Saif Ali Khan Health Updates : प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी पहाटे २.३० च्या समुरास चाकूने हल्ला झाला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून लीलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू आहेत. हल्लेखोराने त्याच्यावर सहा वार केले आहेत. या हल्ल्यामुळे बॉलिवूड विश्व हादरलं असून, गेल्या काही दिवसांपासून वांद्रे येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्याने निर्माण होत असल्याने अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण तापलं आहे. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाचेही राज्यभर पडसाद उमटत आहे. या प्रकरणांचा तपास व त्याच्या अवतीभोवती घडणाऱ्या राजकीय घडामोडींनी राज्याचं राज्याकारण ढवळून निघालं आहे. या सर्व घडामोडी आणि सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणाचे अपडेट्स तुम्हाला या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे मिळतील. तसेच राज्यासह देशाच्या राकारणातील महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला येथे वाचायला मिळतील.

Live Updates

Marathi Live News Update Today : राज्यासह देशभरातील बातम्या वाचा एकाच क्लिकवर.

15:16 (IST) 17 Jan 2025

महावितरण कंपनीचा मुख्य अधिकारी असल्याचा बनाव करुन धुळ्यात १३ लाख रुपयांना फसवणूक

नाशिक : महावितरण कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याचा बनाव करून धुळे येथील एका व्यावसायिकाची १३ लाख रुपयांना फसवणूक करणाऱ्या सुरत येथील तीन संशयितांना धुळे पोलिसांनी चार महिन्यांच्या तपासानंतर ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर २०२४ रोजी धुळे येथील जय श्रीकृष्णा इंटरप्रायजेसच्या नावाने इलेक्ट्रिकल दुकानाचे मालक जिजाबराव पाटील यांना वीज वितरण कंपनीच्या धुळे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी भ्रमणध्वनी केला.

सविस्तर वाचा...

15:13 (IST) 17 Jan 2025

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीस अटक; एकनाथ शिंदेंची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, झालेली घटना अतिशय दुर्दैवी व दुर्भाग्यपूर्ण आहे. अशा प्रकारे कलावंतांवर हल्ला होणं अतिशय चुकीचं आहे. ज्याने हा ल्ला केला त्याला अटक करण्यात आली आहे. प्राथमिकदृष्ट्या चोरीच्या उद्देशाने ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. आमचं सरकार सैफ अली खान व त्यांच्या कुटुंबाची काळजी घेत आहे. राज्यातील जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी आमचीच आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची आम्ही काळजी घेऊ.

14:25 (IST) 17 Jan 2025

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात १४ वर्षांनी सिंहाचा जन्म

मुंबई : बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफरीमध्ये तब्बल १४ वर्षांनी सिंहाच्या छाव्याचा जन्म झाला. सिंह सफारीमधील 'मानसी' नावाच्या मादी सिंहाने गुरुवारी रात्री एका शाव्याला जन्म दिला.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सिंह सफारीसाठी गुजरातहून आणलेली 'मानस' आणि 'मानसी' ही सिंहाची जोडी पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.

सविस्तर वाचा...

14:16 (IST) 17 Jan 2025

शुक्रवारी मध्य रेल्वेवरील बदलापूर ते खोपोली लोकल सेवा दोन तास बंद असणार

कर्जत स्थानकावरील पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी शुक्रवारी दुपारी १.५० ते ३.३५ वाजेपर्यंत वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. पळसदरी ते कर्जत स्थानकांदरम्यान ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत बदलापूर ते खोपोली दरम्यान लोकल सेवा रद्द असतील. सीएसएमटी येथून दुपारी १२.२० वाजता सुटणारी खोपोली लोकल आणि दुपारी १.१९ वाजता सीएसएमटी येथून कर्जत लोकल अंबरनाथ स्थानकापर्यंत चालविण्यात येईल. तर, सीएसएमटी येथून दुपारी १.४० वाजता सुटणारी कर्जत लोकल बदलापूर स्थानकापर्यंत चालविण्यात येईल. तसेच कर्जत येथून दुपारी १.५५ वाजता आणि खोपोली येथून दुपारी १.४८ वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल अंबरनाथ स्थानकातून चालविण्यात येईल. तर, कर्जत येथून दुपारी ३.२६ वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल बदलापूर स्टेशनवरून सुटेल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

13:52 (IST) 17 Jan 2025

कौटुंबिक वादातून पोटच्या मुलीचा खून करणाऱ्या आईला जन्मठेप

पुणे : पोटच्या मुलीचा खून करणाऱ्या आईला प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी जन्मठेप आणि दहा हजार रुपयांची शिक्षा सुनावली. पतीशी सुरू असलेल्या वादातून तिने मुलीचा खून करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना वारजे भागात घडली होती.

सविस्तर वाचा....

12:47 (IST) 17 Jan 2025

“सैफ रक्तबंबाळ अवस्थेत…”, शस्त्रक्रियेबाबत डॉक्टरांनी दिली सविस्तर माहिती; म्हणाले, “अजून एक आठवडा…”

लीलावती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज उत्तामणी म्हणाले, काल रात्री सैफ अली खान रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात आला होता. त्याच्याबरोबर त्याचा मुलगा तैमूर तिथे होता. तो जखमी असला तरी रुग्णालयात सिंहासारखा वावरला. चित्रपटात तो हिरोची भूमिका साकारतो. मात्र तो खऱ्या आयुष्यातही एखाद्या हिरोसारखाच वागत होता. त्याची प्रकृती आता बरी आहे.

दरम्यान, सैफवर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर नितीन डांगे म्हणाले, सैफवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. त्याची प्रकृती आता बरी आहे. दुखणं देखील कमी झालं आहे. आम्ही त्याला सध्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. आज त्याला अतिदक्षता विभागातून विशेष विभागात हालवलं आहे. आज शक्यतो लोकांना न भेटण्याचा सल्ला दिला आहे. कारण त्याच्या जखमा ताज्या असून संसर्गाचा धोका आहे. पुढील आठवडाभर त्याला जास्तीत जास्त विश्रांती घेण्यास सांगितलं आहे.

12:24 (IST) 17 Jan 2025

पुणे : राडारोडा टाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास अधिकाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई !

पुणे : नदीपात्रात, रस्त्याकडेला, तसेच मोकळ्या जागांवर राडारोडा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा....

12:23 (IST) 17 Jan 2025

पुणे : मेट्रोच्या जागेतील ५० झोपड्या महापालिकेने का हटवल्या ?

पुणे : शिवाजीनगर दिवाणी न्यायालय (सिव्हिल कोर्ट) मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या डेंगळे पुलाजवळ उभारण्यात आलेल्या ५० झोपड्यांवर कारवाई केली. मेट्रोच्या जागेत या बेकायदा झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी पुणे मेट्रोच्या वतीने महापालिकेकडे करण्यात आली होती.

सविस्तर वाचा....

11:08 (IST) 17 Jan 2025
सैफ अली खानवरील चाकूहल्ल्याप्रकरणी एक जण ताब्यात; वांद्रे पोलीस ठाण्यात चौकशी सुरू

सैफ अली खानवरील चाकूहल्ल्याप्रकरणी एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून वांद्रे पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. काही वेळापूर्वी वांद्रे पोलीस ठाण्यात एका आरोपीला आणण्यात आलं आहे. पोलिसांनी या आरोपीविषयी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.

सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसलेला आरोपी आणि पोलिसांनी वांद्रे पोलीस ठाण्यात आणलेल्या संशयिताची शरीरयष्टीसारखीच दिसत असल्यामुळे हल्लेखोराला पकडल्याचं बोललं जात आहे. मात्र, पोलिसांनी सध्या यावर भाष्य करण टाळलं. पोलीस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत. जोवर तोच हल्लेखोर आहे हे स्पष्ट होत नाही तोवर काही माहिती जाहीर केली जाणार नसल्याचं सांगितलं जात आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांची २० पथकं तयार करण्यात आली आहे.

10:46 (IST) 17 Jan 2025

सैफ अली खानच्या भेटीसाठी आशिष शेलार रुग्णालयात; म्हणाले, “पाच तास…”

सैफ अली खानच्या भेटीसाठी मंत्री आशिष शेलार गुरुवारी रात्री लीलावती रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालयात जाऊन त्यांनी सैफच्या कुटुंबियांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. शेलार म्हणाले, आयसीयूमध्ये अभिनेते सैफ अली खान यांना बघून आलो, ते आराम करत आहेत. त्यांच्यावर सहा वार त्यांच्यावर झाले होते. दोन जखमा खोलवर झाल्या होत्या. जवळजवळ पाच तास त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. आपण सर्वजण मिळून प्रार्थना करुया की ते लवकरात लवकर बरे व्हावेत. मी सकाळपासून पोलिसांच्या संपर्कात आहे, जो आरोपी आहे त्याला पकडण्याचा पोलीस प्रयत्न करत आहे. पोलिसांची १० पथकं आरोपीच्या शोधात आहेत.सैफ अली खान यांना सध्या विश्रांतीची गरज आहे. मुंबई सगळ्यात सुरक्षित शहर आहे, वांद्रेवासियांनी घाबरुन जाऊ नये.

Story img Loader