Maharashtra News Live Update, 14 May: एकीकीडे महागाईमुळे सर्वसामान्याचे जगणे अवघड झालेले असताना, दुसरीकडे राजकीय घडामोडींनी देखील वातावरण तापलेलं आहे. हनुमान चालीसाच्या मुद्य्यावरून खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा या राणा दाम्पत्यामध्ये आणि शिवसेनेत सुरू झालेला वाद, मशिदीवरील भोंग्याच्या मुद्य्यावरून राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केली जात असलेली टीका तसेच एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाचं दर्शन घेऊन राज ठाकरेंवर साधलेला निशाणा. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता अन्य नवीन घडामोडी घडत आहेत.

अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.

Live Updates
19:28 (IST) 14 May 2022
'एखादा राजकारणी बाहेरून येतो अन् औरंगजेबच्या समाधीचं दर्शन घेतो, याचा मी निषेध करतो' - शरद पवार

काही दिवसापूर्वी बाहेर राज्यातील एक मोठा राजकीय औरंगाबाद येथे येऊन औरंगजेबच्या समाधीचे दर्शन घेतो, हे कुठेतरी जातीपातीचं राजकारण करत आहेत. त्याला महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास माहीत नाही, त्यानं इथे येऊन राजकारण करू नये. ज्या समाधीच्या दर्शनाला तो गेला, या गोष्टीचा मी जाहीरपणे निषेध करतो, असं वक्तव्य खासदार शरद चंद्र पवार यांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेत केलं आहे.

18:53 (IST) 14 May 2022
'कोण केतकी चितळे, मी ओळखत नाही'- शरद पवार

मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली आहे. या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. केतकी विरोधात पुण्यासह आणि ठाण्यात एकूण ती गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत शरद पवारांना विचारलं, कोण केतकी चितळे मी तिला ओळखत नाही, असं म्हणत शरद पवारांनी भाष्य टाळलं आहे. संबंधित व्यक्तीला आपण ओळखत नसून नेमकं काय झालंय हेही मला माहीत नाही, असं पवारांनी यावेळी म्हटलं आहे.

18:45 (IST) 14 May 2022
उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी भाजपाने केली टीका

आज मुंबईत शिवसेनेची सभा होणार आहे. यासाठी मागील काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरू आहे. उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. असं असताना सभेपूर्वीच भाजपाने कवितेच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की,

वह जिसने घर नहीं छोड़ा

वह क्या मैदान में उतरेगा

देखा तुम्हारा असली चेहरा

कोई बच्चा भी नहीं डरेगा

जय महाराष्ट्र

आज फुस्की सभा

https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1525413485206962176

18:39 (IST) 14 May 2022
सोशल मीडियावर अतिशय बेतालपणे बोललं जातं - देवेंद्र फडणवीस

मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबूकवर केलेल्या पोस्टमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कोल्हापुरात बोलताना सांगितलं की, "आपण काय भाषा वापरतो, याचं भान असलं पाहिजे. हल्ली सोशल मीडियावर अतिशय बेतालपणे बोललं जातं. अतिशय खालच्या दर्जाचे शब्द वापरले जातात, अशा प्रकारचे शब्द कोणीही वापरू नये. या प्रकरणात कायदा त्याचं काम करेल. "

18:09 (IST) 14 May 2022
लातूर - पाझर तलावात बुडून पाच महिलांचा मृत्यू

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे तुळशीराम तांडा जवळील पाझर तलावात बुडून पाच महिलांचा मृत्यू झाला आहे. आज (शनिवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. ऊसतोड कामासाठी पालम येथील या महिला अहमदपूर तालुक्यात काही दिवसापासून कार्यरत होत्या. आज सकाळी दोन महिला व तीन मुली कपडे धुण्यासाठी पाझर तलावावर गेल्या होत्या.

18:07 (IST) 14 May 2022
शरद पवारांनी नारायण राणे, चंद्रकांत पाटलांना लगावला टोला, म्हणाले…

महाविकास आघाडी सरकारचा ६ जून हा शेवटचा दिवस असणार आहे असं केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी म्हटलं असल्याचं सांगून यावर माध्यम प्रतिनिधीने पवारांची प्रतिक्रिया विचारली असता शरद पवारांनी म्हटले की, नारायण राणे, चंद्रकांत पाटील हे सातत्याने तारखा देत असतात आम्ही ऐकत असतो, वाचत असतो, आनंदही घेत असतो.

