Sanjay Raut Arrest Maharashtra News : टीकेनंतर एकनाथ शिंदे उद्यानाच्या नावात बदल, सर्व घडामोंडीची माहिती एका क्लिकवर…: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांची १५ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली आहे. राऊत यांना न्यायालयात हजर केलं असता, त्यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊतांना अटक केल्याप्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसांबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्याबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागितली आहे. त्यांनी सोमवारी प्रसिद्धपत्रक जारी करत माफीनामाच सादर केला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील हडपसर भागात महापालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या ‘एकनाथ शिंदे उद्याना’चे उद्घाटन करणार आहेत. स्वत:च्या नावाचं उद्यान आणि स्वत:च उद्घाटक असल्याने पुण्यातील ‘एकनाथ शिंदे उद्यान’ वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. राज्यातील आणि देशातील अशाच प्रमुख राजकीय घडामोडी आणि विविध अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर…

Live Updates

Maharashtra News Today 02 August 2022 : महाराष्ट्रातील सर्व प्रमुख अपडेट एका क्लिकवर…

14:32 (IST) 2 Aug 2022
पुणे : टीकेनंतर एकनाथ शिंदे उद्यानाच्या नावात बदल; आता ‘धर्मवीर आनंद दिघे उद्यान’

महापालिकेच्या ठरावाला केराची टोपली दाखवत हडपसर परिसरात स्वत:च्या नावे उभारलेल्या उद्यानाचे स्वत:च उद्घाटन करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावर टीका झाल्यानंतर आता उद्यानाचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकनाथ शिंदे उद्यान नव्हे तर धर्मवीर आनंद दिघे उद्यान असे महापालिकेच्या उद्यानाचे नामकरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याबाबतची घोषणा केली. दरम्यान, सायंकाळपर्यंत सर्व प्रशासकीय मान्यता मिळवून एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच सायंकाळी उद्घाटन करण्याच्या हालचाली शिंदे गटाकडून सुरू झाल्या आहेत. वाचा सविस्तर बातमी…

14:30 (IST) 2 Aug 2022
उद्यानाला ‘एकनाथ शिंदे’ नाव दिल्याने कार्यक्रम रद्द, मुख्यमंत्री पुण्यात पोहोचले, नगरसेवकाला म्हणाले “अरे बाबा…”

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हडपसर भागात पालिकेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या उद्यानाचं उद्घाटन करण्यात येणार होतं. पण या उद्यानाला एकनाथ शिंदे यांचं नाव देण्यात आल्याने वाद निर्माण झाला आणि ऐनवेळी कार्यक्रम रद्द करावा लागला. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी पुण्यात पोहोचताच नगरसेवकाला उद्यानाला आपलं नाव देण्यासंबंधी विचारलं आणि एक सल्लाही दिला.

सविस्तर बातमी

14:17 (IST) 2 Aug 2022
पोलीस ठाण्याच्या परिसरात रिक्षा चालकाने घेतले जाळून

भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाण्याच्या परिसरात एका व्यक्तीने रिक्षा चोरीला गेली असून पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप करत स्वत:ला जाळून घेतल्याचा प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला. त्याची रिक्षा चोरीला गेली नसून ती अर्थपुरवठा करणाऱ्या कंपनीने जप्त केली असल्याची माहिती नारपोली पोलिसांनी दिली. त्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सविस्तर वाचा

14:03 (IST) 2 Aug 2022
मुंबई : हिरे अपहारप्रकरणी दलालाला अटक; ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

उधारीवर घेतलेल्या सुमारे ६३ लाख रुपये किंमतीच्या हिऱ्यांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हिऱ्यांचा व्यवहार करणारा दलाल भरत मांजीभाई गांगानीला सुरत येथून अटक केली. गेल्या नऊ महिन्यांपासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. त्याने फसवणुकीच्या रक्कमेतून खरेदी केलेली मोटरगाडी पोलिसांनी जप्त केली. भरतने अन्य काही हिरे व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे का? याचा पोलीस तपास करीत आहेत. वाचा सविस्तर बातमी…

13:53 (IST) 2 Aug 2022
काश्मिरी कन्येला पुण्यातून आधार; पुनीत बालन ग्रुप आणि आफरीन हैदर यांच्यात करार

सदतीसाव्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेवर आपली मोहोर उमटविणाऱ्या आफरीन हैदरला पुण्यातील पुनीत बालन ग्रुपच्या वतीने करारबद्ध करण्यात आले आहे. २१ वर्षीय आफरीनने आतापर्यंत विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दमदार आणि लक्ष्यवेधी कामगिरी करताना तायक्वांदोमध्ये आपला दबदबा निर्माण केला.

सविस्तर वाचा

13:51 (IST) 2 Aug 2022
भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू; नगर रस्त्यावर अपघात

भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अयुब दाऊद मुजावर (वय ५०, रा. हनुमान चौक, वाघोली, नगर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

सविस्तर वाचा

13:49 (IST) 2 Aug 2022
वाहने उचलण्याची कारवाई पुन्हा; ‘नो पार्किंग’मधील कारवाई पारदर्शक होण्यासाठी नियमावली

सम-विषम दिनांक न पाहता वाहने लावणाऱ्या दुचाकी तसेच मोटारचालकांच्या विरोधात पुन्हा कारवाई सुरू करण्यात आली आहे. क्रेनवरील (टोईंग) कर्मचाऱ्यांच्या गैरप्रकारांच्या तक्रारी आल्यानंतर गेल्या महिनाभरापासून वाहने उचलण्याची कारवाई शिथिल झाली होती. टोईंग क्रेनवरील कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक पोलिसांनी नियमावली तयार केली असून नियमांचे पालन करूनच वाहने उचलण्याची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा

13:46 (IST) 2 Aug 2022
‘स्वाईन फ्लू’च्या एक लाख लससाठ्याची खरेदी; जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू

राज्यातील स्वाईन फ्लूचा प्रसार वाढत असल्याने प्रतिबंधासाठी फ्लूच्या सुमारे एक लाख लसींचा साठा राज्याने उपलब्ध केला आहे. गर्भवती महिला, आरोग्य कर्मचारी अशा जोखमीच्या गटांसाठी ही लस जिल्ह्यांना पाठविण्यात येणार आहे. वाचा सविस्तर बातमी…

13:23 (IST) 2 Aug 2022
डोंबिवलीतील टिळकनगरमध्ये रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा; इतर भागातील वाहने टिळकनगर मधील रस्त्यांवर, रहिवासी हैराण

डोंबिवली पूर्व भागातील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणचा शांत भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिळकनगर भागात शहराच्या विविध भागातील रहिवासी, व्यापारी संकुलातील व्यावसायिक, डाॅक्टर, रुग्णवाहिका रस्त्यावर आणून ठेवत असल्याने स्थानिक रहिवासी हैराण आहेत. स्थानिक रहिवाशांना आपली वाहने कोठे उभी करायची असे प्रश्न पडू लागले आहेत.

सविस्तर वाचा

13:18 (IST) 2 Aug 2022
रस्त्यावर वाहन चालकांचा उलट मार्गिकेतून प्रवास; अपघातांचे प्रमाण वाढले

कल्याण-शिळफाटा, काटई नाका ते बदलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी अनेक दुचाकी स्वार उलट मार्गिकेतून प्रवास करत असल्याने समोरुन येणाऱ्या वाहन चालकाला अशा वाहनांचा अंदाज येत नसल्याने या रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आठवड्यातून दोन ते तीन अशाप्रकारच्या अपघातांच्या घटना या रस्त्यावर घडत आहेत.

सविस्तर वाचा

12:54 (IST) 2 Aug 2022
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस; देशात १०६ टक्के पावसाचा अंदाज

मोसमी पावसाच्या ऑगस्ट-सप्टेंबर या दोन महिन्यांच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात देशात सरासरीच्या तुलनेत १०६ टक्क्यांपर्यंत पाऊस होईल, असा अंदाज सोमवारी भारतीय हवामान शास्त्र विभागाने जाहीर केला. प्रामुख्याने दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भातील काही भाग वगळता राज्यात सर्वत्र या दोन महिन्यांत सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. दक्षिण भारत आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:37 (IST) 2 Aug 2022
पुणे : अमली पदार्थाची विक्री प्रकरणात दोघांना पकडले; दोन लाखांचे मेफेड्रोन जप्त

अमली पदार्थाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना गुन्हे शाखेने पांडवनगर परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख दहा हजार रुपयांचे ६ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले. विराज इंद्रकांत छाडवा (वय ३२, रा. हेल्थ कॅम्प मित्र मंडळाजवळ, पांडवनगर, वडारवाडी), जयेश भारत कोटियाना (वय २०, रा. तिरुपती लॅान, टिंगरेगनर, विश्रांतवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वाचा सविस्तर बातमी…

12:32 (IST) 2 Aug 2022
सुजय विखे पाटलांनी केलेल्या बोचऱ्या टीकेला सुप्रिया सुळेंचं केवळ आठ शब्दांत उत्तर, म्हणाल्या…

सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सुंदर उदाहरण दिलं, पण तीच राष्ट्रवादीची परंपरा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीने दुधापासून निघणारा कोणताच पदार्थ सोडला नाही, अशी बोचरी टीकाही सुजय विखे पाटलांनी केली आहे. यावर आता सुप्रिया सुळे यांनी अवघ्या आठ शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. सविस्तर बातमी

12:32 (IST) 2 Aug 2022
‘एक साधा आमदार’ म्हणणाऱ्या बंडखोर तानाजी सावंत यांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असून, याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील शहरात असणार आहेत. आदित्य ठाकरे कात्रज चौकात सभा घेणार असून यानिमित्ताने बंडखोर आमदार तानाजी सावंत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे केवळ एक साधे आमदार असून, आपण त्यापेक्षा जास्त महत्व देत नाही असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. तानाजी सावंत यांच्या टीकेला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. कोल्हापुरात जनता दरबार पार पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

सविस्तर बातमी

12:24 (IST) 2 Aug 2022
“भाजपा नेत्यांवर ईडी, CBI, आयकरची कारवाई झालेली दाखवा, एक लाख रुपये मिळवा”; महाराष्ट्रातील ‘या’ शहरात झळकले बॅनर्स

केंद्रामध्ये आणि आता राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांच्या पाठींब्याने सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पार्टीविरोधात विरोधकांकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचे आरोप केले जातात. भाजपाकडून विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) माध्यमातून अडकविण्याचा डाव सुरू आहे असे आरोप शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा विरोधकांकडून केले जात आहे. राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापलेलं असतानाच आता औरंगाबादमध्ये भाजपाविरोधात झळकावण्यात आलेलं पोस्टर अनेकांचे लक्ष वेधून घेत असून ते शहरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. येथे वाचा सविस्तर वृत्त

12:21 (IST) 2 Aug 2022
“सरसंघचालकांनी आम्हाला एवढंच सांगितलं की…”; मोहन भागवतांच्या भेटीनंतर हिंदुत्वाचा उल्लेख करत फडणवीसांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (१ ऑगस्ट) मुंबईमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. या भेटीची फोटो समोर आल्यानंतर राज्यातील दोन्ही प्रमुख नेत्यांनी अचानक सरसंघचालकांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं. या भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या प्रमुखांबरोबर जवळजवळ पाऊण तास चर्चा केली. या भेटीसंदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात असतानाच या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दोन्ही नेत्यांनी भेटीत काय घडलं याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त…

12:20 (IST) 2 Aug 2022
“…कारण पुढचा नंबर उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा असू शकतो”; संजय राऊतांचा उल्लेख करत निलेश राणेंनी केलेलं ‘ते’ ट्विट चर्चेत

शिवसेना खासदार संजय राऊत यांना सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. मी तुमच्यासोबत आहे, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी राऊत यांच्या कुटुंबियांना देत त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. रविवारी राऊत यांच्या घरी ईडीने छापेमारी आणि चौकशी केल्यानंतर त्यांना पुढील चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेत असताना त्यांच्या आईला मारलेल्या मिठीचा व्हिडीओ समोर आल्यापासून राऊत यांच्या आईंबद्दलही सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. असं असतानाच आता भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी खोचक शब्दांमध्ये याच विषयावरुन शिवसेनेला टोला लगावला आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त…

