Marathi Breaking News LIVE Updates: गेल्या काही दिवसांत राज्यातील राजयकीय क्षेत्रात विविध घडामोडी घडल्या आहेत. यामध्ये महायुती सरकारमधील पालकमंत्रीपदाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर रायगडच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या (अजित पवार) आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण, यासाठी शिवसेनाही (एकनाथ शिंदे) आग्रही असल्यामुळे तटकरे यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली होती. अशात काही दिवसांपूर्वी अमित शाह यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या घरी भेट दिल्याने पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली आहे.

दुसरीकडे राज्यात पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गाजत आहे. याचबरोबर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही रखडल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. तसेच राज्यातील काही भागांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचबरोबर विविध क्षेत्रांतील बातम्यांचा लाईव्ह आढावा घेऊया.

Live Updates

Marathi Breaking News Highlights 15th April : 

17:33 (IST) 15 Apr 2025

"मंत्र्यांच्या पगारासाठी निधी आहे, पण, शेतकऱ्यांच्या...", शेतकरी कर्जमाफीवरून आदित्य ठाकरे यांची सरकारवर टीका

माजी मंत्री आणि शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफी, एसटी कर्मचाऱ्यांचे पगार आणि लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले, "एसटी कर्मचाऱ्यांना ५६% च पगार दिला जात असल्याचं गेल्या आठवड्यात आपण पाहिलंच, तसंच महाराष्ट्रातल्या अनेक सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल होणार असं दिसतंय. सरकारकडे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधी नाही, शेतकरी आत्महत्या वाढल्या असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी निधी नाही,

लाडक्या बहीणींना निवडणुकीपूर्वी दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी निधी नाही, आरोग्य व्यवस्था, औषधांचा पुरवठा यासाठी निधी नाहीये. परंतु, मंत्र्यांच्या पगारासाठी निधी आहे. मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी निधी आहे. उपमुख्यमंत्री कोल्हापूरात म्हणाले तसं मंत्र्यांच्या ताफ्यातील नवीन गाड्या खरेदीसाठी निधी आहे."

16:24 (IST) 15 Apr 2025

दादरमध्ये ठाकरे गटाचा हंडा मोर्चा, अनेक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

मुंबईतील दादर, शिवाजी पार्क आणि माहिम या परिसरात होत कमी दाबाने होत असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे शिवसेनेने (उद्धव ठाकरे) आक्रमक भूमिका घेतली असून, याच्या विरोधात त्यांनी आज मुंबई महापालिकेवर हंडा मोर्चा काढला आहे. या मोर्चादरम्यान पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

15:26 (IST) 15 Apr 2025

ग्रामीण अर्थकारणास बळ- शंभूराज देसाई , दौलतनगरला आजपासून तीन दिवसीय महोत्सव

कराड : राज्य शासनाचा पर्यटन विभाग, पाटण कृषी उत्पादन बाजार समिती आणि जिल्हा प्रशासनातर्फे आयोजिलेला ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२५’ यास आज प्रारंभ होत असून, शेती, संस्कृती व ग्रामीण पर्यटनाचा भव्य सोहळा असलेला हा महोत्सव शेती आणि ग्रामीण अर्थकारणाला निश्चितपणे बळ देईल, असा विश्वास या महोत्सवाचे संकल्पक, राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

मंत्री शंभूराज यांनी याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, दौलतनगर- पाटण येथे मंगळवारी १५ ते १७ एप्रिल या कालावधीत संपन्न होत असलेला कोयना दौलत डोंगरी महोत्सव शेतकऱ्यांना फायदा, महिला उद्योजकांना प्रोत्साहन आणि ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. स्थानिक संस्कृती, परंपरांचे जतन करत पर्यटकांना ग्रामीण महाराष्ट्राचे सौंदर्य अनुभवण्याची संधी त्यातून उपलब्ध होईल. हा महोत्सव शेती, ग्रामीण पर्यटन आणि स्थानिक संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजिला आहे. त्यात शेतकरी, पर्यटक, उद्योजक आणि जनतेनेही सहभागी होण्याचे आवाहन पर्यटन संचालनालयाने केले आहे.

