Marathi News Updates : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेला प्रवेश नाकारण्यात आल्याने प्रसुतीदरम्यान तिचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने उपचारांआधीच अनामत रक्कम भरण्यासाठी अडवणूक केल्यामुळे गर्भवती तनिशा भिसे यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप भिसे कुटुंबियांकडून करण्यात आला होता. याप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल आला असून संबंधित डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. राज्या सध्या या प्रकरणाची बरीच चर्चा चालू असून या प्रकरणी येणारे सर्व अपडेट्स आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे पाहणार आहोत.
दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर एका पत्रकाराच्या वृत्ताचा हवाला देत आरोप केले आहेत. या आरोपांवरून दोन्ही नेत्यांमध्ये द्वंद्व चालू आहे. याबाबतच्या घडामोडी आपण पाहणार आहोत.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात मुंबईतील उत्तर भारतीय एकवटू लागले आहेत. राज ठाकरेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे.
कुणाल कामराच्या याचिकेवर आज सुनावणी
प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा याच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गुन्हे रद्द व्हावे यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली असून खार पोलीस या याचिकेला विरोध करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Mumbai-Maharashtra News Live Today, 8 April 2025 : राज्यासह देशातील महत्त्वाच्या बातम्या.
१५ गुन्हे दाखल ठाकुर्लीतील सुरेंद्र पाटीलचा मुक्काम मानपाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत, फरार चालकाचा पोलिसांकडून शोध
डोंबिवली : एकूण १५ गुन्हे दाखल असलेला डोंबिवली जवळील ठाकुर्लीतील रील स्टार आणि विकासक सुरेंद्र पाटील यांचा मुक्काम मानपाडा पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहे. गुरुवारपर्यंत त्यांची पोलीस कोठडी आहे. सुरेंद्र यांच्या वाहनाचा चालक फरार आहे. तोही लैंगिक अत्याचार गुन्ह्यातील आरोपी असल्याने त्याला पकडण्यासाठा मानपाडा पोलीस ठाण्याची तपास पथके विविध भागात त्याचा शोध घेत आहेत.
देवगिरी किल्ला परिसरात आग लागली, तीन तासांनंतरही आग धुमसतेय
छत्रपती संभाजीनगरमधील दौलताबाद येथील देवगिरी किल्ला परिसरात भीषण आग लागली आहे. तीन तासांनंतरही ही आग धुमसतेय. उन्हामुळे वाळलेलं गवत पेटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही आग किल्ल्याच्या चारही बाजूंनी पसरली आहे. किल्ल्याच्या भोवताली धुराचे लोट दिसत आहेत.
“मनसे मराठी भाषेचा आग्रह धरते त्यात गैर काय?” निरुपम यांचा प्रश्न
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी भाषेचा आग्रह धरते यात गैर काय? असा प्रश्न शिवसेना (शिंदे) नेते संजय निरुपम यांनी उपस्थित केला आहे. निरुपम म्हणाले, आग्रह धरण्यात काहीच गैर नाही, मात्र मनसेची जी गुंडगिरी चालू आहे ती चुकीची आहे. त्यामुळे त्यांच्या गुंडगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई झालीच पाहिजे. मनसेची आंदोलनाची पद्धत चुकीची आहे. मुंबईत आलेल्या नव्या लोकांना मारहाण करणं चुकीचं आहे.
डोंबिवलीत सम्राट चौकातील बेकायदा मोरे टाॅवरवर हातोडा ? इमारत रिकामी करण्यासाठी मोरे टाॅवरचा विकासक, रहिवाशांना नोटिसा
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील पंडित दिनदयाळ रस्त्यावरील सम्राट चौकातील मोरे टाॅवर (तिरूपती छाया ) ही बेकायदा इमारत पालिकेने एकदा तोडली असताना ही इमारत पुन्हा कशी उभी राहिली. या बेकायदा इमारतीला पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी काय कारवाई केली, असे प्रश्न करत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी, न्यायमूर्ती कमल खाता यांनी कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांनी याप्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत.