Marathi News LIVE Updates : राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचाराअभावी तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या बरोबरच गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठी बोलण्याबाबतचा मुद्दा देखील तापलेला आहे. तसेच आज महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्ताने राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दाही चर्चेत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून माजी मंत्री बच्चू कडू हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Mumbai Pune Breaking News Highlights Today, 14 April 2025 : राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Raj Thackeray : “मराठी म्हणून एकत्र नाही आलो तर या लढ्याला काय अर्थ?”, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट
‘रयत’च्या सर्व शाळांत कृत्रिम बुद्धिमत्ता विषय : अजित पवार
सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा व महाविद्यालयांत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या विषयाचा समावेश या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणार आहे. याबाबत ‘मॅनेजिंग कौन्सिल’च्या बैठकीत निर्णय झाल्याची-माहिती रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळळाचे संचालक सदस्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिली.
रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाची बैठक अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये झाली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, बहुजन, ग्रामीण भागातील मुलांकरिता कर्मवीर अण्णांनी ही संस्था उभारली आहे. यामध्ये साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हा नवीन विषय आता आला असून, तो रयतच्या सर्व शाळा व महाविद्यालयात सुरू करण्याबाबत आज निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबरच इतर २४ विषयांवर चर्चा झाली. सगळ्यांनी मिळून ही संस्था चालविण्याची परंपरा यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू आहे. ती पुढे नेण्याचे काम सुरू आहे. आता काही बदल केले पाहिजेत. पालकांना कृत्रिम बुद्धिमत्ता वाढीसाठी ग्रामीण व शहरी भागातील शाखांत सुविधा देण्याचा निर्णय झाला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबतचा मार्ग लवकरच निघेल, असे त्यांनी सांगितले.
‘फायलींबाबत अमित शहा बोललेच नाहीत..’ – अजित पवार
डाॅ. आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात वाहतूक बदल
मिरवणुकांनी ख्रिश्चन बांधवांचा ‘झावळ्यांचा रविवार’ साजरा
पुणे : हातात झावळ्या घेऊन ‘होसान्ना-होसान्ना’, ‘येणारा राजा धन्यवादीत असो’ अशा घोषणा देत ख्रिश्चन समाजाने पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून ‘झावळ्यांचा रविवार’ (पाम संडे) साजरा केला. विविध चर्चमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
चर्चमध्ये रविवारी सकाळी प्रभू येशूच्या नावाचा जयघोष करत सामूहिक प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर मिरवणुकांना सुरुवात झाली. नारळाच्या झाडाच्या झावळ्या हातात घेऊन भाविक मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. ख्रिस्त धर्मीयांमध्ये चाळीस दिवसांच्या उपवासाचे महत्त्व चर्चच्या पाळकांनी सभासदांना प्रवचनातून समजावून सांगितले.
पाम संडे ते इस्टर संडे या सप्तकाला पवित्र सप्ताह म्हणतात. या काळात प्रभू येशू ख्रिस्ताचा जेरुसलेम शहरात झालेला प्रवेश, गेथशमानी बागेत त्याला झालेली अटक आणि त्यांचे वधस्तंभावरील बलिदान आणि त्याचे मृतांमधून झालेले पुनरुत्थान हा प्रवास रेव्हरंड सुधीर पारकर यांनी चर्चमध्ये प्रवचानातून उलगडला. रेव्हरंड सुधीर गायकवाड, राजेंद्र शिरसाट, विजय म्हंकाळे, मनोज काटे, एरिट म्हस्के, पराग लोंढे यांसह विविध चर्चमधील प्रमुखांनी सभासदांना मार्गदर्शन केले.
पाम संडेपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात गुड फ्रायडे, मौदी गुरुवार, ईस्टर, अंजिराचा सोमवार हे महत्त्वाचे दिवस ख्रिस्त बांधव साजरे करतात. या आठवड्यात येशू ख्रिस्ताला सर्वाधिक यातना भोगाव्या लागल्या म्हणून याला पवित्र सप्ताह असे म्हटले जाते.- सुधीर चांदेकर, सभासद, चर्च ऑफ द होली नेम
संत परंपरा सामान्यांपर्यंत पोहोचविण्यात कीर्तनकारांचे योगदान, स्वामी गोविंददेव गिरी यांचे मत
पुणे : संतसाहित्य हे महाराष्ट्राचे प्रगल्भ, समृद्ध संचित आहे. संत परंपरेचा खजिना लोकांपर्यंत पोहोचविण्यात योगदान देत कीर्तनकारांनी संस्कृतीचे जतन केले, असे मत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी रविवारी व्यक्त केले.
संत विचार प्रबोधिनीच्या वतीने स्वामी गोविंददेव गिरी यांच्या हस्ते ज्येष्ठ कीर्तनकार जयवंत महाराज बोधले आणि लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांना डाॅ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वासकर महाराज फडाचे प्रमुख राणा महाराज वासकर, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन इटकर, देहू संस्थानचे पुरुषोत्तम महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, अंजली देखणे, डॉ. रामचंद्र देखणे साहित्य-कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भावार्थ देखणे, डॉ. पूजा देखणे, डॉ. पद्मश्री जोशी या वेळी उपस्थित होत्या.
स्वारगेट पीएमपी स्थानकात दागिने चोरी
स्वारगेट पीएमपी स्थानकात चोरांनी एका ज्येष्ठ महिलेच्या हातातील ५० हजारांची सोन्याची बांगडी कापून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ६५ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला बोपोडीत राहायला आहेत. त्या शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास स्वारगेट येथील पीएमपी स्थानकात थांबल्या होत्या. त्या वेळी एका बसमध्ये प्रवेश करत असताना चोरांनी महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी कटरचा वापर करून कापून नेली. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे तपास करत आहेेत. स्वारगेट बस स्थानक परिसरात प्रवासी महिलांकडील दागिने चोरून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत.
पुणे : टिळक रस्त्यावर ज्येष्ठ महिलेला लुबाडले परिसरातील आठवड्याभरात चौथी घटना
पुणे : टिळक रस्त्यावर पीएमपी थांब्यावर ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील अडीच लाख रुपयांचे दागिने हिसकावून चोर पसार झाल्याची घटना घडली. सदाशिव पेठेतील महाराणा प्रताप उद्यान, रविवार पेठ, तसेच गोखलेनगर भागात ज्येष्ठ महिलांचे दागिने हिसकावून नेण्याच्या घटना नुकत्याच घडल्या होत्या. आठवड्याभरात चार घटना घडल्याने ज्येष्ठांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
याबाबत एका ६५ वर्षीय महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार बिबवेवाडी भागात राहायला आहेत. टिळक रस्त्यावरील आयसीआयसीआय बँकेसमोर असलेल्या पीएमपी थांब्यावर त्या शुक्रवारी (११ एप्रिल) रात्री पावणेनऊच्या सुमारास थांबल्या होत्या. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या चोरांनी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील दोन लाख ४६ हजारांचे दागिने हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. महिलेला धक्का देऊन चोरटे भरधाव वेगात पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.
“तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात तात्पूरती कारवाई नाही, तर…”, रुपाली चाकणकर यांचा इशारा
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात बोलताना रुपाली चाकणकर यांनी म्हटलं की, “या प्रकरणात तात्पूरती प्रक्रिया करणं हे अपेक्षित नाही. या प्रकरणात ज्या समित्यांचे अहवाल येतील त्या अनुषंगाने योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कारण तनिषा भिसे यांचा मृत्यू वेदनादायी आहे. मात्र, यापुढे अशा घटना घडू नये, यासाठी कायदेशीर कारवाई ही पूर्णकाळ असणार आहे. तात्पूरती मलमपट्टी किंवा तात्पूरती कारवाई करणं हे अपेक्षित नाही. या प्रकरणात खोलात जाऊन कारवाई होईल”, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा तडाखा, (फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)