Marathi News Updates राज्यासह देशभरात आज रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी केलेला कॉमेडियन कुणाल कामरा हा आज मुंबई पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता आहे. याबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पक्षाच्या पाडवा मेळाव्यात वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले आहे, त्यावरून राजकीय वर्तुळात आज प्रतिक्रिया उमटू शकतात. याबरोबरच राज्यात औरंगजेबाची कबर तसेच रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक वादाच्या भोवऱ्यात आहे, या आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी आपण येथे जाणून घेणार आहोत
Mumbai-Maharashtra News Live Today, 31 March 2025 : राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…
‘एचएसआरपी’ नंबरप्लेट आता घरपोच? २५ गाड्यांहून जास्तची मागणी असलेल्या सोसायटीमध्ये…
नागपूर : राज्याच्या परिवहन खात्यातर्फे २०१९ पूर्वीच्या सगळ्याच वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्याची सक्ती करण्यात आली आहे. पूर्वी संबंधित केंद्रावर जाऊन ही पाटी बसवावी लागत होती. परंतु आता सोसायटी असेल किंवा कमीतकमी २५ गाड्या असतील तर त्यांच्यासाठीही ही सुविधा तेथे संबंधित केंद्रातर्फे दिली जाईल.
धुळ्यातील सोनोग्राफी केंद्रावर छापा…बेकायदेशीररित्या गर्भपाताचा संशय
धुळे : बेकायदेशीरपणे गर्भपात करण्यात येत असल्याच्या संशयावरुन धुळे येथील साक्री रस्त्यावर असलेल्या सुमन हॉस्पिटलमधील सोनोग्राफी केंद्रावर सोमवारी जिल्हा वैद्यकीय विभागाच्या चौकशी पथकाने कारवाई केली. चौकशी पथकाने छापा टाकला त्यावेळी सोनोग्राफी केंद्रात दोन महिला रुग्ण आढळून आल्या.गर्भपात सुरु असताना रुग्णालयातील डॉ. सोनल वानखेडे या उपस्थित नव्हत्या. रुग्णालयातील इतर महिला कर्मचाऱ्यांकडून कडी बंद खोलीत गर्भपात करण्यात येत असल्याचे आढळले.
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, शेतात पाइप बदलवण्यासाठी गेले अन्…
भंडारा : विद्युत पुरवठा सुरू होण्याआधी शेतात पाईप बदलवून येतो असे पत्नीला सांगून शेतावर गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला आणि ठार केले. ही घटना लाखांदूर तालुक्यातील खैरी पट गावातील शेतशिवरात काल रात्रीच्या सुमारास घडली. डाकराम देशमुख (४३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली.
सावधान ! तापमानाचा पारा वाढतोय, पण…
नागपूर : राज्यात तापमानाचा आलेख वाढतच चालला आहे. विदर्भ या तापमानात अक्षरशः होरपळून निघत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमान सातत्याने ४२ अंश सेल्सिअसपलीकडे चालले आहे. एकीकडे तापमानात झपाट्याने वाढ होत असताना हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात बालविवाहाचा शाप, पाच वर्षांत ४८ बालविवाह
चंद्रपूर मध्ये जिवती, कोरपना, पोंभूर्णा हे तीन ग्रामीण तालुके आहेत. शहरी भाग सोडला तर ग्रामीण भागात बालविवाह नित्याने होत असल्याचे दिसून आले आहे.
पोलीस हत्या प्रकरणी चार आरोपी गजाआड, अनैतिक संबंधांची किनार! स्थानिक नेत्याने दिलेल्या सुपारी नंतर ‘टायगर’ने केला ‘गेम’…
मृत पोलिसाच्या नात्यातील व गावातील एका स्थानिक पुढाऱ्याने एका कुख्यात गुंडाला सुपारी देऊन पोलिसाला संपविल्याचे आढळून आले.
“२०२९ मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान, त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या स्पर्धेत मी…”, मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
वयाची ७५ वर्ष पूर्ण झाल्यावर राजकारणातून दूर व्हावे आणि नव्या पिढीला संधी द्यावी असे फर्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच काही वर्षांपूर्वी काढले होते.
छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात सोमवारी सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक महिला माओवादी ठार झाली आहे.
दंतेवाडा-विजापूर सीमेवर माओवादी असल्याबद्दल गुप्त माहिती मिळाली होती, त्यानंतर सुरक्षा दलांनी कारवाई केली. दरम्यान सकाळी ९ वाजता ही चकमक सुरू झाली. पोलिसांना या महिला माओवाद्याकडून एक ऑटोमॅटीक INSAS रायफल जप्त केली आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान माओवादी आणि सुरक्षा यंत्रणा यांच्यात अजूनही गोळीबार सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
याबरोबरच छत्तीसगडमध्ये या वर्षभरात मारल्या गेलेल्या माओवाद्यांची एकूण संख्या १३५ झाली आहे. २०२४ मध्ये ही संख्या २१९ होती.
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटदिन सोहळ्यानिमित्त अक्कलकोट नगरी भक्तांनी गजबजली
– अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटदिन सोहळ्यानिमित्त अक्कलकोट नगरी भक्तांनी गजबजली
– आज पहाटेपासून शेकडो भाविक श्री स्वामी समर्थांच दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे आहेत
– श्री स्वामी समर्थ्यांचे दर्शन घ्यायला महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणातून मोठ्या संख्येने भाविक अक्कलकोटमध्ये झाले दाखल
– भाविकांच्या सोयीसाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त
“…तर देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देणं राष्ट्राची गरज”, राऊतांचा राज ठाकरेंना टोला
राज ठाकरे यांनी काल झालेल्या पाडवा मेळाव्यातील भाषणात बोलताना मराठी माणसासाठी जर चांगल्या गोष्टी करणार असाल तर आमचा देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा आङे असे विधान केले होते. याचा संजय राऊतांनी समाचार घेतला आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं काम केलं तर त्याला आम्ही पाठिंबा देऊ, तर चांगल्या कामांची यादी त्यांनी (राज ठाकरे) काल जाहीर करायला पाहिजे होती. त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा आहे? कुणाल कामरा यांचा स्टुडिओ फोडला आणि गुन्हेगारांना पाठीशी घातलं हे चांगलं काम आहे का? मुंबईमध्ये मराठी माणसाची पिच्छेहाट सुरू आहे, महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्यावर काहीच बोलत नाहीत हे चांगलं काम आहे का? मुंबईत मराठी माणसाला घर नाकारलं जात आहे, मराठी संस्कृतीवर हल्ला होतोय. हे चांगलं काम असेल तर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणं राष्ट्राची गरज आहे,” असे राऊत म्हणाले आहेत.