Maharashtra Breaking News LIVE Updates : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मस्साजोगवासियांनी अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर खासदार बजरंग सोनावणे हे मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे राज्यात मंत्र्यांच्या पीए आणि ओएसडीवरून रणसंग्राम सुरू आहे. राज्यातील विविध खात्यातील दलाली रोखता यावी याकरता मंत्र्यांचे पीए आणि ओएसडींच्या नियुक्तीचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याचं सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्यानंतर आता त्यांच्या नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्टँडवर उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांना आरोपीची ओळख पटली असून त्याच्या शोधासाठी आठ पथक तैनात करण्यात आले आहे. दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५,, रा. शिक्रापूर) असं या आरोपीचं नाव असून त्याच्यावर जबरी चोरीचे गुन्हेही दाखल आहेत. यासह राज्यातील इतर घडामोडी जाणून घेऊयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Live News Update Today, 26 February 2025 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
‘तुमचे शिवराय पळाले’, म्हटल्याचा आरोप असलेल्या कोरटकरच्या घरासमोर आंदोलन….
नागपूर : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लील शिवीगाळ करुन कोल्हापूरमध्ये येऊन मारण्याची धमकी दिल्याच्या आरोप असलेल्या प्रशांत कोरटकर याच्या घरासमोर सकल मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
Maharashtra Live Updates : वादानंतर प्राजक्ता माळीची माघार; त्र्यंबकेश्वर मंदिरातील कार्यक्रमाला जाणार नसल्याची भूमिका जाहीर!
महाशिवरात्रीनिमित्त होणारा त्र्यंबकेश्वर कार्यक्रमाला पूर्वीपासूनच प्रसिद्ध द्यायची नाही, असं ठरलं होतं. काल दिवसभरात या कार्यक्रमाला अनावश्यक प्रसिद्ध मिळाली, त्यामुळे आता अवास्तव गर्दीची भीती आणि काळजी प्रशासनाच्या मनात आहे. त्यामुळे मी कुटुंबियांशी बोलून मी हा निर्णय घेतेय. कमिटमेंट दिली होती, त्यानुसार हा कार्यक्रम होणार आहे, परंतु माझ्याशिवाय. अर्थात यामुळे माझ्या आनंदावर विरजण पडेल. परंतु, वैयक्तिक सुखापेक्षा आपल्यामुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण येऊ नये ही बाब मला महत्त्वाची वाटते. हा सर्वस्वी माझा निर्णय आहे – प्राजक्ता माळी</p>
स्वारगेट बस स्थानकावर शिवसेनानेत्या नीलम गोऱ्हे दाखल
आमच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण करा… कुलब्यातील रहिवाशांनी पालिकेला दिला अल्टीमेटम
मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून खोदून ठेवलेले रस्ते पूर्ण करा असा इशारा कुलाब्यातील नागरिकांनी दिला आहे. फर्स्ट पास्ता लेन आणि विंडी हॉल लेन या रस्त्यांची कामे अर्धवट सोडून दिली असून त्यामुळे रहिवाशांची मोठी गैरसोय होते आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेला पाचव्यांदा उर्जा संवर्धनाचा पुरस्कार, दिल्लीत कार्यकारी अभियंता प्रशांंत भागवत यांनी स्वीकारला पुस्कार
कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेने हरित उर्जा आणि उर्जा संवर्धनात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तेराव्या ग्रीन एनर्जी समितीमध्ये इंडियन चेंबर ऑफ काॅमर्सतर्फे कल्याण डोंबिवली पालिकेला हरित उर्जा आणि उर्जा संवर्धनाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले. या श्रेणीतील हा पाचवा पुरस्कार पालिकेला मिळाला आहे.
मेळघाटातील स्ट्रॉबेरीची चव न्यारी; पर्यटकांसाठी पर्वणी…
अमरावती : मेळघाटातील चिखलदरा परिसरातील शेतकरी आजवर संपूर्णपणे पारंपरिक पिके घेऊनच उदरनिर्वाह करीत असत. मात्र बदलत्या काळानुसार या शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी पिकाची लागवड करण्यास सुरुवात केली. आता परिस्थिती अशी झाली आहे की, चिखलदरा या पर्यटन स्थळी येणारे देशभरातील नागरिक येथे स्ट्रॉबेरीचा आस्वाद आवर्जून घेत आहेत.
ओबीसी-आर्य वैश्य समाजात वादाची ठिणगी!काय आहे कारण? जाणून घ्या…
चंद्रपूर : आर्य वैश्य (कोमटी) समाजाच्या ओबीसी प्रवर्गातील समावेशाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाने विरोध दर्शवला आहे. महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे आणि राष्ट्रीय सरचिटणीस सचिन राजूरकर यांनी राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अनिल शुक्रे व सदस्यांची मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. आर्य वैश्य समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये, अशा मागणीचे निवेदन त्यांनी अध्यक्षांना दिले. दुसरीकडे, आर्य वैश्य समाजाच्या शिष्टमंडळानेही आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेऊन माहिती सादर केली. त्यामुळे ओबीसी व आर्य वैश्य समाजात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
ठाण्यात केवळ तीनच सहाय्यक आयुक्तांना नोटीसा; संपुर्ण शहरात बांधकामे असताना केवळ तिघांच नोटीसा दिल्याने आश्चर्य व्यक्त
ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभाग समिती क्षेत्रात ७६९ बेकायदा बांधकामे असून त्यापैकी ६६३ बांधकामांची नोंद प्रभाग समितींच्या बीट निरीक्षकांनी बीट नोंदवहीत केल्याचे सांगत ती तोडण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी नुकतेच दिले आहेत. सविस्तर वाचा…
घटस्फोट घेत असल्याने भर रस्त्यात पत्नीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळले
पत्नी घटस्फोट घेत असल्याने विक्रम भोईर (३५) याने भर रस्त्यात पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परिसरातील एका पाण्याच्या डबक्यात महिलेने उडी घेतल्याने या घटनेत तिचा जीव वाचला. सविस्तर वाचा…
कोयना धरण जमीन अधिग्रहण प्रकरण : तब्बल ६५ वर्षांनी याचिकार्त्यांना न्याय, सहा महिन्यात भूखंड देण्याचे सरकार आदेश
कोयना धरण प्रकल्पासाठी १९६० मध्ये जमीन अधिग्रहित केलेल्या वामन कदम यांच्या कायदेशीर वारसांना येत्या सहा महिन्यात पर्यायी भूखंड देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकारला दिले. सविस्तर वाचा…
महिला टीसीचा विक्रम; एकाच दिवसात १५० विनातिकीट प्रवाशांकडून ४५ हजारांचा दंड वसूल
लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढल्याने, तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतो. तसेच वातानुकूलित लोकल, प्रथम श्रेणीच्या सामान्य लोकल डब्यात गर्दीचा फायदा घेत विनातिकीट प्रवाशांची घुसखोरी सुरू आहे. सविस्तर वाचा…
Santosh Deshmukh Murder Case : “कुटुंबीय भयभीत, आमच्यावर पाळत ठेवली जातेय”, खासदार बजरंग सोनावणेंचा आरोप
कुटुंबीय भयभीत आहे. त्यांच्यावर पाळत ठेवला जात आहे. आमच्यावरही वॉच ठेवला जात आहे. – बजरंग सोनावणे
पत्नीसोबत झालेल्या वादानंतर सासूला टेम्पोतच जाळले; सासू आणि जावयाचा मृत्यू
पत्नीसोबत झालेल्या वादामुळे संतापलेल्या जावयाने सासूला टेम्पोत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना सोमवारी मुलुंड परिसरात घडली. या घटनेत सासूसह जावयाचाही जळून मृत्यू झाला असून याप्रकरणी नवघर पोलीस अधिक तपास करीत आहेत. सविस्तर वाचा…
Santosh Deshmukh Murder Case : सीडीआर का तपासले जात नाहीत? – बजरंग सोनावणे
पोलिसांनी सीडीआर सापडत नाहीत का? लोकसभा निवडणुकीच्या काळात माझे फोन टॅप केले जात होते. आता एवढा संवेदनशील विषय आहे, मग आता सीडीआर का काढला जात नाही? या प्रकरणात संबंधित असलेल्या सर्वांचे सीडीआर तपासले पाहिजेत. – बजरंग सोनावणे
सुप्रिया सुळे यांनी घेतली माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट
आरोपपत्र दाखल करताना सरकारी वकिलांची मदत होईल- धनंजय देशमुख
एसआयटी, सीआयडीच्या अधिकाऱ्यांना वकिलांची मदत होईल. कुठे काही उणिवा वाटत असेल तर मदत होईल. जी चौकशी सुरू आहे, त्यात जास्तीचा फायदा होऊ शकतो. लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, यासाठीही सरकारी वकिलांचा उपोयग होणार आहे. – धनंजय देशमुख
आज आमची एक मागणी मान्य केली असून इतर मागण्याही मान्य कराव्यात अशी अपेक्षा आहे.
आम्हाला न्याय मागण्यासाठी जे करणं शक्य आहे, ते मी करणार आहे. कारण माझे वडील माझ्यासाठी सर्वस्व होते. त्यांच्यासाठी आम्ही न्याय मिळवू शकलो नाही तर आम्ही स्वतःला माफ करू शकणार नाही.
एकीकडे मला माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा आहे तर दुसरीकडे मला परीक्षाही द्यायची आहे. दोन्ही गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. पण त्याहीपेक्षा माझ्या वडिलांना न्याय मिळवून देणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. – वैभवी देशमुख
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, या हत्याप्रकरणातील सर्व आरोपींना कडक शिक्षा व्हावी, या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशा विविध मागण्यांसाठी मस्साजोगवासियांनी अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून सरकारने त्यांची एक मागणी मान्य केली आहे. सरकारने उज्ज्वल निकम यांची या प्रकरणात सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. तर, बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक सरकारी वकील म्हणून नियुक्ती.
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. pic.twitter.com/CkHIgGNneF
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 26, 2025
क्षमता २० कोटी, दाखविले १३३ कोटी! ‘न्यू इंडिया’प्रकरणी ऑडिट कंपन्यांना समन्स
‘न्यू इंडिया को ऑप बँक’ गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सहा ऑडिट कंपन्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. बँकेच्या दोन शाखांमधील तिजोरीची क्षमता केवळ २० कोटी रुपयांची रक्कम ठेवण्याची असताना त्यात १३३ कोटींपेक्षा जास्त रक्कम ठेवल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे याप्रकरणाची व्याप्ती वाढण्याची चिन्हे आहेत.
मुंबईतील चार हजार अपंगांचे अर्ज सादर; आनंद दिघे योजनेअंतर्गत २७०० जणांना अर्थसाहाय्य
मुंबईतील अठरा वर्षांवरील अपंग व्यक्तींसाठी महापालिकेच्या वतीने सुरू केलेल्या आनंद दिघे दिव्यांग अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत आतापर्यंत २७०० अपंगांना अर्थसाहाय्य मंजूर केले आहे. सविस्तर वाचा…
म्हाडाचा पहिला ‘झोपु’ प्रकल्प मार्गी; जोगेश्वरीतील १५५० चौ. मीटर भूखंडावरील प्रकल्पासाठी ‘झोपु’ प्राधिकरणाकडून इरादा पत्र
मुंबईतील रखडलेल्या १७ झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने कामाला वेग दिला आहे. त्यानुसार आता लवकरच म्हाडाचा मुंबईतील पहिला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रत्यक्षात मार्गी लागणार आहे. सविस्तर वाचा…
कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, तळोजा औदयोगिक परिसरात शुक्रवारी पाणी नाही
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे कल्याण तालुक्यातील जांभुळ येथील जलशुध्दीकरण केंद्र, बारवी गुरुत्व वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी रात्री १२ ते शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हाती घेतले जाणार आहे.
पालिका आणि पोलिसांचे हितसंबंध; कारवाई केलेले डान्सबार पुन्हा सुरू
मिरा भाईंदर महापालिकेने कारवाई केलेल्या २२ डान्स बार पैकी बहुतांश डान्स बार पुन्हा सुरू असल्याची बाब समोर आली आहे. हे डान्स बार वेळेची मर्यादा ओलांडून पहाटेपर्यंत सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहे. सविस्तर वाचा…
प्रेयसीच्या पतीला संपविताना प्रियकराचाही बुडून मृत्यू
अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काटा काढला. परंतु त्याच वेळी हे कृत्य प्रियकराच्याही जिवावर बेतले. दोघांचाही जीव गेला. बार्शी तालुक्यातील पांगरीजवळ हा प्रकार घडला. सविस्तर वाचा…
“बाळासाहेब ठाकरे आणि सावरकरांना भारतरत्न देण्याकरता राज्य सरकारने ठराव करावा”, संजय राऊतांची मागणी
वीर सावरकरांचा आज स्मृतीदिन आहे. वीर सावरकर महान योद्धे, लेखक आणि कवी होते. स्वातंत्र्यवीर होते. त्याविषयी कोणाच्या मनात शंका असेल तर त्यांनी इतिहास वाचावा. वीर सावरकर यांच्या गीताबद्दल जो पुरस्कार दिला जातोय, तो स्वागतार्ह निर्णय आहे. महाराष्ट्र सरकारने एक ठराव केंद्राला पाठवायला हवा. दोन हिंदूहृदयसम्राट या देशात झाले. वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदूहृदयसम्राटांनी देशाला दिशा दिली. त्यामुळे या दोन नेत्यांना भारतरत्न देण्याचा ठराव महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे पाठवायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी वीर सावरकरांना प्रेरणास्त्रोत मानतात, कधी बाळासाहेबांना मानतात. ते सोयीनुसार करतात. माझी अशी भूमिका आहे की वीर सावरकरांना आणि बाळासाहेब ठाकरेंना एकाचवेळी भारतरत्न द्यायला काहीच हरकत नाही, कारण हे दोघेही देशाचे प्रेरणास्थान राहिले आहेत. महाराष्ट्राने ठराव तरी पाठवावा, मग बघू केंद्र काय करतंय ते. मतांची गणितं जुळावीत म्हणून माहित नसलेल्या अनेक लोकांना या सरकारने भारतरत्न पुरस्काराची खिरापत वाटली. मला नावं घेऊन त्यांचा अपमान करायचा नाही. जातिय आणि राजकीय गणित जुळवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे भारतरत्न पुरस्काराचं अवमुल्यन झालं – संजय राऊत</p>
Maharashtra Live News Update Today, 26 February 2025 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर