Latest Marathi News LIVE Updates : राज्यात आज तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने राज्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच विदर्भात आणखी दोन दिवस उष्णतेची लाट असणार असून बुधवार, गुरुवारी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.तसेच विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे तीन उमेदवार जाहीर केले आहेत, यानंतर आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा चर्चेत आहे या पार्श्वभूमिवर राजकीय वर्तुळातील प्रतिक्रिया तसेच इतर महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत.
Maharashtra News Live Today, 17 March 2025 : महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
‘दुर्दैव, आम्हाला औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करावं लागतं’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने भिवंडीत पहिल्या शिव मंदिराचे लोकार्पण सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात बोलत असताना फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबरीवर भाष्य केले.
यावेळी ते म्हणाले, या देशात महिमामंडन होईल, तर ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराचे होईल, औरंगजेबाच्या कबरीचे होणार नाही. खरंतर औरंग्याची कबर आपल्या महाराष्ट्रात कशाला हवी? असा प्रश्न पडेल. पण आपल्याला कल्पना आहे. भारतीय पुरातत्व विभागाने या कबरीला ५० वर्षांपूर्वी संरक्षित स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. म्हणून त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे. ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारले, दुर्दैवाने त्याच्याच कबरीचे संरक्षण आम्हाला करावे लागत आहे.
“देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना भाजपाच्या लोकांनीच केली”, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं भाजपाला प्रत्युत्तर
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना मुघल सम्राट औरंगजेबाशी केल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांनी दोन्ही राज्यकर्ते धर्माचा सत्तेसाठी वापर करणारे “क्रूर शासक” असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपातून तीव्र पडसाद उमठताना पाहायला मिळत आहे. भाजपाने काँग्रेसवर महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करण्याचा आणि राजकारण आणखी खालच्या पातळीला नेल्याचा आरोप केला आहे.
यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपाला प्रत्युत्तर देत भाजपाचे लोकच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी करत असल्याचे म्हटले आहे.
राजस्थान येथील बोगस डॉक्टर व त्याला मदत करणारा अशा दोघांविरुद्ध कारवाई
वैद्यकीय शाखेची कोणतीही अधिकृत पदवी व व्यवसाय परवाना नसतांना राजस्थान येथील बोगस डॉक्टर व त्याला मदत करणारा अशा दोघांविरुद्ध आश्वी येथील पोलिस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा
“सत्ता कशी कबरीत गाढली जाऊ शकते हे २०० वर्षांनंतरही…” औरंगजेबाच्या कबरीबाबत रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) रोहित पवार यांनी भाजपा आणि त्यांच्याशी संबंधित संघटना लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटेल आहे. “इतिहासाचे रक्षण केले पाहिजे जेणेकरून इथून पुढे २०० वर्षांनंतरही लोकांना हे लक्षात येईल की सत्ता कशी एका कबरीत गाढता येऊ शकते”, असे रोहित पवार म्हणाले.
परभणीत शिवसेनेने ठोकले पाटबंधारे कार्यालयाला टाळे, पूर्ण क्षमतेने जायकवाडीच्या पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी
सध्या जायकवाडी प्रकल्पातून शेतीला पाणी सोडले जात असले तरी या पाण्याचा विसर्ग जास्त क्षमतेने होत नाही.
राजकीय छत्रछायेत वावरणाऱ्या कोरटकरला जामीन मिळणार? कोल्हापूर सत्र न्यायालयात…
आज सोमवारी कोल्हापूर न्यायालयात सकाळी सुनावणी सुरु झाली. कोरटकर याच्या वकिलांनी बाजू मांडली.
यवतमाळात आठवडाभरात दुसरा खून… दगडाने ठेचून युवकाची हत्या
आशीष हा रविवारी रात्री वाघापूर येथील आपल्या मित्राकडे गेला होता. यावेळी त्याच्यासोबत एका युवकाचा वाद झाला होता.
एमडी विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक; ॲपल कंपनीचा मोबाईलही जप्त
मुंब्रा शहरातील मित्तल मैदान येथे मेफोड्राॅन (एमडी) हे अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या मोहम्मद सैफ चष्मावाला (२५) याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या तस्कराकडून एक लाख ५७ हजार रुपयांचे एमडी हे अमली पदार्थ, ॲपल कंपनीचा मोबाईल, वाहन क्रमांक नसलेली दुचाकी, वजन काटा, बॅग असा एकूण दोन लाख १७ हजार रुपो किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सविस्तर वाचा…
गृहमंत्र्यांच्या शहरात चाललयं तरी काय ? उपराजधानीत सलग तिसऱ्या दिवशी हत्याकांड
गेल्या तीन महिन्यांत शहरात हत्याकांड आणि महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
हनुमान चालीसा प्रकरणी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या याचिकेवरील सुनावणी १७ एप्रिल पर्यंत तहकूब
हनुमान चालीसा पठण प्रकरणी माजी खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या याचिकेवरील सुनावणी १७ एप्रिल पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. या दोघांनी दोषमुक्तीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तांत्रिक कारणास्तव सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
मुंबई पोलीसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी राणा दांपत्याची हायकोर्टात याचिका दाखल केली असून आज यावर सुनावणी पार पडली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ या घराबाहेर हनुमान चालिसा पठणाचं आंदोलव पुकारल्याबद्दल नवनीत कौर राणा आणि त्यांचे पती रणी राणा यांच्याविरोधात दाखल गुन्हा झाला होता.
लातूर : भीषण आगीत गरम मसाला हॉटेलचे ५० लाखाचे नुकसान
लातूर: शहरातील खोरी गल्ली भागातील हॉटेल गरम मसालाच्या इमारतीत तळमजल्यात आग लागली आणि पाहता पाहता या हॉटेलचे पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाले मात्र कुठलीही जीवित हानी न होण्यात अग्निशामक दलाच्या जवानांनी केलेले शर्थीचे प्रयत्न कामी आले. सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास खोरी गल्ली भागातील हॉटेल गरम मसाला च्या इमारतीतून धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर शेजाऱ्यांनी हा आगीचा प्रकार आहे हे लक्षात घेऊन तातडीने अग्निशामक दलाला पाचारण केले. तिसऱ्या मजल्यावर घावटी कुटुंबीय राहत होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने तिसऱ्या मजल्यावरील कुटुंबीयांना बाहेर काढले, आग तळमजल्यात लागली होती पहिल्या मजल्यावरील खिडक्यांचे तावदाने फोडली व त्यानंतर धूर बाहेर आला.
अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली, तरीही सुमारे ५० हजार ६० लाख रुपयांची नुकसान झाले. मात्र कुठलीही जीवित हानी न होण्यात अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न कामी आले.
आता एसटीचे निवृत्त कर्मचारी करणार आंदोलन, ‘ईपीएफ- ९५’चे निवृत्ती वेतन…
आता एसटीतील निवृत्त कर्मचाऱ्यांकडून ‘ईपीएफ- ९५’ योजनेतील निवृत्ती वेतन वाढवण्यासाठी १८ मार्चला आंदोलन केले जाणार आहे.
राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा वाचवा, शिक्षकांचे धरणे आंदोलन
शिक्षण हक्क कायदा २००९ मधील कलम १९ व २५ नुसार इयत्ता पहिली ते आठवीसाठी विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक संख्या निश्चित केली आहे.
चंद्रपूर : घोडाझरी तलावात पाच तरूणांच्या मृत्यूला कंत्राटदार जबाबदार
विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून घोडाझरी तलावात मृत पावलेल्या पाच तरूणांचा मृत्यू कंत्राटदाराच्या चुकीमुळे झाल्याचे म्हटले आहे.
प्रेमविवाह ठरला अल्पकालीन, कुटुंबीय तरुणीस बळजबरीने घेऊन गेल्याचा आरोप
तालुक्यातील एका तरुणाची धार्मिक कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी गेलेल्या तरुणीसोबत ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर पुढे मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले.
छत्रपती शिवरायांच्या दर्शनाशिवाय कुठल्याच देवाचे दर्शन फळणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत
हनुमानाचे दर्शन घेतल्याशिवाय प्रभू श्रीरामांचा दर्शन पूर्ण होत नाही, तसेच छत्रपती शिवरायांच्या दर्शनाशिवाय कुठल्याच देवाचे दर्शन हे आपल्याला कधीच फळणार नाही, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीतील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
किडनीदात्याचे वैद्यकीय रजेसाठी मुख्यमंत्र्यांसमोर साकडे
आदिवासी पाड्यांवरील लोकांसाठी आणि जंगल, पर्यावरण संरक्षणासाठी काम करणारे कौस्तुभ पांढरीपांडे यांना गेल्या दीड वर्षांपासून किडनीचा आजार झाला.
