Marathi News Updates: कॉमेडियन कुणाल कामरा याने काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांमधून प्रतिक्रिया उमटत आहेत. याचबरोबर बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सुनावनी सुरू झाली असून, या प्रकरणातील नवनवे होत आहेत. तसेच छत्रपती संभाजीराजे यांनी कोणतेही ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावे नसल्याने रायगड किल्ल्यावर असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला राज्यातील काहींनी विरोध केला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात औरंगजेबाची कबर आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियानच्या मृत्यूचा मुद्दाही गाजला होता. त्याबाबत अधिवेशनानंतरही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
Maharashtra News Live Today, 28 March 2025 : राज्यात गाजत असलेले कुणाल कामरा-एकनाथ शिंदे प्रकरण, रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याची समाधी आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणासह महत्त्वाच्या घडामोडी.
‘किस मुँह से कहूँ, ये मेरा वही शहर है…?’ नागपुरातील दंगलीनंतर..
नागपूर : ‘किस मुँह से कहूँ, ये मेरा वही शहर है जो कभी अमन का पैगाम दिया करता था, अब तो जख्म इतने हुए है की, ठीक होने मे सदिया गुजर जाएगी’ ही वेदना आहे भालदारपुरा परिसरातील अबू बकर खान यांची… दंगलीने त्यांना आंतर्बाह्य हादरवून सोडले आहे… ‘ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरम’चे ते सरचिटणीस… जन्मापासून अर्थात गेल्या सहा दशकांपासून नागपुरात राहतात… या सहा दशकांत त्यांनी नागपूरचा सामाजिक सौर्हादच पाहिलेला… दंगलीच्या रात्री मात्र अबू बकर खान यांच्या डोळ्यात वसलेल्या सौर्हादाच्या सुंदर चित्राला विध्वंसाचे तडे गेले… तेव्हापासून ते सारखे विचारताहेत…
अकोला : वसुलीसाठी रणरागिणी मैदानात; तीन दिवसांत १९० कोटी…
अकोला : वीज बिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मोठ्या थकबाकीदार ग्राहकांकडील देयक वसूल करण्याची जबाबदारी महावितरणच्या रणरागिणी यांनी घेतली. त्या कारवाईसाठी थेट ग्राहकांच्या दारात पोहोचत आहेत. चालू आर्थिक वर्षाचे केवळ तीन दिवस शिल्लक असताना अजूनही परिमंडळातून १९० कोटी वसुली बाकी आहे.
महाराष्ट्र एक्सप्रेस १ जूनपासून कात टाकणार….!
गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांकरिता जीवनदायिनी ठरणारी महाराष्ट्र एक्सप्रेस एक जूनपासून कात टाकणार आणि आपल्या नवीन स्वरूपात धावणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिलेली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या काकू सरकारवर नाराज
चंद्रपूर: या जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम आणि सिंंचन विभागाला वाळू घाट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र प्रधानमंत्री घरकुल लाभार्थ्यांना वाळू दिली जात नाही. त्यामुळे जिल्ह्यात घरकुलाची कामे थंड बस्त्यात आहेत. वाळू धोरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर त्यांच्या काकू माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घरकुल योजनाला वाळू उपलब्ध करून दिली नाही तर आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
चंद्रपूर : वन अकादमीतील बंद खोलीत लाखोंचे साहित्य पडून
चंद्रपूर : वन अकादमीतील एका बंद खोलीत स्नेक बाईट उपचार किट्स, प्रथमोपचार किट्स, हार्ड डिस्क, माईक्स, कॅटरेज आणि इतर महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे अनेक बॉक्स आहेत. ही सर्व उत्पादने नवीन पॅकिंगमधील आहेत. त्यावर मोठ्या प्रमाणात उधळी लागल्यामुळे त्याची नासाडी झाली आहे. सरकारी निधीतून खरेदी केलेली ही लाखोंची उत्पादने अशा स्थितीत सापडणे हे निष्काळजीपणाचे आणि भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण आहे. हा धक्कादायक प्रकार आम आदमी पक्षाने समोर आणला असून कारवाईची मागणी केली आहे.
