Maharashtra Latest News Live Updates : राज्यात आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. मान्सून दाखल झाल्याने राज्यातील अनेक ठिकाणी पावसाच्याही अपडेट्स येत आहेत. युक्रेन व रशियातील संघर्ष, शेअर बाजारातील चढउतार अशा विविध घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय पातळीवर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडींचा एकाच ठिकाणी आढावा…

Live Updates

Maharashtra Live News Today, 18 June 2022 : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, क्षणोक्षणीचे अपडेट्स जाणून घ्या एकाच क्लिकवर

19:47 (IST) 18 Jun 2022
मुंबईत सेना-भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने; आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात गोंधळ

मुंबई महानगर पालिकेची निवडणूक तोंडावर आली आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून विविध विकासकामाचं लोकार्पण करण्यात येत आहे. आज मुंबईतील बोरिवली येथील एका उड्डाणपुलाचं उद्घाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी संबंधित पुलाच्या श्रेयवादावरून उद्घाटनप्रसंगी शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याची घटना घडली आहे. सविस्तर बातमी

19:12 (IST) 18 Jun 2022
‘जिहे-कठापूर’ योजनेच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदींनाच निमंत्रित करावे – जयकुमार गोरे

‘जिहे-कठापूर’साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरघोस निधी दिल्याने या योजनेच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदींनाच का बोलवू नये? असा सवाल करत जिहे-कठापूर योजनेच्या उद्घाटनाला नरेंद्र मोदीच निमंत्रित असावेत, अशी भूमिका भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांनी मांडली.

वाचा सविस्तर बातमी

18:28 (IST) 18 Jun 2022
सातारा हादरलं! जिल्ह्यात तिहेरी हत्याकांडानं खळबळ, चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराकडून महिलेसह २ मुलांची हत्या

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील मौजे वेलंग या गावात चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने महिलेचा गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर महिलेच्या दोन लहान मुलांना वेलंग गावाजवळ असणाऱ्या विहिरीत ढकलून दिल्याचं समोर आलं. दत्ता नारायण नामदास असे संशयित आरोपीचे नाव आहे.

सविस्तर बातमी...

18:28 (IST) 18 Jun 2022
अग्निपथ योजनेवरून आग लागली असताना, अनेकांनी त्यात तेल ओतलं : जनरल राजेंद्र निंबोरकर

पुणे : अग्निपथ योजनेवरून देशभरात अनेक ठिकाणी तरुणांचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी या आक्रमक आंदोलनाला हिंसक वळणही लागलं. या पार्श्वभूमीवर 'उरी द सर्जिकल स्ट्राइक'चे जनक जनरल राजेंद्र निंबोरकर यांनी आंदोलक तरुणांना अग्निपथबद्दल चुकीच्या पद्धतीने माहिती देण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच त्या सर्व तरुणांना समजाऊन सांगण्याची गरज असल्याचं नमूद केलं. राजेंद्र निंबोरकर यांनी पुण्यातील भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

सविस्तर बातमी...

18:27 (IST) 18 Jun 2022
सावधान! बिष्णोई गँगकडून पुण्याच्या तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न; पुणे पोलिसांचा इशारा

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या बिष्णोई गँगमधील मोठे गुन्हेगार आपले वर्चस्व दाखवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे या गोष्टींना तरुणांनी बळी पडू नये, असे आवाहन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी केले आहे. त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

सविस्तर बातमी...

18:27 (IST) 18 Jun 2022
महिलेचा नग्न व्हिडीओ फॉरवर्ड करणं 'आयटी' कायद्यानुसार गुन्हाच : मुंबई उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालयाने ठाण्यातील एका महिलेचा नग्न व्हिडीओ इतरांना फॉरवर्ड करणाऱ्या आरोपीला जामीन देण्यास नकार दिलाय. तसेच महिलेचा नग्न व्हिडीओ फॉरवर्ड करणं माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ 'अ'नुसार गुन्हाच असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं.

सविस्तर बातमी...

18:22 (IST) 18 Jun 2022
पावसाचा जोर वाढणार!

आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह दक्षिण कोकणात सोमवार पासून अतीमुसळधार पावसाची शक्यता. मुंबई ठाण्यासह उत्तर कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता...

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1538098642208313345

18:01 (IST) 18 Jun 2022
“महाविकास आघाडीतून एकाची विकेट पडेल”, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान!

