Maharashtra Politics : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गाजत आहे. यावरून विरोधी पक्ष सातत्याने सरकारला धारेवर धरत असताना सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनीही या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार बजरंग सोनावणे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर यांनी हे प्रकरण लावून धरले असून भाजपाचे आमदा सुरेश धसही या प्रकरणी आक्रमक झाले आहे. दरम्यान या संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे महायुती सरकारने मंत्री धनंजय मुंडे यांच्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीडचे पालकमंत्रीपद सोपवले आहे. अशात पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आज पवार प्रथमच बीड दौऱ्यावर आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले असून, आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. आमदार सुरेश धस यांनी नुकतेच मराठा आरक्षणप्रश्नी जरांगे पाटील यांची भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. येत्या काही काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. अशात पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार भरवल्यामुळे शिवसेना (एकनाथ शिंदे) नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यासह विविध घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊया.
रा. स्व. संघाचे लातूरात रविवारी विराट शाखा दर्शन
लातूर : रा.स्व.संघाच्या शताब्दी वर्षात रविवारी लातूर शहरात त्यांच्या उपस्थितीत ‘विराट शाखा दर्शन’ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास दत्तात्रय होसबळे हे उपस्थित राहणार आहेत. लातूर शहरातील ६१ वस्तीतील शाखा या रविवारी राजस्थान विद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी पाच ते सात या एकाच वेळात लागणार आहेत.
वसई : डास निर्मूलनासाठी आता रसायनाचा वापर, डासांचा प्रभाव असलेली ९९ ठिकाणी निश्चित
वसई : वसई विरार शहरात डासांचा उपद्रव रोखण्यासाठी वसई विरार महापालिकेने विशेष मोहीम सुरू केली आहे. यासाठी डासांचा प्रभाव असलेली ९९ ठिकाणी शोधून काढली असून तेथे विशिष्ट रसायनाचा वापर करून डासांचा समूळ नायनाट केला जाणार आहे. औषध फवारणी देखील आता दोन वेळेस करण्यात येणार आहे.
डोंबिवलीत देवीचापाडा येथील देशी, विदेशी मद्याचा अड्डा उदध्वस्त
डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील हनुमान मंदिराजवळ काही वर्षापासून घरगुती पध्दतीने सुरू असलेला देशी, विदेशी मद्याचा अड्डा पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून विष्णुनगर पोलिसांनी बुधवारी उदध्वस्त केला. सविस्तर वाचा
“दुसऱ्या पक्षाचे सरकार असते तर तमाशे केले असते,” महाकुंभमधील चेंगराचेंगरीवर राज ठाकरेंची टीका
विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज मुंबईत पहिल्यांदा मेळावा झाला. यावेळी राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यामध्ये महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीवर ते म्हणाले की, “कुंभ मध्ये किती लोकांचा मृत्यू झाला त्याचा आकडा समोर येत नाही. पण दुसऱ्या पक्षाचे सरकार असते तर चॅनलवाल्यांनी तमाशे केले असते.
MH BSc Nursing CET 2025: बीएस्सी नर्सिंगसह परिचारिका संवर्गातील अभ्यासक्रमांची नोंदणी सुरू
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता परिचारिका संवर्गातील प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. सविस्तर वाचा
Pune Mission 15 : ‘मिशन १५’ च्या रस्त्यांवर खोदाईला बंदी, काय आहे कारण ?
Pune Municipal Corporation Mission 15 : शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता.
माघी गणेशोत्सवासाठी पीओपी गणेशमूर्तींची विक्री आणि विसर्जन नको
मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्ती तयार करणे, विक्री करणे आणि विसर्जन करण्यास केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुधारित मार्गदर्शक तत्त्वांननुसार बंदी घातली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही ही मार्गदर्शक त्तत्वे योग्य ठरवली आहेत.
पिंपरी : अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवरील कारवाईला विरोध; कुदळवाडीतील व्यावसायिकांकडून रस्ता बंद
चिखली, कुदळवाडी परिसरात मोठ्या संख्येने अनधिकृत भंगार दुकाने आणि गोदामांसह इतर व्यावसायिक आस्थापना आहेत.
कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये परप्रांतीय कामगाराची हत्या
सांगली : जेवण बेचव बनविल्याच्या कारणावरून एका परप्रांतीय कामगाराची हत्या करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी रात्री कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये घडला. संशयितांनी हत्या केल्यानंतर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करत गुन्ह्याची कबुलीही दिली. औद्योगिक वसाहतीमध्ये एका खासगी कंपनीत काम करत असलेल्या तीन मजूर कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या खोलीत वास्तव्य करत होते
पुणे : पुरवठ्या आधीच समाविष्ट गावांच्या पाणीपट्टीत वाढ ?
अनेक गावांना टँकरने पाणी द्यावे लागते. काही भागात अशुद्ध पाणी मिळते, या गावांकडे महापालिका सतत दुर्लक्ष करत असल्याची ओरड या भागातील नागरिकांकडून केली जाते.
फुरसुंगीतील पाॅवर हाऊसजवळ भरधाव मालवाहून कंटेनरने मोटारीला धडक दिली.
अपंग, गर्भवती, नवदाम्पत्याला आता विठ्ठलाचे तात्काळ दर्शन !
पंढरपूर : अंध, अपंग, अतिशय वृद्ध, आजारी, गर्भवती तसेच नवदाम्पत्यांना आता सावळ्या विठुरायाचे झटपट दर्शन मिळणार आहे. यासाठी त्यांनी येथील संत तुकाराम भवन येथे संपर्क साधावा, असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे.
सायबर गुन्हेगारांच्या ‘जाळ्यात’ उच्च शिक्षितच; गेल्या वर्षभरात किती तक्रारी?
पिंपरी : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास, तर कधी ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची ऑनलाइन लूटमार करण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मागील वर्षभरात पिंपरी-चिंचवडमधील २० हजार ६८८ जणांनी राष्ट्रीय सायबर संकेतस्थळावर तक्रारी केल्या आहेत.
वाटमारी करणारी टोळी जेरबंद; दहा ट्रॅक्टरसह तीन ट्रेलर हस्तगत
सोलापूर : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांची वाटमारी करून ट्रॅक्टर ट्रॉलीसह अन्य सामानासह एका टोळीचा शोध सोलापूर ग्रामीण पोलिसांनी लावला आहे. एका चौकडीला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून लुटून दिलेले दहा ट्रॅक्टर, एक छकडा ट्रेलर आणि दोन मोठे ट्रेलर असा सुमारे ५५ लाख ६५ हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
डहाणूत जमीन घोटाळा, भाजपच्या पदाधिका-याकडून वर्ग दोनच्या जमिनीवर साठेकरार व कुलमुखत्यार पत्राची बेकायदा नोंदणी
पालघर : डहाणू तालुक्यातील आसनगाव या ठिकाणी असणाऱ्या एका सामायिक जमिनीचा भाग भाजपच्या स्थानीय पदाधिकाºयाने विकत घेण्याच्या उद्देशाने केलेला साठेकरार व कुलमुखत्यार पत्राची नोंदणी डहाणूच्या उपनिबंधक यांनी केल्याने वाद निर्माण झाला आहे.
सांगलीत ‘जीबीएस’चे सहा रुग्ण आढळले, आरोग्य यंत्रणा सतर्क, उपचार सुरू
सांगली : सांगली शहरात एक तर ग्रामीण भागात पाच असे सहा गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून सांगली शहरात रुग्ण आढळलेल्या चिंतामणीनगरामध्ये बुधवारअखेर ६०० घरांचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व्हेक्षण करत जलतपासणीही केली.
शाळांजवळ तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या टपऱ्या जमीनदोस्त, हडपसर भागात पोलिसांची कारवाई
पुणे : शाळा, महाविद्यालयांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. हडपसर आणि काळेपडळ परिसरातील आठ टपऱ्या जमीनदोस्त करण्यात आल्या. पोलिसांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या सहकार्याने ही कारवाई केली.शाळा आणि महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
‘आयटी’ कंपनीतील महिलांच्या सुरक्षेसाठी नियमावली, नियमावलीचे पालन करणे बंधनकारक; पोलिसांकडून वेळोवेळी तपासणी
पुणे : विमाननगर भागातील एका बहुराष्ट्रीय ‘बीपीओ’च्या आवारात झालेल्या तरुणीच्या खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील बीपीओ, तसेच आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी नियमावली (एसओपी) तयार केली आहे. बीपीओ आणि आयटी कंपन्यांच्या प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे.
इथेनॉल खरेदीच्या दरवाढीचे गाजर जाणून घ्या, केंद्र सरकारच्या निर्णयावर साखर उद्योग नाराज का
मुंबई : केंद्र सरकारने सी हेवी मोलॅसिसपासून (मळी) तयार होणाऱ्या इथेनॉलचे खरेदी दर प्रति लिटर ५६.५८ रुपयांवरून ५७.९७ रुपये केला आहे. उसाचा रस आणि बी हेवी मोलॅसिसपासून उत्पादीत होणाऱ्या इथेनॉलचे दर जेसे – थे ठेवले आहेत. सी हेवी मोलॅसिसपासून फार इथेनॉल तयार होत नसल्यामुळे आणि फक्त १.३९ रुपये इतकी किरकोळ दरवाढ झाल्यामुळे साखर कारखाने आणि शेतकऱ्यांना काहीही फायदा होणार नाही, असे मत साखर उद्योगातून व्यक्त केले जात आहे.
राज्याच्या आर्थिक स्थितीची श्वेतपत्रिका काढा जाणून घ्या, सुप्रिया सुळे यांनी अशी मागणी का केली
मुंबई : राज्यात उद्योगस्नेही वातावरण राहिले नसून राज्याची आर्थिक स्थिती खालावल्याचे निती आयोगाच्या अहवालात म्हटले आहे. राज्याची वित्तीय तूटही वाढली आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत जनतेपुढे वस्तुस्थिती येण्यासाठी सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी केली.
लोकजागर : फसलेले ‘चिंतन’!
नागपूर : राहुल गांधींकडे पक्षाची सूत्रे आल्यापासून भाजप व संघपरिवाराला पर्याय उभा करण्यासाठी कार्यकर्ते घडवण्याची सुरुवात काँग्रेस पक्षात झाली. त्याला अनुसरून चिंतन शिबिरे सुरू करण्यात आली. त्यातली बहुतेक पार पडतात सेवाग्रामला. तर अलीकडे पार पडलेल्या एकात नागपूर जिल्ह्यातील एक पराभूत उमेदवार सहभागी झालेले. सलग पाच दिवस चालणाऱ्या या शिबिरात अतिशय मन लावून सहभागी होणे हा नियम.
कल्याणमधील खडकपाडा येथे तृतीय पंथीयांकडून महिलेला मारहाण
कल्याण : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागात तीन तृतीय पंथीय आणि त्यांच्या सहकाऱ्याने रात्रीच्या वेळेत एका महिलेचा मार्ग रोखून त्यांच्याकडे २० हजार रूपयांच्या रकमेची मागणी केली. तसेच, अश्लिल भाषेत शिवीगाळ करून तृतीय पंथीयांनी संगनमत करून महिलेला आणि तिच्या लहान मुलीला मारहाण केली.
“लाडक्या बहिणींना दिलेले पैसे आता परत मागण्यात अर्थ नाही”, छगन भुजबळ यांचे मोठे विधान
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठे भाष्य केले आहे. ते म्हणाले, “लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना अनेक अटी व नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता पैसे परत मागण्यात अर्थ नाही, ते करू नये. तसेच ज्यांना गरज नाही त्यांनी या योजनेचा लाभ स्वीकारू नये”
उल्हासनगर पालिका इमारत अतिधोकादायक, मुख्यालय दुसऱ्या जागेत स्थलांतरित करण्याचे आदेश
ठाणे : उल्हासनगर महापालिका मुख्यालयाची इमारतीचे बांधकाम अतिधोकादायक झाली असल्याची बाब बुधवारी झालेल्या ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उघडकीस आली. हि इमारत तातडीने दुसऱ्या जागेत स्थलांतरित करण्याचे आदेश देत नव्या इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक असलेला निधी नगरविकास विभागामार्फत देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिले.
सविस्तर वाचा…
विधी सीईटी परीक्षेचे स्वरूप बदलले, क्लॅटच्या धर्तीवर होणार परीक्षा
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या विधि अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा यावर्षीपासून सामाईक विधि प्रवेश परीक्षेच्या (क्लॅट) धर्तीवर घेण्यात येणार आहे. त्यामुळे विधि अभ्यासक्रमांची परीक्षा १५० ऐवजी १२० गुणांची घेण्यात येणार आहे. सीईटी परीक्षा दोन तासांची असणार आहे.
ठाण्याचा तीन हात नाका टपऱ्यांनी कोंडला
ठाणे : एकाबाजूला सुरू असलेली मेट्रो प्रकल्पाची कामे आणि दुसऱ्या बाजूला वेस ओलांडून रस्त्यावर उभी ठाकलेल्या बेकायदा टपऱ्या यामुळे ठाणे शहराचा केंद्रबिंदू असलेला तीन हात नाका आणि इटरर्निटी मॉलचा परिसर सध्या अभूतपूर्व अशा कोंडीने ग्रासला आहे.
वरळीत तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण, तीन तासात अपहरणकर्त्या महिलेला अटक
मुंबई : वरळी येथे चॉकलेट देऊन तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याचे उघडकीस आले असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी आरोपी महिलेच्या शोधासाठी पथके सज्ज केली. पोलिसांनी अवघ्या तीन तासात आरोपी महिलेला अटक केली.
“वाल्मिक कराडला प्यादं म्हणून वापरले जाईल”, अजित पवार आणि धनंजय मुंडेंवर संजय राऊतांची टीका
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. राऊत म्हणाले, “अजित पवार तटस्थ वृत्तीचे नेते नाहीत. ते निष्पक्षपणे काम करत नाहीत. धनंजय मुंडेही काही त्या विचाारंचे किंवा न्यायबुद्धीचे नेते नाहीत. बीडमध्ये जे सुरू आहे, ते एकमेकांचे हात धरून सुरू आहे. अजित पवारांनी बीडचं प्रकरण एका तटस्थ माणसाकडे द्यायला हवं होतं. पण पूर्ण महाराष्ट्रात तटस्थ असा एकही नेता नाही. बीडमध्ये संतोष देशमुख यांचे आरोपी बाहेर आहेत. वाल्मिक कराड याला लवकरच बाहेर काढलं जाईल, तेव्हा सामाजिक कार्यकर्ते जे आज आवाज उठवत आहेत, त्यांनाही शांत केलं जाईल. मराठा वि. ओबीसी अशा प्रकारे प्यादं म्हणून वाल्मिकला वापरलं जाईल. सामाजिक समतोल बिघडवणारं राजकारण केलं जातंय. खून बलात्काराचा आरोप असणाऱ्यांना वापरलं जातंय, असं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे.”