Maharashtra News Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार व मंत्र्यांना खातेवाटप दोन्हा पार पडले आहे, यानंतर आता पालकमंत्री पदाचे वाटप होणे बाकी आहे. सध्या पालकमंत्री पदासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये रस्सीखेंच होताना पाहायला मिळत आहे. कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणत्या मंत्र्यांकडे जाणार? तसेच कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणत्या पक्षाकडे जातं? हे आज स्पष्ट केलं जाऊ शकतं. याबरोबरच बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यूचे प्रकरण देखील चर्चेत आहे. या दोन्ही प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी होत आहे. कल्याण येथे एका १२ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिची भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे हत्या करण्यात आल्याचा प्रकार घटला आहे. या हत्येप्रकरणी कोळसेवाडी भागातील मुख्य सूत्रधार विशाल गवळी याला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून, तर त्याची पत्नी साक्षी गवळीला कल्याण शहरातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपींना आज न्यायालयापुढे सादर केले जाणार आहे. यासह, महाराष्ट्र आणि देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा पाहूयात.
Marathi News Updates - महाराष्ट्रातील सर्व राजकीय घडमोडी वाचा एका क्लिकवर
पुणे : लोहगड विसापूर किल्ला परिसरामध्ये पोलीस कर्मचाऱ्याने पाच वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सदर मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात सचिन वसंत सस्ते (वय ४३, सध्या रा. महंमदवाडी, हडपसर, पुणे. मूळ रा. जेजुरी, पुरंदर) या पोलीस कर्मचाऱ्यावर पोक्सो, ॲट्रासिटी आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याला निलंबित करण्यात आले आहे.
या प्रकरणी शिवसेना नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दखल घेऊन पुणे ग्रामीण अधिक्षक पंकज देशमुख यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्याबाबत नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, या घटनेतील आरोपी सचिन सस्ते या पोलीस कर्मचाऱ्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत उचित कार्यवाही करावी आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी,त्याच बरोबर या प्रकरणात शासनाद्वारे योग्य कायदेशीर मदत मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. तर पीडित मुलीच्या पालकांशी संपर्क साधून त्यांचे समुपदेशन देखील त्यांनी केले.
"शक्य असतं तर विशाल गवळीचा चौरंग…", कल्याण बलात्कार आणि हत्या प्रकरणी भाजपाच्या महिला आमदाराची संतप्त प्रतिक्रिया
"शक्य असतं तर विशाल गवळीचा चौरंग केल्याशिवाय गप्प बसलो नसतो मात्र संविधानिक पद्धतीने विशाल गवळीला कठोरात कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही… इथे देवाभाऊंची प्रत्येक बहिण आणि तिच्या लेकी सुरक्षित राहाव्या यासाठी आपले देवाभाऊ दिवस रात्र झटत आहे. त्यामुळे गवळीसारख्या नराधमांच्या नुसत्या मुसक्याच आवळल्या नाही जाणार तर त्यांना फासावर लटकवलं जाणार हे नक्की…! आज त्या चिमुकलीच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही सगळेचं खंबीरपणे उभे आहोत. आणि आमचा सर्वांचा समस्त महाराष्ट्रातल्या बहिणींचा विश्वास आहे की विशाल गवळी सारख्या विकृतांना गाडल्याशिवाय आमचा देवा भाऊ शांत बसणार नाही…", अशी पोस्ट सोशल मिडियावर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.
कल्याण बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलावर बलात्कार करून तिची हत्या केल्या प्रकरणातील विशाल गवळी याला न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तसेच गु्न्ह्यात मदत करणाऱ्या विशालच्या पत्नीलाही न्यायालयात हजर केले असता तिला २ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीये.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, 'या' मुद्द्यावर झाली चर्चा
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान व विश्व नेते नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्रात विक्रमी जनादेश मिळाल्यानंतर महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. या पार्श्वभूमीवर, 'विकसित भारताच्या वाटचालीत राज्याचा योगदानाबाबत मोदी यांच्याशी चर्चा करता आली. त्यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि स्नुषा वृषाली शिंदे हे दोघेही उपस्थित होते, अशी पोस्ट एकनाथ शिंदे यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर घेतली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे, त्यांचा मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे आणि सून वृषाली शिंदे यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली.
कोकणातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरवा मग मराठवाड्याला पाणी द्या - ॲड . विलास पाटणे
रत्नागिरी : कोकणातील समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्याच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा मनोदय जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी मंत्री झाल्यावर अहिल्यानगर येथे स्वागताच्या कार्यक्रमात व्यक्त केला आणि कोकणचे वाहून जाणारे पाणी गोदावरीत आणण्याचे माझे स्वप्न आहे असे सांगितले. यापूर्वी जयंत पाटील यांनी सांगलीसाठी कृष्णेत पाणी सोडा अशी मागणी केली होती. परंतु आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या ही योजना परवडणारी नाही. तसेच आधी कोकणातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरवा मग मराठवाड्याला पाणी द्या असे मत ॲड. विलास पाटणे यांनी व्यक्त केले आहे.
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध…
राजेश रोकडे यांनी फसवणुकीचा प्रयत्न हाणून पाडल्यानंतर त्या तोतया सुरक्षा अधिकाऱ्याचे फोटो सराफा संघटनेच्या व्हॉट्सअॅप ग्रूपवर टाकले.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले की, "ज्या देशमुखांची निर्घृण हत्या झाली, ज्यांनी कोणी हत्या केली त्यांना शासन झालं पाहिजे, ते फासावर गेले पाहिजेत या मताचा पहिल्या दिवसापासून मी आहे. शेवटी तो माझ्या जिल्ह्यातील सरपंच आहे. आता जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा, मग तो कोणीही असो, कोणाच्याही-कितीही जवळचा असो, अगदी माझ्याही जवळचा कोणी असो तरीही त्याला सोडायचं नाही असं म्हणत असताना, फक्त राजकारणासाठी माझ्यावर आरोप करणं यामागे काय राजकारण असू शकतं हे तुम्ही समजू शकता", असे धनंजय मुंडे म्हणाले.
शिवसेना (शिंदे) पक्षाचे मंत्री संजय शिरसाट (सामाजिक न्याय) यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, गणेश नाईक (वनखाते) आणि गिरीश महाजन(जलसंपदा) या मंत्र्यांनीदेखील पदभार स्वीकारला आहे.
पदभार स्वीकारण्यापूर्वी संजय शिरसाटांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळास अभिवादन
महायुती सरकारमध्ये पहिल्यांदाच संजय शिरसाट यांची मंत्रिपदावर वर्णी लागली आहे. त्यानंतर ते आजपासून पदभार स्वीकारणार आहेत. यापूर्वी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले. शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय खाते देण्यात आले आहे.
दुसरी महापालिका ही पुण्याची निकड ? कोणी मांडली भूमिका
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्याला दोन महापालिका हव्यात, अशी भूमिका मंगळवारी मांडली होती. त्या पार्श्वभूमीवर, दुसरी महापालिका करण्याच्या गरजेबाबत ‘लोकसत्ता’ने तज्ज्ञांशी संवाद साधला.
सविस्तर वाचा...
पिंपरी : औद्योगिक क्षेत्रात नव्या महापालिकेसाठी हालचाली
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात गावांचा समावेश होऊन महापालिकांची हद्दवाढ झालेली आहे.
"जम्मू काश्मीरमधील पूंछ येथे कर्तव्यावर असताना रस्ते अपघातात भारतीय सैन्याचे ५ जवान शहीद झाले. यात मराठा रेजिमेंटचे नायक शुभम घाडगे व अक्षय निकुरे या महाराष्ट्रातील जवानांचा समावेश आहे. राज्य सरकारने या दोघांच्या वारसांना एक कोटी रुपये आर्थिक मदत व इतर लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे", अशी माहिती भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिली आहे.
शिक्षकाला वीस लाखांचा गंडा, सुरतचे तीन आरोपी गजाआड; बुलढाणा सायबरची कारवाई
बुलढाणा येथील एका शिक्षकाची सायबर गुन्हेगारांनी वीस लाखाची ऑनलाइन फसवणूक केली होती.
अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिर परिसरात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू
अक्कलकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रमाकांत डाके यांनी दिलेल्या माहितीनुसार श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरातील जागा १९७८ साली शासनाने विकासासाठी आरक्षित केली होती.
पिंपरी : उद्योगमंत्र्यांनी बैठक घेताच ‘एमआयडीसी’तील प्रलंबित कामांना गती; प्रशासनाने…
भोसरीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) स्थापनेपासून रखडलेल्या औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्राच्या प्रस्तावाला गती मिळणार आहे.
पुणे : ओढे, नाल्यांवरील पुलांचेही होणार स्ट्रक्चरल ऑडिट कोणी घेतला निर्णय?
शहरात आंबिल ओढा, भैरोबा नाला, मुठा डावा कालव्यावर पूल उभारण्यात आलेले आहेत. त्यांपैकी काही जुने झाले आहेत.
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
शहरातील रस्त्यांवर गतिरोधक उभारताना ते कसे असावेत, याचे नियम आहेत. मात्र, त्यांकडे दुर्लक्ष करून अनेक रस्त्यांवर चुकीच्या पद्धतीने गतिरोधक बांधण्यात आलेले आहेत.
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
अतिशय वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील बुटीबोरी उड्डाण पुलाला तडे गेले आहेत.
कल्याणमधील घटनेचा पोलिसांनी तातडीने तपास पूर्ण करावा; महिला आयोगाचे आदेश
राज्य महिला आयोगाच्या आध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर कल्याणमधील घटनेचा पोलिसांनी तातडीने तपास पूर्ण करावा असे आदेश महिला आयोगाकडून देण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, "कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी आरोपी विशाल गवळी तसेच त्याला मदत करणारी त्याची पत्नी साक्षी हिला पोलिसांनी अटक केलेली आहे. या दुर्दैवी घटनेचा पोलिसांनी संवेदनशीलतेने तसेच तातडीने तपास पूर्ण करावा असे निर्देश राज्य महिला आयोगाकडून देण्यात आले आहेत. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा तसेच आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आयोग पाठपुरावा करेल".
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी जम्मू काश्मीरमधील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील जवानांना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी पोस्ट केली आहे. "काश्मीरमधील पूंछ भागात लष्कराचं वाहन दरीत कोसळल्याने सातारा जिल्ह्यातील कामेरी गावाचे जवान शुभम समाधान घाडगे (२८) आणि चंद्रपूर जिल्ह्यातील अक्षय दिगंबर निकुरे (२७) या दोन्ही जवानांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूची घटना अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत",असे रोहित पवार म्हणाले आहेत.