऱ्या दिवशी परतीच्या पावसाने झोडपले.

सविस्तर वाचा

18:02 (IST) 18 Oct 2022
पुणे : पावसामुळे वाहनांमध्ये बिघाड, दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये गर्दी

शहरात सोमवारी झालेल्या अतिमुसळधार पावसाने दाणादाण उडवली. शहरातील अनेक रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. त्याचा फटका दुचाकी आणि चारचाकींना बसला. पाणी गेल्याने बिघाड झालेल्या वाहनांची आता दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये गर्दी होऊ लागली आहे. 

सविस्तर वाचा

17:40 (IST) 18 Oct 2022
“शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा डाव,” रोहित पवारांचा मोठा दावा, म्हणाले “पवार कुटुंबात मतभेद…”

ज्याप्रकारे शिवसेनेत दोन गट पाडले, त्याप्रकारे पवार कुटुंबातही फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवार यांनी हा दावा केला आहे. शिवसेनेनंतर आम्हाला लक्ष्य केलं जाऊ शकतं अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी पवार कुटुंबात कोणतेही हेवेदावे नसून, सर्वांचं उद्दिष्ट स्पष्ट आहे असंही सांगितलं.

सविस्तर बातमी

17:39 (IST) 18 Oct 2022
पुणे : चोरीचा जाब विचारल्याने दुकानदाराला बेदम मारहाण ; मंगळवार पेठेतील घटना

दुकानातील ताडपत्री चोरणाऱ्या दोघांना जाब विचारल्याने दुकानदाराला गजाने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवार पेठेत घडली.दुकानदाराचा खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

17:37 (IST) 18 Oct 2022
‘पवार कुटुंबात मतभेद निर्माण करुन पक्ष फोडण्याचा डाव’, रोहित पवारांच्या दाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “त्याला मी…”

विरोधकांना आमच्या कुटुंबात फूट पाडायची आहे. पवार कुटुंबात अंतर्गत भांडण असेल तर राष्ट्रवादी फुटेल असं त्यांना वाटत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवार यांनी शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पुढील लक्ष्य असू शकतं असा दावा केला आहे. दरम्यान रोहित पवार यांचे काका आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सविस्तर बातमी

17:36 (IST) 18 Oct 2022
काका अजित पवार आणि तुमच्यात वाद? रोहित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले “त्यांनीच मला…”

ज्याप्रकारे शिवसेनेत दोन गट पाडले, त्याप्रकारे पवार कुटुंबातही फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवार यांनी हा दावा केला आहे. शिवसेनेनंतर आम्हाला लक्ष्य केलं जाऊ शकतं अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी यावेळी अजित पवारांसोबत असणाऱ्या संबंधांवरही भाष्य केलं आहे.

सविस्तर बातमी

17:34 (IST) 18 Oct 2022
“ओ भास्करशेठ माझ्या नादी लागू नका, तुम्ही नाच्याचं…”, चित्रा वाघ संतापल्या, ‘सुपारीबाज’, ‘भाडोत्री’ म्हणून केला उल्लेख

शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी सभेमध्ये आपली नक्कल केल्यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. भास्कर जाधव यांनी चित्रा वाघ यांना विद्यमान कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्यासंदर्भातील पूजा चव्हाण प्रकरणावरुन टोला लगावला आहे. कुडाळ येते कार्यकर्त्यांसमोर भाषण करतान त्यांनी चित्रा वाघ यांची नक्कल केली. यानंतर चित्रा वाघ यांनी व्हिडीओ ट्वीट केला असून माझ्या नादी लागू नका सांगत जोरदार टीका केली आहे.

सविस्तर बातमी

17:23 (IST) 18 Oct 2022
डोंबिवलीत दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

डोंबिवली : डोंबिवली पूर्व राजाजी रस्ता भागात एका सोसायटीत कुटुंबीयांसह राहत असलेल्या दहावीच्या विद्यार्थिनीने सोमवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. बातमी वाचा सविस्तर...

17:10 (IST) 18 Oct 2022
पुणे : फरार अमली पदार्थ तस्कर वर्षभराने गजाआड ; मेफेड्रोनसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

अमली पदार्थ विक्री प्रकरणात गेले वर्षभर फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मार्केट यार्ड परिसरात पकडले. त्याच्याकडून मोटार, अमली पदार्थ असा सहा लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सविस्तर वाचा

16:50 (IST) 18 Oct 2022
आधी भास्कर जाधवांनी केली नक्कल, आता नितेश राणे यांचे जशास तसे उत्तर; म्हणाले...

आमदार भास्कर जाधव यांनी भाजपा तसेच केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. मात्र भास्कर जाधव यांच्या याच टीकेचा समाचार आमदार नितेश राणे यांनी घेतला आहे. भास्कर जाधव हे खरंच शिक्षकाचे पुत्र आहेत का? हा संशोधनाचा विषय आहे, असे नितेश राणे म्हणाले आहेत. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. वाचा सविस्तर

16:49 (IST) 18 Oct 2022
नितेश राणेंचे वैभव नाईकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप! थेट कागदपत्रेच केली सादर

भाजपाचे नेते तथा आमदार नितेश राणे यांनी नाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल आहेत. वैभव नाईक यांच्या विरोधातील पुरावे आमच्याकडे आहेत, असा दावा नितेश राणे यांनी आहे. तसेच चौकशीला समोरे जायचे. मोर्चा काढून काय होणार आहे, असेही राणे म्हणाले आहेत. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. वाचा सविस्तर

16:30 (IST) 18 Oct 2022
“…तर मी राजाराम पाटलाची औलाद नाही”, शहाजीबापू पाटील यांचं ठाकरे गटाला जाहीर आव्हान

पंढरपुरातील एका सभेत बोलताना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी विधानपरिषदेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर ठाकरे गटाला घाबरून माघार घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून करण्यात येत आहे. या आरोपाचा समाचार घेताना त्यांनी उद्धव ठाकरे गटाला आव्हान दिलं आहे.

सविस्तर बातमी वाचा...

16:04 (IST) 18 Oct 2022
दिवाळी भेटवस्तूंना ‘या’ पालिकेत No Entry ; कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट स्वीकारण्यास मनाई

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेतील कर्मचारी, अधिकाऱी यांनी पालिकेत स्वतः किंवा आपले कुटुंबीय, खासगी व्यक्तींच्या माध्यमांमधून दिवाळी भेटीचा स्वीकार करू नये, असे पत्रक आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी मंगळवारी काढले आहेत. बातमी वाचा सविस्तर...

15:48 (IST) 18 Oct 2022
पुणे : कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन ; आमदार संतोष बांगर यांच्या अर्वाच्य भाषेचा निषेध

हिंगोली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांना स्थानिक आमदार संतोष बांगर यांनी १३ ऑक्टोबर रोजी मोठ्या जनसमुदायासमोर अर्वाच्य भाषेमध्ये बोलून अपमान करून त्यांना मारहाणीची धमकी दिली होती.

सविस्तर वाचा

15:39 (IST) 18 Oct 2022
रुग्णालयांमध्ये आता मंत्र्यांना घेऊन जायचं का? अंबादास दानवेंचा सवाल, “आमच्या मंत्री महोदयांना…” म्हणत साधला भुमरेंवर निशाणा

सरकारी रुग्णालयाच्या दुरावस्थेमुळे किंवा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना बरेचदा गैरसोयीचा सामना करावा लागतो. रुग्णालयात उपचार घेताना अशाच प्रकारच्या गैरसोयीचा सामना औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांना करावा लागला. उपचारादरम्यान लाईट गेल्यामुळे झालेल्या मंत्र्यांच्या गैरसोयीनंतर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाला जनरेटर मंजुर करण्यात आले. यावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षेनेते अंबादास दानवे यांनी सडकून टीका केली आहे.

सविस्तर बातमी वाचा...

15:13 (IST) 18 Oct 2022
‘श्रीमंत’ ग्रामपंचायतीच्या कार्यालयात चोरी करण्याचा प्रयत्न, चोरांच्या हाती लागले धुपाटणे

पनवेल : पनवेल तालुक्यातील देवद ग्रामपंचायतीमध्ये चोरांनी चोरी करण्याच्या उद्देशाने प्रवेश केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. लाखो रुपयांचे महसुली उत्पन्न असणाऱ्या या ग्रामपंचायतीमध्ये चोरी केली तर मोठे घबाड हाती लागेल असे चोरांना वाटले. बातमी वाचा सविस्तर...

15:02 (IST) 18 Oct 2022
पुणे: तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन आता थेट बँक खात्यात जमा; उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय

राज्यातील महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्त्वावर (सीएचबी) प्राध्यापकांचे मानधन आता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. तसेच नियुक्तीसाठी तयार करण्यात आलेल्या कार्यपद्धतीने निश्चित करण्यात आली आहे. कालबद्ध वेळापत्रकानुसार १५ फेब्रुवारी ते १५ जून या कालावधीत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

सविस्तर वाचा

14:49 (IST) 18 Oct 2022
पनवेल: लग्नाचे आमिष दाखवत महिला डॉक्टरची फसवणूक

कामोठे येथील एका डॉक्टर महिलेवर गेल्या दोन वर्षांपासून अत्याचार करुन महिलेला ३७ लाख रुपयांना फसविण्याची घटना घडली आहे. या घटनेने कामोठे येथील महिलावर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.दोन वर्षांपूर्वी ओळख काढून या डॉक्टर महिलेशी संबंधित पुरुषाने मैत्री केली. बातमी वाचा सविस्तर...

14:39 (IST) 18 Oct 2022
मुंबई: मेट्रो ३ विरोधात गिरगावकर रस्त्यावर; प्रकल्पाबाधितांच्या ‘या’ सर्व प्रश्नांमुळे रहिवाशी रस्त्यावर

मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) प्रकल्पातील प्रकल्पबाधितांचे योग्य पुनर्वसन करण्यात आलेले नाही, त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे आरोप करून गिरगाव येथील रहिवाशी मंगळवारी मेट्रो ३ विरोधात रस्त्यावर उतरले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) याकडे लक्ष दिले नाही तर गिरगावातील मेट्रो ३ चे काम बंद पाडण्याचा इशारा यानिमित्ताने रहिवाशांनी दिला.

सविस्तर वाचा

14:28 (IST) 18 Oct 2022
पुण्यातील ४०० किलोमीटर रस्त्यांची नव्याने दुरुस्ती ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री पाटील यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की यंदा शहर व परिसरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. परिणामी शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे पुणेकरांना प्रचंड वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे.

सविस्तर वाचा

14:22 (IST) 18 Oct 2022
दिवाळीपर्यंत शिक्षक भरती करा अन्यथा… पालकांचा शिक्षण विभागाला अल्टीमेटम

नवी मुंबई महापालिकेची कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सहामाही परीक्षा देखील अंतिम टप्प्यात आली असून, अजूनही शिक्षक उपलब्ध झालेले नाहीत. बातमी वाचा सविस्तर...

14:13 (IST) 18 Oct 2022
“त्यांच्या मशालीचा चटका त्यांनाच बसला” ‘सामना’तील टीकेवर संदीप देशपांडेचं प्रत्युत्तर, म्हणाले, “उद्धव ठाकरे कोत्या मनाचे तर राज…”

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून भाजपा आणि शिंदे गटावर हल्लाबोल करण्यात आला आहे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ‘मशाली’चा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मनांना बसला आहे, असे या अग्रलेखात ठाकरे गटाने म्हटले आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सडकून टीका केली आहे.

सविस्तर बातमी वाचा...

13:53 (IST) 18 Oct 2022
३९० महाविद्यालयांनी सुधारणा न केल्यास कारवाई ; पुणे विद्यापीठाची तंबी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नॅक मू्ल्यांकन न झालेल्या ३९० संलग्न महाविद्यालयांचे शैक्षणिक आणि प्रशासकीय मूल्यमापन करण्यात येणार आहे. या मूल्यमापनानंतर मानकांनुसार सुविधा उपलब्ध नसलेल्या महाविद्यालयांना सुधारणेसाठी संधी दिली जाणार असून, संधी देऊनही सुधारणा न झाल्यास महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