12:19 (IST) 2 Aug 2022
शिंदे विरुद्ध ठाकरे: “४० आमदारांना बंडखोर ठरवून अपात्र ठरवल्यास…”; सुनावणीच्या आधीच शिंदेंचं न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या आणि अपात्रतेसंदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारऐवजी बुधवारी सुनावणी होणार आहे. मात्र या सुनावणीच्या दोन दिवस आधीच राज्याचे मुख्यमंत्री आणि बंडखोरांचं नेतृत्व करणाऱ्या शिंदे यांनी खरी शिवसेना कोणती या वादावर निर्णय घेण्याची मुभा केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यावी, असे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त…

12:18 (IST) 2 Aug 2022
हर घर तिरंगा उत्सवात सहभागी होण्यास शेतकरी निरुत्साही – अनिल घनवट

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाने हर घर तिरंगा अभियान राबविण्याचे आवाहन केले आहे. स्वातंत्र्य प्राप्तीला ७५ वर्ष झाली तरी शेतकरी अद्यापही पारतंत्र्यातच असल्याचा अनुभव असल्यामुळे शेतकरी या उत्सवात सहभागी होणार नाहीत. आपल्या भावना शेतकऱ्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना कळवाव्यात, असे आवाहन स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:18 (IST) 2 Aug 2022
पुण्यातील ‘एकनाथ शिंदे उद्याना’च्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द; मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते आजच होणार होतं उद्घाटन पण…

पुण्यातील हडपसर भागात महापालिकेच्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या उद्यानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी स्वत:च्या खासगी निधीमधून उभारलेल्या या उद्यानाचे उद्घाटन आज पुणे दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार होते. येथे वाचा सविस्तर वृत्त…

12:17 (IST) 2 Aug 2022
Mumbai Municipal Election : प्रभाग आरक्षण सोडतीवर सूचना – हरकती सादर करण्याची आज अखेरची संधी

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शुक्रवार, २९ जुलै रोजी काढण्यात आलेल्या प्रभाग आरक्षण सोडतीवर सोमवारी उशिरापर्यंत १९८ सूचना व हरकती नोंदवण्यात आल्या. सूचना व हरकती नोंदवण्याचा आज शेवटचा दिवस असून अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर सूचना – हरकती सादर होण्याची शक्यता असून त्यांचा विचार करून ५ ऑगस्ट रोजी अंतिम सोडत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:15 (IST) 2 Aug 2022
आता शिंदे गट आणि राज ठाकरेंच्या मनसेमध्ये संघर्ष होण्याची शक्यता; मनसेनं शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतरही नवी मुंबईत…

राज्यामधील अभूतपूर्व सत्तानाट्यानंतर शिवसेनेमधील अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटामध्ये प्रवेश केला आहे. आतापर्यंत शिवसेनेला धक्का देणाऱ्या शिंदे गटाने आता थेट राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार पाडलं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त…

12:14 (IST) 2 Aug 2022
“पुरंदरेंची भाषणं, लिखाणाने शिवछत्रपतींवर अन्याय केला” म्हणणाऱ्या शरद पवारांना चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “स्वत:ला…”

“बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं, त्यांचं लिखाण माझ्या मते शिवछत्रपतींवर इतका अन्याय दुसरा कोणी केलेला नाही,” असं मत नुकतेच पुण्यातील डॉ.श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचार प्रवाह ग्रंथाचे प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले होते. यावरच सोमवारी एका जाहीर कार्यक्रमातील भाषणात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त…

11:54 (IST) 2 Aug 2022
“त्यांनी दुधातून निघणारा कोणताही पदार्थ सोडला नाही” सुजय विखे पाटलांची सुप्रिया सुळेंवर टीका!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महागाईवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी सोमवारी लोकसभेत “दत्त दत्ता, दत्ताची गाय, गायीचं दूध, दुधाची साय, सायीचं दही, दहीचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप” अशी मराठी कविता वाचून दाखवली. या कवितेतील देव दत्त आणि गाय सोडली तर केंद्र सरकारने सर्व वस्तूंवर जीएसटी लावला आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. सुप्रिया सुळे यांच्या या टीकेला भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सविस्तर बातमी

11:37 (IST) 2 Aug 2022
“…तर त्यांचा फोटो पुन्हा लावू” उद्धव ठाकरेंचा फोटो कार्यालयातून हटवल्यानंतर बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचं विधान

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्षात अंतर्गत कलह सुरू आहे. बंडखोर आमदारांनी सुरुवातीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात काहीही बोलणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पण आता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरेंवर टीका करायला सुरुवात केली आहे. यानंतर आता औरंगाबाद पश्चिमचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या कार्यालयातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवले आहेत. त्याजागी आनंद दीघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लावले आहेत. सविस्तर बातमी

11:26 (IST) 2 Aug 2022
वर्धा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही ताडगाववासीयांच्या नशिबी जीवघेणा प्रवास

केंद्र व राज्य सरकारच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमाद्वारे साजरा केला जात आहे. एकीकडे, विकासाचे प्रत्यंतर दाखविण्याचे पर्व आरंभ होत असताना, दुसरीकडे मात्र एका गावातील ग्रामस्थांना अजूनही जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सरपंचासह काही गावकरी जगाशी संपर्क जोडण्याच्या कामात व्यस्त आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजतागायत या गावकऱ्यांची दैना विकासपर्व अद्याप दूर असल्याचं भीषण वास्तव मांडते. वाचा सविस्तर बातमी…

11:13 (IST) 2 Aug 2022
राणा दाम्पत्याचे कुख्यात युसूफ लकडावालाशी आर्थिक संबंध? – संजय राऊतांचे आरोप पुन्हा चर्चेत!

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर आता त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर केलेल्या आरोपांचीही चर्चा सुरू झाली आहे. कुख्यात युसूफ लकडावाला याचे राणा दाम्पत्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप संजय राऊत यांनी तीन महिन्यांपूर्वी केला होता. आता, राज्यात झालेल्या सत्ताबदलाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचे काय होणार? असा प्रश्न विचारला जात आहे. वाचा सविस्तर बातमी…

10:04 (IST) 2 Aug 2022
विश्लेषण: ईशान्येकडील खेळाडू क्रीडा क्षेत्रात का चमकत आहेत?

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून पुन्हा एकदा ईशान्येकडील खेळाडूंची कामगिरी लक्षणीय ठरत आहे. या वेळी मेरी कोम नाही; पण लवलिना बोरगोहेन, लालनिनरुंगा, मीराबाई चानू यांनी छाप पाडली आहे. या खेळाडूंची कामगिरी जशी लक्षवेधक आहे, तसाच या भागातील क्रीडा विकासदेखील नजरेत भरतो. या खेळाडूंची कामगिरी आणि या दुर्गम भागातील क्रीडा विकास या प्रवासाचे हे विश्लेषण…

सविस्तर बातमी

10:03 (IST) 2 Aug 2022
विश्लेषण: गुजरातमधील ‘गिफ्ट सिटी’ मुंबईची जागा घेणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (गिफ्ट सिटी) येथे इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंजची (आयआयबीएक्स) सुरुवात करण्यात आली. तसेच राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई), आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र आणि सिंगापूर एक्सचेंज लि. यांना जोडणाऱ्या सामूहिक मंचाचीदेखील सुरुवात केली. यामुळे सध्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील आर्थिक घडामोडींचे केंद्र गुजरातमधील गिफ्ट सिटीमध्ये हस्तांतरित केले जाते आहे, अशी चर्चा सुरू आहे.

सविस्तर बातमी

10:02 (IST) 2 Aug 2022
अल-कायदाचा म्होरक्या जवाहिरी ठार, अमेरिकेने ड्रोन हल्ला करत केला खात्मा

अमेरिकेने ड्रोन हल्ला करत दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीला ठार केलं आहे. मोस्ट वॉण्टेड आणि ९/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड असणाऱ्या जवाहिरीचा अमेरिकेने ड्रोन हल्ला करत खात्मा केला. २०११ मध्ये ओसामा बिन लादेनला ठार करण्यात आल्यानंतर जवाहिरी अल-कायदाचं नेतृत्व करत होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जवाहिरीचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

सविस्तर बातमी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अवमान केल्याप्रकरणी सोमवारी प्रसिद्धीपत्रक जारी करत माफी मागितली आहे.