Marathi News Updates, 10 October 2024 : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. राज्यातील वेगवेगळे पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. काही दिवसांत निवडणूक जाहीर होईल. ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे राज्यभर दौरे चालू आहेत. हे नेते ठिकठिकाणी मेळावे घेत आहेत. यासंबंधीच्या बातम्यांवर आपलं लक्ष असेल. लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यात फिरत आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील पक्षबांधणी करण्यात व्यस्त आहेत. या सर्व राजकीय घडामोडींवर आणि राज्यातील सामाजिक घडामोडींवर आपलं लक्ष असेल.
Maharashtra Breaking News Live Today, 10 October 2024 : राज्यासह देशभरातील बातम्या वाचा एकाच क्लिकवर
मुंबई: भरधाव वेगात असलेल्या एका टेम्पोने मंगळवारी दुपारी मुलुंड टोल नाक्यावरील एका बूथला जोरदार धडक दिली. या अपघातात बूथमधील एक कर्मचारी जखमी झाला असून नवघर पोलिसांनी टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.मुलुंड टोल नाक्यावरील बूथ क्रमांक आठ येथे मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली. ठाण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पोने बूथला धडक दिली.
यावेळी या बुथमध्ये कर्मचारी अस्मित कांबळी (३७) उपस्थित होता. त्यालाही या टेम्पोची धडक बसली असून तो जखमी झाला आहे. ही बाब इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अस्मितला मुलुंडच्या अगरवाल रूग्णालयात दाखल केले.या अपघातात बूथमधील संगणक आणि इतर सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले.
मुंबई : राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याकरीत मोफत शिक्षण योजना लागू केली आहे. ही योजना केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच लागू केल्यानंतर त्याचा परिणाम यंदा मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील १ लाख ३९ हजार विद्यार्थिनींनी विविध पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतले आहेत.
नाशिक - मालेगाव येथील सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या कामगाराचा रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी मालेगांव तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मालेगाव तालुक्यातील चिखलओहळ परिसरातील मोहम्मद इद्रिस (३९) हे रिलायन्स कंपनीच्या शाखेत काम करत होते. ते नेहमीप्रमाणे काम झाल्यानंतर खोलीत आराम करण्यासाठी गेले असता खोलीत असलेल्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने ते जबर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने खासगी वाहनातून मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर धुळे येथील वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
अकोला : जुने शहरातील हरिहर पेठ भागात जातीय वाद होऊन तणावाचे वातावरण असल्यावर चक्क पोलीस ठाण्यावरच विनापरवानगी मोर्चा काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
राज्य सरकारने उद्योगरत्न पुरस्काराचं नाव बदलून त्याचं नाव आता रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार असं केलं आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार पहिल्यांदा रतन टाटांनाच मिळाला होता.
बुलढाणा जिल्ह्यासाठी बुधवार (दि. ९) अक्षरशः घातवार ठरला. संध्याकाळी उशिरा झालेल्या विविध दुर्घटनात ७ जणांचा मृत्यू झाला तर ५ जण गंभीर जखमी झाले.
मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन विभागात कार्यरत असलेल्या सहाय्यक परिचारिका प्रसविकांना ग्रेड पे ४२०० रुपये पूर्वलक्षी प्रभावाने कालबद्ध पदोन्नती लागू करण्याबाबत प्रशासनाकडून दिरंगाई करण्यात येत आहे. सविस्तर वाचा
म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ६,२९४ घरांच्या सोडतीसाठीच्या अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेस गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून सुरुवात झाली असून पुणे, पिंपरी – चिंचवड, पीएमआरडीए, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगलीतील घरांचा या सोडतीत समावेश आहे. सविस्तर वाचा
पिंपरी-चिंचवडमध्ये शाहू नगर येथील डी. वाय. पाटील शाळेत साडेतीनशे विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या गंभीर घटनेनंतर शाळा प्रशासनाने पालकांची माफी मागितली असून दिलगिरी व्यक्त केली आहे. सविस्तर वाचा
वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या बुलढाणा चिखली राज्य महामार्गावर ‘तो ‘ सुसाट वेगाने धावत आला…रस्ता ओलांडताना ‘त्याने’ एकदोन नव्हे तीन वाहनांना धडक दिली… यामध्ये स्वतः जखमी झाला .पण त्याने किमान चार चालक आणि प्रवाशांना देखील गंभीर जखमी केले.
Ratan Tata Death News मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली असून उद्योग क्षेत्रासह राजकीय, सामाजिक आदी विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कल्याण येथील पश्चिमेतील खडकपाडा भागात मंगळवारी रात्री आपल्या मित्रांसमवेत गरबा पाहण्यासाठी आलेल्या १५ वर्षाच्या एका मुलाचा जिवंत वीज वाहिनीचा धक्का बसून मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
नागपूर : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे मंगळवारी निधन झाले. त्यानिमित्ताने टाटा उद्योग समूह आणि त्याची व्याप्ती यासंदर्भात पुन्हा एकदा उजळणी सुरू झाली.
विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतर्फे जय्यत तयारी सुरू असून जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. बुलढाणा जिल्ह्यात निर्विवाद वर्चस्व असलेल्या महायुतीचे जागा वाटप जवळपास ठरल्यात जमा आहे. सविस्तर वाचा…
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडीकडून चंद्रपूर जिल्ह्यात महिलांना संधी मिळणार का, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. भाजप व काँग्रेसने यापूर्वी महिला उमेदवाराला संधी दिली आहे. सविस्तर वाचा…
शिवसेनेला (शिंदे) शहरातील एकही जागा देण्यात येऊ नये, यासाठी महायुतीमधील राष्ट्रवादी (अजित पवार) आणि भाजपने या मित्रपक्षांनी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. शहराऐवजी जिल्ह्यात दोन जागा देण्यास मित्रपक्षाने सहमती दर्शविली आहे.
दांडीया कार्यक्रमात टोळक्याने दहशत माजवून तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना कात्रज भागातील संतोषनगर परिसरात घडली. याप्रकरणी सराइतासह साथीदारांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सविस्तर वाचा…
शौचालयासारखी मूलभूत सुविधा उपलब्ध करणे हे महानगरपालिकेचे घटनात्मक कर्तव्य आहे. असे असतानाही कलिना येथील झोपडपट्टीत अतिरिक्त शौचालये बांधण्यास नकार देण्याची मुंबई महानगरपालिकेची भूमिका असहकाराची आणि असंवेदनशील असल्याची टीका उच्च न्यायालयाने केली. सविस्तर वाचा…
1. वांद्रे शासकीय कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा देणार (सार्वजनिक बांधकाम)
2. सावनेर, कणकवली, राजापूर, अंबरनाथ, जिहे कठापूर, लातूरच्या जलसंपदा प्रकल्पांना मान्यता (जलसंपदा विभाग)
3. महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमात सुधारणा (उच्च व तंत्र शिक्षण)
4. कायमस्वरुपी विनाअनुदान तत्वावर नवीन समाजकार्य महाविद्यालय (उच्च व तंत्र शिक्षण)
5. राज्यात तीन नव्या खासगी विद्यापीठांना मान्यता. (उच्च व तंत्र शिक्षण)
6. राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरे सुरू करणार (महिला व बाल)
7. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापतींच्या निवडणूकीस मुदतवाढ (ग्राम विकास)
8. सिडको महामंडळ व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास दिलेले भूखंड कब्जेहक्काने रुपांतरीत करणार (नगर विकास)
9. केंद्र शासनाची अॅग्रिस्टॅक योजना राबवणार (कृषि)
10. मा. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रास अतिरीक्त निधी (कृषि).
11. पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला (महसूल)
12. बोरीवली तालुक्यातील जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी (महसूल)
13. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याच्या अधिनियमात सुधारणा (महसूल)
14. कुर्ल्यातील शासकीय जमीन डायलेसिस सेंटरसाठी शाहीर अमर शेख प्रबोधनीला (महसूल)
15. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात आफ्रिकन सफारी प्रकल्प (वने)
16. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना (पशुसंवर्धन, दुग्धविकास व्यवसाय)
17. भेंडाळे वस्ती प्रकल्प पाणी पुरवठा विभागास हस्तांतरित (मृद व जलसंधारण)
18. रमाबाई आंबेडकर मधील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी खासगी जमिनीचा मोबदला देणार (गृहनिर्माण)
19. मराठवाड्यातील शाळांकरीता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेत निधी (शालेय शिक्षण)
20. राज्यात आंतररष्ट्रीय रोजगार व कौशल्य विकास कंपनी (शालेय शिक्षण)
21. शाळांना २० टक्के वाढीव अनुदानाचा टप्पा (शालेय शिक्षण)
22. न्यायमुर्तींच्या खासगी सचिवांना सचिवालयीन संवर्ग (विधि व न्याय)
23. नाशिकरोड, तूळजापूर, वणी-यवतमाळ येथे न्यायालय (विधि व न्याय)
24. नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणार (कृषि)
25. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य)
26. शबरी महामंडळाच्या थकहमीची मर्यादा वाढवून शंभर कोटी. (आदिवासी विकास)
27. देवळालीतील भूखंड नाशिक रोडच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेला (नगर विकास)
28. मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ (अल्पसंख्याक विकास)
29. मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ (अल्पसंख्याक विकास)
30. पिंपरी चिंचवड पोलीसांच्या परेड ग्राऊंडसाठी पशुसंवर्धन विभागाची जागा (गृह)
31. समृध्दी महामार्गास जोडणाऱ्या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गास मान्यता (सार्वजनिक बांधकाम)
32. कात्रज कोंढवा उड्डाणपुलास बाळासाहेब देवरस यांचे नाव (सार्वजनिक बांधकाम)
33. आपत्ती सौम्यीकरणाची कामे आता स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत (मदत व पुनर्वसन)
34. राहता तालुक्यातील शेती महामंडळाची जागा क्रीडांगणासाठी (महसूल)
35. शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी-वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळे (इतर मागास बहुजन कल्याण)
36. पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळे (कामगार)
37. कराड तालुक्यातील उंडाळे योजनेच्या दुरुस्तीस मान्यता (मृद व जलसंधारण)
38. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सुलभ शौचालयांची सुविधा (सार्वजनिक आरोग्य)
(बातमी अपडेट होत आहे.)
