पुणे : समाजमाध्यमावर अनोळखी व्यक्तीशी मैत्री एका उच्चशिक्षित महिलेला महागात पडली. परदेशात डाॅक्टर असल्याची बतावणी करणाऱ्या चोरट्याने भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने महिलेची तीन लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी येरवडा पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ३३ वर्षीय उच्चशिक्षित महिलेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेला समाजमाध्यमावरुन अनोळखी व्यक्तीने मैत्रीची विनंती पाठविली. महिलेने विनंती स्वीकाली. त्यानंतर सायबर चोरटा आणि महिलेचा संवाद वाढला.
चोरट्याने ऑस्कर हॅरी असे नाव सांगून परदेशात डाॅक्टर असल्याची बतावणी केली होती. त्यानंतर चोरट्याने महिलेला परदेशातून भेटवस्तू पाठविण्याचे आमिष दाखविले. चोरट्याने विमानाने वस्तू विमानतळावर पाठविल्या असून सीमाशुल्क विभागाचा (कस्टम) कर भरावा लागेल, अशी बतावणी केली. त्यानंतर महिलेला एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेने तीन लाख २५ हजार रुपये बँक खात्यात जमा केले. पैसे जमा केल्यानंतर पुन्हा पैशांची मागणी करण्यात आल्याने महिलेला संशय आला. तिने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे तपास करत आहेत.