Latest Marathi News Updates : औरंगजेबच्या कबरीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलेले आहे. १७ मार्चच्या रात्री नागपुरात घडलेल्या घटनेचे पडसाद काल (१८ मार्च) रोजी दिवसभर उमटले. या विषयावर विधानसभा आणि विधान परिषेद घमासान चर्चा झाली. या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी चोख उत्तरेही दिली. तरीही विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलं आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी जाणून घेऊयात.
Maharashtra News Live Today, 19 March 2025 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांप्रती सहवेदना, यवतमाळमध्ये अन्नत्याग आंदोलन
यवतमाळ : महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण (ता. महागाव) येथील शेतकरी साहेबराव करपे आणि कुटुंबाच्या आत्महत्येचे स्मरण आणि शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध म्हणून बुधवारी महागाव तालुक्यातील चिलगव्हाणसह गुंज, पुसद, यवतमाळ आदी ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
सविस्तर बातमी…
नागपूर दंगल : हिंदू परिषदेचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात हजर; दोन तासात जामीन…
बुधवारी दुपारी चार वाजता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे आठ कार्यकर्त्यांनी कोतवाली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यांना पोलिसांना आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली.
विनातिकीट प्रवासी दिसल्यास मध्य रेल्वेला ‘व्हॅाट्स ॲप’वर तक्रार करा; ‘एसी लोकल टास्क फोर्स’कडून १०० टक्के तक्रारींचे निवारण
मध्य रेल्वेवरील सामान्य लोकल आणि वातानुकूलित लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांची घुसखोरी वाढली आहे. त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होत आहे. त्यामुळे प्रवासी वारंवार स्थानक व्यवस्थापक किंवा समाज माध्यमावर तक्रारी करीत असतात.
जमीन खरेदी व्यवहारात १४ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक; चिपळूणात दोघांवर गुन्हा
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात जमीन खरेदीच्या व्यवहारात तब्बल १४ लाख ८२ हजार ३०० रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वस्तातील सोन्याचे अमिष दाखवून दहा लाखांचा गंडा; पोलिसांकडून दहा तासात आरोपी जेरबंद
स्वस्तातील सोन्याचे आमिष दाखवून दहा लाखांची फसवणुक करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी दहा तासांच्या आत ताब्यात घेतले आहे. दैठणा पोलिस ठाणे हद्दीतील काही इसमांनी नांदेड जिल्हयातील लोकांना घराचे बांधकाम करताना सोने सापडले असुन ते आपणास स्वस्तात विकत देउ असे सांगुन १० लाख रूपयांचा गंडा घातला. सविस्तर वाचा…
सिलिंडरमध्ये बेकायदा गॅस भरण्याचा प्रकार उघड, पोलिसांकडून एकाला अटक; ८० सिलिंडर जप्त
पुणे : सिलिंडरमध्ये धोकादायक पद्धतीने बेकायदा गॅस भरण्याचा प्रकार काळेपडळ पोलिसांनी उघडकीस आणला. घरगुती वापरातील सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ८० सिलिंडर जप्त करण्यात आले. हडपसर भागात ही कारवाई करण्यात आली.
निकांत राजकुमार जाधव (वय २२, रा. शोभास्पर्श अपार्टमेंट, ससाणेनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. काळेपडळ पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी माऊली गॅस एजन्सीजवळ एका पत्र्याच्या खोलीत एक जण घरगुती वापरातील सिलिंडरमधील गॅस काढून छोट्या टाक्यात भरत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अतुल पंधरकर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ८० छोटे सिलिंडर, गॅस भरण्यासाठी वापरला जाणारा पाईप असा एक लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काळभोर, अतुल पंधरकर, महादेव शिंदे, सद्दाम तांबोळी यांनी ही कारवाई केली.
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या वकिलाचे अपहरण नाही, दुचाकी घसरून अपघात झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न
पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचे वकील साहिल डाेंगरे यांनी अपहरण करून दिवे घाटात मारहाण केल्याची तक्रार पोलिसांकडे दिली होती. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तपास केला. तेव्हा अपहरणाचा प्रकार घडला नाही. ॲड. डाेंगरे हे मद्य प्राशन करुन दुचाकी चालवित होते. दुचाकी घसरून ते पडल्याने जखमी झाले, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
ॲड. आणि त्यांचा मित्र हडपसर गाडीतळ येथील एका बिअर बारमध्ये १७ मार्च रोजी रात्री दहा वाजता गेले होते. पोलािसांनी तेथील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तांत्रिक विश्लेषणात ॲड. डोंगरे दिवे घाटात गेले. तेथून त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी केला. त्यानंतर सासवड पोलिसांना या घटनेची माहिती कळविण्यात आली. सासवड पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार घटनास्थळी जाऊ शकले नाही. त्या वेळी सासवड परिसरात आग लागली होती. ॲड. डोंगरे यांनी दिवे घाटात अपघात झाल्याने डोळ्याला दुखापत झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली होती. त्यानंतर सासवड ग्रामीण रुग्णालयतील रुग्णवाहिका तेथे आली. ॲड. डोंगरे यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेली.
१ कोटी ८४ लाख ६६ हजार रु. ची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ३ जणांचा विरोधात तक्रार
शिरूर : प्लांटमध्ये पार्टनर घेऊन त्यामधून येणारा नफा तुम्हाला देऊ असे खोटे नाटे सांगून विश्वास संपादन करत संगनमताने १ कोटी ८४ लाख ६६ हजार ६५८ रु.ची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांचा विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सविता अशोक मेसे वय ४८ वर्ष, व्यवसाय टेलरिंग, रा. स्वामी छाया फेज २ , फ्लॅट नं १९ , विठ्ठल नगर, शिरूर, जि. पुणे यांनी १) सुनिता राहुल भांगे २) राहुल नवनाथ भांगे, ३ ) ऋषी नवनाथ भांगे रा. केसनंद रोड, वाघोली मूळ रा. अरणगाव, ता. केज, जि. बीड यांचा विरोधात फिर्याद दिली आहे .
नाशिक : रंगांची उधळण आणि रहाडींमध्ये डुंबून नाशिककरांनी बुधवारी रंगपंचमीचा आनंद घेतला. रंगपंचमीनिमित्त शहरात विविध मंडळांनी वर्षानृत्यासाठी (रेन डान्स) व्यवस्था केली होती. या आधुनिक पद्धतीऐवजी परंपरेला प्राधान्य देणाऱ्यांनी जुन्या नाशिकमधील रहाडींमध्ये डुंबण्याचा आनंद घेतला.
VIDEO : नीलम गोऱ्हेंच्या समर्थनार्थ विश्वास प्रस्ताव, विरोधकांचा गोंधळ; फडणवीस म्हणाले, “मी चॉकलेट नाही तर…”
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या समर्थनार्थ सत्ताधाऱ्यांनी विश्वास प्रस्ताव आणला. या विरोधात विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी विरोधकांना चॉकलेट नाही तर कॅडबरी देण्याचा प्रयत्न केला. साधं नाही तर डेअरी मिल्क देण्याचा प्रयत्न केला आहे.
डोंबिवलीतून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता
डोंबिवली : डोंबिवली जवळील कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पिसवली गावात आपल्या कुटुंबासमवेत राहत असलेल्या दोन अल्पवयीन मुली गेल्या मंगळवारपासून राहत्या घरातून निघून गेल्या आहेत. या दोन्ही मुलींचा कुटुंबीयांनी नातेवाईक, आपल्या मूळ गावी, कल्याण, डोंबिवली शहर परिसरात शोध घेतला. त्या कुठेही आढळून आल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी सोमवारी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
दादा पाटील महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी बॅरिस्टर डॉ. पी .जी. पाटील व सौ. सुमतिबाई पाटील फेलोशिपचे मानकरी
रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयातील पाच विद्यार्थी बॅरिस्टर डॉ. पी .जी. पाटील व सौ. सुमतिबाई पाटील फेलोशिपचे मानकरी ठरलेले आहेत. महाविद्यालयात शिकणाऱ्या वेगवेगळ्या वर्गातील उच्च शिक्षण घेत असलेल्या आणि सर्वोच्च गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना ही फेलोशिप दिली जाते. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ यावर्षी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांना मिळालेली होती. यावर्षी महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना बॅरिस्टर डॉ. पी .जी. पाटील व सौ. सुमतिबाई पाटील फेलोशिप प्राप्त झाली आहे. या फेलोशिपचा धनादेश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या हस्ते फेलोशिप प्राप्त विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आला.
फेलोशिप प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये प्राजक्ता संदीप भंडारी (एस.वाय.बी.ए-८२.५०%), हर्षदा विनोद नरसाळे (टी.वाय.बी.ए- ८०.४०%), भांडवलकर अनिकेत दत्तात्रय (टी.वाय.बी.ए-७८.९७%), आदित्य दादासाहेब सुरवसे (टी.वाय.बी.ए-६६.९०%), काजी सदक हारूण (एफ.वाय.बी.ए-८२.८५ या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळालेली आहे.
“आधी कॅमेरे फोडले, नंतर गाड्या जाळल्या…” नागपूरच्या दंगलग्रस्त भागातील थरार…
नागपूर : चिटणीसपुरा चौकात सुरू झालेली दंगल गीतांजली चौकातून पुढे सरकत रात्री साडेअकराच्या सुमारास हंसापुरीपर्यंत पोहोचली. जुना भंडारा मार्गावरील दुकानावर लावलेली सीसीटीव्ही कॅमरे फोडण्यात आले. त्यानंतर दुकानासमोर उभ्या गाड्या जाळल्या. हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य करण्यात आले, असे येथील एक दुकानदार अशोक साधनकर यांनी सांगितले.
सिडकोचे ७२ लाखांची घर विकण्यासाठी ४०० कोटींची जाहिरात, भ्रष्टाचाराच्या सीमा पार करणारे सरकार, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
ठाणे : सिडकोने ७२ लाख रुपयांची घरे विक्री करण्यासाठी तब्बल ४०० कोटी रुपयांच्या जाहिराती दिल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केला आहे. भ्रष्टाचाराच्या सीमा पार करणारे हे सरकार असल्याचेही आव्हाड म्हणाले. सिडकोची घरे जाहिरातीत दर्शविलेल्या क्षेत्रफळापेक्षा कमी क्षेत्रफळ असल्याचा आरोप सोडत विजेत्यांकडून केला जात आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप “पोलिसांवर हल्ले अन गुंडाना संरक्षण!”
बुलढाणा : महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा सत्तेवर आल्यापासून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. अलीकडच्या काळात तर कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे दुर्दैवी, भीषण चित्र आहे. राजकीय गुंडाना सरकारचे संरक्षण असून राज्यातील २हजार ४०० पोलिसांवर हल्ले करण्यात आल्याचा गंभीर व खळबळजनक आरोप महाराष्टाचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट )चे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.
उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातमधील शीतलामाता देवीची पूजा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे आज शीतलामाता मंदिरामध्ये महिलांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम करून शितला सप्तमी साजरी करण्यात आली. प्रामुख्याने देशातील उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश व गुजरात या परिसरामध्ये सध्या शितला देवीची सप्तमी साजरी करण्याची परंपरा आहे. सविस्तर वाचा…
डोंबिवलीतील साई गॅलेक्सीचे शालीक भगत यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला; बनावट सात बारा उताराप्रकरणी दाखल आहे गुन्हा
कल्याण – बनावट सात बारा उताऱ्याच्या आधारे खरेदीखत, डोंबिवलीत आयरे भागात (कोपर पूर्व रेल्वे स्थानक) ६५ महारेरा प्रकरणातील साई गॅलेक्सी या बेकायदा इमारतीच्या उभारणी प्रकरणातील मे. साई डेव्हलपर्सचे भागीदार शालीक रतन भगत यांच्यावर तहसीलदारांच्या आदेशावरून रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भिवंडीत स्टेम प्राधिकरणाची जलवाहीनी फुटली; काही भागांचा पाणी पुरवठा ठप्प तर, काही ठिकाणी कमी दाबाने पाणी
ठाणे : भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाची मुख्य जलवाहीनी मंगळवारी रात्री फुटली असून तिच्या दुरुस्तीचे काम बुधवारी दिवसभर सुरू होते. यामुळे भिवंडी शहरातील पाणी पुरवठ्यावर बुधवारी परिणाम झाला असून काही भागांचा पाणी पुरवठा ठप्प झाला होता तर, काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता.
सेवानिवृत्त शिक्षकाचा पत्नीकडूनच डोक्यात दगड टाकून खून
मुलबाळ होत नसल्याने पत्नीनेच सेवानिवृत्त शिक्षक असलेल्या पतीचा डोक्यात दगड टाकून खून केल्याचे पोलिसांच्या तपासात बुधवारी समोर आले. यासंदर्भातील माहिती शिल्लेगाव पोलिसांनी दिली. याप्रकरणी शिल्लेगाव पोलिसांनी आरोपी असलेली पत्नी भारती पमुसिंग पपैया (वय ५१) हिला अटक केली आहे. सविस्तर वाचा…
दंगलीमुळे किराणा, खाद्यवस्तूंचा तुटवडा; कर्फ्युमुळे आठवड्यातील दुकाने बंद
नागपूर : नागपुरात सोमवारी (१७ मार्च २०२५) दोन धार्मिक गटांत संघर्ष पेटल्यामुळे महाल, इतवारीसह परिसरात तणाव कायम आहे. तणावामुळे इतवारीतील किराणा ओळी सलग दोन दिवसांपासून बंद असल्याने शहरातील विविध भागातील किरकोळ दुकानात किराणा, खाद्यवस्तूंचा तुटवडा जाणवत असल्याचा दावा नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाने केला आहे.
विलास सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरो
लातूर -विलास सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. निवडणुकीत विरोधकांनी माघार घेतल्याने संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले आहे. या बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांची नावे निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी नऱ्हे- विरोळे यांनी जाहीर केली आहेत .
बिनविरोध संचालकात काळे रवींद्र व्यंकटराव, बुलबुले नरसिंग दगडू ,पटेल रसूल दिलदार, पालकर तात्यासाहेब छत्रेपाटील, रणजीत राजेसाहेब मोरे, गोवर्धन मोहनराव, शिंदे वैजनाथराव ज्ञानदेवराव , बारबोले अनंत व्यंकटराव ,पवार हनुमंत नागनाथराव ,साळुंखे नेताजी शिवाजीराव ,पाटील नितीन भाऊसाहेब साळुंखे, रामराव विश्वनाथ देशमुख, अमित विलासराव, जाधव अमृत हरिश्चंद्र ,शिंदे सतीश विठ्ठलराव ,बनसोडे दीपक अर्जुन ,देशमुख वैशाली विलासराव ,देशमुख लताबाई रमेश ,बरुरे शाम भारत ,माने सुभाष खंडेराव यांचा समावेश आहे .विलासराव देशमुख यांचे सुपुत्र लातूरचे आमदार अमित देशमुख व विलासराव देशमुख यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती वैशालीताई देशमुख याही बिनविरोध संचालकांमध्ये निवडल्या गेल्या आहेत.
