Maharashtra Political Crisis Updates, 15 November 2022 : राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय दंड विधानातील ३५४ कलमांतर्गत त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्रही त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या नावे लिहिले आहे.
वसईतील एका २६ वर्षीय तरुणीची तिच्याच प्रियकराने दिल्लीत खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे. आरोपी प्रियकराने मृतदेहाचे तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिले. सहा महिन्यानंतर हे क्रौर्य उघडकीस आलं आहे. दरम्यान पोलीस चौकशीत आरोपीने तिचा गळा दाबणं सोपं होतं, पण मृतदेहाची विल्हेवाट लावणं फार कठीण होतं असं म्हटलं आहे.
वाचा राज्यभरातील विविध घडामोडी एकाच क्लिकवर
Marathi News Live Today, 15 November 2022 : वाचा राज्यभरातील विविध घडामोडी एकाच क्लिकवर
भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला. यानंतर आव्हाडांनी राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवला. राजीनामा पवारांकडे दिल्यावरून भाजपाने आव्हाडांचा राजीनामा 'नौटंकी' असल्याची टीका केली. त्यावर आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलंय. यावेळी त्यांनी संभाजी भिडे, अब्दुल सत्तार, गुलाब पाटील यांची नावं घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.
विलेपार्ले येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे मैत्रीणीसोबत नग्नावस्थेत चित्रीकरण करून त्याच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने एका आरोपीला अटक केली आहे.
‘आपल्या नवऱ्याप्रमाणे बँकेत येणाऱ्या ग्राहकांना कन्व्हिन्स करा, असे लज्जास्पद बोलून महिला कर्मचाऱ्याचा मानसिक त्रास दिल्याने बँकेच्या सहायक महाप्रबांधकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार भंडारा येथील स्टेट ऑफ इंडियाच्या मिस्कीन टँक शाखेत घडला.
नवी मुंबई: लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षांपासून शारीरिक शोषण करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षका विरोधात नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी पीडित महिला ही सुद्धा पोलीस दलातच कार्यरत आहे. बातमी वाचा सविस्तर...
महाराष्ट्राच्या विविध भागात दिवसा, रात्री चोऱ्या करुन गायब होणाऱ्या कल्याण जवळील आंबिवली गावत राहत असलेल्या एका खतरनाक चोरट्याला पकडण्यात भिवंडी पोलीस ठाणे हद्दीतील कोनगाव पोलीसांना सोमवारी यश आले.
दिल्ली हायकोर्टाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली असून आणखी एक धक्का दिला आहे. ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पक्षनाव व निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेत आव्हान दिलं होतं. मात्र दिल्ली हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. तसंच निवडणूक आयोगाला यासंबंधी तातडीने निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा निर्णय निवडणूक आयोगाच्या अधिकारकक्षेत असल्याचंही कोर्टाने स्पष्ट केलं.
ठाण्यातील श्रीनगर पोलीस स्टेशनच्या आवारात सोमवारी (१४ नोव्हेंबर) संध्याकाळी पोलिसांनी लाठ्यांनी आणि लाकडी बॅटने लोकांना मारल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. पोलिसांना आम्ही अडवत असतानाही पोलीस काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांचा लाठीमार सुरूच होता. कित्येक जणांचे या लाठीमारामध्ये डोकी फुटली, असंही शिंदे गटाने म्हटलं. तसेच या लाठीमाराची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.
ठाणे : श्रीनगर पोलिस ठाण्याच्या आवारात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर सोमवारी रात्री झालेल्या पोलिसांकडून झालेल्या लाठीहल्ल्याची चौकशी करण्याची मागणी बाळासाहेबांची शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे. बातमी वाचा सविस्तर...
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात दिलासा मिळाला आहे. ठाणे कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती प्रणय गुप्ता यांनी हा निर्णय दिला. रिदा रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे कोर्टात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी २४ तास वाहन तपासणी करण्याचे आदेश परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सोमवारी दिले. परिवहन आयुक्त भिमनवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी आयेजित करण्यात आली. या बैठकीत रस्ते सुरक्षा आणि राज्यातील विविध महामार्गांवर झालेल्या अपघातांच्या घटनांचा आढावा घेण्यात आला. बातमी वाचा सविस्तर...
मांडवा वॉटर टॅक्सी सेवा सुरू होऊन दोन आठवडे पूर्ण झाले असून या दोन आठवड्यांत २,४०३ प्रवाशांनी देशातील सर्वात मोठ्या वॉटर टॅक्सीतून प्रवास केला आहे. तूर्तास या सेवेला प्रतिसाद कमी आहे. मात्र भविष्यात त्यात वाढ होईल, असा विश्वास कंत्राटदार कंपनीकडून व्यक्त करण्यात येत आहे. बातमी वाचा सविस्तर...
पुणे : सदनिकांचे प्रथम विक्री करारनामे आणि भाडेकरार या प्रकारचे दस्त ऑनलाइन प्राप्त झाल्यानंतर पुढील २४ तासांत ते नोंदविले गेले पाहिजेत. अन्यथा संबंधित दुय्यम निबंधकांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेश नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने प्रसृत केले आहेत. बातमी वाचा सविस्तर...
संचित रजेचा कालावाधी संपल्यानंतर तुरुंगात परत न जाता पळून गेलेल्या दोन आरोपींना धारावी आणि अंधेरी येथील एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. रवी नयनसिंग ठाकूर आणि मोहम्मद आयान करीम शेख अशी या दोघांची नावे आहेत. बातमी वाचा सविस्तर...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी "तुम्ही दारू पिता का?" या वक्तव्यावरून राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना सत्तारांनी तुम्ही दारू पिता का? अशी विचारणा केली होती. याच मुद्द्यावर अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारचे कान टोचले. तसेच शिंदे गट आणि भाजपात वाचाळवीरांचं प्रस्थ वाढल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितल्याचंही त्यांनी नमूद केलं. ते मंगळवारी (१५ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत बोलत होते.
शासनाच्या मच्छिमार विरोधी निर्णयामुळे पर्ससीन पध्दतीने मासेमारी करणाऱ्या व त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या लाखो कुटूंबियांच्या मागण्यासाठी प्रसंगी शासनाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा मच्छीमारांनी करंजा येथे झालेल्या बैठकीत दिला आहे. बैठकीला मुंबई, मोरा, करंजा, दिघोडे, रेवस, ट्रॉम्बे, माहुर,ठाणे येथील विविध मच्छिमार संस्थांचे सुमारे ५५० पदाधिकारी व मच्छीमार प्रतिनिधी उपस्थित होते.
नागपूर: सौंदर्य फुलवण्यासाठी बरेच तरुण केस प्रत्यारोपण करतात. त्यासाठी डोक्याच्या मागील भागातील (डोनर भाग) शिल्लक केस घेतले जाते. परंतु ही प्रक्रिया तज्ज्ञांकडून करणे अपेक्षित आहे. परंतु या क्षेत्रातील कुठलाही अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण न घेतलेले केस प्रत्यारोपण करू लागले आहेत. त्यामुळे मागील भागातील शिल्लक केसही गमवावे लागू शकतात. बातमी वाचा सविस्तर...
मुंबई : दादरच्या फुलबाजारातील दुकानांवर मुंबई महानगरपालिकेकडून केल्या जाणाऱ्या पाडकाम कारवाईस उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. फुलविक्रेत्यांच्या व्यवसायात ५ डिसेंबरपर्यंत कोणताही अडथळा आणू नये, असेही न्यायालयाने यावेळी महानगरपालिकेला बजावल्याने फुलविक्रेत्यांना तूर्त दिलासा मिळाला. बातमी वाचा सविस्तर...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी "आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे," असं वक्तव्य केलं. यानंतर सोशल मीडियावर या वक्तव्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अमृता फडणवीस सोमवारी (१४ नोव्हेंबर) नाशिकमध्ये अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे इत्यादीही उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने राज्यात सध्या वाद निर्माण झाला आहे. रिदा रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचे पडसाद उमटत असतानाच आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय सोशल मीडियावरुन जाहीर केला. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे कोर्टात धाव घेतली असून अटकपूर्व जामिनासाठी र्ज केला आहे. यावेळी जितेंद्र आव्हाडांच्या वकिलांनी गर्दीत विनयभंग कसा होऊ शकतो? अशी विचारणा केली आहे.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून कल्याण मधील सम्राट अशोक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोमवारी शाळेत व्यसन मुक्तीची शपथ घेतली. बातमी वाचा सविस्तर...
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या नियमित जामीन अर्जावर विशेष न्यायालय २४ नोव्हेंबर रोजी निर्णय देण्याची शक्यता आहे.
स्वयंघोषित समाज माध्यम विश्लेषक अजित पारसे आणि एका मोठ्या राजकीय नेत्याच्या मुलाचे ‘संबंध’ समोर आले असून पारसेने त्या युवा नेत्यालाही ‘दिल्ली दर्शन’ घडवल्याची धक्कादायक माहिती आहे. बातमी वाचा सविस्तर...
ठाणे : वागळे इस्टेट येथील किसननगर भागात ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादात ठाकरे गटाच्या दोन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटने प्रकरणी दोन्ही गटांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या. बातमी वाचा सविस्तर...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघातील तूप अपहारप्रकरणी दाखल गुन्ह्यात कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह चौघांना शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने रात्री अटक केली. या कारवाईमुळे राजकीय व सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मुंबई : सोनेरी कोल्हा (गोल्डन जॅकल) कांदळवन परिसंस्थेतील प्रमुख सस्तन प्राणी असून त्यावर अद्याप नियोजनबद्ध सर्वेक्षण झालेले नाही. त्यामुळे सोनेरी कोल्ह्यांची संख्या, माहिती तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध आहे. बातमी वाचा सविस्तर...
नागपूर : प्रकल्प पूर्णत्वास झालेला विलंब आणि सुधारित आराखड्यात दोन नव्या स्थानक बांधणीचा समावेश यामुळे मेट्रो प्रकल्पाच्या एकूण खर्चात वाढ झाल्याने राज्य शासनाने ९२७९ कोटींच्या सुधारित खर्चास सोमवारी मान्यता दिली. बातमी वाचा सविस्तर...
गळतीमुळे राज्यभर गाजलेल्या टेमघर धरणाच्या दुरुस्तीच्या कामांची राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरणाच्या (नॅशनल डॅम सेफ्टी ॲथॉरिटी – एनडीएसए) अधिकाऱ्यांनी पाहणी केली. धरणाच्या दुरुस्तीच्या अनुषंगाने केलेल्या कामाची सविस्तर माहिती घेऊन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी टेमघर धरण दुरुस्तीचे प्रारूप देशभरातील धरणांच्या दुरुस्तीसाठी वापरण्याची शिफारस करण्यात येणार असल्याचे सांगितले. बातमी वाचा सविस्तर...
राज्य सरकारने वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळीतील रहिवाशांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकल्पातील पात्र झोपडपट्टीवासीयांना आता २६९ चौरस फुटांऐवजी आता ३०० चौरस फुटांचे घरे देण्यात येणार आहे. बातमी वाचा सविस्तर...
वाशीम : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ‘भारत जोडो यात्रा’ आज, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी विदर्भातील वाशीम जिल्ह्यात दाखल झाली. राहुल गांधी यांचे वाशीम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले. बातमी वाचा सविस्तर...
पुणे : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोमवारी मांजरी येथील संस्थेत करण्यात आले.ममता बाल सदन, सन्मती बाल निकेतन संस्था, मनःशांती छात्रालय आणि वनवासी गोपालकृष्ण बहुउद्देशीय मंडळ यांच्या वतीने सिंधुताईंची जयंती आणि बालदिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बातमी वाचा सविस्तर...
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडी सरकारने वाढवलेली प्रभागसंख्या २३६ वरून पुन्हा २२७ करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या ८ ऑगस्ट रोजीच्या निर्णयाला माजी नगरसेवकाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.