Marathi News LIVE Updates : महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात राज्यातील विविध मुद्यांवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याचं प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचीही मागणी विरोधकांकडून केली जात आहे. यातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केलेल्या एका विधानावरून त्यांच्यावर टीका होत आहे. “छत्रपती संभाजी महाराजांवर कसे अत्याचार झाले, तरी त्यांनी धर्म बदलला नाही. तसेच माझ्यावरही तुरुंगात अत्याचार झाले, पण मी पक्ष बदलला नाही”, असं विधान अनिल परब यांनी केलं. त्यांच्या या विधानावरून आज सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील विविध राजकीय व इतर घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Maharashtra  News Update highlights , 07 March 2025 : राज्यातील राजकीय व इतर घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

13:49 (IST) 7 Mar 2025

चंद्रपूर महापालिकेचे यंदाचे बजेट कितीचे? अमृत अभियान व मलनिस्सारणसाठी…

चंद्रपूर : महापालिकेच्या अर्थसंकल्पीय बैठकीत आयुक्त तथा प्रशासक विपीन पालिवाल यांनी २०२४-२५ चा सुधारित आणि २०२५-२६ चा वार्षिक अर्थसंकल्प प्रशासक समितीच्या मान्यतेसाठी सादर केला.

सविस्तर वाचा…

13:46 (IST) 7 Mar 2025

भक्ती ठरली तरूणींची ‘रोल मॉडेल’!

यवतमाळ :पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात भटकंती करत घर, गाव, शहर सोडणारे असंख्य तरूण, तरूणी आपल्या आसपास असतात. आपल्या अंगभूत कौशल्यांचा शोध घेवून आपल्या गावातच रोजगार शोधण्याचे धाडस कोणी करत नाही. मात्र भक्ती शशांक दुधे ही अभियांत्रिकी पदवीधर तरूणी सध्या सोशल मीडियावर इन्फ्ल्युएंसर म्हणून असंख्य तरूणींची रोल मॉडेल ठरली आहे.

सविस्तर वाचा

13:43 (IST) 7 Mar 2025

तुमच्या चालत्या वाहनातून होणार वीज निर्मिती, स्वच्छ ऊर्जेमुळे भविष्यात पेट्रोलचा खर्चही…

नागपूर : तुमच्या चालत्या वाहनातून वीज निर्माण होणार हे वाचून जरा नवलच वाटेल. पण हे खरं आहे. तुमची चारचाकी चालत असताना आता ऊर्जा निर्माण करता येणार आहे. यामुळे भविष्यात पेट्रोलचा खर्चही वाचणार आहे. हा अनोखा शोध नेमका काय आहे पाहूया.

सविस्तर वाचा…

13:42 (IST) 7 Mar 2025

डोंबिवली एमआयडीसीत महिला कामगाराला मारहाण करणारे दोन अधिकारी अटकेत

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील फेज क्रमांक दोन मध्ये एका एम्ब्राॅयडरी कंपनीत व्यवस्थापक आणि पर्यवेक्षक यांनी एका महिला कामगाराचा विनयभंग करून त्या महिलेचा अश्लिल भाषेत उल्लेख करून तिला लाथांनी मारहाण केली.

सविस्तर वाचा…

13:28 (IST) 7 Mar 2025

अंबरनाथ डावलपाड्यातील सुरेश म्हात्रे कुटुंबीयांना खूनप्रकरणी जन्मठेप

कल्याण : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या मांगरूळ गावाजवळील डावलपाडा येथील सहा जणांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. याशिवाय खुनाचा प्रयत्न आणि इतर प्रत्येक गुन्ह्यात सहाही आरोपींना प्रत्येकी १० वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी ७० हजार रूपये दंड ठोठावला.

सविस्तर वाचा…

13:27 (IST) 7 Mar 2025

आदिवासी महिलांचा मेहनतीचा मोबदला रखडला

बदलापूरः महिला दिनाचे औचित्य साधत एकीकडे लाडक्या बहिणींना योजनेचे मानधन देण्याची घोषणा सरकार करत असतानाच ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यात आदिवासी महिलांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. रोजगार हमी योजना, आदिवासी घरकूल योजना, सामुहिक वनहक्कधारक, राष्ट्रीय कुटूंब सहाय्य योजना आणि जननी सुरक्षा योजना अशा विविध योजनांमधून आदिवासी महिलांना मिळणारे हक्काचे अर्थसहाय्य, मोबदला मिळाला नसल्याने संताप व्यक्त होतो आहे. श्रमिक मुक्ती संघटनेने मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन दिले आहे.

सविस्तर वाचा…

13:08 (IST) 7 Mar 2025

‘झोपू’ योजनेनंतर जाहिरातींचे पेव ५ लाखात चाळीत घरांचे आश्वासन

वसई- झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकणाकरणाने वसई विरार शहरात झोपडपट्टी पुनर्विकास योजना सक्रीय करण्याच्या निर्णय घेतल्यानंतर भूमाफिया सक्रीय झाले आहेत. ५ लाखत चाळीत घर अशा जाहिराती करण्यास सुरवात झाली आहे. अगदी रेल्वे ट्रेनमध्येही या जाहिराती लावण्यात आल्या आहेत.

