Maharashtra Breaking News Updates: राज्यात गेल्या काही काळापासून राजकीय वातावरण तापलेले असताना, काल राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने एका प्रकरणात दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. याचबरोबर नवी दिल्ली येथे आजपासून ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे.
दुसरीकडे आजपासून राज्यात दहावीच्या परीक्षा सुरू होत आहे. या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “आजपासून इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेला बसणाऱ्या तमाम विद्यार्थी-विद्यार्थिनींना मनःपूर्वक शुभेच्छा!” यासह राज्यातील विविध घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊया.
Maharashtra News Live Update Today, 21 February 2025:
जिल्हा निधी वाटपातील घोटाळ्यावर शिक्कामोर्तब! १६२ कोटींच्या प्रशासकीय मान्यतांना स्थगिती…
गडचिरोली : खनिज निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या १६२ कोटी रुपयांच्या विविध कामांच्या प्रशासकीय मान्यतांना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्थगिती दिली आहे.केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार ही मान्यता देण्यात आली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला.
अमेरिकेत अवतरणार ‘सुंदरी’! आशिष पाटीलचा जुलै महिन्यात नृत्याविष्कार
मुंबई : कलेच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करताना नृत्यसंस्कृती जपली जावी या उद्देशाने मराठी कलाविश्वातील लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक आणि ‘लावणीकिंग’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आशिष पाटील याने ‘सुंदरी’ – लावणीचा इतिहास (अदा, ताल व शृंगार) हा नवा कार्यक्रम सादर करून यशस्वी केला आहे.
गेल्या १३ वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक
मुंबई : गेल्या १३ वर्षांपासून स्वतःची ओळख बदलून विविध ठिकाणी राहणाऱ्या फरार आरोपीला अटक करण्यात ॲन्टॉप हिल पोलिसांना यश आले. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे शीव कोळीवाडा येथे सापळा रचून आरोपीला पकडले. त्याच्याविरोधात घरात शिरून हत्येचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल केला.
रेल्वेतील साहित्ययात्री संमेलन जल्लोषात, कार्यकर्त्यांची उत्तम बडदास्त
पुणे : दिल्लीकडे निघालेल्या महादजी शिंदे एक्सप्रेसमधून अभंगाचे सूर, स्वरचित कवितांचे तसेच हिंदी-मराठी गीतांचे गायन आणि तरुणाईचे रॅप अशा जल्लोषात मराठी साहित्ययात्री संमेलन रंगले होते. सरहद संस्थेच्या कार्यकर्त्यांनी साहित्य संमेलनाला निघालेल्या दिंडीतील वारकऱ्यांची उत्तम बडदास्त ठेवली.
डोंबिवलीत शेलार नाका येथे हद्दपार केलेल्या तरूणाची सुरा घेऊन दहशत
डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या डोंबिवलीतील एका तरूणाने हातात सुरा घेऊन डोंबिवली पूर्वेतील शेलारनाका भागात मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर दहशत निर्माण केली. या दहशतीने नागरिक सैरावैरा पळू लागले.
अंबरनाथमध्ये कचऱ्याचे ढीग, सफाई कामगारांचा संप
अंबरनाथ : अंबरनाथ शहरात शुक्रवारी सकाळपासून कचऱ्याचे ढीग दिसू लागले असून कचरा उचचला जात नसल्याची बाब समोर आली आहे. शहरात कचरा उचलणाऱ्या कंत्राटदाराला पालिकेने तब्बल ७ महिने बिलाचे पैसे अदा केले नाही.
वाळू माफियागिरी एका दिवसात संपणार नाही.., महसूल मंत्री बावनकुळे असे का म्हणाले?
अमरावती : वाळू धोरणावर येत्या २४ फेब्रुवारी रोजी अंतिम सादरीकरण आहे.वाळू धोरणावर १३५ आक्षेप प्राप्त झाले आहेत. जनतेने अनेक चांगल्या सुधारणा सुचवल्या आहेत. अंतिम सादरीकरणानंतर आठवडाभरात एक चांगले वाळू धोरण जाहीर होणार आहे.
डोंबिवली पश्चिमेत प्रवाशांच्या वाटेवर फळ विक्रेत्याचा ठेला
डोंबिवली : डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ महात्मा फुले रस्त्यावरील रिक्षा वाहनतळाजवळ पादचाऱ्यांच्या येण्याच्या जाण्याच्या वाटेतच एक फळ विक्रेता मागील काही दिवसांपासून व्यवसाय करत आहे.
