Marathi News LIVE Updates : महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात राज्यातील विविध मुद्यांवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याचं प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचीही मागणी विरोधकांकडून केली जात आहे. यातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केलेल्या एका विधानावरून त्यांच्यावर टीका होत आहे. “छत्रपती संभाजी महाराजांवर कसे अत्याचार झाले, तरी त्यांनी धर्म बदलला नाही. तसेच माझ्यावरही तुरुंगात अत्याचार झाले, पण मी पक्ष बदलला नाही”, असं विधान अनिल परब यांनी केलं. त्यांच्या या विधानावरून आज सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील विविध राजकीय व इतर घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra News Update highlights , 07 March 2025 : राज्यातील राजकीय व इतर घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांना उच्च न्यायालयाची नोटीस, निव़डणुकीत…
नागपूर : ब्रम्हपुरीचे काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली. निवडणुकीसाठी दाखल शपथपत्रावर आक्षेप नोंदवत त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
नितीन गडकरी म्हणाले ‘घाई असेल तर थांबूच नका’…
वर्धा: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणजे चालता बोलता ज्ञानकोष, असे त्यांच्या बाबतीत म्हटले जाते. त्यांची प्रत्येक विषयावर ठाम मते असतात. आता त्यांनी गायीबाबत नवाच दृष्टिकोन सांगितला. येथील पशू व पर्यावरणप्रेमी तसेच करुणाश्रमचे संचालक आशीष गोस्वामी हे आज दुपारी वेळ घेऊन गडकरी यांच्या नागपूर स्थित घरी पोहचले.
मुंबईतली कोणती मेट्रो कधी सुरू होणार? देवेंद्र फडणवीसांनी यादीच सांगितली; विधानसभेत दिली माहिती!
मुंबईतील वाहतूक कोंडीवरच्या उपायांचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मेट्रो मार्गिकांकडे पाहिलं जातं. यात मेट्रोच्या काही मार्गिकांचं काम पूर्ण होऊन त्या मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या असून काही मार्गिकांचं काम चालू आहे. काही मेट्रो मार्गिकांचं काम अद्याप प्राथमिक स्तरावरच असून त्यांची कामं पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत नेमके मेट्रो मार्गिकांचे किती, कोणते प्रकल्प चालू असून ते नेमके कधी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत? याबाबत चर्चा पाहायला मिळत आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना माहिती दिली.
राज्यातील ‘ट्रिपल सीट’ सरकार औरंगजेबाच्या विचाराचे; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
अहिल्यानगरः राज्यातील ‘ट्रिपल सीट’ सरकार हे जुलमी सरकार असून ते औरंगजेबाच्या विचाराने चालत आहे. आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसारखे लढायचे आहे, या माध्यमातून पुन्हा काँग्रेसचे गत वैभव निर्माण करून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाभोवती कचऱ्याचा वेढा, दुर्गंधीने नागरिक हैराण
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाची इमारत पाच वर्षापूर्वी धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली आहे. या इमारतीमधील कार्यालये डोंबिवलीतील इतर भागात सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे कर्मचारीमुक्त असलेल्या या इमारतीची आता देखभाल होत नसल्याने या इमारतीच्या पाठीमागील अडगळींच्या जागेत कचऱ्याचे ढीग साचले आहेत.
भिवंडीच्या कोंडी संदर्भात महापालिका आयुक्त ॲक्शन मोडवर, कोंडीवरील उपाय योजनेसाठी होणार कृती समिती गठीत
भिवंडी शहरातील वाहतुक कोंडीच्या विळख्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. नव नियुक्त महापालिका आयुक्त अनमोल सागर यांच्याकडेही नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अनमोल सागर यांनी महापालिका अधिकारी आणि ठाणे पोलिसांसोबत बैठक आयोजित करुन वाहतुक कोंडी आणि इतर वाहतुक समस्येविषयी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
कायम करा अथवा इच्छामरणची परवानगी द्या…,’या’ कर्मचाऱ्यांचे ‘काम बंद’
बुलढाणा : राज्याच्या शैक्षणिक प्रगतीत महत्वाचा वाटा असतानाही राज्य शासन आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षाचे बळी ठरलेल्या समग्र शिक्षा अभियान मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरु केले आहे.विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई स्थित आझाद मैदान येथे राज्यातील समग्र कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिला आहे.
२९४ कोटी रुपयांसाठी धावाधाव; वाचा नेमकं कारण काय?
