Marathi News Updates : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेला प्रवेश नाकारण्यात आल्याने प्रसुतीदरम्यान तिचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने उपचारांआधीच अनामत रक्कम भरण्यासाठी अडवणूक केल्यामुळे गर्भवती तनिशा भिसे यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप भिसे कुटुंबियांकडून करण्यात आला होता. याप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल आला असून संबंधित डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. राज्या सध्या या प्रकरणाची बरीच चर्चा चालू असून या प्रकरणी येणारे सर्व अपडेट्स आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे पाहणार आहोत.
दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर एका पत्रकाराच्या वृत्ताचा हवाला देत आरोप केले आहेत. या आरोपांवरून दोन्ही नेत्यांमध्ये द्वंद्व चालू आहे. याबाबतच्या घडामोडी आपण पाहणार आहोत.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात मुंबईतील उत्तर भारतीय एकवटू लागले आहेत. राज ठाकरेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे.
कुणाल कामराच्या याचिकेवर आज सुनावणी
प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा याच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गुन्हे रद्द व्हावे यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली असून खार पोलीस या याचिकेला विरोध करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Mumbai-Maharashtra News Live Today, 8 April 2025 : राज्यासह देशातील महत्त्वाच्या बातम्या.
एकनाथ शिंदेविरोधातील विडंबनात्मक गाण्याचे प्रकरण: कामराच्या याचिकेवर उत्तर दाखल करा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारसह मुरजी पटेल यांना आदेश
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत विडंबनात्मक गाणे सादर केल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी हास्यकलाकार कुणाल कामराने दाखल केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने मंगळवारी दखल घेतली. तसेच, पोलीस आणि तक्रारकर्ते व शिवसेना आमदार मुरजी पटेल यांना न्यायालयाने नोटीस बजावून कामरा याच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
“…तर भय्यांना मुंबई, महाराष्ट्रात राहू देण्याबाबत विचार करावा लागेल”, उभाविसेच्या याचिकेवर मनसे आक्रमक
राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या मनसे या पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी उत्तर भारतीय विकास सेना नामक पक्षाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशपांडे म्हणाले, आमचा पक्ष राहणार की नाही राहणार हे आता भय्ये ठरवणार असतील तर भय्ये मुंबईत राहणार की नाही, त्यांना इथे राहू द्यायचं की नाही हे आम्हाला ठरवावं लागेल.
नवी मुंबई पालिकेच्या रोपवाटिकांना नवसंजीवनी
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेकडे स्वतःच्या १४ रोपवाटिका आहेत. या सर्वांची अतिशय दुरवस्था झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ‘माझी वसुंधरा उपक्रमा’अंतर्गत सर्व रोपवाटिका कात टाकत आहेत. साफसफाई, पाण्याची सोय, तसेच मोठ्या प्रमाणात रोपांची लागवड केली जात आहे. त्यामुळे रखरखीत उन्हाळ्यात रोपवाटिकेत आल्हाददायक दृश्य दिसत आहे.
बँकांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मराठी शिकण्यास प्रशिक्षण द्या, शाळकरी विद्यार्थ्याचे ‘आरबीआय’ला पत्र
ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून बँकांच्या शाखा-शाखांमध्ये जाऊन मराठी भाषेच्या वापराविषयी मनसेकडून आंदोलन केले जात होते. हे आंदोलन आता मनसेकडून थांबविण्यात आले आहे. परंतु ठाण्यातील एका शाळकरी मुलाने थेट रिझर्व्ह बँकेला (आरबीआय) पत्रव्यवहार करुन राज्यातील सर्वच सार्वजनिक बँका, वित्तीय सेवा पुरविणाऱ्या संस्थांसह इतर बँकांमध्ये मराठी अनिवार्य करण्याचे आणि मराठी भाषा येत नसलेल्या कर्मचाऱ्यांना मराठी भाषा शिकण्यास आणि लिहीण्यास प्रशिक्षण, प्रोत्साहन देण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणाची पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी होणार असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे. आज या प्रकरणी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सूर्यवंशी कुटुंबाची बाजू मांडली. यावेळी त्यांनी बदलापूरमधील बलात्कार प्रकरणाप्रमाणे न्यायालयाच्या अधिपत्याखाली समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली. बदलापूर प्रकरणात न्यायिक समिती नेमण्यात आली होती. यावर न्यायालयाने म्हटलं आहे की आम्ही आधी राज्य सरकारचं म्हणणं ऐकून घेऊ. त्यानंतर या प्रकरणी निर्णय घेऊ. या याचिकेत प्रतिवाद्यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. न्यायालयाने नोटीस देखील काढली आहे. आता २९ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होईल.
“कच्च्या तेलाची किंमत १० डॉलर्सने घटली, तरी लुटारू सरकारने…”, शरद पवार गटाचा चिमटा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे की “मार्च महिन्यात कच्च्या तेलाची ८४ डॉलर प्रति बॅरल असणारी किंमत एप्रिल महिन्यात ७४ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली उतरत असेल तर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्या पाहिजेत की वाढल्या पाहिजेत?”