13:31 (IST) 18 Oct 2022
३९० महाविद्यालयांनी सुधारणा न केल्यास कारवाई ; पुणे विद्यापीठाची तंबी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नॅक मू्ल्यांकन न झालेल्या ३९० संलग्न महाविद्यालयांचे शैक्षणिक आणि प्रशासकीय मूल्यमापन करण्यात येणार आहे. या मूल्यमापनानंतर मानकांनुसार सुविधा उपलब्ध नसलेल्या महाविद्यालयांना सुधारणेसाठी संधी दिली जाणार असून, संधी देऊनही सुधारणा न झाल्यास महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नॅक मू्ल्यांकन न झालेल्या ३९० संलग्न महाविद्यालयांचे शैक्षणिक आणि प्रशासकीय मूल्यमापन करण्यात येणार आहे. या मूल्यमापनानंतर मानकांनुसार सुविधा उपलब्ध नसलेल्या महाविद्यालयांना सुधारणेसाठी संधी दिली जाणार असून, संधी देऊनही सुधारणा न झाल्यास महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

13:04 (IST) 18 Oct 2022
नाशिक : कैलासनगर चौकात उड्डाण पूल उभारण्याचा प्रस्ताव ; अपघातप्रवण क्षेत्रातील धोके कमी करण्याचा उपाय

पंचवटीतील औरंगाबाद महामार्गावरील कैलासनगर (हॉटेल मिरची) चौफुली येथे उड्डाण पूल उभारण्याचा प्रस्ताव महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाला देणार आहे. काही दिवसांपूर्वी या चौकात खासगी प्रवासी बस आणि मालवाहू वाहनाच्या (डंपर) अपघातात १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.

सविस्तर वाचा

12:51 (IST) 18 Oct 2022
शिखर बँक घोटाळा प्रकरणावर अजित पवार स्पष्टच बोलले; म्हणाले "आता सरकार... "

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी मूळ तक्रारदाराने निषेध अर्जाद्वारे घोटाळ्याशी संबंधित उपस्थित केलेले मुद्दे आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या अहवालाच्या आधारे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केल्याची माहिती आर्थिक गुन्हे विभागातर्फे शनिवारी (ईओडब्ल्यू) विशेष न्यायालयात देण्यात आली. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर

12:51 (IST) 18 Oct 2022
डोंबिवली : ठाकुर्लीत मंजुनाथ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला टोळक्याची बेदम मारहाण

डोंबिवली जवळील ठाकुर्ली भागात मंजुनाथ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका १७ वर्षाच्या विद्यार्थ्याला जुन्या वादातून चार तरुणांनी खंबाळपाडा येथील बालाजी आंगण सोसायटीच्या समोर लाथाबुक्के, लोखंडी कड्याने सोमवारी संध्याकाळी बेदम मारहाण केली. बातमी वाचा सविस्तर...

12:12 (IST) 18 Oct 2022
पुणे : डांबरीकरण डिसेंबरमध्ये ? ; पहिल्या टप्प्यात ६१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती

शहरातील रस्त्यांची चाळण झाल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून महिन्याभरात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

11:58 (IST) 18 Oct 2022
पुणे-नागपूर खासगी बससाठी अधिकृत भाडे ३२०० रुपयांवर ; दिवाळीतील मागणीमुळे काही वाहतूकदारांकडून मनमानी भाडे

दिवाळीच्या सणासाठी मूळ गावी जाणाऱ्या नागरिकांची सध्या एसटी आणि खासगी वाहतूकदारांच्या गाड्यांसाठी गर्दी दिसून येत आहे. प्रामुख्याने नागपूरला जाण्यासाठी मागणी वाढत असून, खासगी बससाठी पुणे-नागपूर दरम्यानचे भाडे अधिकृतपणे ३२०० रुपयांवर गेले आहे.

सविस्तर वाचा

11:57 (IST) 18 Oct 2022
नागपूर : झटपट वजन कमी केल्यास केस गळतीचा धोका ! ; त्वचारोग तज्ज्ञ डॉ. श्रद्धा महल्ले यांचे मत

बैठी जीवनशैली, खानपानाच्या वाईट सवईंसह इतर कारणांमुळे सगळ्याच वयोगटात लठ्ठपणा वाढला आहे. त्यामुळे बरेच व्यक्ती झटपट वजन कमी करण्यासाठी समाज माध्यमावरील चलचित्र बघून मनमानी उपाय करतात.

सविस्तर वाचा

Devendra Fadanvis

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. भारतीय जनता पार्टीने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमधून माघार घेतल्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याने या निवडणुकीसंदर्भातील चर्चा दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाशी होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र फडणवीस यांच्या या दौऱ्याचं मुख्य कारण भाजपाची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक हे आहे.

Story img Loader