Mumbai Maharashtra News Updates: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिंदे गट व ठाकरे गट या दोन्ही बाजूंचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतलं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पुन्हा उद्धव ठाकरे गटाकडे जाण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. भुजबळांनी आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं असलं, तरी त्यांच्या ‘घरवापसी’वर जोरदार तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

Live Updates

Mumbai Maharashtra News : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा!

16:04 (IST) 19 Jun 2024
Maharashtra News Live: शरद पवारांचं सूचक विधान, म्हणाले…

बारामती दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी सांगवीतील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी निवडणुकीदरम्यान इतरांकडून त्रास झाल्याचं ग्रामस्थांनी सांगितल्यानंतर त्यावर शरद पवारांनी दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला. ” मी बऱ्याच दिवसातून या वेळेला तालुक्यातल्या गावांमध्ये जातोय. लोक गावचे सांगतात की निवडणुकीमध्ये काही लोकांचा विरोध खूप झाला. झालं ते विसरून जायचं, लक्षात ठेवायचं नाही. सुडाचं राजकारण आपण कधी करत नाही”, असं शरद पवार यावेळी म्हणाले. तसेच, “गावातल्या नेत्यांचं दुकान चाललं नाही, पण सामान्य माणसांचं दुकान जोरात चाललं”, असं सूचक विधानही शरद पवारांनी यावेळी केलं.

वाचा पूर्ण पोस्ट…

बारामती तालुका दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सांगवी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. एक काळ असा होता की, सांगवीला माझं जाणं येणं नेहमी असायचं. अनेक सहकारी होते काही हयात आहेत व काही नाहीत. सांगवीचे नेतृत्व आता नव्या पिढीच्या हातात आहे. अनेक निवडणुकींना सांगवीच्या नागरिकांनी सतत आम्हा लोकांना पाठिंबा दिला, सांगवीच्या विकासामध्ये सहकार्य केलं. या ठिकाणची शेती संपन्न व्हावी यासाठी एकेकाळी नदीमध्ये बंधारे बांधण्याचे काम सांगवीपासून सुरू झाले. नंतरच्या काळामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखाना असो, अन्य संस्था दूध संघासारख्या असो या सगळ्यांमध्ये सांगवीचा मोठा वाटा होता. सांगवीने नेतृत्व सुद्धा केलं. या भागाच्या एकंदर शेती व्यवसायाच्या उद्योगाला हातभार लावण्यासाठी सांगवीची मदत नेहमी राहिलेली आहे. त्यामुळे सांगवीचं सबंध भागामध्ये नावलौकिक आहे. मोठ्या मतांनी जवळपास ४० – ४५ हजारांच्या फरकाने सुप्रियाला तुम्ही विजयी केलं. मी तुम्हाला एवढीच खात्री देतो की, देशाच्या लोकसभेमध्ये तुम्हा लोकांच्या मतदारसंघाचे नाव तुमचे नवे खासदार, तुमचे खासदार हे त्याठिकाणी गाजवल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला त्याचे समाधान मिळेल. आता बोलताना काही अडचणी या ठिकाणी सांगितल्या. रयत शिक्षण संस्थेच्या काही अडचणी आहेत. संस्थेचा अध्यक्ष मीच आहे त्यामुळे चौकशी करून त्यातून काही मार्ग काढावा लागेल तो मी काढेन. नदीच्या पाण्याचा प्रश्न, बंधारे आपण बांधले, पाणी साठवलं पण पाण्यामध्ये प्रदूषणाचा त्रास व्हायला लागला. पाणी स्वच्छ राहिले नाही आणि त्यामुळे साहजिकच तुम्ही सगळे अस्वस्थ आहात. पर्यावरण खात्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याशी मी बोलेन. शक्य झालं तर त्याच्या तज्ञांना या ठिकाणी पाठवून कायमचा मार्ग कसा काढता येईल याचा विचार आपण करू आणि तुम्हा लोकांची सुटका त्यामधून करू एवढेच मी सांगू इच्छितो. साखर कारखानदारी आपण सर्वांनी वाढवली. साखर आपण करत होतो, नंतर इथेनॉल करायला लागलो त्याची तुम्हा लोकांना अधिकची किंमत मिळाली याची काळजी आपण घेतली. लहान वर्ग गावामध्ये मोठा आहे तसं उसाचं क्षेत्र कदाचित नसेल. ह्या लोकांसाठी आपण दुधाचा धंदा वाढवला त्यासाठी दुधाच्या सोसायट्या केल्या, दुधाचा तालुका संघ केला आणि दुधाची विल्हेवाट एकेकाळी आपण पुण्याला जे करत होतो त्याच्यात बदल करायची गरज आहे हे लक्षात आल्यावर बारामतीला दुधाची पावडर तयार केली. डायनामिक नावाची एक मोठी कंपनी अमेरिकेहून आणून आपण उभी केली आणि त्या दुधाच्या पावडर पासून चॉकलेटचे कारखाने आपण बारामतीला उभे केले आणि त्यामुळे दुधाची विल्हेवाट कशी लावायची याची आता अडचण राहिली नाही आणि त्या कारखान्यात सुद्धा काही हजारो लोकांना आता काम मिळायला लागलं. विकासाच्या दृष्टीने त्याची मदत झाली. त्यामुळे ऊस, ऊसाची साखर, साखरेपासून इथेनॉल या गोष्टी जसं दूध, दुधापासून पावडर, पावडरपासून चॉकलेट अशा प्रकारची कारखानदारी आपण आपल्या भागात उभी केली. शेतीला मदत होईल अशा प्रकारची व्यवस्था आपण या कारखानदारीतून आपल्या भागात केली त्याचा फायदा हा काही ना काही प्रमाणात लोकांना होतोय. तरी आणखी काम करावं लागेल, शिक्षणाचा दर्जा सुधारावा लागेल आणि आपली नवीन पिढी ही वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे कशी जाईल याची काळजी घ्यावी लागेल आणि ते काम करायचं असेल तर आपल्याला एका विचाराने पुढची पाऊलं टाकावी लागतील. मी तुम्हाला खात्री देतो की कुणाचा कितीही विरोध असला तो विरोध तुम्ही लोकांनी लक्षात ठेवला नाही. मी बऱ्याच दिवसातून या वेळेला तालुक्यातल्या गावांमध्ये जातोय. लोक गावचे सांगतात की निवडणुकीमध्ये काही लोकांचा विरोध खूप झाला. झालं ते विसरून जायचं, लक्षात ठेवायचं नाही. सुडाचं राजकारण आपण कधी करत नाही पण एक गोष्ट ज्यांनी बारामती तालुक्यात सिद्ध केली नेते गावातले होते त्यांचं दुकान काही चाललं नाही. सामान्य माणसं जी आहेत, साधी माणसं आहेत, लहान शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत त्यांचं दुकान जोरात चाललं. त्यामुळे त्याच्यामध्ये नवीन पिढी, तरुणांची पिढी ही पुढे आली. या तरुणांच्या पिढीच्या मार्फत गावाचा विकास कसा होईल? प्रश्न कसे सुटतील? याच्यावर लक्ष देणं आम्हा लोकांची जबाबदारी राहील ती काळजी केली जाईल. या सगळ्या तरुण पिढीला ज्यांनी निवडणुकीत पुढाकार घेतला त्यांना ताकद देणं, त्यांच्या पाठीशी उभे राहणं या कामात आम्हा लोकांचे लक्ष राहील एवढीच खात्री या ठिकाणी देतो. तुम्ही लोकांनी स्वागत केलं त्याबद्दल तुम्हा लोकांना धन्यवाद देतो. या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष होतं. आज माझ्याबरोबर एक रशियावरून मुलगा आलाय त्याचं नाव पीटर. मी त्यांना विचारलं कशासाठी येताय? ते म्हटले गावामध्ये तुमच्या निवडणुकी झाल्या त्याची काय पद्धत असते? रशियात सुद्धा चर्चा झाली बारामतीच्या निवडणुकीची आणि म्हणून तो स्वतः इथे आला आहे रशियावरून. काही हरकत नाही जी चर्चा सगळीकडे झाली, तो एक इतिहास तुम्ही लोकांनी निर्माण केला. त्याबद्दल तुम्हा लोकांना धन्यवाद देतो.