नवी मुंबई शहरात आज पाणीपुरवठा बंद
नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील पाणीपुरवठा जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे शुक्रवारी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद राहील.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीला सीबीडी बेलापूर, सेक्टर २८ येथे गुरुवारी गळती लागली. शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून येथे पाइपलाईन दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद करावा लागणार आहे.
त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात व सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे येथे होणारा संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. तसेच शनिवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी, तसेच पाणी जपून वापरावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाकडून शैक्षणिक शुल्कात वाढ
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाने २०२४-२५ व पुढे या शैक्षणिक वर्षासाठी बीए, बीकॉम, बीएसस्सी, एमएसस्सी, एमबीए, मास कम्युनिकेशन, बीपीएड, फॅशन डिझाईन या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्कात प्रचंड वाढ करून विद्यार्थ्यांची आर्थिक लुट सुरू केली आहे. अचानक केलेल्या या शुल्कवाढीमुळे विद्यार्थ्यांसमोर चिंतेचे सावट आहे. दरम्यान गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे पूर्ण करायचे असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
नागपूर : दंगलीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा, उपासमारीची वेळ, पुन्हा तीन दिवस दुकाने बंद
नागपूर: शहरात झालेल्या धार्मिक दंगली नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा आहे. दंगल झालेल्या भागापासून नजीकच असलेल्या रेशीम बागेतील स्मृती मंदिराला मोदी भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारच्या दौऱ्याच्या निमित्ताने एसपीजीचे पथक नागपुरात दाखल झाले असून, गुरुवारी त्यांनी सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला.
धरण उशाला आणि कोरड घशाला ! गावात पाण्याच्या चार टाक्या असूनही…
भंडारा : धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती सध्या ठाणा पेट्रोल पंप गावातील नागरिक अनुभवत आहेत. जल जीवन मिशन योजनाअंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या दोन पाण्याच्या टाक्या आणि जुन्या दोन अशा चार पाण्याच्या टाक्या असताना ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. नवीन टाक्या सुरू दोन वर्षांपासून सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असून नागरिकांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे.
घे भरारी! लहान गावात शिकून आंतरराष्ट्रीय पातळीवर झळाळी, क्षितिजाला विख्यात फोर्बस पुरस्कार
वर्धा : लहान गावात शिकून आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकणारे विरळेच. त्यामुळे त्यांचे यश नेत्रदीपक म्हटल्या जाते. असे यश मिळवून परत जमिनीवर पाय ठेवून गरजू लोकांना मदत करण्याची भावना असणे महत्वाचे. तसेच क्षितिजा वडतकर वानखेडे यांच्या बाबतीत म्हटल्या जाते.
वाघांची अवैध शिकार थांबवण्यासाठी वन विभागाकडे गुप्तचर यंत्रणाच नाही…
नागपूर : राज्यात वाघांची अवैध शिकार, अवैध मासेमारी असे प्रकार थांबवण्यासाठी राज्याच्या वनविभागाकडे पुरेशी गुप्तचर यंत्रणाच उपलब्ध नसल्याचा दावा न्यायालयीन मित्राने न्यायालयात केला. गुप्तचर यंत्रणा प्रभावी नसल्याने राज्यात अवैध शिकारीचे प्रमाण वाढत आहे आणि वनविभाग यावर आळा बसवण्यात असमर्थ दिसत आहे, असेही ते म्हणाले.
“सौगत-ए-मोदी म्हणजे, करदात्यांच्या पैशाने…”, उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रियंका चतुर्वेदींचे समर्थन
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘सौगत-ए-मोदी’ वरील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, “…’सौगत-ए-मोदी’ म्हणजे काय? या भेटवस्तू करदात्यांच्या पैशाने वाटल्या जात आहेत आणि त्याचे श्रेय पंतप्रधान मोदींना जातात आहे. उद्धव ठाकरे यांनी हाच फरक स्पष्ट केला आहे.”
कल्याण पूर्वेतील शिंदे शिवसेनेची उपशहरप्रमुख ते संघटक पदांची कार्यकारिणी बरखास्त; जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांचा आदेश
कल्याण – शिंदे शिवसेनेची कल्याण पूर्वेतील उपशहरप्रमुख ते संघटक पदापर्यंतच्या सर्व महिला, पुरूष पदांना स्थगिती देण्यात आली आहे. आपल्या कामाचा आढावा घेऊन, मुलाखती घेऊन पुढील नेमणुका केल्या जातील, असे पत्र शिवसेना कल्याण पूर्व शिंदे सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी गुरुवारी काढले आहे. या आदेशामुळे कल्याण पूर्वेतील उपशहरप्रमुख ते संघटक पदापर्यंतची कार्यकारिणी या आदेशामुळे रद्द झाली आहे.
Uddhav Thackeray: “त्यांनी असं विधान करायला नको होतं”, उद्धव ठाकरेंच्या ‘सौगत-ए-मोदी’वरील टीकेवर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
भाजपाच्या ‘सौगत-ए-मोदी’ उपक्रमावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा उपक्रम ‘सौगत-ए-सत्ता’ असल्याची टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले की, “त्यांनी असं विधान करायला नको होतं. मोदींचा हा उपक्रम अल्पसंख्याकांना विश्वास देण्यासाठी आहे.”
Marathi News Live Updates : मध्य आफ्रिकेत समुद्री चाच्यांनी बंधक बनविलेल्या खलाश्यांमध्ये रत्नागिरीतील दोन तरुणांचा समावेश
समुद्री चाच्यांनी एमव्ही बिटू रिव्हर या जहाजावर हल्ला करुन बंधक बनवलेल्या १० खलाशांमध्ये रत्नागिरीतील दोन तरुणांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. बंधक असलेल्या या दोघांना सोडवण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी रत्नागिरीतील कुटुंबांनी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे केली आहे.
Disha Salian: “दिशा सालियनच्या वडिलांना हाताशी धरून राजकारण”, ठाकरे गटाचा आरोप
राज्यात पाच वर्षांनी पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरण चर्चेत आले आहे. याबाबत बोलताना शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी दिशा सालियनच्या वडिलांना हाताशी धरून राजकारण सुरू असल्याचा आरोप केले आहे. ते म्हणाले, “दिशा सालियनच्या घरात आर्थिक चणचण होती. ती मुलगी नैराश्यात होती हा त्यांचा कौटुंबीक विषय आहे. त्याचावरून आम्हाला राजकारण करायचे नाही. पण, आता पाच वर्षांनी तिच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करत आहेत, त्यांना लख लाभ होवो.”
Kunal Kamra: “त्याच्या आयुष्याची कॉमेडी करा, केतकी चितळेही…” कुणाल कामरा प्रकरणावर भाजपा नेत्याचा आक्रमक पवित्रा
भाजपाचे माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिसांनी कॉमेडियन कुणाल कामराच्या आयुष्याची कॉमेडी करावी, असे विधान केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोतलाना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “पोलिसांनी त्याला पकडावे आणि त्याच्या आयुष्याची कॉमेडी करावी. भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही काहीही बोलू शकत नाही. प्रत्येकाला स्वाभिमानाचा अधिकार आहे. केतकी चितळेने कोणाचे नावही घेतले नव्हते तरी तिला ३० दिवस तुरुंगात ठेवले. त्यामुळे विरोधकांना आम्हाला शिकवण्याचा अधिकार नाही.”
Maharashtra News: “मोदींनी त्यांच्या कार्यकाळात कोणत्याही मुस्लिमावर अत्याचार केले नाहीत”, शिंदे गटाकडून पंतप्रधानांचे समर्थन, ठाकरेंवर टीका
भाजपाच्या ‘सौगत-ए-मोदी’ या अभियानावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर देताना शिवसेना (एकनाथ शिंदे) नेत्या मनीषा कायंदे म्हणाल्या, “मोदींनी त्यांच्या कार्यकाळात कधीही कोणत्याही मुस्लिमांवर अत्याचार केले नाहीत. खरं तर, त्यांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, महाविकास आघाडी नेहमीच मुस्लिमांना खूश करण्याचा प्रयत्न करत असते.”