Mumbai Maharashtra News : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात जागतिक योग दिन साजरा केला जात आहे. योग दिनानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नेते, खेळाडू आणि कलाकार मंडळी या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत. यापैकी महत्त्वाच्या कार्यक्रमांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. तसेच विधान परिषदेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ही निवडणूक आणि पाचारावर आपलं लक्ष असेल. यासह मुंबई, महाराष्ट्र आणि देशभरातील राजकीय घडामोडींचा तथा शरद पवारांच्या शेतकरी मेळाव्यांचा आढावा आपण घेणार आहोत. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. ते राज्यभर शेतकरी मेळावे घेत आहेत.

Live Updates

Mumbai Maharashtra News Live : राज्यासह देशभरातील बातम्या एकाच क्लिकवर

13:30 (IST) 21 Jun 2024
काय सांगता! जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून चक्क पुरुषांनी वटवृक्षाला मारले सात फेरे

पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवडच्या पिंपळे गुरव येथे जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून वटवृक्षाला चक्क पुरुषाने सात फेरे मारले आहेत. आजचा हा सण महिलांसाठी असल्याचे नेहमीच बोललं जातं. याला छेद देत पुरुषांनी देखील वटवृक्षाला फेरे मारून स्त्री पुरुष समानता असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

वाचा सविस्तर…

13:30 (IST) 21 Jun 2024
डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्थलांंतरित आरक्षित तिकिटांचे केंद्र सज्ज

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ते पाचच्या दरम्यान उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलाच्या कामासाठी या पुलाने बाधित होत असलेले फलाट क्रमांंक एकवरील आरक्षित तिकिटांचे केंंद्र आता प्रवासी सेवेसाठी सज्ज करण्याचे काम अंतीम टप्प्यात आले आहे.

वाचा सविस्तर…

13:24 (IST) 21 Jun 2024
मुख्यमंत्री आणि गणेश नाईक विसंवाद मिटता मिटेना, गणेश नाईकांच्या विधानाची कार्यकत्यांमध्ये चर्चा

ठाणे : कोकण पदवीधर निवडणूक प्रचाराकरिता गेल्या आठवड्यात महायुतीने आयोजित केलेल्या मेळाव्यात माजी मंत्री गणेश नाईक यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

सविस्तर वाचा….

13:07 (IST) 21 Jun 2024
आणखी एका अनधिकृत जाहिरात फलकावर म्हाडाचा हातोडा

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या मालकीच्या जागेवरील अनधिकृत जाहिरात फलकाविरोधातील कारवाई सुरूच आहे. मंडळाने मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने गुरुवारी दुसरा अनधिकृत जाहिरात फलक हटविला.

सविस्तर वाचा…

12:57 (IST) 21 Jun 2024
विरारमध्ये झाड पडून महिलेचा मृत्यू, दोन दिवसांनी आढळला बेपत्ता वृद्धेचा मृतदेह

वसई– मागील दोन दिवसांपासून विरारमधून बेपत्ता असलेल्या मंजुळा झा (७०) या महिलेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी विरारच्या बोळींज येथे आढळला आहे. बुधवारी पावसामुळे चिंचेचे झाड पडून या महिलेचा मृत्यू झाला होता. मात्र ती झाडाखाली दबली गेल्याने दोन दिवस कुणाला त्याबाबत समजले नाही.

सविस्तर वाचा…

12:44 (IST) 21 Jun 2024
अन्यथा राजन विचारे, विनायक राऊत पराभूत होण्याचे कारण नव्हते, नाना पटोलेंचा शिंदे सरकारवर आरोप

ठाणे : कोकणातील लोकसभेच्या जागा षडयंत्राने महायुतीने जिंकल्या. यंदाच्या लोकसभेत धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. प्रशासनाला त्याच्यामध्ये वापरले गेले. अन्यथा राजन विचारे आणि विनायक राऊत यांचा पराभव होण्याचे कारणच नव्हते, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

सविस्तर वाचा…

12:35 (IST) 21 Jun 2024
साहेब, पक्षातील मक्तेदारी थांबवा, अन्यथा भाजपविरोधात… देवेंद्र फडणवीस यांना कार्यकर्त्याचे पत्र..!

वाशीम : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात भाजपला अपेक्षित यश प्राप्त करता आले नाही. त्यामुळे आता संभाव्य विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेऊन तयारीला लागण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला जात आहे.

वाचा सविस्तर…

12:31 (IST) 21 Jun 2024
सातारा : सलमान खान चित्रीकरणासाठी महाबळेश्वरमध्ये, संरक्षणासाठी मोठा पोलीस बंदोबस्त आणि सोबत गाड्यांचा ताफा

वाई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा आगामी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी गुरुवारी सायंकाळी महाबळेश्वरमध्ये पोहोचला आहे. दाट धुके आणि भन्नाट पावसाळी वातावरणामुळे महाबळेश्वरला सध्या निसर्ग खुलला आहे. त्याचा आनंदही सलमान घेत आहे.

सविस्तर वाचा…

12:22 (IST) 21 Jun 2024
नाशिक महानगरपालिकेची सिटीलिंक बससेवा पुन्हा विस्कळीत; हजारो विद्यार्थी, प्रवासी वेठीस

नाशिक : महानगरपालिकेची सिटीलिंक बस सेवा हंगामी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे शुक्रवारी सकाळपासून पुन्हा एकदा विस्कळीत झाली. हजारो पासधारक विद्यार्थी व सामान्य प्रवासी वेठीस धरले गेले. तपोवन आगाराच्या १५० बसेस पूर्णत बंद असून नाशिकरोड आगारातील ९७ बसगाड्यांमार्फत सेवा देण्याचा प्रयत्न सिटीलिंक प्रशासन करीत आहे.

वाचा सविस्तर…

12:22 (IST) 21 Jun 2024
पुणे : अपघातानंतर वाहतूक पोलिसांना जाग; गंगाधाम रस्त्यावर जड वाहनांना बंदी

पुणे : गंगाधाम रस्त्यावर भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी मार्केट यार्ड भागातील गंगाधाम चौक ते शत्रूंजय मंदिर रस्ता दरम्यान ट्रक, ट्रेलर, डंपर अशा जड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश दिले.

वाचा सविस्तर…

12:03 (IST) 21 Jun 2024
कल्याणमधील तरुणीची लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील तरुणाकडून ६० लाखाची फसवणूक

कल्याण – कल्याणमधील एका २९ वर्षाच्या नोकरदार तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखवून ठाण्यातील हिरानंदानी गृहसंकुलात राहणाऱ्या एका तरुणाने ५९ लाख ५६ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत हा तरुण या तरुणीला आपण विवाह करू, अशी आमिषे दाखवून तिला कर्ज घेण्यास सांगून तिच्याकडून रकमा घेत होता.

सविस्तर वाचा…

11:59 (IST) 21 Jun 2024
अंबरनाथ पालिका म्हणते वालधुनी नदी नव्हेच ! बांधकाम प्रकरणात स्पष्टोक्ती

अंबरनाथ: ज्या वालधुनी नदीवर ग्रेट इंडियन पेनिनसुला अर्थात आत्ताच्या भारतीय रेल्वेने बंधारा बांधला, ज्या नदीवर शिलाहारकालीन शिवमंदिर आहे त्या नदीला नदी मानण्यात मात्र सर्व शासकीय यंत्रणा नकारघंटा देताना दिसत आहेत.

सविस्तर वाचा…

11:58 (IST) 21 Jun 2024
फलकांचे भय कायम, ठाण्यात कापूरबावडी नाक्यावर जाहिरातीचे सर्वाधिक लोखंडी सांगाडे

ठाणे : मुंबईतील घाटकोपर भागात जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने शहरातील १६ बेकायदा जाहिरात फलक काढले. त्यानंतर महाकाय ५८ पैकी २० फलकांवरील लोखंडी पत्रे काढून टाकले असताना फलकांचे सांगाडे कायम आहेत.

सविस्तर वाचा…

11:43 (IST) 21 Jun 2024
वर्धा : सहा पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या काय आहे कारण…

वर्धा : तांबे चोरीच्या प्रकरणात समुद्रपूर पोलिसांनी आर्थिक व्यवहार केल्याचा ठपका ठेवत सहा पोलिसांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. समुद्रपूर येथील ठाणेदारपेक्षा पोलीस शिपाईच अधिक कारभारी व शिरजोर झाल्याची सातत्याने चर्चा होत होती. एका आठवड्यापूर्वी एक प्रकरण घडले होते.