डोंबिवली पश्चिमेत सुभाषचंद्र बोस रस्त्याचे काम विकास आराखड्याप्रमाणे होत नसल्याने नाराजी
डोंबिवली : सुभाषचंद्र बोस रस्त्यावर कुंभारखाणपाडा, नवापाडा भागात विकास आराखड्यातील रस्त्याचे काम १८ मीटर रुंदीचे होणे आवश्यक आहे. काही स्थानिक धनदांडग्यांनी आपल्या अतिक्रमित बांधकामाला धक्का लागणार नाही म्हणून पालिकेला अतिक्रमणे तोडण्यास विरोध केला आहे.
आठ तासानंतर गॅस पुरवठा पुर्ववत,घोडबंदरवासियांचे झाले हाल; रात्रीचे जेवणासाठी हाॅटेलचा आधार
ठाणे : घोडबंदर परिसरात मंगळवारी दुपारी एका खाजगी कंपनीकडून सुरु असलेल्या खोदकामादरम्यान महानगर कंपनीची गॅस वाहीनी फुटली. यामुळे कासारवडवली, आनंदनगर परिसरातील साडेपाचशेहून अधिक ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत झाला. दुपारी ४ वाजता खंडीत झालेला गॅस पुरवठा रात्री १२ वाजता म्हणजेच आठ तासानंतर पुर्ववत झाल्याने नागरिकांना रात्रीच्या जेवणासाठी हाॅटेलचा आधार घ्यावा लागला.
नवी मुंबई : गृहनिर्माण संस्थेत ४ कोटी ४९ लाखांचा गैरव्यवहार
नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर ११ येथील हसफीन को – ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड या संस्थेत ४ कोटी ४९ लाख ५६ हजार ८३५ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी २२ जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१० ते २०२३ दरम्यान हा अपहार झाला आहे.
या संस्थेमध्ये सन २०१० ते २०२१ या कालावधीमध्ये थकबाकि रक्कम न भरता सदनिकेचा परस्पर ताबा / हस्तांतरणात गैरव्यवहार, कर्ज वसुली व भरणा रकमेतील गैरव्यवहार, इमारत दुरुस्ती फंडातील गैरव्यवहार, वसूलपात्र रकमेतील गैरव्यवहार बेकायदेशीर कमिशन व खर्च यामध्ये झालेला गैरव्यवहार आदी मार्गांनी आर्थिक अफरातफर झाली आहे. त्यांनी लेखा परीक्षकाची बोगस नियुक्ती करून, संगनमताने बेकायदा लेखापरीक्षण केले होते. नव्याने लेखापरीक्षण केल्यावर लेखा परीक्षक पाखले यांच्या चाचणी लेखा परीक्षण अहवालामध्ये सर्व प्रकार नमुद करण्यात आला आहे. या अहवालाचा आधार घेत संशयितांच्या विरोधात गैरव्यवहार, अफरातफर, आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित मोरे करीत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय, गोंडवाना विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी ४१४ कोटी
चंद्रपूर: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या दमदार पाठपुराव्यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील उपकेंद्रासाठी राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. आमदार श्री. मुनगंटीवार यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या महत्त्वाच्या चर्चेवर उत्तर देताना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यापीठासाठी ४१४ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी जाहीर केला.
साडेबारा लाख रुपयाची दारू जप्त 181 जणांना अटक
लातूर- राज्य उत्पादन शुल्क विभागाने 12 लाख 38 हजार 920 रुपयाची दारू 188 अड्ड्यावर छापा टाकून जप्त केली असून यामध्ये 181 जणांना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेडचे विभागीय उपायुक्त बी एच दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर येथील अधीक्षक केशव राऊत यांच्या आदेशानुसार अवैध हातभट्टी, देशी विदेशी दारू विक्री चोरट्या मार्गाने होणाऱ्या वाहतुकी विरोधात 14 फेब्रुवारी ते 17 मार्च यादरम्यानच्या कालावधीत लातूर, उदगीर ,निलंगा, चाकूर विभागाच्या पथकाने 181 जणांना अटक केली आहे. तब्बल 188 ठिकाणी छापे मारले आहेत यात दारूची वाहतूक करतानाचे पाच वाहने पकडण्यात आली असून 1732 लिटर हातभट्टी दारू, हातभट्टी निर्मिती करण्यासाठी लागणारे 2350 लिटर रसायन, 420 लिटर ताडी, 745 लिटर देशी दारू 119 लिटर विदेशी दारू असा 12 लाख 38 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई करताना या विभागातील निरीक्षक, दुय्यम निरीक्षक आदींनी सहभाग दिला आहे. जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने ही धडक मोहीम राबवण्यात येत आहे.
पालिकेचे स्मृती उद्यान विस्मृतीत!‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’त सुरू करण्यात आलेली योजना बारगळली
२०२५ – २६ च्या अर्थसंकल्पात पालिकेने उत्त्पन्न वाढीसाठी पाणीपट्टी करात २५ टक्के तर मालमत्ता करात ५ ते ७ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र करवाढीला नागरिकांनी केलेल्या विरोधानंतर पालिकेने माघार घेत करवाढीला स्थगिती दिली आहे.
नागपूर दंगलीतील जखमींना इतरत्र हलवणाऱ्या रुग्णवाहिकेवरही हल्ला.. पोलीस उपयुक्तही…
नागपूर : महाल परिसरातील दंगलीत जखमी पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यासह इतरही जखमींना मेयो रुग्णालयात हलवण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर तीन रुग्णांना न्यू ईरा रुग्णालयात हलवण्यात येणार होते. त्यापैकी कदम यांना घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेवर दगडफेक झाली. रुग्णवाहिकेच्या चालकाच्या प्रसंगावधानाने कदम थोडक्यात बचावले.
परतूरमध्ये महावितरणच्या तंत्रज्ञास धक्काबुक्की, जिवे मारण्याची धमकी ; एकावर गुन्हा दाखल
जालना : थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केला म्हणून महावितरणच्या तंत्रज्ञास धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या एकावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या परतूर शहर शाखेचे वरिष्ठ तंत्रज्ञ रामेश्वर भामट हे १८ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास साईबाबा चौक भागात कर्तव्य बजावत होते. वीजबिलधारकांचे कट केलेले कनेक्शन पुन्हा जोडून येताना त्या ठिकाणी एक टपरीचालक पुनर्जोडणीबाबत चौकशी करीत होता. त्यावेळी सोन्यासिंग टाक हा तेथे आला. त्याने भामट यांच्या हातातील वीजबिल थकबाकीदार ग्राहकांची यादी व पेन हिसकावून घेतला. अशोक माठे या नावाने मी विजेचे कनेक्शन वापरतो. ते तू का कट केले, असे म्हणत त्याने गोंधळ घातला. बिल थकीत असल्याने कनेक्शन कट केल्याचे समजावून सांगितले असता टाकने भामट यांना शिविगाळ व धक्काबुक्की केली. त्यांची मोटारसायकल ढकलून दिली. तू माझे कनेक्शन जोडले नाही तर तुझे हातपाय तोडून जिवे मारून टाकतो, अशी धमकी दिली.
याप्रकरणी भामट यांच्या फिर्यादीवरून आरोपी सोन्यासिंग टाक याच्यावर परतूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदलापुरात थकबाकीदारांची नावे थेट बॅनरवर; वसूली वाढवण्यासाठी पालिका मुख्याधिकाऱ्यांचा धाडसी निर्णय
बदलापूरः कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता कराची थकबाकी भरणाऱ्याकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांची नावे शहरात जाहीरपणे थेट बॅनरवर झळकली आहेत. पालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी असे बॅनर लावले जातील असे स्पष्ट केले होते.
महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन
Maharashtra News Live Today, 19 March 2025 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा