पत्राचाळ घोटाळा प्रकरणी पीएमएलए न्यायालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊतांपाठोपाठ त्यांची पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स बजावले आहे. आज वर्षा राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. ‘आझादी का अमृत महोत्सवा’निमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला ते हजेरी लावणार आहेत. या दौऱ्यात ते दिल्लीतील नेत्यांची भेट घेतील. यादरम्यान राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
देशाच्या नवीन उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी आज मतदान होत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार जगदीप धनखड आणि विरोधी पक्षाच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात लढत आहे. आकडेवारीचा विचार करता पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल धनखड यांचा विजय निश्चित दिसत आहे. हा विषयही दिवसभर चर्चेत असणार आहे.
महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाविषयक घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…
Maharashtra News Today : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर
गंगापूरहून औरंगाबाद कडे येणाऱ्या गंगापूर आगाराच्या धावत्या बसचे टायर निखळले. मात्र, रस्ता अत्यंत खराब असल्याने बसचा वेग कमी होता. यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. यावेळी बसमध्ये सुमारे २५ ते ३० प्रवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही बस गंगापूर वरून लासूर गवळीशिवरा गाजगावमार्गे औरंगाबादकडे येत होती. रस्ता खराब असल्यामुळे एसटी बसचे मागील टायर आणि रॉड तुटल्याचे प्रत्यक्षदर्शीयांचे म्हणणे आहे.
देशातील महागाई आणि ईडीच्या कारवाईवरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. युपीएच्या कार्यकाळात देशात अनेक महत्त्वाची कामे झाली. मात्र, आता देशात एक प्रकारचे दहशतीचे वातावरण असून विरोधकांचं आवाज बंद करण्याचे काम सुरू आहे आणि महागाई प्रचंड वाढली आहे, असं ते म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान काँग्रेसतर्फे 'स्वातंत्र्याचा गौरव' ही पदयात्रा काढण्यात येणार असल्याचीही त्यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून बाईक आणि रिक्षा चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. मानपाडा पोलिसांनीही आपल्या कारवाईत एका सराईत चोरटयाला अटक केली. गस्त घालत असताना पोलिसांना दुचाकीवरून जाणाऱ्या एका व्यक्तीचा संशय आला. पोलिसांनी त्याला थांबवले अन् कागदपत्रांची विचारणा केली, तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरं दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. अधिक चौकशी केली असता तो अट्टल दुचाकीचोर असल्याचं समोर आलं. वाचा सविस्तर बातमी...
“सामना सारख्या वर्तमान पत्राचे मुख्य संपादक आता उद्धव ठाकरे आहेत. त्यांच्या तोंडी मधुचंद्र, लग्न असे शब्द शोभत नाही. आम्ही एका चांगला नेता म्हणून त्यांच्याकडे बघतो.”, असे प्रत्युत्तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिले आहे.
राज्यात सत्ता परिवर्तन होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवीन सरकार आलं आहे. मात्र नवीन सरकार होऊन जवळपास दीड महिना होत आला तरी देखील अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. यावरून विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात बोलताना टीका केली. वाचा सविस्तर बातमी...
गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. वाचा सविस्तर बातमी...
अरबी समुद्रात वसईच्या परिसरात शनिवारी रात्री खोल समुद्रात अचानक आगीचे लोट दिसू लागल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. परंतु या आगीबाबत आता ओएनजीसी कडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून, सर्वेक्षणाचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वाचा सविस्तर बातमी...
सध्या अटकेत असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत हे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी शनिवारी शिवडी न्यायालयासमोर हजर होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना जबाब नोंदवण्यासाठी हजर करण्याचे आदेश अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) द्यावेत, अशी मागणी मेधा सोमय्या यांच्या वतीने न्यायालयाकडे करण्यात आली. न्यायालयाने त्यावर १८ ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवली आहे. वाचा सविस्तर बातमी...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येत असलेल्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१-संयुक्त पेपर १च्या परीक्षेवेळी एक उमेदवार गैरप्रकार करताना आढळला. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित उमेदवारावर एमपीएससीकडून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली. वाचा सविस्तर बातमी...
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली असताना आज ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील चौकशीसाठी बोलावले होते. दरम्यान, आता संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी भाजपा नेते मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात कंबोज यांचा देखील समावेश असल्याचे सुनील राऊत म्हणाले.
