Maharashtra Politics LIVE Updates : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण चर्चेत आहे. यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. खासदार बजरंग सोनावणे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर यांनी या प्रकरणावरून राज्यभरात आवाज उठवला आहे. भाजपाचे आमदा सुरेश धसही या प्रकरणी आक्रमक झाले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप होत विरोधक करत आहेत. तसेच वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, यावरूनच मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत असून यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. यातच आज मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवान गडाचे महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेतली. या भेटीनंतर महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठीशी असल्याची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, मराठा आरक्षणप्रश्नी जरांगे पाटील यांनी आपल उपोषण मागे घेतलं आहे. तसेच ठाकरे गटाचे काही नेते आणि कॉग्रेसचे काही नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यासह राज्यातील विविध घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Marathi News Live Update Today : राज्यातील राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात.
रायगडच्या कलिंगडांना दुबईत मागणी
रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील रोहन पाटील या तरुण शेतकऱ्यांने पिकवलेली कलिंगडे दुबईला निघाली आहेत. पहिल्या टप्प्यात ४० टन कलिंगड दुबईत पाठवली जाणार आहेत.
कल्याण-डोंबिवलीत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १३ जणांना अटक
गेल्या वीस दिवसांच्या कालावधीत पोलीस उपायुक्तांचे विशेष अंमली पदार्थ विरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांनी कल्याण, डोंबिवलीतील सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १३ जणांना विविध भागातून अटक केली.
महंत नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; मनोज जरांगे म्हणाले, "महंत अशा प्रकारे कोणालाही..."
मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवान गडावर जाऊन महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांच्याशी चर्चा केली. यावेळी धनंजय मुंडे यांनी महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांच्याशी चर्चा केली.त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याबरोबर काय चर्चा झाली? याविषयीची माहिती डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी दिली. यावेळी त्यांनी आपली भूमिका देखील स्पष्ट केली. "भगवान गड मंत्री धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठीशी आहे, असंही महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलं. त्यांच्या या भूमिकेबाबत मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे म्हणाले, "महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री हे खूनाच्या घटनेबाबत, खंडणीच्या घटनेबाबत बोलतील असं वाटत नाही. आता धनंजय मुंडे यांना कुठे हात पसरावेत हे कळायला तयार नाही. कोणताही समाज असो मस्साजोग सारख्या घटनेला पाठिशी घालत नाही आणि महंत देखील अशा प्रकारे कोणालाही पाठिशी घालत नाहीत. तसेच या संपूर्ण घटनेचा संप्रदायावर काही परिणाम होण्याचं कारण नाही. त्यामुळे महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री हे असं बोलतील असं मला वाटत नाही", अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.
पनवेलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण
नवीन पनवेल येतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे सीझन क्रिकेट मैदान आणि महापालिकेने विकसित केलेल्या लोकाभिमुख ॲप सेवेसह अनेक विकासकामांचे लोकार्पण सोहळा पुढील आठवड्यात पनवेलमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे.
ठाणे जिल्हा निधीसाठी तहानलेलाच
ठाणे : पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पद लाभलेल्या ठाणे जिल्ह्यातील विकास कामांसाठी गेल्यावर्षी ११६७ कोटींपैकी ४६० कोटी रुपये इतकाच निधी प्राप्त झाल्याची बाब समोर आली आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील विकास कामांसाठी विविध विभागांकडून २८२० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असतानाही, केवळ १०५० कोटींचा निधीची मर्यादा ठेवण्यात आली आहे.
माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदे गटात प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, "मी..."
काँग्रेस पक्षाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर पुढे काही वेगळी वाटचाल असणार का? असा प्रश्न रवींद्र धंगेकर यांना विचारला असता ते म्हणाले, "मी काँग्रेस पक्षात आहे, काँग्रेस पक्षाचं काम करणार आहे. काँग्रेस पक्ष जे सांगेल ते मी काम करत आहे आणि यापुढेही काम करत राहणार आहे. शिवसेनेत (शिंदे गट) जाण्याचा माझा कोणताही प्लॅन नाही. वैयक्तिक कामानिमित्त भेटलो, कामाच्या संदर्भानेच चर्चा झाली, बाकी काही नाही. मी काँग्रेस पक्षातच आहे आणि वैयक्तिक कामाला कोणी कोणाला भेटू नये असं कोणी म्हटलेलं नाही. सर्वजण एकमेकांना भेटतात मग मी भेटलं त्यात गैर काय?", असं रवींद्र धंगेकर यांनी 'लोकसत्ताशी' बोलताना म्हटलं.
महंत भगवान शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर अंजली दमानियांची प्रतिक्रिया!
डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी भगवान गडावर पत्रकार परिषद घेऊन त्यांची ही भूमिका स्पष्ट केली. त्यावर अंजली दमानिया यांनी टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “भगवान गड आपल्यासर्वांसाठी पवित्र स्थान आहे. अशा ठिकाणाहून पत्रकार परिषद घेणं आणि अशी पाठराखण केली जावी याचं वाईट वाटलं. आपण कोणीही मंदिरात जातो किंवा अशा पवित्र स्थानी जातो, तिथलं आपलं वागणं वेगळं असतं. पण नामदेव शास्त्रींना कदाचित धनंजय मुंडे यांच्याविषयी माहिती नसावी आणि म्हणून त्यांनी असं विधान केलं. अतिशय आदरपूर्वक मला म्हणावंसं वाटतंय, तुम्हाला एवढी माहिती नसेल तर ती मी तुमच्यापर्यंत पोहोचते. बोलणारे लोक कोणत्याही आकसापोटी बोलत नाहीत. जी वस्तुस्थिती आहे तीच दाखवली जात आहे. मी जे धनंजय मुंडेंविरोधात बोललेय, जे तथ्य आहे तेच सांगितलं आहे. अतिशय आदरपूर्वक नामदेव शास्त्रींना सांगावं वाटतं की असं व्हायला नको होतं”, अशी खंतही अंजली दमानिया यांनी व्यक्त केली.
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद कधी सुटणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
गेल्या काही दिवसांपासून रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद सुरु आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळण्यासाठी शिवसेना शिंदे गट आग्रही आहे. मंत्री भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत. तसेच नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी भाजपा आग्रही आहे. दरम्यान, यावरून महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे. आता यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला असता देवेंद्र फडणवीस यांनी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री प्रश्न लवकरच सोडवला जाईल, असं सांगितलं आहे.
भगवान गड धनंजय मुंडेंच्या पाठीशी : महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री
महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री माध्यमांशी बोलत असताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला की भगवान गड धनंजय मुंडेंच्या पाठिशी आहे का? यावर डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलं की, “आम्ही धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठिशी आहोत”, असं नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलं आहे.