Marathi News Updates : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाद्वारे सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक केल्याची टीका होत आहे. तर, हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक व राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य असल्याचं सरकारमधील मंत्र्यांचं व आमदारांचं म्हणणं आहे. आज विधीमंडळात अर्थसंकल्पावर चर्चा होऊ शकते. यावर आपलं लक्ष असेल. तसेच राज्यात घडणाऱ्या इतर घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. दुसऱ्या बाजूला मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका घोषणेमुळे ‘हलाल’विरोधात ‘झटका’ मांस असा वाद सुरू झाला आहे. ठिकठिकाणी मल्हार प्रमाणपत्रासह झटका मांस विक्री करणारी दुकानं उघडली जातील आणि हिंदूंनी त्याच दुकानांमधून मांस खरेदी करावं असं आवाहन नितेश राणे यांनी केलं आहे. यावर वेवेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत असून यावरही आपलं लक्ष असेल.
Maharashtra Live News Update Today, 11 March 2025 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.
धावपट्टीवर श्वान, विमान वळवले भोपाळला
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर श्वान आढळल्याने एक विमान सोमवारी रात्री उशिरा भोपाळ येथे वळवावे लागले. धावपट्टीवरील श्वानामुळे विमान उतरविताना कुठला अपघात होऊन प्रवाशांचा जीव धोक्यात आला येण्याची शक्यता होती. मात्र, वैमानिकाच्या प्रसंगावधानाने कुठलीही अनुचित घटना घडली नाही.
उष्माघाताच्या रुग्णांवर त्वरीत उपचार करण्याची सूचना
नाशिक – जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत असून आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्र तसेच सीपीआर आणि जिल्हा रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांवर त्वरीत उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ठाण्यातील कचरा प्रश्नावर तोडगा काढा अन्यथा महापालिकेच्या प्रवेशद्वारावर कचरा टाकू; आनंद परांजपे यांचा इशारा
ठाणे : ठाणे शहरातील कचरा उचलला जात नाही. अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे हा कचरा जमा झाला आहे. ठाणेकरांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रयत्न आहे. पुढील तीन ते चार दिवसांत यावर तोडगा निघाला नाही तर, ठाण्यातील कचरा महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर नेऊन टाकू असा इशारा राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला.
मांदाडे समितीच्या शिफारशींना अहिल्यानगर जिल्ह्यातून विरोध; उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील पाणीवाटपाचा वाद
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील समन्यायी पाणी वाटपसंदर्भात मांदाडे समितीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालातील शिफारशींनी अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील दारणा, गंगापूर, भंडारदरा, निळवंडे, मुळा, पालखेड प्रकल्पांतर्गत लाभधारकांचा पूर्ण अपेक्षाभंग केला आहे.
हमाल माथाडी कामगारांच्या बहिष्कारामुळे मिरजगाव बाजार समितीचे कामकाज दोन दिवस बंद
मिरजगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे हमालीच्या दरावरून हमाल माथाडी कामगारांनी कामकाजावर टाकलेल्या बहिष्कारामुळे दोन दिवस या उपबाजार समितीचे काम ठप्प होते. त्यामुळे शेतकरी व व्यापारी यांचे आर्थिक नुकसान झाले. सविस्तर वाचा…
अहिल्यानगर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू; उन्हाची तीव्रता वाढली
जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम पाणीप्रकल्पामधून पर्याप्त पाणीसाठा असला तरी लाभक्षेत्रात टंचाईच्या झळया सुरू झाल्या आहेत. उन्हाची तीव्रता वाढू लागली तशी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागले आहेत. सविस्तर वाचा…
शेतकऱ्याला ठार करणारा बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात कैद
वडनेर (ता. राहुरी) येथील शेतकऱ्याला ठार करणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद झाला. सध्या या बिबट्याला डिग्रस येथील नर्सरीमध्ये ठेवण्यात आले आहे.
अनधिकृत बांधकामांच्या वसूलीसाठी अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा; आनंद परांजपे यांचा महापालिका अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
ठाणे : अनधिकृत बांधकामांसाठी वसूली कोण करणार, साहाय्यक आयुक्त म्हणून कोण बसणार यासाठी बोली लागली आहे का, असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी ठाणे महापालिकेच्या कारभारावर गंभीर आरोप केले. मुंब्रा येथील काही भागात मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहे.
