Marathi News Updates : संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झालं आहे. या वक्फ सुधारणा विधेयकावरून महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या विधेयकावरून राजकीय वर्तुळात पडसाद उमटत आहेत. तसेच दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. यासह राजकीय वर्तुळातील सर्व राजकीय घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Mumbai-Maharashtra News Live Today, 4 April 2025 : राज्यातील सर्व महत्त्वाच्या सर्व घडामोडी वाचा एका क्लिकवर…
अंजली दमानिया-मनोज जरांगे यांची भेट, संतोष देशमुख हत्याकांडाबाबत चर्चा
छत्रपती संभाजीनगर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुले याचा जबाब अर्धवट असून, अनेक प्रश्नांची उत्तरे त्यातून मिळत नाही. पुढील काळात या प्रकरणात कोणती व्यूहरचना करता येईल, यावर गुरुवारी अंजली दमानिया आणि मराठा आरक्षण आंदोलन मागणीचे आंदोलनकर्ते मनाेज जरांगे यांची भेट झाली.
अवकाळी पाऊस, भोकरदनमध्ये वीज पडून जनावरांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस पडत असून, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात वीज पडून जनावरांचा मृत्यू झाला. फुलंब्री व जालना तालुक्यात गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काही वेळ गारांचा पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यातील बहुतांश भागात सकाळच्या सत्रात ढगाळ वातावरण आहे. पावसाची तीव्रता अधिक नसली, तरी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यात काही तालुक्यांत मोसंबीचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
खोट्याचा बोलबाला झाला तरी शेवटी विजय सत्याचाच, पंकजा मुंडे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
जालना : विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा आणि परीक्षेत काॅपीच्या मार्गाला जाऊ नये. आगाऊ मित्र सर्वांच्याच वाट्याला येतात. असा एखादा मित्र म्हणाला की, माझ्याकडे गाईडची पाने फाडून आणलेली आहेत तर त्याचे ऐकू नका. कारण जगात खोट्याचा बाेलबाला कमी वेळ जोरजोराने होत असला तर शेवटी सत्याचाच विजय होत असतो, असे पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरी
छत्रपती संभाजीनगर : चाकू हल्ल्यात एक जण गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात दाखल सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात आरोपी मेराज खान रफिक खान (४६, रा. समतानगर) याला दहा वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एच. केळुसकर यांनी बुधवारी सुनावली.
धर्माबाद मार्गावरील अपघातात दोन ठार; दोन गंभीर
नांदेड : उमरी ते धर्माबाद राज्य रस्त्यावरील राजापूर चौरस्त्यावर बुधवारी सायंकाळी पिकअप व दुचाकीची धडक झाली. या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. शेख अयाज शेख सलीम (वय २५, रा. धर्माबाद) व कपिल बाबूराव गायकवाड (वय २४, रा. करखेली) अशी मृत्यू पावलेल्या दोघांची नावे आहेत. तर गंभीर जखमी मुकुंद रामा क्षीरसागर व राजू लक्ष्मण कांबळे यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे.
बीडजवळ नवदाम्पत्याची आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर : बीड शहरापासून जवळ असलेल्या केतुरा गावात अवघ्या ४० दिवसांपूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्याने एका पाठोपाठ आत्महत्या केली. नवविवाहितेने बुधवारी रात्री व तरुणाने गुरुवारी पहाटे गळफास घेऊन जीवन संपवले. पुण्याला राहायला घेऊन जाण्याच्या कारणावरून दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि त्यातूनच हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.
नांदेडमध्ये ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहिरीत पडल्याच्या घटनेत ८ महिलांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर
नांदेडच्या आलेगाव शिवारात शुक्रवारी घडलेल्या भीषण अपघातामध्ये ८ महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. या संदर्भातील ट्विट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ट्विटमध्ये एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, “नांदेड जिल्ह्यातील आसेगाव येथे आज सकाळी ११ महिला मजूर घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत कोसळून अपघात झाल्याची घटना अत्यंत दुःखदायक आणि दुर्देवी आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलांना श्रद्धांजली अर्पण करतो. हिंगोली जिल्ह्यातील गुंजगाव येथील महिला शेती कामासाठी जात असताना ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून विहिरीतून ३ महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच काही महिलांचा या दुर्देवी घटनेत मृत्यू झाला असल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना ५ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असून ईश्वर त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना”, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
नांदेड जिल्ह्यातील आसेगाव येथे आज सकाळी ११ महिला मजूर घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत कोसळून अपघात झाल्याची घटना अत्यंत दुःखदायक आणि दुर्देवी आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलांना श्रद्धांजली अर्पण करतो.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 4, 2025
हिंगोली जिल्ह्यातील गुंजगाव येथील महिला शेती कामासाठी जात…
नादुरुस्त वाहनाला धडक दोघांचा मृत्यू
लातूर- औसा- तुळजापूर रस्त्यावर औसा तालुक्यातील बेलकुंड येथे गुरुवारी रात्री नादुरुस्त ट्रकला मागून आयशर टेम्पो धडकला तर आयशर टेम्पोला मागून येणाऱ्या कारची धडक बसली या अपघातात आयशर टेम्पो चालक व नादुरुस्त ट्रक दुरुस्ती करणार्या मेकॅनिकच्या जागीच मृत्यू झाला .