वाचा सविस्तर…

11:13 (IST) 21 Jun 2024
यवतमाळ : कोलकत्ताच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ने घाटंजीत थाटला दवाखाना, अडकला अन् सुटलासुद्धा…

यवतमाळ : ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटाने वैद्यकीय क्षेत्रातील उणीवांवर बोट ठेवत भावनिक उपचारांच्या गरजेवर भर दिला होता. पण, शास्त्रोक्त वैद्यकीय शिक्षण न घेता रूग्णांवर उपचार करणे, हे जीवघेणेच आहे. तरीही प्रशानाचे दुर्लक्ष, कायद्यातील त्रुटी यामुळे अनेक मुन्नाभाई ग्रामीण भागात लोकांवर बिनबोभाट उपचार करतात. अशीच एक घटना घाटंजी तालुक्यात उघडकीस आली.

वाचा सविस्तर…

10:14 (IST) 21 Jun 2024
राज्य सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीला; उपोषण मागे घेणार?

ओबीसी कार्यकर्ते लक्ष्मण हाके हे सध्या उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. दरम्यान, त्यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीला आंतरवाली येथे गेलं आहे. राज्य सरकारकडून मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत आणि गोपीचंद पडळकर यांनी लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा केली. यावेळी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांना विनंती केली की, त्यांनी राज्य सरकारशी चर्चा करून हे उपोषण मागे घ्यावं. चर्चेतून मार्ग काढावा. कोणतेही प्रश्न केवळ चर्चेतून सुटतात.

09:45 (IST) 21 Jun 2024
बच्चू कडूंचं पोलीस अधीक्षकांना पत्र

प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की “माझा अपघात झाल्याची अफवा पसरवली जात आहे.” बच्चू कडूंनी त्यांच्या पत्रात त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू यांच्या निकटवर्तीयांना अज्ञात व्यक्तींकडून फोन येत आहेत. फोनवर सांगितलं जात आहे की बच्चू कडूंचा अपघात झालाय. दरम्यान, बच्चू कडू यांनी याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

बच्चू कडू म्हणाले, गेल्या २० दिवसांपासून माझ्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. मी अमरावती जिल्ह्याच्या बाहेर गेलो की माझ्या घरी, मित्रांना, माझ्या कार्यकर्त्यांना फोन येतो आणि त्यांना सांगितलं जातं की बच्चू कडूंचा अपघात झाला आहे. या संदर्भात मी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले आहे. यामागे नेमकं काय कारण आहे ते मला माहिती नाही. परंतु १५ ते २० वेळा अशा प्रकारचा फोन येऊन गेला आहे. फोन करून गंभीर वातावरण निर्माण केलं जात आहे. बातम्या पसरवल्या जात आहेत त्याची मी तक्रार केली आहे.

मोदींनी सभा घेतलेले अर्ध्याहून अधिक उमेदवार पडले”, शरद पवारांचा टोला; म्हणाले, “आता विधानसभेला…”

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या शेतकरी मेळावे घेत आहेत. गुरुवारी (२० जून) त्यांनी बारामतीमधील मोरगाव या गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील एनडीएच्या अपयशावरून चिमटा काढला. शरद पवार म्हणाले, नुकतीच महाराष्ट्राची लोकसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे १८ दौरे केले. निवडणुकीत भाजपासह एनडीएच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी १८ वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतल्या. परंतु, त्या बिचाऱ्यांना माहिती नव्हतं की त्यांनी ज्या १८ ठिकाणी सभा घेतल्या. त्यातले दहा उमेदवार पडले.

शरद पवार म्हणाले, मी उद्या दिल्लीला जाऊन मोदी यांना भेटून सांगेन तुम्ही महाराष्ट्रात जिथे जिथे गेलात तिथले ६० टक्के उमेदवार पडले. उद्या महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आहे तेव्हाही तुम्ही महाराष्ट्रात फिरा. मोदी या निवडणुकीत सतत मेरी गॅरंटी… मेरी गॅरंटी… असं ओरडत होते. परंतु, ते कोणी ऐकलं नाही. मोदींच्या गॅरंटीवर कोणाचा विश्वास बसला नाही. त्यांचं नाणं महाराष्ट्रात काही चाललं नाही. त्यांची गॅरंटी भाजपाच्या कामाला आली नाही.