महावितरणचा कनिष्ठ अभियंता २० हजार घेताना सापळ्यात
छत्रपती संभाजीनगर - महावितरणच्या बिडकीन उपविभागातील कनिष्ठ अभियंता सौर संच पंपासाठी २० हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या सापळ्यात अडकला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. महेश काशिनाथ घावट, असे लाच मागणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे.
याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी सुरू होती. यासंदर्भातील तक्रारदाराला त्याच्या शेतात सौर पंपासाठी पाच संच बसवायचे होते. त्यासाठी त्याने मंजुरी मिळावी, असा अर्ज महावितरणच्या बिडकीन उपविभागाकडे केला होता. या अर्जाला मंजुरी देण्यासाठी कनिष्ठ अभियंता महेश घावट यांनी २५ हजारांची मागणी केली. तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याचे ठरले. यासंदर्भाने मागण्यात आलेल्या लाचेची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. तक्रारीनुसार लाच मागितल्याच्या संदर्भाची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार मंगळवारी पोलीस निरीक्षक तथा सापळा अधिकारी केशव दिंडे यांच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून महेश घावट यांना २० हजार रुपये घेताना पथकाने पकडले.
ठाण्यातील कचरा प्रश्नावर तोडगा काढा अन्यथा महापालिकेच्या प्रवेशद्वारावर कचरा टाकू; आनंद परांजपे यांचा इशारा
ठाणे : ठाणे शहरातील कचरा उचलला जात नाही. अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे हा कचरा जमा झाला आहे. ठाणेकरांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रयत्न आहे. पुढील तीन ते चार दिवसांत यावर तोडगा निघाला नाही तर, ठाण्यातील कचरा महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर नेऊन टाकू असा इशारा राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला.
आरटीओमध्ये नोकरीच्या आमिषाने तरुणाची २४ लाख रुपयांना फसवणूक
प्रादेशिक परिवहन विभागात उपनिरीक्षक (सब इन्स्पेक्टर) पदावर नोकरी लावून देण्याच्या नावाखाली संशयितांनी एका बेरोजगारास २४ लाख २० हजार रुपयांना फसविल्याचे उघड झाले आहे. पैसे दिले असताना पाच वर्षे उलटूनही नोकरी मिळाली नाही. बेरोजगार युवकाने पाठपुरावा केला असता संशयितांनी बनावट मेलवरून खोटे नियुक्तीपत्र पाठवून दिशाभूल केली.
बदलापुरात थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई- ५२ मालमत्तांची जप्ती, भरारी पथकाकडून ३६ लाखांची वसुली
बदलापूरः थकीत मालमत्ता कराची वसूली करण्यासाठी कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली असून मंगळवारी ५२ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. शहरातील थकबाकीदारांवर कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासनाने पाच भरारी पथकांची स्थापना केली असून त्यांकडून सोमवारी ३६ लाखांची वसूली करण्यात आली.
राम गणेश गडकरी यांच्या अपमानावर सीकेपी समाजाचा तीव्र संताप
ठाणे – आमदार अमोल मिटकरी यांनी विधानभवन परिसरात साहित्यभूषण राम गणेश गडकरी यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे राज्यभरातून तीव्र विरोध होत असतानाच, ठाण्यात अखिल भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभु मध्यवर्ती संस्था (सीकेपी) यांच्या वतीने मंगळवारी ठाणे शासकीय विश्राम गृहाबाहेर आंदोलन करण्यात आले.
मुंब्रा शहरातील मोकळ्या जागेत ‘एमडी’ची विक्री; एकाला अटक
ठाणे : मुंब्रा येथे एका मोकळ्या जागेत मेफेड्राॅन (एमडी) या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या परवेझ खान (२२) याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल आणि ६३ ग्रॅम वजनाचे १ लाख ५७ हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहे.
डोंबिवली आयरेतील साई गॅलेक्सीचे भागीदारशालीक भगत यांच्यावर गुन्हा दाखल करा; तहसीलदार सचिन शेजाळ यांचे रामनगर पोलिसांना आदेश
कल्याण - डोंबिवली पूर्वेतील आयरे भागातील बालाजी गार्डन इमारतीच्या बाजुला असलेल्या साई गॅलेक्सी या ६५ महारेरा बेकायदा इमारत प्रकरणात मे. साई डेव्हलपर्सचे भागीदार शालीक आर. भगत यांनी बनावट सात बारा उतारा आणि बनावट बिनशेती आदेशाचा वापर करून सह दुय्यम निबंधक कल्याण १ कार्यालयातून खरेदीखत दस्त नोंदणी करून घेतले आहे, असा अहवाल मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिला.
होळीसाठी मुंबईहून ८ विशेष रेल्वेगाड्या धावणार
नागपूर : रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि गोरखपुर दरम्यान ८ होळी विशेष ट्रेन चालवणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-गोरखपुर होळी विशेष (८ फेऱ्या) गाडी धावणार आहे.
एमपीएससी होऊनही पीएसआयची नियुक्ती लांबली, कुणाचे लग्न मोडले तर कुणाचे….आमदार रोहित पवार म्हणाले
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून(एमपीएससी) पोलीस उपनिरीक्षक पदासाठी संयुक्त गट-ब पूर्व परीक्षेची जाहिरात २३ जून २०२२ प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रस्तुत परीक्षेची नियुक्तीसहीत संपूर्ण प्रक्रिया मे २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. सविस्तर वाचा…
पिंपळगाव समितीत शेतकऱ्यांकडून टोमॅटो लिलाव बंद; साडेचार महिन्यांपासून पैसे रखडवल्याची तक्रार
नाशिक - साधारणत: साडेचार महिन्यांपूर्वी विकलेल्या टोमॅटोचे साडेतीन ते चार कोटी रुपये देण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी संतप्त शेतकऱ्यांनी पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या कार्यालयास टाळे ठोकून टोमॅटोचे लिलाव बंद पाडले.
ठाण्यात घंटागाड्याचे वेळापत्रक कोलमडले; गृहसंकुलांबाहेर तसेच रस्त्यावर कचरा साठला
पावसाळ्यात रात्री नऊनंतर अवजड वाहतूक सुरू ठेवा; 'जस्टीस फॉर घोडबंदर रोड'च्या प्रतिनिधींची पालिकेकडे मागणी
ठाणे : अवजड वाहनांची वर्दळ असलेल्या ठाणे आणि घोडबंदर मार्गावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून या पार्श्वभूमीवर पावसाळ्याच्या कालावधीत अवजड वाहनांची वाहतूक रात्री नऊनंतरच सुरू करावी, अशी मागणी 'जस्टीस फॉर घोडबंदर रोड'च्या प्रतिनिधींनी सोमवारी ठाणे महापालिका प्रशासनासह इतर शासकीय यंत्रणासोबत झालेल्या बैठकीत केली.
गायमुख घाट रस्त्याची पुन्हा डांबरीकरणाद्वारे डागडुजी; ठाणे महापालिका आयुक्तांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश
ठाणे : गेल्यावर्षी पावसाळ्यापुर्वी डांबरीकरण करण्यात आलेल्या घोडबंदर येथील गायमुख घाट रस्ता पहिल्याच पावसात उखडल्याने वाहनचालकांसह प्रवाशांचे हाल झाले असतानाच, त्यापाठोपाठ वन खात्याकडून काँक्रीटीकरणाला परवानगी मिळाली नसल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यापुर्वी या रस्त्याची पुन्हा डांबरीकरणाद्वारे डागडुजी करण्यात येणार आहे.
डोंबिवली ६५ महारेरा बेकायदा इमारतींमधील सर्व दोषींचा अहवाल शासनाला पाठवा; वास्तुविशारद संदीप पाटील यांची जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे मागणी
कल्याण - डोंबिवलीतील ६५ महारेरा बेकायदा इमारत प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करणारे, बनावट जमीन शोध अहवाल देणारे वकील, शासनाचा बांधकाम परवानग्या, अकृषिक महसूल बुडविणारे जमीन मालक, भूमाफिया, वास्तुविशारद, सनदी लेखापाल, दस्त नोंदणी करणारे अधिकारी, त्यांचे मध्यस्थ या सर्वांची समग्र माहिती जमा करून त्यांचा सविस्तर अहवाल कठोर कारवाईसाठी शासनाकडे पाठवावा, अशी मागणी ६५ महारेरा बेकायदा इमारत प्रकरणातील याचिकाकर्ते व वास्तुविशारद संदीप पाटील यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भेट घेऊन केली आहे.
डोंबिवली, दिवा खाडी किनारी वाळू माफियांची २५ लाखाची उत्खनन सामग्री जाळून नष्ट
डोंबिवली – सतत कारवाई करूनही वाळू माफिया खाडीतील बेकायदा वाळू उपसा थांबवत नसल्याने कल्याण महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाळू माफियांच्या बोटी, सक्शन पंप जाळून नष्ट करण्याची मोहीम सुरू केली आहे. सोमवारी सकाळीच महसूल, सागरी महामंडळ, वन विभागाचे अधिकारी, पोलीस दिवा, डोंबिवलीतील जुना डोंबिवली, मोठागाव, कोपर, मुंब्रा भागात हजर झाले.
शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा ते रुणवाल गार्डन दरम्यानचे पदपथ ‘अडगळी’ने गायब
डोंबिवली – कल्याण शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा ते रुणवाल गार्डन परिसरातील रस्त्याच्या दुतर्फाचे पदपथ जाहिरात फलक, या भागात सुरू असलेल्या गृहसंकुलांचे बांधकाम साहित्य, महावितरणच्या उच्च दाब वीज वाहिन्यांच्या वेट्टोळ्या तारा यांनी व्यापून गेले आहेत. त्यामुळे या भागातून रस्त्याच्या दुतर्फा चालताना नागरिकांना रस्त्याच्या कडेने वाहनांनापासून अंतर ठेऊन जीव धोक्यात घालून चालावे लागते.
कल्याणमधील खडकपाडा येथील उच्चभ्रूंच्या संकुलातील मसाज केंद्रात वेश्या व्यवसाय; पोलिसांकडून मसाज केंद्र चालकांविरुध्द गुन्हा
कल्याण – कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथील उच्चभ्रूंच्या वसाहतीत मसाज केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याचा प्रकार खडकपाडा पोलिसांनी उघडकीला आणला आहे. या केंद्राच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या मसाज केंद्र मालक, व्यवस्थापक आणि अन्य एका कर्मचाऱ्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रविंद्र धंगेकरांनंतर आणखी एका नेत्याचा काँग्रेसला रामराम; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश
माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांचा पक्षांतराचा बेत नक्की झाला आहे. दि. २३ मार्च रोजी (रविवारी) गुढीपाडव्याच्या एक आठवडा आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीची गुढी उभारून पाडवा साजरा करतील. सविस्तर वाचा…
अपघाताला जबाबदार यंत्रणांवर गुन्हा दाखल करावा : प्रकाश गवळी
पुणे-बंगळूर महामार्गावर महामार्ग राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ आणि टोल अथॉरिटी व महामार्ग पोलिसांमुळेच अनेक अपघात होत आहेत. अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत आहे. सविस्तर वाचा…
रविंद्र धंगेकरांनंतर आणखी एका नेत्याचा काँग्रेसला रामराम; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश
माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांचा पक्षांतराचा बेत नक्की झाला आहे. दि. २३ मार्च रोजी (रविवारी) गुढीपाडव्याच्या एक आठवडा आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीची गुढी उभारून पाडवा साजरा करतील. सविस्तर वाचा…
प्रशांत कोरटकरच्या पाठिशी ती ‘प्रभावशाली व्यक्ती’ कोण? राजे मुधोजी भोसले यांचे सूचक व्यक्तव्य
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आणि जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या पाठीशी निश्चितच कोणीतरी प्रभावशाली व्यक्ती असून त्याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे.
कारागृहात मुलाला ‘सिमकार्ड’ देणाऱ्यावर साताऱ्यात गुन्हा
चोरीच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या मुलाला मोबाइलचे सिमकार्ड देणाऱ्या वडिलांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजू उत्तम निकम ( माहुली, ता. खानापूर, सांगली), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. सविस्तर वाचा…