आदेशाची अंमलबजावणीच होणार नसेल, तर आदेश देण्याला अर्थ काय ? आदेशाच्या अंमलबजावणासाठी गृहमंत्री तर असायला हवेत ना ? अशी मिश्किल टिप्पणी उच्च न्यायालयाने राज्याला सध्या गृहमंत्रीच नसल्यावरून केली. शस्त्र परवाना नाकारण्याच्या ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशाविरोधात केलेल्या अपिलावर राज्याच्या गृहमंत्र्यांना सुनावणी घेण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करणाऱ्या वकिलाच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने ही मिश्किल टिप्पणी केली. वाचा सविस्तर बातमी...
दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी पुन्हा एकदा वाढत असून आता धरणे ९० टक्के भरली आहेत. धरणक्षेत्रात पावसाने ओढ दिल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून स्थिरावलेली पाणी पातळी आता किंचित वाढली आहे. वाचा सविस्तर बातमी...
रिक्षातून पुढे सोडतो असे सांगून एका भामट्याने वृद्धाच्या खिशातील ९ हजार ५०० रुपये काढून घेतल्याचा प्रकार गुरूवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. वाचा सविस्तर बातमी...
पुणे- नाशिक महामार्गावर भरधाव दुचाकीवर झाड कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. भोसरीमधून नाशिक फाट्याकडे जात असताना दुचाकीवरील दोघांवर मृत्यू ने झडप घातली आहे. अद्याप मृतांची नाव समजू शकली नाहीत. ही घटना आज (शनिवार) सकाळी सातच्या सुमारास घडली. रस्त्यावर झाड कोसळल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. वाचा सविस्तर बातमी...
येरवडा भागातील मनोरुग्णालयात वसाहत परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी जुगार अड्ड्याचा मालक, कामगार तसेच जुगार खेळणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाचा सविस्तर बातमी...
राजुरा तालुक्यातील देवाडा व अन्य तीन गावात गॅस्ट्रोची लागण झाल्याने तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दुषित पाण्यामुळं ही लागण झाल्याच सांगितलं जात आहे. दरम्यान, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी देवाडा गावाला भेट दिली. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर त्यांनी ताशेरे ओढले. यावेळी बोलताना त्यांनी गावातली परिस्थिती भयावह असल्याचे सांगितले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 97 रुग्ण दाखल आहेत. देवाडासह, सोंडो, टेंभुरवाही व अन्य गावातील रुग्णांचा समावेश त्यात आहे, असेही ते म्हणाले. देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रामधील दुरवस्थेबद्दल अहिरांनी नाराजीही व्यक्त केली.
“आगामी नागपूर महापालिका निवडणुकीमध्ये चेहरा पाहून उमेदवारी मिळणार नाही किंवा कुठलीही लॉबिंग चालणार नाही. निवडून येण्याची क्षमता असलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा उमेदवारीसाठी विचार केला जाईल.”, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. वाचा सविस्तर बातमी...
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी पीएमएलए न्यायालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊतांपाठोपाठ त्यांची पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स बजावले आहे. ६ ऑगस्ट म्हणजे आज वर्षा राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत.
अंबरनाथच्या वडोळ औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराने अंग मस्करी करत उच्चदाब हवेची नलिका थेट सहकारी मित्राच्या पार्श्वभागात घुसवली. त्यामुळे या तरूणाच्या शरीरात अंतर्गत गंभीर दुखापत झाली आहे. या तरुणावर आता शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली आहे. वाचा सविस्तर बातमी...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. 'आझादी का अमृत महोत्सवा'निमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला ते हजेरी लावणार आहेत. या दौऱ्यात ते दिल्लीतील नेत्यांची भेट घेतील. यादरम्यान राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
सविस्तर बातमी
घाटकोपर पूर्वेला म्हाडाच्या मोडकळीस आलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. पंतनगर को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील इमारत क्रमांक ९२मध्ये राहणाऱ्या जयेश कांबळे यांच्या घरात सकाळी ही घटना घडली. जयेश यांची बहीण अस्मिता हुमरे या त्यांच्या लहान मुलासह गाढ झोपलेले असताना अचानक घराच्या छपराचा मोठा स्लॅबचा भाग कोसळला. मात्र, अस्मिता यांनी थोडा भाग कोसळताच मुलाचा अंगावर आडव्या झाल्या आणि सर्व स्लॅब त्यांच्यावर कोसळला.या मुळे सुदैवाने त्यांच्या मुलाला दुखापत झाली नाही.मात्र घराचे मोठे नुकसान झाले आणि अस्मिता ही जखमी झाल्या.गेले अनेक वर्षे इथल्या इमारती च्या पुनर्वसनचे प्रकल्प रखडत असल्याने या घटना वाढत असून अश्या इमारती कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे.