Maharashtra News Updates Today: ओबीसी आरक्षणावरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले असून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंना घरी जाऊन स्वयंपाक करा असा सल्ला दिल्याने वादाला तोंड फुटलं आहे. तर दुसरीकडे ईडीने शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर कारवाई केली असून छापे टाकले आहेत. यामुळे राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.
तसंच आता केंद्र शासनाने साखर निर्यातीवर निर्बंध लादले आहेत. १०० लाख टनांपेक्षा अधिक साखर निर्यात होणार नाही, असा पवित्रा केंद्र शासनाने घेतला आहे. साखर निर्यातबंदी लागू केल्याने साखर उद्योगात नाराजीचा सूर आहे. याशिवाय दहशतवादी कारवायांसाठी निधीपुरवठा प्रकरणी कोर्टाने काश्मीरमधील फुटीरवादी नेता यासीन मलिकला सुनावलेली फाशीची शिक्षा, कपिल सिब्बल यांनी काँग्रेसमधून राजीनामा देत सपाचा घेतलेला पाठिंबा, मुंबईत दुचाकीवरील सहप्रवाशासाठी हेल्मेटसक्ती असे अनेक विषय चर्चेत आहेत.
अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.
Maharashtra Latest News Updates : शिवसेना नेते अनिल परब यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे आणि रत्नागिरीतील सात ठिकाणी छापेमारी
ईडीने राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावर छापेमारी केली. तसेच तब्बल १३ तास चौकशी करण्यात आली. यानंतर अनिल परब यांनी माध्यमांसमोर येऊन ईडीच्या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया दिली.
शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळेंबाबत केलेलं वक्तव्याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
प्रेयसीला सीताबर्डीतील हॉटेलमध्ये नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करताना मोबाईलने अश्लील छायाचित्र काढून समाज माध्यमांवर प्रकाशित केले. या प्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
अकोला जिल्ह्यातील कृषीनगर भागातील अंगावर काटा आणणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आरोपी पती अमानुषपणे बायकोला मारहाण करताना दिसत आहे.
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. डीएचएफल प्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली आहे.
महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांमागे ईडी आणि आयकर विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. यातील अनेक नेत्यांवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अगोदर आरोप केलेले आहेत. नंतरच महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. याच कारणामुळे ईडी आणि आयकर विभागाच्या कारवाईची माहिती सोमय्या यांना सर्वप्रथम कशी मिळते, असा प्रश्न नेमही विचारला जातो. या प्रश्नाचे उत्तर आता खुद्द किरीट सोमय्या यांनीच दिले आहे. सविस्तर बातमी
संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरुन राज्यात सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. या सर्व घडामोडींदरम्यान संभाजीराजेंनी फेसबुकवर छत्रपती शिवाजी महारांना वाकून नमस्कार करताना स्वत:चा एक फोटो भावनिक मजकुरासहीत पोस्ट केलाय. तर दुसरीकडे त्यांचे पुत्र शहाजीराजे छत्रपती यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शहाजीराजे छत्रपती सोलापुरात असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वडिलांच्या उमेदवारीवरुन सुरु असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं. राजकारणाचा चिंता रोजच्या जीवनात आणणं हे मला पटत नाही असं यावेळी त्यांनी सांगितलं.
शिवसेना खासदार संजय राऊत आणि पक्षाचे कोल्हापूर विभाग प्रमुख संजय पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार उपस्थित होते.
शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या मुंबई येथील घरावर सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने छापा टाकला आहे. ईडाच्या या कारवाईनंतर एकच खळबळ उडाली आहे. मुंबईसोबतच पुणे आणि रत्नागिरी येथेदेखील ईडीची कारवाई सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा धारण केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मध्यप्रदेशच्या धर्तीवर राज्यातही ओबीसी आरक्षण लागू करून घ्यावे अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. भाजपने याच मागणीला घेऊन बुधवारी मंत्रालयावर मोर्चा काढला. असे असताना आता राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार यांनी ओबीसी आरक्षणावर महत्त्वाचे भाष्य केले आहे.
शेअर बाजारात गुंतवणूक करा, तुम्हाला आकर्षक व्याजाचा परतावा मिळेल असे सांगून शेअर्सचे व्यवहार करणाऱ्या डोंबिवली पूर्वेतील फडके छेद रस्त्यावरील एका खासगी आस्थापनाने एका सेवानिवृत्त नोकरदाराची १३ लाख ८० हजार रूपयांची फसवणूक केली. सेवानिवृत्ताने याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात खासगी आस्थापना चालका विरुद्ध तक्रार केली.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. सुप्रिया सुळेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटलांनी त्यांना स्वयंपाक करण्याचा सल्ला दिला होता. तसंच दिल्लीत जा नाहीतर मसणात जा असं म्हटलं होतं. त्यानंतर सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे यांनी संताप व्यक्त करत चंद्रकांत पाटलांना स्त्रीद्वेषी म्हटलं होतं. या सर्व घडामोडींवर चंद्रकातं पाटील यांना उत्तर दिलं आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अनिल परब यांची चौकशी सुरू असून त्यासंदर्भातच या धाडी टाकल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये किरीट सोमय्यांनी आरोप केलेल्या दापोलीतील रिसॉर्टवर देखील धाडी टाकण्यात आल्याचं समोर आलं आहे. यावरून आता राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून त्यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तपास यंत्रणांचा तो अधिकार असल्याचं नमूद करतानाच अजिच पवारांनी सूचक शब्दांत टोला देखील लगावला आहे.
‘‘तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा, नाही तर मसणात जा’’, असे बेताल विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून केले. या वक्तव्यावरुन वाद सुरु असतानाच आता काँग्रेसच्या नेत्या तसेच ठाकरे सरकारमधील महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी चंद्रकांत पाटलांना खडेबोल सुनावले आहेत. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावरुन निशाणा साधताना यशोमती ठाकूर यांनी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा संदर्भ दिलाय. येथे वाचा सविस्तर वृत्त
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याचं कारण सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे. सचिन वाझेंनी आरोपींविरोधात आपल्याकडे असणारी सर्व माहिती देण्याची तयारी दर्शवली असून यामध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही समावेश आहे.
"तुम्ही सूडाच्या भावनेने कितीही कारवाया केल्या तरी आमच्यावर कोणताही दबाव येणार नाही. सर्व निवडणुका सुरळीत पार पडतील, सरकार सुरळीत चालेल. अशा कारवायांमुळे भाजपा रोज खड्ड्यात जात आहे. महाराष्ट्रातील राजकारणाला इतकं वाईट वळण गेल्या ५५ वर्षात कधी मिळालं नाही," अशी टीका संजय राऊतांनी अनिल परबांवरील ईडी कारवाईवर बोलताना केली आहे.
कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याने त्यांच्या उमेदवारीचा विषय मागे पडला. राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीत संभाजीराजे हे अपक्ष म्हणून लढण्यावर ठाम असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. संभाजीराजे हे निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्यास १० जूनला प्रत्यक्ष मतदान होईल. याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच संभाजीराजेंनी फेसबुकवर छत्रपती शिवाजी महारांना वाकून नमस्कार करताना स्वत:चा एक फोटो भावनिक मजकुरासहीत पोस्ट केलाय. येथे पाहा संभाजी राजेंनी नेमकं काय म्हटलंय या पोस्टमध्ये
परिवहन मंत्री अनिल परब यांनाही आता तुरूंगाची हवा खावी लागेल. त्यांनी आता त्यासाठी तयार रहावे, असा इशारा भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे. अनिल परब यांच्या निवासस्थानी व राज्यात सात ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापासत्र सुरू केले. सोमय्या यांनी परब यांच्या विरोधात विविध पातळ्यांवर तक्रारी नोंदविल्या असून ईडीने त्यासंदर्भात गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यानेही परब यांना पैसे दिल्याचा जबाब दिला आहे.
शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्र्यातील घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने ही धाड टाकली असून मुंबईसोबतच पुणे आणि रत्नागिरीमधील ठिकाणांचीही पाहणी केली जात आहे.
जम्मू काश्मीरमधील बडगम जिल्ह्यात एका ३५ वर्षीय सोशल मीडिया स्टारची दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यात महिलेचा १० वर्षाचा भाचा जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबाने हा हल्ला केला.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण मिळावं यासाठी भाजपाने बुधवारी मंत्रालयावर मोर्चा काढला होता. महाविकास आघाडी सरकार ओबीसींची फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला. दरम्यान यावेळी सुप्रिया सुळेंबद्दल बोलताना मात्र त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याला सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे यांनी उत्तर दिलं आहे.
अनेक महत्वाच्या घडामोडी राज्यात, देशात, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्हाला आता एकाच ठिकाणी वाचू शकता