15:53 (IST) 19 Jun 2024
‘कवच’विनाच धावताहेत महाराष्ट्रात रेल्वे गाड्या; कांचनगंगा अपघातानंतर…

नागपूर : रेल्वेगाड्यांची टक्कर टाळण्यासाठी ‘कवच’ ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. परंतु महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेला मध्य रेल्वे विभाग अद्याप या प्रणालीपासून लांबच आहे.

सविस्तर वाचा…

15:36 (IST) 19 Jun 2024
एमएचटी-सीईटीच्या निकालातील गुणवाढीमुळे ‘या’ शाखांमध्ये प्रवेशासाठी गर्दी वाढणार; अशी आहे राज्यातील प्रवेशाची स्थिती

नागपूर: अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राज्य समाईक प्रवेश परीक्षेत (एमएचटी-सीईटी) पीसीबी आणि पीसीएम गटातील मिळून ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले आहेत. गेल्या वर्षी २८ जणांना १०० पर्सेंटाइल होते. राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) रविवारी निकाल जाहीर झाला.

सविस्तर वाचा…

15:17 (IST) 19 Jun 2024
नवी मुंबई : एपीएमसी’च्या सचिवांच्या दालनातील छताचा भाग कोसळला

नवी मुंबई : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सचिव पी. एल. खंडागळे यांच्या दालनातील खुर्चीवर स्लॅब कोसळल्याची दुर्घटना सोमवारी सायंकाळी घडली.

सविस्तर वाचा…

15:16 (IST) 19 Jun 2024
नवी मुंबई : क्षुल्लक कारणावरून हत्येचा प्रयत्न; गुन्हा दाखल

नवी मुंबई : क्षुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करेल या रागापोटी थेट हत्येचा प्रयत्न करणाऱ्या त्रिकुटा विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सविस्तर वाचा…

15:15 (IST) 19 Jun 2024
पुणेकरांना गुड न्यूज! स्वारगेटहून आता थेट मंत्रालयासाठी शिवनेरी सुरू

पुणे : पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. याचबरोबर अनेक नोकरदार नोकरीनिमित्त मुंबईत राहतात आणि आठवड्याच्या अखेरीस साप्ताहिक सुट्यांना पुण्यात परतात. ते पुन्हा सोमवारी सकाळी मुंबईला कामावर जातात. अशा प्रवाशांसाठी एसटीने स्वारगेट ते मंत्रालय शिवेनरी बस सुरू केली आहे.

सविस्तर वाचा…

15:04 (IST) 19 Jun 2024
जरांगे पाटलांचे समाधान होतच नसेल तर आता आम्ही काय करणार ? – गिरीश महाजन

मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजात भाजपने वाद लावला अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

सविस्तर वाचा…

14:35 (IST) 19 Jun 2024
करंजाडे ते पनवेल स्थानक बसच्या मार्गातील वाहतूक कोंडी दूर करा

पनवेल ः करंजाडे वसाहतीपासून पनवेल रेल्वेस्थानकाला जोडणारी नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रम सेवेची ७६ क्रमांकाच्या बससेवेला वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले आहे.

सविस्तर वाचा…

14:13 (IST) 19 Jun 2024
उरण : ओएनजीसी’च्या तेलगळतीग्रस्तांना दीड कोटींची नुकसानभरपाई

उरण : ऑगस्टमध्ये उरण ओएनजीसी प्रकल्पातून झालेल्या प्रचंड तेलगळतीमुळे येथील शेतकरी आणि मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानभरपाईपोटी प्रशासनाने १ कोटी २३ लाख ८० हजार रुपये देण्याचे मान्य केले. यातील शेतकऱ्यांना २३ लाख ८० हजार रुपयांचे वाटप केले आहे. तर मच्छीमारांसाठी एक कोटीचे मच्छीमारी साहित्य तसेच मासळी सुकविण्यासाठी ओटा या सुविधा देण्यात येणार आहेत.

