Maharashtra News LIVE Updates : पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला आज (२८ फेब्रुवारी) पुणे पोलिसांनी अटक केलं आहे. आज आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या घटनेबाबत बोलताना केलेल्या एका विधानावरून ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. “राज्याचे गृहराज्यमंत्री दिव्यच आहेत”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी योगेश कदम यांच्यावर टीका केली आहे. या बरोबरच बीडमधील मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे. त्यामुळे आता दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्र नेमकं काय म्हटलं आहे याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. या बरोबरच राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. यासह राज्यातील सर्व राजकीय व इतर घटनांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Live News Update Today, 28 February 2025 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती ब्लॉगद्वारे जाणून घ्या.
मंत्री योगेश कदम यांच्या असंवेदनशील विधानाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल; मंत्र्यांना सल्ला देताना म्हणाले…
पुण्यातील स्वारगेट बस आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली असताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबत असंवेदनशील विधान केले होते. शिवशाही बसमध्ये जी घटना घडली त्यात कुठेही पीडितेकडून प्रतिकार झाला नाही. त्यावेळी बसच्या आजूबाजूला काही लोक उभे होते. पण प्रतिकार न झाल्यामुळे याबाबत कुणाला शंका आली नाही, असे विधान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले होते. या विधानानंतर विरोधकांनी टीकेची राळ उठवली आहे. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत आपली भूमिका मांडत. नव्या मंत्र्यांना एक सल्ला दिला आहे.
करोना काळात नागपूर कारागृहातून फरार! दोन आरोपी चार वर्षानंतर…
चंद्रपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृह शिक्षा भोगत असताना करोना संक्रमण काळात आकस्मिक अभिवचन रजेवर असताना विहीत कालावधीत कारागृहात परत न येता फरार झालेल्या विकास उर्फ विक्की बद्रीप्रसाद तिवारी व दिपक उर्फ सुरेश यशवंत पुणेकर या दोन बंद्यांना चार वर्षानंतर अटक करण्यात चंद्रपूर पोलीसांना यश आले आहे.
ठाणे : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाने त्याच्याच मित्राच्या कानाला चावा घेऊन कानाची पाळी तोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
‘शक्ती कायद्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “शक्ती कायद्यात काही बदल…”
शक्ती कायद्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, ठआपण जो शक्ती कायदा तयार केला होता. तो शक्ती कायदा अनेक कायद्यांचा अधीक्षेप करणारा कायदा होता. त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने काही आक्षेप घेतले होते, तसेच सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय होते, त्या निर्णयावरही तो कायदा अधिक्षेप करत होता. त्यामुळे तसा अधिकार राज्याला नाही. त्यामुळे त्यामध्ये काही बदल करण्याची आवशक्यता होती. तसेच त्या कायद्यात काही बदल करण्याच्याआधी केंद्र सरकारने नवीन कायदे तयार केले. तसेच आपण शक्ती कायद्यात ज्या गोष्टी टाकल्या होत्या त्यातील बहुतांश गोष्टी केंद्राच्या नवीन संहितेत आलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही शक्ती कायद्याबाबत पुन्हा एकदा आढावा घेऊ आणि आवश्यक असेल तर आम्ही पुढील कार्यवाही करू”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आईस्क्रिमसाठी चिमुकली दुकान गेली अन् घडला अनर्थ…
वाशीम : पुणे येथील स्वारगेट बसस्थानकावर बंद बसमध्ये तरुणीवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच वाशीम जिल्ह्यातून देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.सात वर्षीय चिमुकली आईस्क्रीम आणण्यासाठी दुकानात गेली. दुकानातील १९ वर्षीय तरुणाची वाईट नजर त्या चिमुकलीवर पडली. त्यामुळे सात वर्षीय चिमुकलीवर १९ वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वाशीम शहरात घडली आहे.
आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला का? आरोपीला कसं पकडलं, कोणती माहिती समोर आली? फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला आज (२८ फेब्रुवारी) पुणे पोलिसांनी अटक केलं आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत महत्वाची माहिती सांगितली आहे.
कल्याणमध्ये गोविंदवाडी रस्त्यावरील तबेल्यांना घेतलेल्या चोरीच्या नळ जोडण्यांवर कारवाई
कल्याण : कल्याण पूर्व भागाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी दुर्गाडी किल्ला, पत्रीपूल भागातील गोविंदवाडी रस्त्यावरून जाते. या जलवाहिनीवर गोविंदवाडी भागातील म्हशींच्या तबेले मालकांनी अधिक संख्येने चोरीच्या नळ जोडण्यात घेतल्या होत्या. त्यामुळे कल्याण पूर्वेतील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला होता
कल्याण एस. टी. बस आगार, रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांचे पथसंचलन
कल्याण : पुणे येथील स्वारगेट बस आगारातील महिलेवरील लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या पोलिसांनी गुरुवारी रात्री पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे आणि पथकाने पथसंंचलन केले. यावेळी कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातील बस आगार, आगारातील बसची तपासणी करण्यात आली.
शेवटची टिप देणाऱ्याला मिळणार एक लाख रुपये, पुणे पोलीस आयुक्तांनी नेमकं काय सांगितलं?
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका पडीक शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या घटनेनंतर सर्वत्र संतप्त भावना व्यक्त झाल्या. या पार्श्वभूमीवर घटना घडल्यापासून फरार असलेला आरोपी दत्तात्रय गाडेच्या अखेर पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शेवटी त्याच्या गावात एका कॅनॉलच्या खड्ड्यात दत्तात्रय गाडे लपलेला पोलिसांना सापडला. यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्थानिक नागरिकांचे आभार मानले असून ते त्यांच्या सत्कारासाठी गुणाट गावात जाणार आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
“स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत महिला आयोग…”, रुपाली चाकणकरांची महत्वाची प्रतिक्रिया
पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केलं आहे. याबाबत आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हटलं आहे की, “स्वारगेट बस स्थानकात झालेल्या अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीला अखेर शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून रात्री १:30 वा.पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सलग ३ दिवस आरोपीचा जलद गतीने शोध घेण्यासाठी पुणे पोलीसांच्या १३ पथकांसह संयुक्त कारवाईत शोध घेण्यासाठी ड्रोन आणि श्वान पथक तैनात केले होते. याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करतच आहे. पण असे गुन्हे घडूच नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो”, असं त्यांनी म्हटलं आहे.
स्वारगेट बस स्थानकात झालेल्या अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीला अखेर शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून रात्री 1.30 वा.पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 28, 2025
सलग 3 दिवस आरोपीचा जलद गतीने शोध घेण्यासाठी पुणे पोलीसांच्या 13 पथकांसह संयुक्त कारवाईत शोध घेण्यासाठी ड्रोन आणि श्वान पथक तैनात केले…
मुंबईतील चिंचपोकळीच्या निर्मल पार्क इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या १० गाड्या दाखल
Chinchpokli Fire : मुंबईतील चिंचपोकळी परिसरातील निर्मल पार्क येथील इमारतीच्या काही मजल्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १० गाड्या दाखल झाल्या असल्याची माहिती सांगितली जात आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
स्वारगेट प्रकरणातील आरोपीला अटक; अजित पवारांची महत्वाची प्रतिक्रिया; म्हणाले…
पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आलं आहे. यानंतर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं की,”एखादी घटना घडल्यानंतर मीडियाने ती कशी मांडावी हा त्यांचा अधिकार आहे. काल पुण्यातील घटनेचा सगळ्यांनीच निषेध केला आहे. ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. त्या नराधमाला ताबडतोब अटक व्हायला हवी म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करत होतो. काल मध्यरात्रीनंतर त्याला अटक केली आहे. तो पोलिसांच्या ताब्यात आहे. सविस्तर चौकशी चालू आहे. आज त्याला कोर्टातही हजर केलं जाणार आहे. त्यातून वस्तुस्थिती समोर येईल. मी सकाळीच पोलीस आयुक्तांशी बोललो. त्यांनी मला सांगितलंय की आरोपीला मध्यरात्री ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी चालू आहे”, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
“एकनाथ शिंदे मोठे साहित्यिक, लेखक, कवी…”, संजय राऊतांची उपमुख्यमंत्र्यांवर टीका
खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे फार मोठे साहित्यिक, फार मोठे लेखक, फार मोठे कवी, फार मोठे संत आहेत. यापेक्षा अजून काही पदवी द्यायची असेल तर देऊ. एकनाथ शिंदे अशा पदव्या विकत घेऊ शकतात. आमदार आणि खासदार जसे विकत घेतले जातात त्या प्रकारे साहित्यिक, लेखक, कवी या पदव्या जर एकनाथ शिंदेंना हव्या असतील तर ते त्या पदव्या विकत घेऊ शकतात. एकनाथ शिंदे यांना अमित शाह अजून पुरस्कार देऊ शकतात. एवढंच नाही तर ते एकनाथ शिंदेंना ज्ञानपीठ पुरस्कार देखील देऊ शकतात”, अशा खोचक शब्दांत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली
योगेश कदमांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून ठाकरे गट आक्रमक; संजय राऊत म्हणाले…
पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे याला आज (२८ फेब्रुवारी) पुणे पोलिसांनी अटक केलं आहे. स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या घटनेबाबत बोलताना केलेल्या एका विधानावरून ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. “राज्याचे गृहराज्यमंत्री दिव्यच आहेत”, अशा शब्दांत आता संजय राऊत यांनी योगेश कदम यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी केली अटक
पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बलात्कारची घटना घडली होती.या आरोपीचा शोध १३ पथकांच्या माध्यमांतून घेतला जात होता,पण अखेर या आरोपीला गुणाट या गावातून पोलिसांनी अटक केली आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी केली अटक, (फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)