मुंबई : अग्निसुरक्षाविषयक नियमांच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा एकात्म विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावलीमध्ये (डीसीपीआर) समावेश करणारी अंतिम अधिसूचना काढण्याबाबत काही ना काही सबबी पुढे करून चालढकल करणाऱ्या राज्य सरकारच्या नगरविकास विभागाला उच्च न्यायालयाने बुधवारी फैलावर घेतले.
नागपूर : प्रत्येकीची चिठ्ठी पाहून भला मोठा बॉक्स दिला जातो. तो उघडल्यावर त्यातून एक स्टिलच्या पत्र्याची एक मोठ्ठी पेटी निघते.. सध्या या अशा पेट्या घेण्यासाठी शहरात विविध भागात महिलांची झुंबड उडाली आहे.
डोंबिवली - प्रसिध्द उद्योगपती, भारतरत्न रतन टाटा यांच्या निधनानिमित्त महाराष्ट्र शासनाने राज्यात एक दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. या दुखवट्यानिमित्त आणि रतन टाटा यांना आदरांजली वाहण्यासाठी भाजप, शिवसेनेतर्फे डोंबिवलीत आयोजित केलेल्या नवरात्रोत्सव कार्यक्रमातील रास गरबा, दांडियाचा कार्यक्रम गुरुवारी रद्द करण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला आहे.
कल्याण - कल्याण शिळफाटा रस्ते बांधितांना गेल्या दीड वर्षापासून त्यांची रस्ते भूसंपादनातील भरपाईची रक्कम देण्यास शासनाकडून टाळाटाळ सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी एमएसआरडीसीला शिळफाटा रस्ते बाधितांची ३०७ कोटी १७ लाखाची रक्कम वाटप करण्याचे आदेश दिले होते.
पत्रकारांसाठी आणि वृतपत्र विक्रेते यांच्यासाठी दोन स्वतंत्र महामंडळं तयार केली जाणार आहेत. या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
यवतमाळ : सर्व कार्यर्त्यांना एकत्र आणून ज्यांच्यामागे जनाधार आहे, अशा तरूणांना विधानसभेत पाठविण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी आपण राज्यात दौरा करत असून किमान २५ विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांची मुलं निवडणूक लढतील, अशी माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली.
पुणे : स्मार्ट सिटी प्रकल्पाचा फटका पुणे महापालिकेला बसला आहे. शहरातील रस्त्यांवरील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी स्मार्ट सिटीने उभारलेल्या ॲडॅप्टिव ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (एटीएमएस) यंत्रणेचा खर्च भागविण्यासाठी ४४ कोटी रूपयांचा निधी द्यावा, अशी मागणी स्मार्ट सिटीने महापालिकेकडे केली आहे.
डहाणू : डहाणू तालुक्यातून वडिलांकडून पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २०२० पासून वडिलांकडून मुलीवर अत्याचार सुरू असल्याची माहिती समोर येत असून पोलिसांकडून शाळा महाविद्यालयात सुरू असलेल्या लैंगिक जनजागृती कार्यक्रमानंतर विद्यार्थिनीने आपल्या शिक्षिकेकडे या घटनेची माहिती दिली आहे.
भंडारा : भंडारा शहरातील एका फळ विक्रेत्याने एका अल्पवयीन मुलाला त्याच्या गोडाऊनमध्ये नेवून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार काही दिवसांपूर्वी घडला.
कल्याण : येथील पूर्व भागातील चक्कीनाका वाहतूक पोलीस चौकीजवळ एका मोटार कार चालकाने भरधाव वेगात कार चालवून रस्त्याने पायी चाललेल्या एका विद्यार्थ्याला जोराची धडक दिली.
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला धनंजय मुंडे लावणार हजेरी; बहीण-भाऊ पहिल्यांदाच भगवान भक्तीगडावर एकत्र येणार
विधानसभेची निवडूक तोंडावर आल्यामुळे राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेते आपल्या पक्ष संघटनेचा आढावा घेत निवडणुकीची रणनीती आखत आहेत. यातच आता दसरा जवळ आल्यामुळे राज्याच्या राजकारणात मुंबई, नागपूर, बीड अशा ठिकाणी दसरा मेळावे होत असतात. त्यामुळे दसरा मेळाव्यांची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा असते. यामध्ये बीडमध्ये संत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट याठिकाणी पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत असतो. पण यावेळी या दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच बहीण-भाऊ अर्थात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्र उपस्थित राहणार आहेत. धनंजय मुंडे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
“चलो भगवान भक्तीगड…! आपला दसरा, आपली परंपरा…! ही परंपरा जोपासत आपल्याशी संवाद साधून विचारांचे सोने लुटायला या वर्षी प्रथमच मीही येतोय, भगवान भक्तीगडावर सावरगाव घाट येथे. या विजयादशमीला संत भगवानबाबांचे आशीर्वाद घ्यायला मी येतोय, तुम्हीही या…!”, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.