अकोला : तहसीलदारापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी दिलेले जन्म-मृत्यू प्रमाणपत्र रद्द
बांगलादेशी मुस्लिमांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा करण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला.
महापारेषणमध्ये शेकडो जागा रिक्त; सरळसेवेद्वारे भरती, अनुभवाची गरज नाही
कंपनीने विविध २६० जागा भरण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज देण्याची प्रक्रिया सूरू झाली आहे.
बीडमधील शेतकऱ्याकडून कल्याणमध्ये दुर्गाडी भागात तेरा किलो गांजा जप्त
बीड मधील एका गावातील शेतकरी कल्याणमध्ये गांजाची तस्करी करताना साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नियंत्रणाखालील अंमली पदार्थ विरोध पथक आणि बाजारपेठ पोलिसांनी अटक केला आहे. सविस्तर वाचा…
वामन म्हात्रेंच्या अंगरक्षकाने चोरले सहकाऱ्याचेच अग्नीशस्त्र; पोलिसांकडून अटक, बदलापूर पश्चिमेत गुन्हा दाखल
उल्हासनगरात खेमानी परिसरात स्मशानभूमीच्या रस्त्यावर कडेला उभ्या असलेल्या एका टेम्पोत मृतदेह आढळल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. अचानक समोर आलेल्या या मृतदेहाने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
देवा भाऊंच्या उपस्थितीत पाटील – कथोरे ‘एकसाथ’ ; दोघांकडून एकमेकांच्या नावाचा उल्लेख, बाळ्यामामा म्हात्रेही उपस्थित
गेल्या काही वर्षात एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे भाजपचे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील सोमवारी मराडेपाडा येथील कार्यक्रमात एकाच मंचावर सोबत दिसले. सविस्तर वाचा…
बुलढाणा : दुर्दैवी… चिखलीत घराचा भाग कोसळला, ढिगाऱ्याखाली दबून बापलेकाचा मृत्यू
चिखली तालुक्यातील शेलोडी येथे ही भीषण घटनाक्रम घडला आहे. जुनाट घराचा धाबा ( छत ) कोसळून त्या ढिगाऱ्याखाली दबून बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
चंद्रपूर: “मरण आले तरी चालेल पण, हक्कासाठी शेवटपर्यंत लढणार”, निप्पान प्रकल्पग्रस्तांचा निर्धार
प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे १७ मार्चला भद्रनाग मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे.
शिवरायांचे १२ किल्ले लकवरच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे जे १२ किल्ले आहेत, त्या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळून देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनोस्कोमध्ये तसे नॉमिनेशन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीतील कार्यक्रमात बोलताना दिली.
मेळघाटात बहरलेय ग्रीष्मातील पुष्पवैभव…
निसर्गाने रखरखत्या उन्हातही लाल, जांभळ्या, पिवळ्या, गुलाबी अशा विविधरंगी फुलांचे आगळे-वेगळे सौंदर्य मेळघाटच्या ओंजळीत टाकले आहे.
फणसवळे येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याचा मृत्यु; फासकी लावणाऱ्यावर गुन्हा दाखल
रत्नागिरी तालुक्यातील फणसवळे गावात एका आंब्याच्या बागेत सात वर्षांचा नर जातीचा बिबट्या थेट फासकी तोडून एका ठिकाणी बसलेला ग्रामस्थांना दिसून आला. मात्र या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यापूर्वीच मृत्यू झाला. सविस्तर वाचा
अनिश शेंडगे यांचा शिवसेना (ठाकरे) गटात प्रवेश
समाजसेवक प्रकाश शेंडगे यांचे बंधू अनिश शेंडगे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना (ठाकरे) पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी करणाऱ्या काँग्रेस अध्यक्षांवर आमदार संजय गायकवाडांची टीका
“औरंगजेब क्रूर शासक होता, आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत”, असं विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. या विधानावरून आता महायुतीचे नेते आक्रमक झाले आहेत. शिंगे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी हर्षवर्धन सपकाळ हे निजामाची वैचारिक औलाद आहे, अशा शब्दांत टीका केली आहे.
औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची विश्व हिंदू परिषद आणि बगजरंग दलाची मागणी
छत्रपती संभाजीनगर जिल्हातील औरंगजेबाची कबर खोदून काढावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे. यासाठी राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. त्यामुळे खुलताबादेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषदेने कबर खोदण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तहसील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिले आहे. यावेळी विश्व हिंदू परिषद बगजरंग दल संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.