18:00 (IST) 14 May 2022
'असल्या प्रवृत्तींना मानसिक उपचारांची गरज', केतकी चितळेच्या पोस्टवरून भडकले अजित पवार

मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिली आहे. याप्रकरणी कळंबोली पोलिसांनी तिला राहत्या घरातून अटक देखील केली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार भडकले आहेत. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं की, "मी तुम्हाला सांगू का आपला महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. काय बोललं पाहिजे याचं भान ठेवलं पाहिजे. हे जे बोललं आहे ती विकृत्ती आहे, असं नाही बोललं पाहिजे. राजकीय विचार वेगळे असू शकतात. मात्र, इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची पद्धत राज्यात नव्हती, अशी वक्तव्य कोणीच करू नये. याचा मी निषेध करतो. असल्या प्रवृत्तींना मानसिक उपचारांची नितांत गरज आहे, चांगल्या दवाखान्यात नेत उपचार दिले पाहिजेत"

17:52 (IST) 14 May 2022
मराठी अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी घेतलं ताब्यात, शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट पडली महागात!

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी दूरचित्रवाहिनीवरील मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर ठाणे पोलिसांनी केतकी चितळे विरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने नवी मुंबई येथून केतकी चितळे हिला ताब्यात घेतलं आहे. सविस्तर बातमी

17:18 (IST) 14 May 2022
ठाण्यात महागाईविरोधात राष्ट्रवादीचं जनआक्रोश आंदोलन

देशातील वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शनिवारी ठाण्यात जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. महागाईचा भस्मासुर, पगार कपात, नोकरी जाण्याची भीती, इंधन दरवाढ अशा आशयाचे फलक झळकवत कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. सविस्तर बातमी

17:17 (IST) 14 May 2022
ज्येष्ठ काँग्रेस नेत्यानं फेसबुक लाईव्हमध्येच पक्षाला ठोकला रामराम!

सर्वात आधी गेल्या वर्षी अमरिंदरसिंग यांचा राजीनामा, त्यानंतर पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये झालेला पराभव या दोन धक्क्यांनंतर आता पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील जाखर यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे फेसबुक लाईव्हमध्ये त्यांनी “गुडलक आणि गुडबाय” असं म्हणत पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचं जाहीर केलं.

वाचा सविस्तर...

16:25 (IST) 14 May 2022
केतकी चितळेच्या 'त्या' ट्वीटमुळे राज ठाकरे संतापले, ट्विटरवर खुलं पत्र!

अभिनेत्री केतकी चितळे हिनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून श्लोक प्रकारातून पोस्ट केलेल्या ओळींमधून शरद पवारांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी देखील तीव्र संताप व्यक्त केलेला असताना केतकी चितळेविरुद्ध गुन्हा देखील दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांवर सातत्याने टीका करणाऱ्या राज ठाकरेंनी देखील केतकी चितळेला सुनावलं आहे.

राज ठाकरेंनी पत्रात नेमकं काय म्हटलं, वाचा सविस्तर...

16:21 (IST) 14 May 2022
अभिनेत्री केतकी चितळे विरोधात पुण्यात तक्रार दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्या प्रकरणी दूरचित्रवाहिनीवरील मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. अभिनेत्री केतकी चितळेने समाजमाध्यमावर एक कविता पोस्ट केली आहे. सविस्तर बातमी

16:14 (IST) 14 May 2022
राज ठाकरेंनी उत्तर प्रदेश मधील नागरिकांची माफी मागायला हवी - रामदास आठवले

राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेश मधील नागरिकांची माफी मागायला हवी. उत्तर भारतीयांना विरोध करणे म्हणजे छत्रपतीच्या विचारांना विरोध करण्यासारखे आहे असे केंद्रीय मंत्री रामदार आठवले यांनी म्हटले आहे. तसेच पाठीत खंजीर खुपसल्याने तुम्ही एवढं रक्तबंबाळ आहात तर काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत राहणे योग्य नाही, असेही रामदास आठवले म्हणाले. वाचा सविस्तर...

16:12 (IST) 14 May 2022
शिवसेना विकास कामांचे श्रेय घेत असल्याची भुजबळांची टीका

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यावरुन अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेना विकास कामांचे श्रेय घेत असल्याचे मंत्री भुजबळ  यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरेंनी सुद्धा आधी चौकशी करावी असेही छगन भुजबळ म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ यांनी याबाबत भाष्य केले आहे. वाचा सविस्तर...

