Marathi News Updates: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, औरंगजेबाची कबर, कुणाल कामराचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक गीत यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गेल्या आठवड्यात घडलेले कुणाल कामरा प्रकरण अजूनही धगधगत आहे. तर बीडमधील कारागृहात असलेल्या वाल्मीक कराडला मारहाण झाल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत.
याचबरोबर गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विमागाने मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात आजही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले आहे. याबरोबर राज्यातील इतर घडामोडी लाईव्ह बॉगच्या माध्यमातून जाणून घेऊया.
Mumbai-Maharashtra News Live Today, 1 April 2025 :
दुचाकीला धडक मारत ४००फुट नेले फरफटत; निवळी चाफे येथील अपघात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
रत्नागिरी – रत्नागिरी तालुक्यातील निवळी-जयगड मार्गावरील चाफे येथे झालेल्या ट्रक आणि दुचाकी यांच्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराला प्राण गमवावा लागला. मंगळवारी साडे अकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामुळे संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. तसेच रस्त्यावरील अवजड वाहतुकीविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको केले.
या अपघातात किरण पागदे, रा. खंडाळा, वाटद या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर मोटारसायकलस्वाराला तब्बल चारशे फुट फरफटत नेले. या भीषण धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालकाच्या बेदकारणांमुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीस्वाराचा मृतदेह रस्त्यावर पडलेला पाहून संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. यामुळे काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
“हे जाणूनबुजून केले जात आहे”, वक्फ दुरुस्ती विधेयकावर काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया
वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबत बोलताना काँग्रेस नेते हुसेन दलवाई म्हणाले, “माझ्या मते, हे जाणूनबुजून केले जात आहे. जर चुका असतील तर त्या दुरुस्त करण्यात काहीच गैर नाही. पण, मुस्लिमांचा एक ट्रस्ट आहे, ज्याच्याकडे लोकांनी दान केलेला निधी आणि मालमत्ता आहेत, ज्याचा वापर गरिबांना मदत करण्यासाठी, शिक्षणात मदत करण्यासाठी आणि विधवांना आधार देण्यासाठी केला पाहिजे. जर हे काम योग्यरित्या केले जात नसेल, तर त्यावर लक्ष द्या, परंतु संपूर्ण व्यवस्था बदलणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे चुकीचे आहे.”
जेजुरीत भेसळयुक्त भंडाऱ्याची विक्री, भाविकांना त्रास; विश्वस्तांकडून सरकारकडे कारवाईची मागणी
जेजुरीत उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्यामुळे जेजुरीला ‘सोन्याची जेजुरी’ म्हटलं जातं. मात्र हाच पिवळा भंडारा आता जेजुरीतील भाविकांच्या व स्थानिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. या भंडाऱ्यात होत असलेल्या भेसळीमुळे भाविकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. तसेच येथील ऐतिहासिक जेजुरी गडाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने, सरकारने या गंभीर प्रकरणात लक्ष घालून भंडाऱ्यात होणारी भेसळ रोखावी अशी मागणी जेजुरीतील मार्तंड देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांनी केली आहे.
“मी मुस्लिमांना खात्री देऊ इच्छितो की…” वक्फ दुरुस्ती विधेयकावर शिवसेना खासदाराची प्रतिक्रिया
आज संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे, यावर बोलताना शिवसेना खासदार मिलिंद देवरा म्हणाले की, “जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यात आले आणि सीएए लागू करण्यात आले तेव्हाही एक बनावट कथा रचण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीदरम्यान संविधान धोक्यात आहे अशी आणखी एक बनावट कथा पसरवण्यात आली. आजही असेच केले जात आहे. भारतीय मुस्लिमांना तुष्टीकरण नको आहे तर सक्षमीकरण हवे आहे. मी मुस्लिमांना खात्री देऊ इच्छितो की हे विधेयक त्यांना सक्षम करेल.”
“बाळासाहेब ठाकरे यांना वक्फ कायदा रद्द करायचा होता कारण…” वक्फ दुरुस्ती विधेयकावर शिंदेंच्या खासदाराची प्रतिक्रिया
वक्फ दुरुस्ती विधेयकावर बोलताना शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणतात, “आम्ही वक्फ दुरुस्ती विधेयक आणणार आहोत. बाळासाहेब ठाकरे यांना वक्फ कायदा रद्द करायचा होता कारण या कायद्याचा खरा वापर गरीब अल्पसंख्याकांसाठी, गरीब मुस्लिमांसाठी व्हावा असे त्यांचे मत होते. परंतु वक्फ बोर्डावरील काही मुस्लिम नेते वक्फची मालमत्ता लुटत आहेत, ती गरीब मुस्लिमांसाठी वापरत नाहीत. जे वक्फ दुरुस्ती विधेयक आले आहे त्याचा फायदा गरीब मुस्लिमांना होणार आहे.”
“मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांमुळे राज्यातील वातावरण बिघडले”, ठाकरे गटाचा आरोप
राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर, कुणाल कामरा प्रकरण आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गाजत आहे. अशात राज्यातील राजकीय वातावरण बिघण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री जबाबदार असल्याचे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Maharashtra Live Updates: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत, देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मुंबई येथे होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या ९० व्या वर्धापन दिनाच्या समारोप समारंभाला उपस्थित राहणार आहेत. यासाठी त्या कालच मुंबईत दाखल झाल्या आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील.
दरम्यान आज या आरबीआयच्या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.