गुरुवारी दिनांक ३ एप्रिल रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे .ट्रक नादुरुस्त अवस्थेत उभा होता त्या दुरुस्तीचे काम मेकॅनिक करत होता .औशावरून पुण्याकडे कोथिंबीर घेऊन निघालेला आयशर टेम्पोच्या चालकाला पावसामुळे उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न लागल्याने तो ट्रकला मागून धडकला या अपघातात आयशर टेम्पोचालक दत्ता सावंत वय ४५ राहणार आशीव ता. औसा याचा जागीच मृत्यू झाला ट्रकची दुरुस्ती करणार्या मेकॅनिकच्या डोक्यावर ट्रकचे चाक गेल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला.दरम्यान या दोन वाहनाला मागून येणाऱ्या कारने धडक दिली, सुदैवाने कारमधील लोक बचावले. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
नियंत्रण सुटल्याने खाजगी बसचा अपघात
बोईसर : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील बस रस्त्याच्या खाली उतरून अपघात झाल्याची घटना बोईसर तारापूर रस्त्यावर शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात बसचे चालक आणि वाहक यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
बोईसर तारापूर रस्त्यावरील परनाळी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास खाजगी कंपनीच्या बसचा अपघात झाला. तारापूर बाजूकडून बोईसर कडे भरधाव वेगाने येणाऱ्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस मुख्य रस्ता सोडून खाली उतरली. या अपघातात बसचे चालक आणि वाहक किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात होताच आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी वेळीच धाव घेऊन बसमधील चालक व वाहकाला बाहेर काढले.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि हे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यात राज्यसभेत वक्फ विधेयकाबाबत बोलताना शाब्दिक खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यानंतर संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांच्यावर पुन्हा जोरदार टीका केली आणि आपल्या नादी न लागण्याचा इशारा दिला. यानंतर आता खासदार प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘माझ्या चारित्र्यावर आणि इतिहासावर बोलण्याआधी आपण शरद पवार साहेबांकडून माहिती घेतली असती तर बरं झालं असतं’, अशी खोचक टीका प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत केली आहे.
माझ्या चारित्र्यावर आणि इतिहासावर बोलण्याआधी आपण पवार साहेबांकडून माहिती घेतली असती तर बरं झालं असतं.@rautsanjay61
— Praful Patel (@praful_patel) April 4, 2025
‘मन सुन्न करणारी घटना, कायदेशीर कारवाई..’; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेनंतर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
तनिषा भिसे यांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गर्भवती असेलल्या तनिषा भिसे यांच्या उपचारांसाठी कुटुंबियांकडून १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. पण पैशा अभावी वेळेत उपचार न देण्यात आले नाही आणि त्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या घटनेच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच ही घटना मन सुन्न करणारी असून चौकशी अहवाल समोर आल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेवर जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, योग्य ती कारवाई…”
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने योग्य उपचार न दिल्याने २ जुळ्या मुलींना जन्म दिलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आता नागरिक आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पुण्यात नागरिकांनी आंदोलन करत कारवाईची मागणी केली आहे. यावर आता पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जिल्हाधिकारी म्हणाले की, “मला या प्रकरणार बोलण्याच्याआधी या घटनेचा अहवाल माझ्याकडे येणं गरजेचं आहे. आमच्याकडे सिव्हील सर्जन यांचा अहवाल आला की त्यामाध्यमातून समोर येईल की नेमकं काय-काय झालं होतं? यावर संबंधित रुग्णालयाची प्रतिक्रिया देखील समोर येईल. त्यानंतर आपल्याला या घटनेत कोणाची चूक होती? या संदर्भातील निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल. त्यानुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि कारवाई केली जाईल”, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी दिली.
पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने योग्य उपचार न दिल्याने २ जुळ्या मुलींना जन्म दिलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आता नागरिक आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पुण्यात नागरिकांनी आंदोलन करत कारवाईची मागणी केली आहे.
‘देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावला’, मुख्यमंत्री फडणवीसाची मनोजकुमार यांना श्रद्धांजली
‘ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीतील एका महान व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. चित्रपटांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि भारतीय समाजजीवन जनमानसावर बिंबवणाऱ्या या अष्टपैलू आणि भारतकुमार हे नाव खऱ्या अर्थाने सार्थकी लावणाऱ्या कलाकाराला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो’, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
“देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार पोपटपंची करत फिरतायेत”, संजय राऊतांची टीका
पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने योग्य उपचार न दिल्याने २ जुळ्या मुलींना जन्म दिलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे. या घटनेवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी म्हटलं की, “भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या एका व्यक्तीच्या पत्नीच्या उपचारासाठी फडणवीसांच्या कार्यालयातून रुग्णालयात फोन गेल्याचं सांगितलं जातं. तरीही त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. एका मातेचा अंत झाला. मग देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला १०० दिवस पूर्ण झालेत. सरकार काय करतंय? मला असं वाटतं की गोरगरिबांचे कामं त्यांच्या पातळीची नाहीत. देवेंद्र फडणवीस यांची झेप खूप मोठी आहे. अडानी, अंबानी, टाटा यांची कामे होतात. गोरगरिंबाची कामे होत नाहीत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार फक्त पोपटपंची करत फिरत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. (फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)