विधान परिषदेच्या निवडणुकीतही आमचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा दावा भारतीय जनता पार्टीकडून केला जात आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देखील अशाच प्रकारचा दावा केला जात आहे. येत्या २० तारखेला १० जागांसाठी ११ जणांमध्ये ही लढत होणार आहे. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणार हे निश्चित आहे. तो संबंधित उमेदवार नेमका कोण असेल याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. असं असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक विधान केलं आहे. सविस्तर बातमी

17:01 (IST) 18 Jun 2022
“लूट लूट लुटायचं हाच मविआचा किमान समान कार्यक्रम”; प्रकाश जावडेकरांचा हल्लाबोल

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि खासदार प्रकाश जावडेकर यांनी पनवेल येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या नेत्यांनी मोदींचे फोटो वापरून निवडून आले. आता त्यांनी मोदी विरोधकांशी हातमिळवणी केली. ही महाराष्ट्राच्या मतदारांशी केलेली गद्दारी आहे, अशी टीका जावडेकर यांनी केली. सविस्तर बातमी

16:18 (IST) 18 Jun 2022
“आई-वडिलांची सेवा करताना सोबत फोटोग्राफर अनिवार्य आहे का?”; मोदींच्या आईच्या वाढदिवशीच महाराष्ट्रातील नेत्याचा प्रश्न

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळीच गुजरातमध्ये त्यांची आई हिराबेन मोदी यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींनी आज वयाच्या १०० व्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्तच ही विशेष भेट त्यांनी घेतली. या भेटीचे मोदींनी काही फोटो सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केल्यानंतर आता याच फोटोशूटवरुन काँग्रेसच्या एका महाराष्ट्रातील नेत्याने खोच प्रश्न विचारत मोदींवर अप्रत्यक्ष टीका केलीय. येथे वाचा सविस्तर वृत्त.

https://twitter.com/LoksattaLive/status/1538108518196445184

16:16 (IST) 18 Jun 2022
दीड लाखांचं बक्षीस! काम काय? ३० दिवस घरामध्ये १०० झुरळं सांभाळायची

आपलाच प्रोडक्ट किती दमदार आहे हे दाखवण्यासाठी कंपन्या काहीही करु शकतात. असा एक प्रकार नुकताच अमेरिकेतील एका किटकटनाशकांची फवारणी करणाऱ्या म्हणजेच पेस्ट कंट्रोल करणाऱ्या कंपनीने केलाय. या कंपनीने ग्राहकांना त्यांच्या घरामध्ये काही झुरळं ठेवण्यासाठी तब्बल दीड लाख रुपये देण्याची विशेष ऑफर केलीय. येथे वाचा सविस्तर वृत्त.

https://twitter.com/LoksattaLive/status/1538110318014271488

16:04 (IST) 18 Jun 2022
Legislative Council Elections : चमत्कार कुणाबाबत घडतोय हे महाराष्ट्र पाहील - अजित पवार

राज्याची विधानपरिषद निवडणुकीस अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. २० जून रोजी मतदान आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारपरिषद घेत, महाविकास आघाडीच्या तयारीबाबत माहिती दिली. तसेच, चमत्कार कुणाबाबत घडतोय हे महाराष्ट्र पाहील, असं विधानही यावेळी त्यांनी केलं. शिवाय महाविकास आघाडीचे सर्व सहा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. वाचा सविस्तर बातमी...

16:02 (IST) 18 Jun 2022
'अग्निपथ योजनेतून तरुणांची टिंगलटवाळी', छगन भुजबळांची केंद्र सरकारवर टीका

केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केल्यापासून याचे देशभर पडसाद उमटत आहेत. हजारोंच्या संख्येनं तरुण एकत्र येत देशभरात आंदोलन करत आहेत. आंदोलनाचा हा वणवा आता वाढतच चालला असून अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी अग्निपथ योजनेवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. सविस्तर बातमी

13:55 (IST) 18 Jun 2022
सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची गृहमंत्र्यांची सूचना

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची सूचना, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांना केली आहे. आज(शनिवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना गृहमंत्री वळसेंनी याबाबत माहिती दिली. वाचा सविस्तर बातमी...

13:55 (IST) 18 Jun 2022
मुख्यमंत्र्यांच्या नावाने उघडले बनावट व्हॉटसॲप खाते

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याच्या नावाने बनावट व्हॉटसॲप खाते उघल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सय्यद एजाज (वय ४२) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे.

सविस्तर बातमी

13:12 (IST) 18 Jun 2022
मुंबई: गोरेगावात शाळेच्या बसची दुचाकीला धडक, महिलेचा मृत्यू

मुंबईतील गोरेगाव येथे बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. कुंजन जितेंद्र ठक्कर(३७) असे महिलेचं नाव आहे. याप्रकरणी शाळेच्या बसचालकास दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.गोरेगाव येथील लकी हॉटेलजवळील इराणीवाडी येथे ही घटना घडली. सविस्तर बातमी

12:58 (IST) 18 Jun 2022
अग्निपथ योजनेतून वेगळ्या विचारांचं सैन्य निर्माण करण्याचा प्रयत्न; जितेंद्र आव्हाडांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर देशभर याचे पडसाद उमटत असून अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार वेगळ्या विचाराचं सैन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. सविस्तर बातमी

12:44 (IST) 18 Jun 2022
सिमेंटचा गोळा पडून दीड वर्षीय मुलाचा मृत्यू; इमारतीच्या दुरूस्ती दरम्यान प्रकार उघड

ठाणे : माजीवडा येथील एका इमारतीच्या दुरूस्ती दरम्यान सिमेंटचा गोळा सुमारे दीड वर्षीय मुलाच्या डोक्यात पडला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. आठवडाभरापूर्वी हा प्रकार घडला असून शुक्रवारी या घटनेप्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात ठेकेदार रवि पाटील याच्याविरोधात निष्काळजीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथे वाचा सविस्तर वृत्त.

12:40 (IST) 18 Jun 2022
विश्लेषण : निवडणूक राष्ट्रपतीपदाची, पण चर्चा मात्र शरद पवारांच्या नकाराची! जाणून घ्या काय काय घडलं आत्तापर्यंत

एकीकडे जवळजवळ सर्वच विरोधी पक्ष पूर्ण ताकदीनिशी पवारांच्या पाठिशी उभं राहण्यास तयार असताना मुरलेले राजकारणी असणारे शरद पवार अशी संधी का हातची जाऊ देत आहेत यासंदर्भात अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत चर्चा सुरु झाल्यात. राजकीय वर्तुळाबरोबरच सर्वसामान्यांमध्येही या विषयाबद्दल चर्चा सुरु असल्याचं समाजमाध्यमांवर दिसत आहे. एकीकडे राष्ट्रपती निवडणुकीचा माहोल रंगलेला असताना दुसरीकडे शरद पवार स्वत:च उमेदवारी घेण्यास का तयार नाहीत यासंदर्भातील संभाव्य कारणांवर टाकलेली ही नजर... येथे वाचा सविस्तर.

12:26 (IST) 18 Jun 2022
देशात गेल्या २४ तासात १३ हजारापेक्षा अधिक नव्या करोनाबाधितांची नोंद

देशात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतचं जाताना दिसत आहे. करोना अटोक्यात येत असल्याचे वाटत असतानाच गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. परिणाणी देशात करोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सविस्तर बातमी

11:51 (IST) 18 Jun 2022
“…हा राष्ट्रीय सुरक्षा दलाचा अपमान”, अग्निपथ योजनेवरून संजय राऊतांचं केंद्र सरकारवर टीकास्त्र

केंद्र सरकारने अलीकडेच भारतीय सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार ४ वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारने या योजनेची घोषणा केल्यानंतर देशभर याचे पडसाद उमटत आहे. या योजनेवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. सैन्य दलात कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती करणं हा राष्ट्रीय सुरक्षा दलाचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सविस्तर बातमी

11:37 (IST) 18 Jun 2022
"मी राष्ट्रवादीसोबत, महाविकास आघाडीला मतदान करणार"; मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांची स्पष्टोक्ती

नागपूर: "काँग्रेसकडून संपर्क झालेला नाही. मात्र, मी राष्ट्रवादी काँग्रेससोबत असून विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीलाच मतदान करणार आहे," असे मत मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केले. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.

सविस्तर बातमी...

11:36 (IST) 18 Jun 2022
अष्टगंध लावून पै-पै जमा करणाऱ्या चिमुकलीचा प्रामाणिकपणा, सापडलेलं सोन्याचं मंगळसूत्र दिलं पोलिसांकडे

आळंदीत अष्टगंध लावून पै-पै जमा करणाऱ्या एका चिमुकलीचा प्रामाणिकपणा पाहायला मिळाला आहे. या मुलीने तिला आळंदीत सोन्याचं मंगळसूत्र सापडल्यानंतर कोणत्याही लोभाला बळी न पडता ते मंगळसूत्र प्रामाणिकपणे पोलिसांना दिलं. या मुलींचं नाव पूजा भामरे असं आहे. ती दररोज सकाळपासूनच आळंदीत एक-एक रुपयांसाठी माऊलींच्या मुख्य मंदिर परिसरात भाविकांना अष्टगंध लावण्याचा आग्रह करते. कोणी गंध लावतं, तर कोणी नाही. बरेच गंध लावून घेतात, पण पैसे देत नाहीत. असं असताना देखील पूजाने हजारो रुपयांचं सोन्याचं मंगळसूत्र पोलिसांना सुपूर्द केलं. त्यामुळे तिच्या प्रामाणिकपणाचं कौतुक होत आहे. तिच्या पाठीवर आळंदी पोलिसांनी कौतुकाची थाप दिली आहे. 

सविस्तर बातमी...

11:35 (IST) 18 Jun 2022
नागपुरात मेट्रोचा प्रवास सर्वात स्वस्त; शहर बस, ऑटोरिक्षाच्या निम्मे तिकीट दर

नागपूर : इंधन दरवाढ झाल्याने शहर बसच्या (आपली बस) प्रवास भाड्यात १६ जूनपासून १७ टक्क्यांची वाढ करण्यात आली. किमान भाडे १२ रुपये करण्यात आले. त्याचबरोबर ऑटोरिक्षा चालकांनीही एक किलोमीटरसाठी १८ रुपये दर निश्चत केले आहे. या तुलनेत मेट्रोचे दर सर्वात कमी म्हणजे एका टप्प्यासाठी फक्त पाच रुपये आहेत.

सविस्तर बातमी...

Maharashtra News Live

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, क्षणोक्षणीचे अपडेट्स जाणून घ्या एकाच क्लिकवर

Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट

Story img Loader