अकोला : एरवी थंडगार एसी कॅबिनमध्ये बसून आपले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा जीव आता टांगणीला लागला. त्याचे कारणही तसेच. प्रश्न चक्क २९४ कोटी रुपयांचा. त्याच्या वसुलीसाठी धावाधाव सुरू असून वरिष्ठ अधिकारी एसी कॅबिन सोडून चक्क ग्राहकांच्या दारात पोहोचले आहेत.
खड्ड्यांनी घेतला चिमुकलीचा जीव; बायपासवर नागरिकांचे धरणे
भंडारा : सॅनफ्लॅग कंपनी गेट ते पाचगाव फाटा बायपास पुलावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा तोल सुटला व समोरून येणाऱ्या ट्रकला धडक बसली. यात एकलारी येथील ११ वर्षाच्या मुलीचा जीव गेला. वडील व तिचा वर्गमित्र गंभीर जखमी झाले.
डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाटावर महिलांना उन्हाचे चटके, दीड वर्षापासून फलाटावर छत नसल्याने प्रवाशांची कुचंबणा
डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर सीएसएमटीच्या दिशेकडील भागात फलाटावर गेल्या दीड वर्षापासून छत नाही. या छत नसलेल्या भागात महिला प्रवाशांचा डबा येतो. त्यामुळे उन्हाचे चटके सहन करत आता महिलांना लोकल पकडावी लागते. आता उन्हाचा चटका वाढू लागला आहे.
“औरंगजेबाचा उदो-उदो करणं हा देशद्रोहच”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान
“औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं विधान अबू आजमींनी केलं. औरंगजेबाची कबर येथे आहे, त्याला दिल्लीत पोहोचता आलं नाही. महाराष्ट्रातच जीव सोडावा लागला. छत्रपती संभाजी महाराज बलिदान देऊन देखील जिंकले आणि औरंगजेब जिंकून देखील हारला. औरंगजेबाचा उदो-उदो करणं हा देशद्रोहच आहे. त्यामुळे मीच मागणी केली होती की अबू आजमींचं निलंबन करण्यात यावं आणि त्यानंतर निलंबन झालं”, असं सभागृहात बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
पतंजलीचा नागपुरात आशियातील मेगा फूड पार्क, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसह १५ हजार बेरोजगारांसाठी मोठी घोषणा
नागपूर: उपराजधानीमधील मल्टी-मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब आणि विमानतळ परिसरात असलेले पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्क येत्या ९ मार्चपासून उत्पादनासाठी सज्ज होणार आहे. या मेगा फूड पार्कची पायाभरणी सप्टेंबर २०१६ मध्ये झाली होती. आता हे पार्क फळे आणि भाजीपाला प्रक्रियेचे एक प्रमुख केंद्र बनणार आहे.
देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादीचा पदाधिकारी तडीपार
अकोला: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये घटक पक्षांनाच एका मागून एक धक्के देण्याचे प्रकार सुरू आहेत. आता मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणखी एक मोठा धक्का दिला. देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याने राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाच्या अकोट शहर अध्यक्षाला थेट तडीपार केले.
वाद्गग्रस्त वक्तव्यांवरून ठाकरे गटाचे कल्याणमध्ये आंदोलन
कल्याण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वाद्गग्रस्त वक्तव्य करणारे राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर आणि मुंबईत मराठी भाषेसंदर्भात वाद्गग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ भैय्याजी जोशी यांच्या विरोधात शुक्रवारी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण विभागातील कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन केले.
प्रशासक काळात बदलापुरात मोठा भ्रष्टाचार; आमदार किसन कथोरेंचा आरोप, चौकशीची मागणी
बदलापूर : कुळगाव बदलापूर नगरपालिकेत गेल्या २०२० पासून प्रशासकीय राजवट आहे. या काळात मुख्याधिकारी आणि प्रशासक पद एकाच व्यक्तीकडे असून या कालावधीत निधीचे १० -१० लाखांचे तुकडे करून अनेक कामे केली गेली आहेत. यात कोणताही दर्जा तपासला गेला नाही. त्यामुळे अशा कामांची चौकशी करावी, अशी मागणी करत मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी एकच खळबळ उडवून दिली.
Udayanraje Bhosale: औरंगजेबाची कबर उखडून टाकावी; उदयनराजे
सातारा : औरंगजेब हा धर्मांध, क्रूर शासक आणि या देशाचा लुटारू होता. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या, छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करणाऱ्या या औरंगजेबाच्या कबरीचे या महाराष्ट्रात उदात्तीकरण, दैवतीकरण सुरू आहे. त्याचे इथे उरूस भरवले जात आहेत हे आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.