वाचा सविस्तर…

14:10 (IST) 19 Jun 2024
विशाळगड येथे बकरी-ईद, उरूसनिमित्त कुर्बानीस परवानगी, आदेशाचा विपर्यास केल्यावरून उच्च न्यायालयाकडून स्थानिक प्रशासनाची कानउघाडणी

याचिकाकर्त्यांना चार दिवसांसाठी कुर्बानी देण्यास परवानगी दिली असतानाही न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला, असे न्यायमूर्ती बर्गिस कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

सविस्तर वाचा…

14:01 (IST) 19 Jun 2024
Maharashtra News Live: रोहित पवारांचा भाजपावर हल्लाबोल, अजित पवारांचा केला उल्लेख!

विआच्या विरोधात दुहेरी लढतीत जनता आपल्याला पराभूत करते म्हणून तिरंगी लढत झाली पाहिजे, तिरंगी लढत झाल्यास सर्वसामान्य जनतेची मते विभागली जाऊन भाजपला फायदा होतो, असा भाजपच्या चाणक्यांचा कयास आहे. त्यामुळेच तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादांना बळीचा बकरा करण्यात येत असून आधी आरएसएसच्या मुखपत्रातून टीका, नंतर झोपलेले तथाकथित गांधी जागे करायचे आणि आता पुढे काहीतरी करून अजितदादांना वेगळे होण्यास भाग पाडायचे ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडली असल्याची चर्चा आहे. परंतु मुळात भाजपचा पराभव केवळ अजितदादांमुळे झालेला नाही तर भाजपच्याच शेतकरी, युवा विरोधी धोरणांमुळे झालेला आहे. भाजप नेत्यांच्या अहंकारामुळे, जनतेला गृहीत धरून चालण्याच्या वृत्तीमुळे, पक्ष फोडण्याच्या कृत्यांमुळे, महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाड केल्यामुळे झालेला आहे. त्यामुळे अजितदादांना वेगळे करून तिरंगी लढती करून उपयोग नाही. शेतकरी, युवा यांना गृहीत धरून चालणाऱ्या, मराठी स्वाभिमान गहाण टाकून महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवणाऱ्या भाजपला धडा शिकवल्याशिवाय हा महाराष्ट्र शांत बसणार नाही, याची दखल चाणक्यांनी घ्यायला हवी – रोहित पवार

13:54 (IST) 19 Jun 2024
उरण : शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा

उरण : या वर्षी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला असून शेतकऱ्यांनी भातपिकाच्या पेरण्या केल्या आहेत. आतापर्यंत उरण तालुक्यात अवघ्या ६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पेरणीनंतर आवश्यक असलेला पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना शेती उपयुक्त पावसाच्या आगमनाची आस लागून राहिली आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

वाचा सविस्तर…

13:52 (IST) 19 Jun 2024
नवी मुंबई : मोरबे धरणात ३८ दिवस पुरेल इतका पाणीसाठा!

नवी मुंबई : शहरात पावसाने श्रीगणेशा केल्यानंतर मागील काही दिवस दडी मारली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने खबरदारी म्हणून आठवड्यातून विभागवार दोन दिवसांऐवजी आठवड्यातून तीन दिवस सायंकाळचा पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय मागील आठवड्यात घेतला आहे.

वाचा सविस्तर…

13:41 (IST) 19 Jun 2024
शक्तिपीठ महामार्गावरून सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती

सत्ताधारी या प्रकल्पावरून सतर्क होत असताना महाविकास आघाडीने या प्रकल्पाविरुद्धचा आवाज आणखी बुलंद केला आहे.

सविस्तर वाचा…

13:31 (IST) 19 Jun 2024
बुलढाणा : कडेकोट बंदोबस्तात पोलीस भरतीला प्रारंभ; गुप्तचर, एसीबी अन्…

बुलढाणा : विविध विभागांसह सीसीटीव्हीची करडी नजर, उमेदवारांची बायोमेट्रिक पद्धतीने ओळख आणि भरती स्थळाला असलेला पोलिसांचा गराडा, अशा कडक बंदोबस्तात आणि काटेकोर दक्षतेत येथे एकूण १३३ रिक्त पदांसाठीच्या पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून पूर्वनियोजित वेळेवर प्रारंभ झाला. पोलीस अधीक्षक सुनील कडासने हे स्वतः पोलीस कवायत मैदानावरील भरती प्रक्रियेत सहभागी झाले.

सविस्तर वाचा…

13:00 (IST) 19 Jun 2024
पंतप्रधान कार्यालयातील बोगस राष्ट्रीय सल्लागार साताऱ्यातील काश्मीरा पवारसह पतीवर गुन्हा

वाई : पंतप्रधान कार्यालयामध्ये राष्ट्रीय सल्लागार असल्याची बतावणी करीत एका व्यावसायिकाची तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. केंद्र शासनाचे मोठे कंत्राट मिळवून देतो असे आमिष त्याला दाखवण्यात आले होते. हा प्रकार डिसेंबर २०१९ ते मार्च २०२२ या कालावधी दरम्यान घडला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर…

12:59 (IST) 19 Jun 2024
ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर बांबूचे छत, पावसापासून बचाव करण्यासाठी तात्पुरता आडोसा

कल्याण : ठाणे रेल्वे स्थानकातील नव्यानेच विस्तारित करण्यात आलेल्या फलाट क्रमांक पाचवर प्रवाशांना पावसाचा त्रास होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात हिरव्या जाळीचे बांबूचे छत उभारले आहे. फलाट क्रमांक पाचचे अलीकडेच रूंदीकरण करण्यात आले. पहिल्याच पावसात या फलाटावर पावसाचे पाणी तुंबल्याने प्रवाशांना लोकलमध्ये चढ उतर करताना त्रास होत होता.

वाचा सविस्तर…

12:19 (IST) 19 Jun 2024
पुण्यात ‘या’ कारणामुळे कडाडले कोथिंबिरीचे भाव; बाजार समितीने उगारला कारवाईचा बडगा

पुणे : मार्केट यार्डातील घाऊक बाजारात दुबार विक्रीमुळे कोथिंबिरीचे दर वाढल्याच्या तक्रारी आल्यानंतर बाजार समितीने मंगळवारी कारवाईचा बडगा उगारला. बाजार आवारातील चौघांवर कारवाई करून बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी कोथिंबिरीच्या ३३५ जुड्या जप्त केल्या.

सविस्तर वाचा…

11:59 (IST) 19 Jun 2024
“काँग्रेसने पुन्हा एकदा इंग्रजांचा काळ आणला,” चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका; म्हणाले, “नाना पटोलेंनी…”

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेत आहेत. इतक्या खालच्या पातळीवर ते गेले आहेत. महाराष्ट्रात हा अशोभनीय प्रकार त्यांनी केला. काँग्रेसने देशात पुन्हा एकदा इंग्रजांचा काळ आणला आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. बावनकुळे नागपुरात बोलत होते.

सविस्तर वाचा…

11:58 (IST) 19 Jun 2024
ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजारांनी काढले डोके वर; १५ दिवसात मलेरियाचे २५ रुग्ण तर, डेंग्यूचे ११ रुग्ण

ठाणे : जिल्ह्यात गेल्या १५ दिवसात मलेरियाचे २५ तर, डेंग्यू चे ११ रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यू आणि मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण हे ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत. यामुळे पावसाळा सुरू होताच साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याचे चित्र आहे.

वाचा सविस्तर…

11:57 (IST) 19 Jun 2024
“काँग्रेसने पुन्हा एकदा इंग्रजांचा काळ आणला,” चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका; म्हणाले, “नाना पटोलेंनी…”

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेत आहेत. इतक्या खालच्या पातळीवर ते गेले आहेत. महाराष्ट्रात हा अशोभनीय प्रकार त्यांनी केला. काँग्रेसने देशात पुन्हा एकदा इंग्रजांचा काळ आणला आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. बावनकुळे नागपुरात बोलत होते.

सविस्तर वाचा…

11:56 (IST) 19 Jun 2024
आवक घटल्याने भाजीपाला कडाडला, नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या पुरवठ्यात घट

नाशिक : मुंबईची परसबाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे भाजीपाला उत्पादनात कमालीची घट झाली असून त्याचा परिणाम मुंबईसह इतरत्र पुरवठ्यावर होत आहे. त्यातच आता पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक ४० ते ५० टक्क्यांनी कमी झाली असून दरही कडाडले आहेत. परिणामी, भाजीपाला खरेदीत गृहिणींना हात आखडता घ्यावा लागत आहे.

वाचा सविस्तर…

11:54 (IST) 19 Jun 2024
Maharashtra News Live: देवेंद्र फडणवीसांच्या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा

हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रखरता आणि प्रतिबध्दता कायम जपणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाला वर्धापनदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! राज्यभरातील शिवसैनिकांना मन:पूर्वक शुभेच्छा! – देवेंद्र फडणवीस

11:29 (IST) 19 Jun 2024
एक काय, दहावेळा पाय धुणार! विजय गुरव यांची सडेतोड भूमिका, म्हणाले, “पटोले माझे दैवत, विरोधकांनी राजकारण…”

बुलढाणा : कार्यकर्त्याने पाय धुणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. त्यांच्यावर चोहीकडून प्रामुख्याने विरोधी पक्ष नेत्यांकडून टीकेचा भडिमार होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राम शिंदे, शिवसेनेचे संजय शिरसाट, राष्ट्रवादीचे (अजितदादा पवार गट) अमोल मिटकरी यांनी यावरून घनघोर टीका करीत पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यामुळे पटोले हे चोहोबाजूंनी अडचणीत आले असताना त्यांचे पाय धुणारे विजय गुरव देखील चर्चेत आले आहे.

सविस्तर वाचा…

11:07 (IST) 19 Jun 2024
नागपूर : गरोदर महिलांच्या तपासणीत १० हजारांवर सिकलसेल वाहकांची नोंद

नागपूर: जिल्ह्यात २०११ पासून गरोदर मातांची सिकलसेल तपासणी होत आहे. त्यात १० हजार ३८१ स्त्रिया सिकलसेल वाहक असल्याचे पुढे आले आहे. १९ जूनला जागतिक सिकलसेल दिन असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.

सविस्तर वाचा…

10:53 (IST) 19 Jun 2024
सावधान! चहातून गुंगीचे औषध देऊन महिलांचे दागिने लुबाडतेय एक महिला

पुणे : बिबवेवाडी भागात गुंगीचे औषध देऊन दोन महिलांकडील दागिने चोरून नेण्यात आल्याची घटना घडली. आरोपी महिलेने दोन महिलांना काम मिळवून देण्याचे आमिष देऊन त्यांना चहातून गुंगीचे औषध देऊन दागिने लुटल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा….

10:34 (IST) 19 Jun 2024
Maharashtra News Live: मी नाराज नाही, भुजबळांनी केलं स्पष्ट

गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ राज्य सरकारमध्ये आणि अजित पवार गटात नाराज असल्याच्या चर्चा चालू आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका मांडली असून त्यावरून ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळ पुन्हा शिवसेनेत जाणार असल्याचे तर्क लावले जात असताना दुसरीकडे भुजबळांनी स्वत: आपण नाराज नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे यासंदर्भातल्या घडामोडींकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

10:32 (IST) 19 Jun 2024
Mumbai Maharashtra News Live Updates: मुंबईतलं राजकीय वातावरण तापणार!

आज शिवसेनेचा वर्धापन दिन असून त्यानिमित्ताने शिंदे गट व ठाकरे गट यांच्याकडून दोन स्वतंत्र मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे गटाचा मेळावा षण्मुखानंद येथे तर शिंदे गटाचा मेळावा वरळीतल्या एनआयसीमध्ये होणार आहे.

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह

Mumbai Maharashtra News Live: छगन भुजबळ खरंच पुन्हा स्वगृही अर्थात ठाकरे गटात परतणार?