आव्हाड यांची डॉक्टरेट खोटी, अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांचा गंभीर आरोप
ठाणे : आमदार जितेंद्र आव्हाड हे स्वत:ला डॉक्टर म्हणतात. त्यांच्या डॉक्टरेट पदवीची चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही करणार आहोत. कारण, कोणी प्रबंध लिहीले, कोण सहा महिने कुठे राहिले त्याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकातील उदवहनाची कळ बिघडल्याने प्रवाशांचे हाल
डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे स्थानकात जाण्यासाठी प्रवाशांच्या सेवेत असलेली पाटकर रस्त्यावरील उदवहनाची कळ (बटण) बिघडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे स्थानकात झटपट जाण्यासाठी या उदवहनाचा बहुतांशी प्रवासी वापर करतात.
डोंबिवलीत २३ लाखाच्या कर थकबाकीपोटी खासगी शिकवणी वर्ग, सदनिका सील
डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने वारंवार नोटिसा देऊनही डोंबिवलीतील चार मालमत्ता कर थकबाकीदार कर भरणा करत नव्हते. अखेर पालिकेच्या फ आणि ग प्रभागाच्या मालमत्ता कर विभागाच्या पथकाने आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून संबंधितांच्या चार मालमत्ता सील करण्यात आल्या.
उल्हासनगरात ७० टक्के मालमत्ताधारक थकबाकीदार
उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील एकूण मालमत्ताधारकांपैकी तब्बल ७० टक्के मालमत्ताधारक थकबाकीदार असल्याची माहिती समोर आली आहे. उल्हासनगर शहरात एकूण मालमत्ताधारकांची संख्या १ लाख ८३ हजार असून त्यातील १ लाख २९ हजार ९२४ मालमत्ताधारक थकबाकीदार आहेत.
बँकॉक बनतेय गांजा तस्करीचे केंद्र, ५६ कोटींचा गांजा विमानतळावरून जप्त
मुंबई : बँकॉक गांजा तस्करीचे केंद्र बनत असून सीमशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर नुकतीच केलेल्या कारवाईत ५६ किलो गांजा जप्त केला.
Maharashtra Breaking News LIVE Updates: राज ठाकरेंनी घेतली मुंबई मनपा आयुक्तांची भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मनपाचा महसूल वाढविण्यासाठीचे काही पर्याय सांगितले. मुंबईच्या जमिनीखालून वेगवेगळ्या खासगी कंपन्यांच्या केबल्स जातात. या जागा मुंबई मनपाच्या असल्यामुळे या केबल्सवर कर आकारावा, त्यातून बराच महसूल जमा होईल, असे राज ठाकरे यांनी सुचविले आहे. तसेच मुंबई मनपाच्या रुग्णालयात परराज्यातील रुग्णांचा भार वाढत आहे. त्यामुळे परराज्यातून येणाऱ्या रुग्णांवर वेगळा दर आकारण्यात यावा, असेही त्यांनी सुचविले.
संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर म्हणाल्या, माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा? मोदींचे नाव न घेता…
आजही एखादा म्हणतो की, माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा? असा प्रश्न करत संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी पंतप्रधान मोदींचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली. सविस्तर वाचा…
Gold Rate in Nagpur : सोन्याच्या दरात घसरण, हे आहेत आजचे दर…
सोन्याचे दर सातत्याने वाढत असल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान शुक्रवारी (२१ फेब्रुवारी २०२५) नागपुरातील सराफा बाजारात सोन्याच्या दरात अनेक दिवसानंतर घट नोंदवली गेली. सविस्तर वाचा…
"मुंबई हाउसिंग जिहाद", शिवसेना नेत्याचा आरोप
शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते संजय निरुपम यांनी मुंबईत हाउसिंग जिहाद सुरू असल्याचे म्हटले आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलतना ते म्हणाले की, "मुंबईत हाउसिंग जिहाद हा एक चिंताजनक ट्रेंड बनत चालला आहे. या अंतर्गत, शहरातील मुस्लिम बांधकाम व्यावसायिक अधिकाऱ्यांना लाच देऊन मुस्लिम नावाच्या प्रकल्पांना मंजुरी मिळवण्यासाठी फसव्या पद्धतींचा वापर करत असल्याचा आरोप आहे. मुंबईतील विविध भागात हा तथाकथित 'हाउसिंग जिहाद' मोठ्या प्रमाणात चालवला जात आहे."
दहावीचा पहिलाच पेपर फुटला!, जालन्यानंतर यवतमाळमध्ये परीक्षा सुरू होताच…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेसाठी केलेले सर्व दावे शुक्रवारी पहिल्या दिवशी फोल ठरले आहे. दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटला आहे.
