Maharashtra News Live Update, 13 May: किरकोळ किमतींवर आधारित महागाई दराने सरलेल्या एप्रिलमध्ये ७.७९ टक्के हा आठ वर्षांतील उच्चांकी स्तर नोंदवला आहे. तर दुसरीकडे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याची वाट सुकर झाली असून, दक्षिण अंदमान व बंगालच्या उपसागरात १५ मे रोजीच दाखल होतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. याशिवाय राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी राज ठाकरेंवर टीका केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. तसंच औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानाही मोठा वाद निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे नवाब मलिकांना कोर्टाने दिलासा दिला असून खासगी रुग्णालयात उपचारास परवानगी दिली आहे. पण अनिल देशमुखांना मात्र कोर्टाने झटका दिला आहे.
अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.
Maharashtra Latest News Updates: राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तसंच इतर क्षेत्रातील सर्व घडामोडी जाणून घ्या
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच मुंबै बँकेच्या निवडणुकीत बोगस मजूर म्हणून अपात्र ठरल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेचे दोन पदाधिकारी यांच्यावर बॅलार्ड पीअर येथील ३८ व्या महानगर दंडाधिकारी न्यायालयात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी आज (शुक्रवार) आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी दरेकर यांना पोलिसांनी अटक केली. मात्र उच्च न्यायालयाने दरेकर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केल्यामुळे त्यांची लगेच जामीनावर सुटका केली. दरेकर यांच्यावर दाखल करण्यात आलेले आरोपपत्र ९०५ पानांचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाकिस्तानमधील सामान्य नागरिक भारताचे शत्रू नसल्याचं वक्तव्य केलंय. तसेच पाकिस्तानमध्ये ज्यांना पाकिस्तानी सैन्याची मदत घेऊन सत्ता काबिज करायची आहे त्यांनाच दोन्ही देशांमध्ये तणाव हवा असतो, असंही त्यांनी नमूद केलं.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात मोरदर शिवारात ठाकरे कुटुंबातील चिमुकल्यांनी बिबट्याच्या बछड्याला मांजरीचे पिल्लू समजून तब्बल ५ दिवस त्याच्यासोबत खेळले, त्याचा सांभाळ केला. मात्र, ५ दिवसांनंतर हे मांजरीचे पिल्लू नसून बिबट्याचं बछडं असल्याचं लक्षात आलं.
जगविख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं १० मे रोजी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर विर्लेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पं. शर्मा यांच्या दोन्ही मुलांनी मुखाग्नी दिला. यावेळी बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया, तबलावादक झाकीर हुसेन यांच्यासह संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सध्या झाकीर हुसेन यांचा पंडित शिवकुमार शर्मा यांना अखेरचा निरोप देतानाचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.
भंडारा-गोंदियामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला सोबत न घेता राष्ट्रवादीने भाजपासोबत युती केली. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि प्रफुल पटेल यांच्यावर दगाबाजीचा गंभीर आरोप केला. आता याला राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी निवेदन जारी करत थेट प्रत्युत्तर दिलंय.
“ठाकरे सरकारमध्ये हनुमान चालीसा म्हटली तर कारवाई आहे. परंतु काश्मीर तोडण्याचा नारा देणाऱ्यांवर कारवाई नाही. शर्जीलवर कारवाई नाही आणि अकबरुद्दीन ओवेसींना मी सांगू इच्छितो, औरंगजेबाच्या कबरीचा त्या ठिकाणी महिमामंडण करून, तुम्ही महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या देशभक्त मुस्लिमांचा अपमान केला आहे.” असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.
“ठाकरे सरकारमध्ये हनुमान चालीसा म्हटली तर कारवाई आहे, परंतु…” – फडणवीसांनी साधला निशाणा!
औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांना आज (शुक्रवार) दुपारी त्यांच्या दालनाच्या परिसरात अरेरावीची भाषा वापरून हल्ल्याच्या उद्देशाने अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचा निषेध नोंदवत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले.
“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी. उत्तर भारतीयांनी राज ठाकरे यांच्या विरोधात घेतलेली भूमिका योग्यच आहे.” असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री रामदास आठवले त्यांनी सातारा येथे केले. सातारा दौऱ्यावर असताना ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे साताराचे अध्यक्ष अशोक गायकवाड उपस्थित होते.
