Today’s News Update, 08 January 2024 : देशभरातील सर्वच पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकसभेच्या जागावाटपावरून युत्या आणि आघाड्यांमध्ये चर्चा चालू आहेत, बैठकांची सत्र चालू आहेत. यासंबंधीच्या बातम्या आज दिवसभरात पाहायला मिळू शकतात. यासह मालदीवमधील मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेली अपमानास्पद टीका आणि भारतीयांवर केलेल्या वर्णद्वेषी टीकेचे जगभरात पडसाद उमटू लागले आहेत. भारतीय नागरिक मालदीव सरकारचा निषेध नोंदवत आहेत. कलाकार, क्रिकेटपटू आणि राजकारणी मालदीवविरोधात संताप व्यक्त करत आहेत. याविषयीच्या बातम्यांवर आपलं लक्ष असेल. तसेच बिल्कीस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या सुटकेप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. यावरही आपलं लक्ष असेल.
Maharashtra News Updates in Marathi : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
शहापूर: ‘बकऱ्या सांभाळायला द्या नाहीतर शाळेवर शिक्षक द्या’ अशी मागणी करत शहापूर येथील साकडबाव केंद्रातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी पंचायत समितीवर बकऱ्या घेऊन जात सोमवारी आंदोलन केले.
शहापूर: शहापूर येथे एका व्यक्तीच्या हत्येचा कट त्याच्या मेहूण्यानेच रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी राजन यशवंत हरड (३० रा. कुरुंद), पंकेश मधुकर शिंदे (३३ रा. आणे) व महेश मुकुंद चव्हाण (४० रा. भांडुप) यांना अटक केली आहे.
सांगली : खरेदी केलेेल्या जमिनीच्या सातबारावर नाव लावण्यासाठी ३२ हजाराची लाच घेत असताना पलूसचे तलाठी बाबूराव जाधव सोमवारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले. या प्रकरणी लाचखोर तलाठ्याविरूध्द पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराने पलूस गावच्या हद्दीत जमिन खरेदी केली होती. खरेदी दस्ताप्रमाणे सातबारा सदरी मालक म्हणून नोंद करण्यासाठी आणि नोंदीचा दाखला देण्यासाठी गावकामगार तलाठी जाधव यांच्याशी तक्रारदाराने संपर्क साधला असता यासाठी ४० हजाराची लाच मागणी करण्यात आली. याबाबत लाच लुचपत विभागाकडे तक्रार करण्यात आली असता पडताळणी वेळी ४० हजाराऐवजी ३२ हजार रूपये लाच दिल्यानंतर सातबारा सदरी नोंद करून देण्याची तयारी जाधव यांनी दर्शवली.
सोमवारी सकाळी पलूस तहसिल कार्यालयात लाचखोर तलाठ्याला पकडण्यासाठी लाच लुचपत विभागाने सापळा लावला. तलाठी जाधव यांने तक्रारदाराकडून ३२ हजाराची लाच स्वीकारताच त्याला रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधिक्षक संदीप पाटील, निरीक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी प्रितम चौगुले, धनंजय खाडे, अजित पाटील, सलिम मकानदार, चंद्रकांत जाधव, पोपट पाटील, ऋषीकेश बडणीकर, सुदर्शन पाटील, रामहरी वाघमोडे, वंटमुरे आदींच्या पथकाने केली.
ठाणे: ठाण्यात कोट्यवधी रुपयांच्या वाहनांची विक्री मोठ्याप्रमाणात वाढली आहे. ठाणे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, ठाणे, भिवंडी आणि मिरा भाईंदर शहरात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत कोट्यवधी रुपयांच्या ८५ मोटारींची नोंदणी झाली आहे.
नागपूर : ‘मास्टरब्लास्टर’ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांच्या प्रेमात तर पडलाच, पण तो आता ‘बर्डमॅन’ अशी ओळख असणाऱ्या ताडोबातील सुमेध वाघमारेच्यादेखील प्रेमात पडला आहे. पाच जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिन होता आणि यानिमित्ताने सचिनने ‘एक्स’वर त्या दोघांची चित्रफीत शेअर केली.
कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील प्रभागस्तरावरील बेकायदा बांधकामे तोडण्याची जबाबदारी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी प्रभागातील साहाय्यक आयुक्तांंवर शासन निर्णयाप्रमाणे सोपवली आहे.
राज्याचे लक्ष लागून असलेल्या आमदार अपात्रतेच्या निर्णयाबद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी देखील त्यांची भावना बोलून दाखवली आहे.
पुण्यातील पाणी प्रश्न सरकार, भ्रष्ट जुमला पार्टी, नगरविकास खाते व सिंचन विभागाने सोडवला पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
उरण : दिघोडे- विंधणे मार्गावरील कंठवली गावातील गोदमाला सोमवारी दुपारी २ ते अडीच वाजता भीषण आग लागली आहे. या प्रचंड आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक होण्याची शक्यता आहे. आग विझविण्यासाठी आता पर्यंत कोणत्याही अग्निशमन दलाचा बंब आलेला नाही. तर गोदाम उच्च दाबाच्या वीज वाहनांच्या खाली वसलेले आहे.
नागपूर: उपराजधानीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) टाकाऊ प्लास्टिक बाटल्या, निकामी टायर्स आदी साहित्यांपासून अनोखे सेल्फी पाॅईंट साकारण्यात आले आहे. तेथे छायाचित्र काढण्यासाठी तपासणीला येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक गर्दी करत आहे.
नागपूर : बदलत्या वातावरणामुळे सारेच त्रस्त असून गरम कपडे घालायचे की रेनकोट सोबत ठेवायचा, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे.
जळगाव - अमळनेर येथे होणार्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार आहे. याबाबत त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषाताई तांबे यांना पत्र पाठवून स्वीकृती कळवली असल्याची माहिती संमेलनाचे समन्वयक प्रा. डॉ. नरेंद्र पाठक आणि मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी दिली.
डोंबिवली: येथील पश्चिम भागात घरकाम करणाऱ्या एका गृहसेविकेने घर मालकीणीला अंधारात ठेऊन तिच्या अपरोक्ष येऊन घरातील तीन लाख रूपये किमतीचे १० तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते.
गडचिरोली : मोहफुल दारूनिर्मिती कारखान्याचे भूमिपूजन झाल्यानंतर महिनाभरापासून जिल्ह्यात वाद निर्माण झाला असून या कारखान्याला परवानगी देऊ नये यासाठी जिल्हा दारुमुक्ती संघटनेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तर महाराष्ट्र ट्रायबल अँड बॅकवर्ड पीपल्स ॲक्शन समितीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देत दारूबंदीची समीक्षा करून ही बंदी उठविण्याची मागणी केल्याने पुन्हा एकदा जिल्ह्यात विरोध व समर्थनाचे सूर उमटू लागले आहेत.
पुणे : विवाहाच्या आमिषाने एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी उपनिरीक्षकाच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवतमाळ : महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही दुय्यमच आहे. ‘त्या’ घरात आणि बाहेरही सुरक्षित नसल्याचे गेल्या वर्षीच्या महिला संदर्भातील गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या वर्षभरात महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचार, विनयभंगाचे ७१५ गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणांत ४७९ आरोपींना अटक झाली, मात्र या घटनांतील २५० आरोपी अद्यापही पोलिसांना सापडले नाहीत.
नाशिक - पंचवटीतील तपोवन परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार असल्याने महोत्सव संस्मरणीय होण्यासाठी प्रशासन तयारीत मग्न आहे. दुसरीकडे, बहुतांश कामे ही एकाच कंपनीकडे देण्यात आल्यामुळे अधिकारी या वेगवेगळ्या कल्पनांबद्दल अनभिज्ञ आहेत.
नाशिक - पतंगोत्सवात प्रतिबंधित नायलॉन मांजा आणि काचेचा वापर करून निर्मिलेल्या मांजाचा वापर रोखण्यासाठी पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेंतर्गत असा मांजा विक्री करणाऱ्या ४२ विक्रेत्यांना शहर पोलिसांनी १५ दिवसांसाठी शहरातून हद्दपार केले. शहरातील रविवार कारंजा आणि मध्यवर्ती भागात पतंग, मांजाची बाजारपेठ आहे. त्यामुळे या भागातील सर्वाधिक २३ विक्रेत्यांचा कारवाई झालेल्यांमध्ये समावेश आहे.
मराठा आरक्षणाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले होते, “मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहीजे, यात कुणाचंच दुमत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात एकमत आहे. परंतु आज राज्यात ६२ टक्के आरक्षण आधीपासूनच आहे. आता आणखी आरक्षण देण्यासाठी कायदेशीर मार्ग तपासावे लागतील. पण काही लोक टोकाची भाषा वापरत आहेत. मुंबईला येण्यासंबंधी घोषणा करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान देऊन ७५ वर्ष झाली. आजही त्याच संविधानाच्या आधारावर देश मार्गक्रमण करत आहे. संविधानाने घालून दिलेल्या चौकटीचा आदर झाला पाहीजे. जर कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुणी केला, तर त्याचा मुलाहिजा ठेवायचा नाही. कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही, हेदेखील लक्षात ठेवा.”
अजित पवारांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला. जरांगे पाटील अजित पवारांना उद्देशून म्हणाले, तुम्ही आधी मराठा आरक्षणावर काहीच बोलत नव्हता ते बरं होतं. लोकांना वाटत होतं तुम्ही शांत आहात याचा अर्थ तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने असाल. तुमचा आरक्षणाला पाठिंबा आहे किंवा नाही याबाबत लोकांमध्ये सांशकता होती. कोणलाही काहीच कळत नव्हतं. परंतु, आता तुमच्या भूमिकेशी मराठ्यांना काहीच देणंघेणं नाही. तुमचं बारामतीवर किती प्रेम आहे ते सगळ्यांना माहिती आहे. परंतु, मराठ्यांविषयी तुमच्या पोटातलं आता ओठांवर आलं आहे. तुम्हाला पूर्वीपासून ती सवय आहे. मराठ्यांचं वाटोळं करायची तुम्हाला सवय आहे. ती तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली. तुम्हीच छगन भुजबळला मराठ्यांच्या अंगावर सोडलंय. कालच्या तुमच्या बोलण्यावरून ते सिद्ध झालं आहे.
नागपूर : कर्जबाजारी झालेल्या युवकाने कर्ज फेडण्यासाठी एका व्यापाऱ्याला खंडणी मागण्याचा कट रचला. कटात मित्राला सहभागी करुन घेतले. मित्राने फोन करून व्यापाऱ्याला तीन कोटींची खंडणी मागितली, असा खुलासा पोलीस तपासात झाला. न्यायालयाने दोन्ही आरोपींना १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अमरावती : महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाला कापूस खरेदीची परवानगी मिळाली असली, तरी भारतीय कापूस महामंडळासोबत (सीसीआय) करारनाम्यास होत असलेला विलंब आणि पणन महासंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया यामुळे पणन महासंघामार्फत कापूस खरेदी सुरू होण्यास अजूनही महिनाभराचा कालावधी लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
नागपूर – ऑफीस, बाजार किंवा अन्य कामांसाठी तुम्ही दुचाकी-चारचाकी वाहनांनी घराबाहेर पडत असाल तर कोणत्या रस्त्याने जावे किंवा कोणत्या रस्त्याने जाणे टाळावे हे लक्षात घ्या.
वाशिम : लोकसभा निवडणुका तोंडावर आहे. त्यासाठी इच्छुक आपलीच उमेदवारी पक्की असल्याचा जनतेत प्रचार करीत आहेत. मात्र, अद्याप कुणाचीच उमेदवारी अंतिम झाली नसून संभ्रम निर्माण करू नये, अशी तंबी दिल्याने शिवसेना ठाकरे गटातील इच्छुकांची चांगलीच कोंडी झाली आहे.
मालमत्ता कर हा मुंबई महापालिकेचा एक महत्त्वाचा उत्पन्नाचा स्त्रोत आहे. जकात रद्द केल्यानंतर पालिकेकडे मालमत्ता कर आणि विकास नियोजन हे दोन महत्त्वाचे उत्पन्नाचे स्त्रोत उरले आहेत.
पुणे : सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करताना आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने शहरातील एका गुंडाच्या नावाने घोषणा दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. आरोपीने मोहोळवर गोळीबार करताना गुंडाच्या नावाने घोषणा का दिल्या, तसेच संबंधित गुंड मोहोळ खून प्रकरणात सामील आहे का? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
मुंबई: महालक्ष्मी येथील रेसकोर्सची जमीन बळकावण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात केल्यानंतर आता भाजपचे माजी नगरसेवक आणि विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर यांनीही या वादात उडी घेतली आहे.
मुंबई: मुंबईत शनिवारी हंगामातले सर्वात कमी किमान तापमान नोंदले गेले होते. त्यानंतर थंडी पडण्याची चाहूल मुंबईकरांना लागताच सोमवारी पुन्हा किमान तापमानात वाढ झाली आहे.
फडणवीसांच्या गळ्यातला दिल्लीच्या गुलामीचा पट्टा...", ठाकरे गटाचा टोला
१०० व्या नाट्य परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी २०१९ साली 'कट्यार पाठीत घुसली'चा प्रयोग झाल्याची टीका केली. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पट्टा पाहिला की आपल्याला सिंहासन सिनेमाची आठवण होते, असंही फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या या टीकेला शिवसेनेच्या ठाकरे गटाने 'सामना' या मुखपत्रातून उत्तर दिलं आहे. ठाकरे गटाने म्हटलं आहे की, “देवेंद्र फडणवीसांना बोलू द्या. त्यांना २०२४ नंतर नाटकं, एकांकिका हेच करायचंय. दुसरं काम काय आहे त्यांना? मानेचा पट्टा एक आजार असतो. असे आजार अनेकांना होत असतात. अमित शाहाही आजारी असतात. मोदीही आजारी पडू शकतात. पण त्या मानेच्या पट्ट्यापेक्षा त्यांच्या गळ्यातला दिल्लीच्या गुलामीचा पट्टा महाराष्ट्राला वेदना देणारा आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पट्टा घातलेला आहे आणि दिल्ली तो पट्टा खेळवत बसली आहे”, असं संजय राऊत म्हणाले.