Marathi News Updates : संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झालं आहे. या वक्फ सुधारणा विधेयकावरून महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या विधेयकावरून राजकीय वर्तुळात पडसाद उमटत आहेत. तसेच दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. यासह राजकीय वर्तुळातील सर्व राजकीय घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Mumbai-Maharashtra News Live Today, 4 April 2025 : राज्यातील सर्व महत्त्वाच्या सर्व घडामोडी वाचा एका क्लिकवर…
ठेकेदाराकडून लाच स्वीकारताना सरपंचाच्या मुलास पकडले
अहिल्यानगर : एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून नंतर पहिला हप्ता म्हणून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वाळुंज (ता. अहिल्यानगर) ग्रामपंचायत सरपंचाच्या मुलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या संदर्भात अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात मकरंद गोरखनाथ हिंगे (४०, रा. वाळुंज, अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साई संस्थानचे डॉ. राम नाईक यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’कडून सन्मान, विक्रमी संख्येने रुग्णउपचार व शस्त्रक्रिया
राहाता : शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या रुग्णालयांतील डॉ. राम नाईक यांनी तब्बल २ लाख ७३ हजार रुग्णांवर उपचार व ६० हजार शस्त्रक्रियांचा विक्रम केला. त्यांच्या या अतुलनीय सेवेची दखल लंडनच्या ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेऊन त्यांना सन्मानित केले. या पार्श्वभूमीवर त्यांना सेवानिवृत्तीनंतर २ वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे.
भाजपच्या जिल्हाध्यक्षांची निवड दि. २५ पर्यंत जाहीर होणार
अहिल्यानगर : शहर जिल्हाध्यक्ष, दक्षिण जिल्हाध्यक्ष व उत्तर जिल्हाध्यक्ष अशा तिन्ही जिल्हाध्यक्षांची निवड येत्या २५ एप्रिलपर्यंत केल्या जातील, तत्पूर्वी येत्या दोन दिवसात मंडल अध्यक्षांच्या निवडी केल्या जातील, असे भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी सांगितले.
राहात्यात विस्थापितांचे बिऱ्हाड धरणे आंदोलन
राहाता : निमगाव शिवारातील देशमुख चारीलगतच्या विस्थापित झालेल्या अतिक्रमणधारकांनी आज, गुरुवारपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत बिऱ्हाड धरणे आंदोलन सुरू केले. वंचित बहुजन आघाडीचे अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. विस्थापितांचे तातडीने पुनर्वसन करावे, यासह विविध मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचे व्हॉट्सअप चॅनल
अहिल्यानगर : शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल सुरू केले आहे. त्याचे विमोचन आज, गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे, कृषी उपसंचालक सागर गायकवाड तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून कृषी विभाग कृषी विषयक योजनांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करणार आहे. तसेच जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या प्रमुख पिकावर प्रक्रिया उद्योग उभारणी, शेतमाल बाजारभाव मिळवणे आदी कामांसाठी व्हाट्सअप चॅनल उपयोगी ठरणार आहे.
जिल्हा बँक, संगमनेर मर्चंट बँकेवर सेवक संचालक नियुक्तीचे आदेश
अहिल्यानगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच संगमनेर मर्चंट सहकारी बँकेवर सेवक संचालक पदाची नियुक्ती कायदेशीर प्रक्रिया ३० दिवसात पूर्ण करावी, असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. याचिकाकर्ते व जिल्हा बँक कर्मचारी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी ही माहिती दिली.
उच्च न्यायालयाने नाशिक विभागाच्या सहकार खात्याच्या सहनिबंधकांना हा आदेश दिल्याचे भंडारे यांनी स्पष्ट केले. न्यायालयाच्या या निकालामुळे ज्या बँका नियमाप्रमाणे सेवक संचालकपदाच्या नियुक्तीसाठी चालढकल करतात, त्यांना चपराक बसली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
संघटनेने जिल्हा सहकारी बँकेवर विद्या अजय तन्वर व श्रीमंत घुले यांची तसेच संगमनेर मर्चंट सहकारी बँकेवर वाघोबा शेलार व तुकाराम सांगळे यांची सेवक संचालक म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, संबंधित बँकांनी ही नियुक्ती स्वीकारली नव्हती. संघटनेने त्या विरोधात सहकारी संस्थांच्या नाशिक विभागीय सहनिबंधकांकडे व त्यानंतर संघटनेचे अध्यक्ष भंडारे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
महायुतीच्या जाहीरनाम्याची १४ एप्रिलपासून होळी
कर्जत : विधानसभा निवडणुकीत महायुतीने जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. असे असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जबाकी भरण्याचे आदेश दिले. जाहिरनाम्यातील इतर आश्वासनांच्या पूर्ततेबाबत अशीच अवस्था आहे. महायुती सरकारने जनतेची फसवणूक केल्याचा निषेध करण्यासाठी १४ एप्रिलला महायुतीच्या जाहीरनाम्याची तसेच बँकांनी दिलेल्या वसुलीच्या नोटिशीची होळी करण्याचे आंदोलन करणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष तथा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.
मनपाचे गाळे, वर्गखोल्या, खुल्या जागा तपासणीसाठी तीन पथके नियुक्त, पोटभाडेकरूचा गाळा ताब्यात घेणार; अतिरिक्त बांधकामास दंड
अहिल्यानगर : महापालिकेच्या मालकीचे परंतु भाड्याने दिलेले गाळे, वर्गखोल्या, खुल्या जागांची तपासणी करण्यासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तीन स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथके शहरातील गाळ्यांची, खोल्यांची, खुल्या जागांची तपासणी करणार आहे. मूळ मालक नसल्यास व पोटभाडेकरू असल्यास गाळा ताब्यात घेणार तसेच, मंजूर जागेपेक्षा अधिक बांधकाम असल्यास दंड आकारणार व अतिक्रमण असल्यास ते लगेच पाडणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.
कर्जतमध्ये सत्ताधारी नगरसेवकाचा आंदोलनाचा इशारा
कर्जत : शहरातील पाणीपुरवठा, पथदिवे व स्वच्छता याबद्दल नाराजी व्यक्त करत सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक तथा उप गटनेते सतीश पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर मिळाल्याचे मानले जाते.
‘थकीत शुल्क प्रतिपूर्ती’तील ८३ कोटी शिक्षण संस्थांना अदा, मराठवाड्यातील व अहिल्यानगरच्या अनेक संस्था खंडपीठात
छत्रपती संभाजीनगर : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी ८३ कोटी रुपये संबंधित शिक्षण संस्थांना उपलब्ध करून दिले असल्याचे निवेदन राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केले. संबंधित शिक्षण संस्थांची रक्कम अनेक वर्षांपासून शुल्क प्रतिपूर्ती थकीत राहिल्यामुळे त्यांनी खंडपीठात धाव घेतली होती. राज्यातील इतर जिल्ह्यांसह राज्य शासनाने मराठवाड्यातील अनेक संस्थांची रक्कम अदा केली आहे.
उष्णतेशी लढा देण्यासाठी हरित लातूरचा नारा
लातूर : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन याच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन मंडळाच्या सभागृहात आयोजित ‘उष्णतेशी लढा’ या कार्यशाळेत ‘हरित लातूरचा’ नारा देण्यात आला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या पुढाकाराने व पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मिना, नवी दिल्ली येथील सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटचे शाश्वत अधिवास विभाग प्रमुख रजनीश सरिन, पुणे येथील वास्तु विशारद अविनाश हावळ, सार्वजनिक आरोग्य चळवळीतील अभ्यासक डॉ. अनंत फडके यांनी दूरदृष्टी प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. हवामान बदलामुळे अर्थकारणावर परिणाम होत आहे.
दोन चिमुकल्यांसह मातेची आत्महत्या
जालना : एका विवाहित महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्याच्या सिध्देश्वर पिंपळगाव शिवारात बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. रात्री उशिरा पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतील पाणी उपसून तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. गुरुवारी सकाळी शवविच्छेदन करून तिन्ही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, घटनेतीले आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या घटनेचा स्थानिक पोलीस तपास करत आहेत.
लातूरच्या मांजरा परिवारात बिनविरोध निवडणुकीचे प्रारूप, विलास साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुन्हा अमित देशमुख
लातूर : लातूर जिल्ह्यातील मांजरा परिवारातील विलास सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. विलास साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अमित देशमुख आहेत. मांजरा परिवारातील मांजरा व रेणा या दोन्ही साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस; भोकरदनमध्ये वीज पडून जनावरांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस पडत असून, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात वीज पडून जनावरांचा मृत्यू झाला. फुलंब्री व जालना तालुक्यात गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काही वेळ गारांचा पाऊस झाला. सायंकाळी साडेसहानंतर छत्रपती संभाजीनगर शहरातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. परिणामी अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला.
गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यातील बहुतांश भागात सकाळच्या सत्रात ढगाळ वातावरण आहे. पावसाची तीव्रता अधिक नसली, तरी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यात काही तालुक्यांत मोसंबीचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काढणीला आलेला गहूदेखील आडवा पडला आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. (फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)