16:11 (IST) 14 May 2022
कोणत्याही परिस्थितीत विमानतळ बारामतीत होणार नाही – अजित पवारांची स्पष्टोक्ती!

पुण्यातील नियोजित विमानतळ कोणत्याही परिस्थितीत बारामतीत नेण्यात येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निक्षून सांगितले. नियोजित विमानतळासाठी योग्य जागा लवकर निश्चित करा. आता उशीर करू नका, अशी विनंती संबंधित यंत्रणेला केली असल्याचे ते म्हणाले. चाकणलगत म्हाळुंगे येथे एका उपाहारगृहाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना पवारांनी हे विधान केले.

16:10 (IST) 14 May 2022
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छाप्यानंतर पोलीस निरीक्षक पसार

गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी दीड लाखांची लाच घेतल्या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहायक फौजदारासह एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. ‘एसीबी’ने पोलीस ठाण्यात टाकलेल्या छाप्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे पसार झाले आहेत. मोरे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

14:36 (IST) 14 May 2022
संजय राऊतांनी भाजपासोबतच राज ठाकरेंवरही निशाणा साधला आहे!

औरंगजेबाची कबर विरोधकांना आत्ताच दिसली का? असा सवाल संजय राऊतांनी भाजपाला विचारला आहे. "तुम्हाला ती कबर आत्ताच दिसतीये का? तुमचं राज्य होतं ना ५ वर्ष? तेव्हाच टाकायची ना उखडून. तुम्हाला ते बेकायदेशीर वाटतंय, तर करा तिथे काय करायचं ते. आताही ते करू शकतात. केंद्र सरकारच्या अखत्यारीतली वास्तू आहे ती", असं संजय राऊत म्हणाले आहेत.

वाचा नेमकं काय म्हणाले संजय राऊत!

14:16 (IST) 14 May 2022
'आता आणखी एक मशीद...' ग्यानवापी मशीद निकालाबाबत ओवेसींचं मोठं विधान

ग्यानवापी मशीद परिसराच्या सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीला न्यायालयानं दणका दिला असून येत्या १७ मेपूर्वी सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, या भागाच्या तळघराचा देखील सर्वे होईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. न्यायालयाच्या निकालानंतर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मोठं विधान केलं आहे. वाचा सविस्तर बातमी

14:02 (IST) 14 May 2022
संजय राऊतांचा भाजपावर निशाणा!

“ही सभा ऐतिहासिक आहे. कोविड, लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांचं आजारपण यामुळे उद्धव ठाकरे अशा सभांच्या व्यासपीठावर मध्यंतरी आले नव्हते. ते आता येत आहेत. ही सभा लोकांच्या, विरोधकांच्या मनातल्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देणारी असेल. ही सभा फक्त त्यासाठीच नाही. गेल्या काही दिवसांत विरोधकांनी महाराष्ट्राचं वातावरण गढूळ करण्याचा, लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा, महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या पायावर हल्ले चालवले आहेत. या सगळ्याबाबत उद्धव ठाकरे परखडपणे बोलतील अशी आमची अपेक्षा आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत, वाचा सविस्तर...

13:42 (IST) 14 May 2022
केतकीला राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडून चोप देण्यात येणार – रुपाली पाटील

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांवर आक्षेपार्ह भाषेत लिहिलेली पोस्ट शेअर केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रुपाली पाटील चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. वाचा सविस्तर...

13:37 (IST) 14 May 2022
केतकी चितळेविरोधात राष्ट्रवादीकडून पुणे सायबर विभागाकडे तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी पोस्ट केलेल्या आक्षेपार्ह कवितेमुळे केतकी चितळेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याकडून पुणे सायबर विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

12:53 (IST) 14 May 2022
माझं पद गेलं तरी बेहत्तर पण शरद पवारांवरील टीका आम्ही सहन करणार नाही - जितेंद्र आव्हाड

अभिनेत्री केतकी चितळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांवर आक्षेपार्ह भाष्येत लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे. या प्रकरणी तिच्या कळवा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन वादग्रस्त कविता पोस्ट केली आहे. यावरुन आता राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे. वाचा सविस्तर...