रोहित पवार म्हणाले, “कच्च्या तेलाच्या किंमती कमी होताच या लुटारू सरकारने पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटीमध्ये २ रुपयांची वाढ केली, घरगुती गॅस सिलिंडरमध्येही ५० रुपयांची वाढ केली. सामान्य जनतेला ्छे_दिन दाखवण्याची थोडी जरी भावना सरकारमध्ये असती तर कच्च्या तेलाच्या उतरलेल्या किंमतीचा दिलासा सर्वसामान्यांनाही दिला असता. यूपीए सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे भाव ११० डॉलर असायचे तेंव्हा पेट्रोलचे भाव ८० रु लिटर असताना महागाई वाढली म्हणून बोंबा मारणारी भाजपा आज कच्च्या तेलाच्या किंमती ७४ डॉलर असताना पेट्रोलचे भाव १०५ रुपयाच्या पुढे गेल्यावर देखील गप्प का?”
“देशात वर्षाकाठी एकूण ५००० कोटी लिटर्स पेट्रोल तर ११२२० कोटी लिटर डिझेल विक्री होते. लिटरमागे २ रु वाढवून ३२००० कोटीची लूट केंद्र सरकार करणार आहे. महाराष्ट्रातून ३२०० कोटींची लूट होणार आहे. #hsrp नंबर प्लेटमधून आधी १८०० कोटी लुटले आणि आता हे ३२०० कोटी…”
मुंब्रा येथे १० वर्षीय मुलीची हत्या करुन मृतदेह इमारतीच्या डक्टमध्ये फेकला – लैंगिक अत्याचारही झाल्याचा संशय
ठाणे : मुंब्रा येथे एका १० वर्षीय मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह इमारतीच्या डक्ट भागामध्ये फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय असून पोलिसांनी या प्रकरणी एका १९ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.मुंब्रा येथे १० मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये सोमवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास एका १० वर्षीय मुलीचा मतदेह आढळला होता.
डोंबिवली एमआयडीसीत काळ्या डागांचे प्रदूषण, वाहने काळी पडल्याच्या तक्रारी
डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील एम्स रुग्णालय परिसर, सोनारपाडा, डोंबिवली नागरी सहकारी बँक भाग आणि मालवण किनारा हाॅटेल परिसरात शनिवारी, रविवारी रात्री सार्वजनिक ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांवर काळे ठिपके पडले असल्याचे उघडकीला आले आहे. हा प्रदुषणाचा प्रकार असल्याच्या तक्रारीत करत एमआयडीसीतील नागरिकांनी याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळविले.
कॉमेडियन कुणाल कामरा याने मुंबई उच्च न्यायालायत दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी १६ एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. कुणाल कामरा याच्याविरोधात मुंबई पोलिसांत दाखल असलेले गुन्हे रद्द व्हावेत यासाठी कामराने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, या याचिकेवर उत्तर देण्यासाठी राज्य सरकारने वेळ मागितला आहे. परिणामी न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी १६ एप्रिलपर्यंत तहकूब केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक कविता सादर केल्याप्रकरणी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी कुणाल कामराविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गु्न्हे खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते.
बोकडवीरा पुलाखालील मार्ग खड्डेमय, खड्डे चुकविण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नामुळे अपघाताचा धोका
उरण : बोकडवीरा उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. हे खड्डे चुकविण्यासाठी चारचाकी आणि दुचाकी वाहनांकडून होणाऱ्या प्रयत्नामुळे या मार्गावर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे प्रवासी वाहन चालक आणि नागरिकांकडून संताप व्यक्त केले जात आहे.
‘महात्मा फुले’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात, फुलेंना मारहाण केल्याच्या दृष्यावर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप
नागपूर : झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित ‘फुले’ या हिंदी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित हा चित्रपट ११ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
पेट्रोल ५१ रुपये आणि डिझेल ४१ रुपये प्रति लिटर करणे शक्य
नागपूर : आज आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल ६५ डॉलर प्रति बॅरल असताना देशात पेट्रोलचे दर १०९ रुपयाच्या आसपास तर डिझेलचे ९३ रुपयांच्यावर आहे.भाजपा सरकार इंधनावर अन्यायकारक झिजीया कर आकारून जनतेची लूट करत आहे. क्रूड ऑईलचे कमी झालेले दर व कररुपी लूट कमी केली तर पेट्रोल ५१ रुपये आणि डिझेल ४१ रुपये प्रति लिटर करणे शक्य आहे ते सरकारने करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
राज्याला उन्हाचा तडाखा
राज्यात तापमान वाढलं आहे. मुंबईत सोमवारी ३६.२ अंश तर अकोल्यात ४४.२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. शहापुरात ४६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. आज आणि उद्या देखील तापमान असंच राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.