वाघांची शिकार : मेघालय ते म्यानमारपर्यंत तार, न्यायालयाकडून…
राज्यात आणि विशेषत: विदर्भात होत असलेल्या वाघाच्या अवैध शिकारीच्या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेतली. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात वाघांच्या झालेल्या अडवणुकीच्या प्रकरणानंतर उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. सविस्तर वाचा…
उच्च न्यायालयाचा आदेश मानायला नागपूर महापालिका तयार नाही…
साधारणत: उच्च न्यायालयाने काही आदेश दिल्यावर कोणत्याही शासकीय संस्थेला त्याचे पालन करणे कायदेशीररित्या बंधनकारक असते. मात्र नागपूर महापालिका उच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवित असल्याचे चित्र आहे. सविस्तर वाचा…
आधी एकनाथ शिंदेंना, आता भाजप आमदाराला जीवे मारण्याची धमकी; सत्ताधाऱ्यांना…
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडून देण्याचे प्रकरण ताजे असतानाच आता चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. सविस्तर वाचा…
कृषिमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड
कोल्हापूर : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथे आज कोकाटे यांच्या विरोधात निषेध आंदोलन केले. शासकीय विश्रामगृहासमोर जमलेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. यावेळी कार्यकर्ते व पोलिसात झटपट झाली.राज्याची कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी भिकारी सुद्धा दिलेला एक रुपया घेत नाही, आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला, असे वक्तव्य केले होते.
खतगावकरांचं ठरलं; सूनबाईंसह 'राष्ट्रवादी'त जाणार!
नांदेड : काँग्रेसचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे आणखी एक पक्षांतर अखेर ठरलं आहे. ह्यांच्यासाठी महायुतीतील दोन पक्षांमध्ये रस्सीखेच झाल्यानंतर खतगावकर यांनी आपल्या उर्वरित कारकिर्दीसाठी तसेच सूनबाईंच्या राजकीय भविष्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची 'घडी' निश्चित केली आहे.
न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणातील आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी
न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी अटक केलेल्या तिन्ही आरोपींना २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुख्य आरोपी हितेश मेहता, धर्मेश पान आणि अभिमन्यू यांना २८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात बँकेचे माजी सीईओ अभिमन्यू यांना काल आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.
नव्या बांधकामांच्या ठिकाणी सीसीटीव्ही बंधनकारक, बांधकामाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही पालिका अधिकाऱ्यांना पाहता येणार
साहित्य संमेलनापासून गडकरी लांब का?...दिल्लीतला प्रमुख मराठी चेहरा असूनही केवळ…
तब्बल सात दशकांनी देशाची राजधानी दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या संमेलनासाठी मराठी सारस्वतांची मांदियाळी दिल्लीत जमली असून देश व विदेशातील साहित्य रसिकही मोठ्या संख्येने पोहोचत आहेत. सविस्तर वाचा…
शिरुर तालुक्यातून दहावीच्या परीक्षेसाठी ६६८४ विद्यार्थी
शिरुर तालुक्यातून ६६८४ विद्यार्थी परीक्षा देत आहे . तालुक्यात एकूण १५ परीक्षा केंद्र आहेत .
सविस्तर वाचा...
उद्योग उभारणीसाठी व रोजगार निर्मितीसाठी महिलांनी पुढाकार घ्यावा उद्योगमंत्री मंत्री डॉ. उदय सामंत, महिला प्रभाग संघाच्या हाऊस बोटचे लोकार्पण
रत्नागिरी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधून कर्ज घेतल्यास ३५ टक्के सबसिडी दिली जाते. महिलांनी कर्ज घेऊन उद्योग उभे करावेत. तो वाढवून रोजगार निर्मिती करावी, त्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
सेट परीक्षेची तारीख जाहीर; अर्जप्रक्रिया कधीपासून?
ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची एक प्रत स्वत:कडे जतन करून ठेवावी. ही प्रत कोणत्याही परीक्षा केंद्रावर अथवा सेट विभागाकडे पाठवू नये.
उपाशीपोटी रेल्वेचे सारथ्य ? रेल्वे चालकांनी का उचलले पाऊल ?
दोन दिवसांचे आंदोलन पुकारण्यात आले असून, चालक आणि गाडीवरील व्यवस्थापकांकडून (गार्ड) उपाशीपोटी गाड्या चालवत असल्याचा दावा रेल्वेचालकांनी केला आहे.