12:47 (IST) 14 May 2022
शिवसेना खासदार राहुल शेवाळे दुचाकी रॅली काढत सभेला पोहचणार

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्यासह शेकडो शिवसेना कार्यकर्ते आज संध्याकाळी साडेपाच वाजता शिवसेना भवन ते बीकेसी मैदान अशी दुचाकी रॅली काढत उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी पोहचणार आहेत.

12:28 (IST) 14 May 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आज होणाऱ्या हुंकार सभेवर भाजपाने साधला निशाणा

“विरोधकांवर ‘टोमणे बॉम्ब’ मारण्यापेक्षा संभाजी राजे जयंतीचं औचित्य साधत औरंगाबाद शहराचं संभाजीनगर नामकरण करत असल्याची घोषणा भर व्यासपीठावर करावी हीच भाजपाची मागणी असेल.” असं म्हणत भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या सभेच्या पार्श्वभूमीवर निशाणा साधला आहे.

“विरोधकांवर ‘टोमणे बॉम्ब’ मारण्यापेक्षा संभाजी राजेंच्या जयंतीचं औचित्य साधत…”

12:25 (IST) 14 May 2022
ग्रामोफोन तबकड्यांचे संग्राहक प्रभाकर दातार यांचे निधन

कुर्ल्याचे ग्रामोफोन तबकड्यांचे संग्राहक प्रभाकर दातार यांचे (वय ९३) यांचे वृद्धापकाळाने आज (शनिवार) पिंपरी येथे निधन झाले. त्यांच्या संग्रहात दहा हजारांहून अधिक ग्रामोफोन तबकड्या होत्या. शास्त्रीय संगीताचे जाणकार असलेले दातार सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स या संस्थेच्या संस्थापकांपैकी एक होते.

12:07 (IST) 14 May 2022
औरंगजेबाच्या कबरीवर फुले अर्पण करणाऱ्यांचे दात तोडून दाखवा - नवनीत राणा

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण यांनी कार्यकर्त्यांसह खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरुन आता दिल्लीत असलेल्या खासदार नवनीत राणा यांनी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर...

11:41 (IST) 14 May 2022
पुणे : मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र ; तिघांवर गुन्हा दाखल

मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार इंदापूर पोलीस तसेच वैद्यकीय विभागाने उघडकीस आणला. इंदापूर परिसरातील करण्यात आलेल्या कारवाईत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून मोटार आणि गर्भलिंग निदान यंत्रणा जप्त करण्यात आली आहे.

11:13 (IST) 14 May 2022
काश्मिरी पंडितांच्या आजच्या विदारक परिस्थितीला भाजपाच जबाबदार - सचिन सावंत

“काश्मिरी पंडितांच्या आजच्या विदारक परिस्थितीला भाजपाच जबाबदार आहे. मोदी सरकारने गेली ८ वर्षे काश्मिरी पंडितांच्या दुखाग्नीवर राजकीय पोळ्या भाजल्या आणि सत्तेच्या बाजारात काश्मिरी पंडितांचे दुःख विकले हे स्पष्ट झाले आहे.” अशा शब्दांमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी टीका केली आहे.

काश्मिरी पंडितांच्या दुखाग्नीवर भाजपाने फक्त राजकीय पोळ्या भाजल्या – सचिन सावंत

10:38 (IST) 14 May 2022
उद्धव ठाकरेंची आजची सभा ही क्रांतिकारी असेल; सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील - संजय राऊत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आज(शनिवार) सायंकाळी एमएमआरडीए मैदान, बीकेसी, वांद्रे पूर्व येथे जाहीर सभा होणार आहे. आजच्या सभेत उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधणार आणि राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या सभेला उपस्थित राहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून शिवसेना कार्यकर्ते येणार आहेत. दरम्यान या सभेबद्दल शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना माहिती दिली. “आजची सभा ही क्रांतिकारी सभा असेल, आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप अशी ही आजची सभा असणार आहे. या सभेतून सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील.” असं त्यांनी सांगितलं.

“आजची सभा आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप आहे” ; उद्धव ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं विधान!

10:38 (IST) 14 May 2022
अभिनेत्री केतकी चितळेविरोधात गुन्हा दाखल

ट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा वादात सापडली आहे. केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांवर आक्षेपार्ह भाष्येत लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे. या प्रकरणी तिच्या कळवा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. वाचा सविस्तर...

Story img Loader