सविस्तर वाचा

13:08 (IST) 7 Mar 2025

अनधिकृत बांधकामांविरोधात यंत्रणा सज्ज; उच्च न्यायालयापाठोपाठ राज्य शासनाची नियमावली

वसई-  वाढत्या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने सर्व महापालिकांना मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. उच्च न्यायालयानेही अनधिकृत बांधकांना वीज आणि नळ जोडणी न देण्याच्या सुचना दिल्या आहेत. दरम्यान वसई विरार  महापालिकेने या नियमावलीनुसार अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

सविस्तर वाचा

13:07 (IST) 7 Mar 2025

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सांगलीत धरणे आंदोलन

सांगली : सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करावी, खुल्लर वेतन त्रुटी समितीचा अहवाल प्रसिद्ध करावा, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करावी आदी मागण्यांसाठी गुरुवारी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

सविस्तर वाचा

13:07 (IST) 7 Mar 2025

सांगलीत अतिक्रमणविरोधी कारवाई

सांगली : रहदारीस अडथळा ठरणारी मारूती रोडवरील १३ दुकानांच्या समोरील अतिक्रमण गुरुवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने हटवले. शहरातील रहदारीचे रस्ते तातडीने अतिक्रमणमुक्त करण्याचे निर्देश आज आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी दिले आहेत. यानुसार ही कारवाई करण्यात आली.

सविस्तर वाचा

12:57 (IST) 7 Mar 2025

पालिका रूग्णालयांतून क्लीनअप मार्शल हद्दपार, मुंबई महापालिकेचा निर्णय

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सहा रुग्णालयामधील क्लीन मार्शलची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे रुग्णालयाच्या आवारात क्लीनअप मार्शल दिसणार नाहीत. क्लीन अप मार्शल पैसे उकळत असल्याच्या तक्रारी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनी केल्यानंतर पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला.

सविस्तर वाचा…

12:47 (IST) 7 Mar 2025

महिला दिन विशेष : भारतीय नाण्यांवर १० थोर महिलांची छाप १८४१ मधील राणी व्हिक्टोरियांच्या…

अकोला : देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळात १९८५ ते २०२४ पर्यंत १० थोर महिलांनी भारतीय नाण्यांवर छाप सोडली. राणी व्हिक्टोरिया यांचे छायाचित्र असलेले जगातील एकमेव सोन्याचे नाणे १८४१ साली काढण्यात आले होते. या नाण्याचे वजन १०.६६ ग्रॅम होते. त्यानंतर जगातील कोणत्याही देशाने सोन्याचे नाणे काढले नाही, अशी माहिती मुद्रा अभ्यासक अक्षय खाडे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त दिली.

सविस्तर वाचा…

12:47 (IST) 7 Mar 2025

नागपूरच्या नारा पार्कसाठी १५५ दिवसांपासून आंदोलन, कारण काय?

नागपूर : नारा येथे प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कबाबत नागपूर सुधार प्रन्यास कोणताच निर्णय घेण्यास तयार नसल्याने उत्तर नागपुरातील नागरिकांमध्ये रोष असून राज्य सरकारने हस्तक्षेप करून येथे पार्क उभारावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सविस्तर वाचा…

12:45 (IST) 7 Mar 2025

शहापूर तालुक्यात ” पॅक हाऊसचा ” यशस्वी प्रयोग !

ठाणे : पारंपरिक फळशेतीच्या पुढे जात जिल्ह्यातील विविध शेतकरी आता नवीन प्रयोग करू लागले आहेत. याचेच फलित म्हणून त्यांच्या विविध पिकांच्या उत्पादनात वाढ होत असून शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळू लागला आहे. याच पद्धतीने शहापूर तालुक्यातील अस्नोली गावात गुलाब दिनकर या आंबा पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याने कृषी विभागाच्या मदतीने फळांची साठवण, पॅकिंग साठी पॅक हाऊस बांधून घेतले.

सविस्तर वाचा…

12:17 (IST) 7 Mar 2025

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला की नाही? सभागृहात जाहीर का केलं नाही? विरोधक आक्रमक

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असं विधानसभेच्या बाहेर जाहीर करण्यात आलं. मात्र, अद्यापही विधानसभेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत जाहीर करण्यात आलं नाही. असं म्हणत राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार) पक्षाचे जयंत पाटील यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केले. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला याची माहिती सभागृहात देण्याची आवश्यकता आहे. आजपर्यंतच्या इतिहासात अशा पद्धतीचा राजीनामा आधी सभागृहात जाहीर केला जातो आणि नंतर बाहेर माध्यमांना सांगितलं जातं. मात्र, असं झालं नाही. त्यामुळे हा सभागृहाचा अवमान ठरतो, असं म्हणत जयंत पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

12:16 (IST) 7 Mar 2025

‘नो पार्किंग’ फलकाखालीच पार्किंग! सर्वत्र दुतर्फा वाहनतळांमुळे नवी मुंबईत वाहतुकीचा बट्ट्याबोळ

नवी मुंबई : नियोजनबद्ध वसवलेल्या नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस बेकायदा पार्किंगचा प्रश्न अतिशय बिकट बनला आहे. शहरात सर्वत्र दुतर्फा पार्किंग पाहायला मिळत असून यामुळे विविध विभागात वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. विशेष म्हणजे ‘नो पार्किंग’ च्या फलकाला अजिबात न जुमानता तेथेच वाहने उभी केली जात आहेत.

सविस्तर वाचा…

12:06 (IST) 7 Mar 2025

“महापुरुषांवर बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात विशेष कायदा पास करा”, उदयनराजे भोसले यांची मोठी मागणी

भारतीय जनता पक्षाचे नेते तथा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेत एक मोठी मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात विशेष कायदा मंजूर करण्यात आला पाहिजे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. तसेच या कायद्यात नेमकं काय-काय तरतुदी असल्या पाहिजेत, याबाबतही उदयनराजे भोसले यांनी सांगितलं आहे.

सविस्तर बातमी वाचा

12:05 (IST) 7 Mar 2025

‘त्या’ सात रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वीच संपवा, खोदकाम योग्य पद्धतीने न झाल्यास दंडात्मक कारवाईचा आयुक्तांचा इशारा

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात गेल्या काही आठवड्यात रस्ते खोदकाम आणि खड्ड्यांमुळे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन जणांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर उल्हासनगर महापालिका प्रशासनाने घेतलेल्या आढावा बैठकीत कंत्राटदाराने खोदकाम योग्य पद्धतीने न केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी दिला आहे.

सविस्तर वाचा…

11:04 (IST) 7 Mar 2025

स्वयंपाकी संपावर म्हणून शिक्षक लागले स्वयंपाकावर, अध्यापन पडले ठप्प

वर्धा : महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटनेने आंदोलन पुकारले आहे. ७ व ८ मार्च रोजी ते आंदोलनात असल्याने पोषण आहार प्रक्रिया ठप्प पडणार.

सविस्तर वाचा…

10:46 (IST) 7 Mar 2025

विधानभवानाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात राज्यातील विविध मुद्यांवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. आज देखील महाराष्ट्रातील विविध विषयांवरून विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यावंर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं आहे.

10:42 (IST) 7 Mar 2025

“पन्हाळा पुन्हा शिवकालीन रुपात दिसणार”, किल्ल्यावरील 13D थिएटरच्या उद्घाटनावेळी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (६ मार्च) किल्ले पन्हाळगड, कोल्हापूर येथे आयोजित ‘विजयोत्सव’ कार्यक्रमाला हजेरी लावली. ६ मार्च १६७३ रोजी कोंडाजी फर्जंद यांनी आदिलशहाकडून पन्हाळगड जिंकून घेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात सामील केला होता. मुख्यमंत्र्यांनी त्या विजयोत्सवाचे औचित्य साधून या किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या ’13D थिएटर’चे लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पन्हाळगडचा रणसंग्राम’ हा लघुपट पाहिला व उपस्थितांना संबोधित केले.

सविस्तर वाचा

10:41 (IST) 7 Mar 2025

“इतिहासकारांनी छत्रपती संभाजी महाराजांवर अन्याय केला, पण…”, ‘छावा’ पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील छावा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी ‘छावा’ चित्रपटाचं कौतुक केलं. तसेच चित्रपटातील संपूर्ण कलाकारांचेही आभार मानत तोंडभरुन कौतुक केलं. यावेळी ‘छावा’ चित्रपटाबाबत बोलताना त्यांनी एक महत्वाचं विधानही केलं. “छत्रपती संभाजी महाराज संस्कृत पंडित, कवी आणि लेखक देखील होते. पण त्यांच्यावर इतिहासकारांनी अन्याय केला. मात्र, छावा चित्रपटाच्या माध्यमातून तो अन्याय दूर झाला”, अशी भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

सविस्तर वाचा

10:36 (IST) 7 Mar 2025

BhaiyaJi Joshi Controversy : “भय्याजी जोशी यांचं विधान भाजपाच्या रणनीतीचा भाग”, खासदार संजय राऊतांची टीका

RSS BhaiyaJi Joshi Controversy :‘मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकली पाहिजे असे नाही’, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह सुरेश ऊर्फ भय्याजी जोशी यांनी केलं. त्यांच्या या विधनानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. भय्याजी जोशी यांच्या या विधानावरून त्यांच्यावर टीका होत आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भय्याजी जोशी यांच्या विधानावरून भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. “मुंबईची भाषा मराठी नाही, हे सांगणं हा भाजपाच्या रणनीतीचा भाग आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भय्याजी जोशी यांच्या विधानाचा निषेध केला का?”, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह सुरेश ऊर्फ भय्याजी जोशी यांच्या मराठी भाषेबाबतच्या विधानावरून विरोधक आक्रमक, (फोटो-एएनआय)