औरंजेबाची कबर काढावी अशी मागणी अनेकांनी केली आहे. यावर तुमचं मत काय? असा प्रश्न खासदार उदयनराजे भोसले यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. यावर बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं की, “औरंजेबाची कबर ठेवून काय उपयोग? औरंजेब लुटायलाच आला होता. चोर होता तो, मग त्याचं उदात्तीकरण काय करायचं? कशासाठी? आणि औरंगजेबाच्या समाधीचं दर्शन घेतात त्यांना सांगा घ्या, ते त्याचे वंशज आहेत का? मग त्यांनी औरंगजेबाची समाधी घरी घेऊन जावी आणि घरी ठेवावी ना. अन्यथा औरंगजेब जिकडून आला होता तिकडे तुम्हीही हा देश सोडून जावा. कशाला येथे थांबता. आता कोणीतरी म्हणेल की हिंदू-मुस्लिम, येथे हिंदू-मुस्लिम असा विषयचं नाही. औरंजेबाची कबर खोदून टाका ना, असं किती वेळ लागतो? एक जेसीबी आणा आणि कबर जेसीबीने उकरून काढा”, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.
रूग्णवाहिकेला उशीर, शल्य चिकित्सक निलंबीत
उल्हासनगर : सरकारची १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका वेळेवर न आल्याने उल्हासनगरात एका ३० वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अर्थसंकल्पीय अधिवनेशनात तारांकीत प्रश्न उपस्थित केल्यानंतर अखेर उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
नभांगणी ज्ञानयज्ञ सप्ताह! ग्रह, तारे, अवकाश संशोधन केंद्राची पर्वणी
अकोला: उन्हाळ्यात समाजमन सुसंस्कारीत होण्यासाठी कथा, पुराणे, भजन-कीर्तन प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. अध्यात्माला विज्ञानाची जोड मिळाली तर भविष्य अधिक उज्ज्वल असेल. अवकाशात देखील एक ज्ञानयज्ञ ९ ते १५ मार्च या कालावधीत होत आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली.
सोलापूर: कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने गंडविले
सोलापूर : एक कोटी रुपयाचे बँक कर्ज मंजूर करून देतो आणि त्यावर ४० टक्के अनुदानही मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका व्यापाऱ्याला आर्थिक गंडा घालण्याचा प्रकार सोलापुरात घडला. पोलिसांनी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.फरीद जाफर शेख (वय ५२, रा. सरवदे नगर, मुळेगाव रोड, सोलापूर) यांनी याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा फसवणुकीचा प्रकार ऑगस्ट २०२३ पासून आजतागायत चालत आल्याचे दिसून आले.
आरोपींनी आपण अर्थविषयक संस्थांशी निगडित आहोत, बँकातून कर्ज मिळवून देणे, शासकीय योजनेतून अनुदान मिळवून देणे इत्यादी कामांचा आपणांस अनुभव असल्याची थाप मारून फरीद शेख यांचा विश्वास संपादन केला. एक कोटीचे कर्ज ४० टक्के अनुदानासह मिळवून देण्याच्या आमिषाला बळी पडत शेख यांनी प्रक्रिया शुल्क म्हणून ८३ हजार रुपये दिले. परंतु, नंतर कोणतेही कर्ज मंजूर करून न देता त्यांची फसवणूक करण्यात आली. नंतर प्रक्रिया शुल्कपोटी घेतलेली रक्कम परत मागितली असता खोटे धनादेश देऊन त्यांचा विश्वासघात करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
‘काँग्रेसने नाना पटोलेंचं नाव येथेही कापलं का?, पण ते आमच्या विदर्भाचा…’, फडणवीसांची सभागृहात टोलेबाजी
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. सध्या सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा झाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील राज्यपालांच्या अभिभाषणावर सभागृहात बोलले आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच आम्ही छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणाऱ्यांमधले नाहीत, असं म्हणत त्यांनी शिवसेना ठाकरे गटावरही खोचक टीका केली. तसेच नाना पटोले यांच्यावरही भाष्य करत मिश्किल शब्दात टीका केली. ‘काँग्रेसने नाना पटोलेंचं नाव येथेही कापलं का? काँग्रेस नाना पटोलेंचा आवाज दाबत आहे का?’, अशी टोलेबाजी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
कल्याणमध्ये सापाड गावात गॅस एजन्सीच्या वाहनावरील चालकाला मारहाण
कल्याण : घराच्या पाठीमागील बाजूस लाकडे का ठेवली आहेत, असे प्रश्न करून कल्याण जवळील सापाड गावात एका स्थानिकाने एचपी गॅस एजन्सीच्या वाहनावर चालक म्हणून काम करणाऱ्या चालकाला बुधवारी रात्री मारहाण केली. मारहाणीत पायाला दुखापत झाल्याने चालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाला भगदाड; माजी मंत्री, माजी आमदारांसह ज्येष्ठ शिवसैनिक शिंदे गटात
सोलापूर : कोकणानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात अचानकपणे मोठी घडामोड होऊन भगदाड पडले असून, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी आमदार रतिकांत पाटील, जिल्हाप्रमुख अमर पाटील, माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव यांच्यासह इतर मोठ्या शिवसैनिकांनी मातोश्रीवरील निष्ठेला तिलांजली देत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला आहे.
ठाण्यात उद्या महिलांसाठी ‘अहिल्या दौड’अहिल्यादेवी होळकरांच्या वंशजांचा पुढाकार
ठाणे : यंदाचे वर्ष हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती वर्ष असल्यामुळे ठाणे शहरात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे शहरात महिलांसाठी प्रथमच ‘अहिल्या दौड’चे आयोजन करण्यात आले आहे.
काँग्रेस जिल्हाध्यक्षांना शासनाची नोटीस, असा काय केला गुन्हा ?
वर्धा : काँग्रेसचे दिवस बरे नाही, असे आता म्हटल्या जाते. पक्षाचे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पानिपत झाले. तेव्हापासून सगळे कसे शांत शांत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर हे अनेक वर्षांपासून या पदाची जबाबदारी सांभाळत आहे. एक भला माणूस म्हणून त्यांची काँग्रेसमध्येच नव्हे तर सर्वपक्षीय ओळख आहे.
“आम्ही छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणाऱ्यांमधले नाहीत”, देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. सध्या सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा झाली. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील राज्यपालांच्या अभिभाषणावर सभागृहात बोलले आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच आम्ही छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणाऱ्यांमधले नाहीत, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाला टोला लगावला. काही महिन्यांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्या असं म्हटलं होतं.
‘काँग्रेसने नाना पटोलेंचं नाव येथेही कापलं का?, पण ते आमच्या विदर्भाचा…’, फडणवीसांची सभागृहात टोलेबाजी
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. सध्या सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा झाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील राज्यपालांच्या अभिभाषणावर सभागृहात बोलले आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच आम्ही छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणाऱ्यांमधले नाहीत, असं म्हणत त्यांनी शिवसेना ठाकरे गटावरही खोचक टीका केली. तसेच नाना पटोले यांच्यावरही भाष्य करत मिश्किल शब्दात टीका केली. ‘काँग्रेसने नाना पटोलेंचं नाव येथेही कापलं का? काँग्रेस नाना पटोलेंचा आवाज दाबत आहे का?’, अशी टोलेबाजी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुंबईत कडोंमपा रुग्णालयातून रूग्ण पाठविताना सोबत डाॅक्टर, मुंबईतील रुग्णालयांच्या कल्याण डोंबिवली पालिकेला सूचना
कल्याण रुग्ण पाठवत असाल तर त्या रुग्णाच्या सोबत कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुग्णालयाने एक डाॅक्टर, परिचारका सोबत पाठवावी, अशी सूचना मुंबईतील
पालिका,शासकीय रुग्णालयांनी कल्याण डोंबिवली पालिका रुग्णालय प्रशासनाला केली असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
भाजपाच्या संघटन पर्वात ‘राष्ट्रवादी’च्या नाण्याचा खणखणाट !
नांदेड: गेल्या दोन महिन्यांपासून भाजपाचे संघटनपर्व आणि पक्षाच्या विस्ताराचा नांदेडसह राज्यभर गाजावाजा होत असताना, नांदेडच्या राजकीय भूमीमध्ये मात्र महायुती सरकारमधील अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाणे खणखणत असल्याचे दिसत आहे.
डोंबिवलीत मोठागाव रेतीबंदर येथे वाळू माफियांची १० लाखाची सामग्री नष्ट
डोंबिवली : महसूल विभागाने कल्याण, डोंबिवली, भिवंडी परिसरातील वाळू माफियांविरूध्द जोरदार कारवाईची मोहीम उघडली आहे. कल्याण भागात महसूल अधिकाऱ्यांनी वाळू माफियांची दोन दिवसापूर्वी गंधारे भागातील ६० लाखाची सामग्री नष्ट केल्यानंतर डोंबिवली विभागाच्या महसूल विभागाने बुधवारी डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव रेतीबंदर भागात खाडी किनारी वाळू माफियांची १० लाखाची सामग्री नष्ट केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह सुरेश ऊर्फ भय्याजी जोशी यांच्या मराठी भाषेबाबतच्या विधानावरून विरोधक आक्रमक, (फोटो-एएनआय)