राज ठाकरेंनी अयोध्येला जाण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी – रामदास आठवलेंचं विधान!
रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पट्टीवडगाव ( ता. अंबाजोगाई ) येथील घटनेनंतर मृत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून संबंधित रोड रोमिओवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क (Elon Musk) मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटर विकत घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पण ट्विटर विकत घेण्याची डील तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मस्क यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे.
असे म्हणतात की गुन्हेगारांना जात नसते, मात्र समाजात अशी एक जात आहे ज्यांच्याकडे नेहमीच संशयाच्या नजरेनं पाहिलं जातं. हाच संशयाचा डाग पुसून टाकण्यासाठी बीडमधील शिरूरमध्ये पारधी समाजातील एका तरुणानं समाजात सन्मानान जगता यावं, म्हणून एक मोठा निर्णय घेतल्याची घटना समोर आलीय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज्य सरकारने सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत धमकीचं पत्र मिळाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या चिंतन शिबीरात हजेरी लावली असून पक्षाच्या नेत्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. राजस्थानमधील उदयपूरमध्ये तीन दिवस हे चिंतन सुरु असणार आहेत. यावेळी सोनिया गांधी यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशात ध्रुवीकरणाचं वातावरण आणि भीती निर्माण केली जात असल्याचा आरोप यावेळी सोनिया गांधींनी केला.
२१ मे २०२२ ला नीट परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काही वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनी केली होती. कांऊनसिलिंगच्या दरम्यान ही परीक्षा येत असल्यामुळे ती पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.
“मी गुजरातला होतो. ज्या राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढतेय, तिथल्या आरोग्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा केली. त्यांचं म्हणणं आहे की रुग्ण वाढत आहेत हे खरंय. पण अतिशय सौम्य स्वरुपाचा परिणाम रुग्णांवर आहे. रुग्णालयात दाखल होण्याचं मोठं प्रमाण दिसत नाही. गृह विलगीकरणातच रुग्ण बरे होत आहेत”, असं टोपे म्हणाले.
वाचा नेमकं काय म्हणाले राजेश टोपे महाराष्ट्रातील करोनाच्या परिस्थितीवर...
जम्मू काश्मीरमधील बडगाव जिल्ह्यातील चदूरा येथे राहुल भट्ट या काश्मिरी पंडिताची दहशतवाद्याकडून करण्यात आलेल्या हत्येनंतर परिसरात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर काश्मिरी पंडित रसत्यावर उतरले असून केंद्र सरकार आणि जम्मू काश्मीर सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल केले आहेत. "आदित्य ठाकरे यांची ७ कोटी रुपयांची चोरी पकडली गेली. यावर उद्धव ठाकरे यांनी काय कारवाई केली?" असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी विचारला.
सध्या महाराष्ट्रात भाजपा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या जवळ जाताना दिसत आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये मात्र राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध होत आहे. याबाबत भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना उत्तर प्रदेशात राज ठाकरे यांना का विरोध होतो असा प्रश्न विचारण्यात आला.
श्रीलंका सध्या अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करत असून नागरिकांमधील रोष वाढत चालला आहे. हिंसक निदर्शनांमुळे पंतप्रधान महिंदू राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर, विरोधी पक्षनेते रानिल विक्रमसिंघे यांना गुरुवारी देशाचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ देण्यात आली. दरम्यान देशात सुरु असलेलं आंदोलन हिंसक होत चालल्याचं दिसत आहे. प्रशासनाने कारवाई करताना आतापर्यंत अनेकांना अटक केली असून कर्फ्यूदेखील लावले आहेत. यादरम्यान एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
“शिवाजी महाराजांचा अजेंडा मराठी साम्राज्य स्थापनेचा नसून हिंदूंचं साम्राज्य स्थापन करण्याचा होता. जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार करण्यासाठी ती धर्मध्वजा हातात घेऊ, तेव्हा आपल्या डोक्यात भाषावाद, प्रांतवाद, जातीवाद, वर्णवाद राहणार नाही. आपल्या डोक्यात फक्त धर्म राहील. राजकारणात परिपूर्ण हिंदुत्व घुसलंच पाहिजे", असं कालीचरण म्हणाला आहे.
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सत्र न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. प्रकृती ठीक नसल्याने नवाब मलिक यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र न्यायालयाने त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास नकार दिला आहे.
कल्याण मधील नामांकित दुकानांमध्ये कपडे खरेदीच्या बहाण्याने जाऊन दुकानदाराला नवनवीन कपडे दाखविण्यात गुंतवून महिलांची एक टोळी कपडे चोरत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या महिलांनी कल्याणमधील एका दुकानदाराच्या दुकानातील ३२ हजारांचे कपडे चोरले आहेत. दुकानातील सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. दुकानदाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण तपासून या महिलांचा शोध सुरू केला आहे.
एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबाद दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे नेते इम्तियाज जलील, वारीस पठाण यांची उपस्थिती होती. यावरुन टीकेची झोड उठलेली असताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. यावेली त्यांनी राज्य सरकारवही निशाणा साधला आहे.
“महाराष्ट्र सरकारला लोकांवर राजद्रोहाचा गुन्हा लावण्याचा भारी शौक आहे. एवढी जर तुम्हाला एवढीच हौस आहे, तर राजद्रोहाचा गुन्हा ओवैसींवर लावा ना. तुमची किती हिंमत आहे, किती साहस तुमच्यामध्ये आहे हे महाराष्ट्रातल्या छत्रपतींच्या मावळ्यांना पाहायचंय. ओवैसी औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवण्यासाठी जातो? काय कारण?” असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा बदलून देण्याचे अमिष दाखवून सहा भामट्यांनी उल्हासनगरातील एका व्यापाऱ्याला तब्बल ६७ लाख रूपयांचा गंडा घातला आहे. धक्कादायक म्हणजे एकीकडे नोटा बदलण्यासाठी दलाली मिळवत असतानाच दुसरीकडे हाच व्यवहार बनावट पोलिसांच्या मदतीने रंगेहात पकडवून पुन्हा संबंधित व्यक्तीकडून पैसे उकळल्याचे समोर आले आहे. तब्बल पाच कोटी रूपयांच्या जुन्या नोटा बदलण्याचे अमिष दाखवण्यात आले होते. त्यामुळे या प्रकारात तक्रारदारही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
भिवंडी येथील शासकीय अनुदानित शाळेत विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी ३५०० रुपयांची मागणी करणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकांसह तिघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. मुख्याध्यापक (माध्यमिक) दिपक लेले (५५), मुख्याध्यापक (प्राथमिक) आत्माराम वाघ (५७) आणि शिक्षक सुरेश कुलकर्णी (५२) अशी ताब्यात असलेल्यांची नावे असून त्यांच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याआधी युपी आणि महाराष्ट्रात त्यांच्या या दौऱ्याला विरोध करणारं एक गाणं युट्यूबवर व्हायरल झाल्याचं पहायला मिळत आहे. स्थानिक भाजपा खासदाराने राज यांच्या दौऱ्याला विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर हे गाणं तयार करण्यात आलाय. या गाण्यात नेमकं काय आहे येथे क्लिक करुन जाणून घ्या
राजस्थानमधील उदयपूरमध्ये आजपासून काँग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबिराला सुरुवात होत आहे. या शिबिरात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. या शिबिरात पक्षाचे ४३० हून अधिक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा
चंद्रपुरातील दुर्गापूर परिसरात १६ हल्ले करून अनेकांचे बळी घेणाऱ्या बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वन विभागाला अखेर यश आलं आहे. शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दुर्गापूर परिसरात वन विभागाने या बिबट्याला पकडले आहे. दोन दिवसांपूर्वी बिबट्याने अडीच वर्षीय बालिकेला तोंडात पकडून नेलं होतं. मुलीच्या आईने बिबट्याशी झुंज देत लेकीची सुटका केली होती.
एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतल्यानंतर एका सभेत बोलताना त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली. ओवेसी नेमकं काय म्हणाले जाणून घ्या येथे क्लिक करुन
अनेक महत्वाच्या घडामोडी राज्यात, देशात, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्हाला आता एकाच ठिकाणी वाचू शकता.