15:23 (IST) 15 Apr 2025

गॅस चोरट्यांवर खंबाटकी घाटात कारवाई; ८० लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा : गॅस टँकरमधून गॅसची चोरी करून तो सिलिंडरमध्ये भरून विक्री करणारा टोळी मुंबईच्या दक्षता पथकाने उघडकीस आणली. दक्षता पथकातील कर्मचाऱ्यांनी खंबाटकी घाटानजीक एका बंद पडलेल्या ढाब्यानजीक छापा टाकून गॅसची चोरी करताना गॅस तस्करांना पडकले. या कारवाईत दोघांना अटक केली असून, वाहने व गॅस सिलिंडर असा तब्बल ८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मोहम्मद तौफिक व हरीओम सिंग अशी संशयितांची नावे आहेत. या कारवाईत २ गॅस टँकर, २ टेम्पो, २०० सिलिंडर व चोरी करण्याचे साहित्य असा ८० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

15:15 (IST) 15 Apr 2025

पंढरीचा पांडुरंग निघाला लंडन वारीला ! भाविकांकडून पंढरी ते लंडन दिंडी; १८००० किलोमीटरचा प्रवास

मूळचे अहिल्यानगरचे पण सध्या लंडन स्थायिक असलेले विठ्ठलभक्त अनिल खेडकर आणि त्यांची दिंडी पंढरपूर येथून थेट लंडनला श्री विठ्ठलाच्या पादुका घेऊन जात आहेत. ...सविस्तर बातमी
15:15 (IST) 15 Apr 2025

"याला लाडक्या बहिणींची फसवणूकच म्हणावी लागेल", 'लाडकी बहीण'च्या हप्त्यातील कपातीनंतर रोहित पवारांची टीका

लाडकी बहीण योजनेतील काही महिला लाभार्थ्यांच्या रकमेत कपात केल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, "राज्यातल्या ८ लाख लाडक्या बहिणींना कृषी सन्मान योजनेचे कारण देत १५०० रुपयां ऐवजी ५०० रुपये देण्याचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींची सरकारने केलेली फसवणूकच म्हणावी लागेल. नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजनेचा उद्देश वेगवेगळा असल्याने सरकार या दोन्ही योजनांची सरमिसळ करत असेल तर सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न पडतो."

ते पुढे म्हणाले, "मुळात वर्षाला २४०० कोटी रुपये वाचावेत म्हणून सरकार २० लाख लाडक्या बहिणींना वगळणार आहे, एकाच वेळी वगळल्यास राज्यात संतापाची लाट उसळेल म्हणून टप्प्याटप्प्याने लाडक्या बहिणींना वगळण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे."

एक्सवर केलेल्या पोस्टच्या शेवटी रोहित पवार म्हणाले, "गेल्या अधिवेशनात महिला व बालविकासमंत्र्यांनी लाडकी बहीण आणि नमो सन्मान योजना या दोन्ही योजनांचे लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणीची संख्या ६ लाख सांगितली होती तर आता एकाच महिन्यात ही संख्या ८ लाखापर्यंत कशी वाढली? महिला बालविकास मंत्र्यांनी सभागृहाला चुकीची माहिती का दिली? याची उत्तरे सरकारला द्यावी लागतील."

14:57 (IST) 15 Apr 2025

पुणे : इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून बांधकाम मजुराचा मृत्यू, बांधकाम ठेकेदारासह तिघांविरोधात गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातील काळे पडळ भागातील एका इमारतीचे बांधकाम सुरू होते.त्यावेळी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी बांधकाम ठेकेदारासह तिघांविरोधात काळे पडळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू सोपान अवचार (वय 43, रा. आदर्शनगर, ऊरळी देवाची) असे मृत्यु झालेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे.तर या दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी

संतोष बाबुराव राठोड (वय 30, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द),रघुनाथ बबन खोपकर (रा. फातिमानगर, वानवडी) आणि स्वप्नील विकास बनकर (वय 30, रा. भोसलेनगर, हडपसर) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील काळेपडळ परिसरातील जेएसपीएम महाविद्यालयाच्या मागील बाजूस एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे.त्या ठिकाणी राजू अवचार हे मजुरीचे काम करायचे,चौथ्या मजल्यावर काम करीत असताना तोल जाऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.त्यानंतर तात्काळ राजू अवचार यांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र राजू अवचार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली.तर सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे निष्पन्न झाल्याने याप्रकरणी संतोष बाबुराव राठोड,रघुनाथ बबन खोपकर आणि स्वप्नील विकास बनकर या तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

14:36 (IST) 15 Apr 2025

सोलापूर बाजार समिती निवडणुकीत भाजपअंतर्गतच मुख्य लढत, दोन्ही देशमुखांसोबत आता आमदार कल्याणशेट्टीही मैदानात

राज्यात चौथ्या क्रमांकाच्या मानल्या जाणाऱ्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपअंतर्गतच मुख्य लढत होत आहे. ...वाचा सविस्तर
14:29 (IST) 15 Apr 2025

सोलापूर : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लुटणाऱ्या टोळीचा शोध

सोलापूर : लग्नाळू मुलांना गोरगरीब मुलींच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, त्यांचे नको त्या अवस्थेत चित्रीकरण करून, प्रसंगी संबंधित तरुणीबरोबर शारीरिक संबंध निर्माण करायला लावून नंतर बलात्काराच्या गुन्ह्यात फिर्याद देण्याची धमकी देत मोठ्या प्रमाणात पैसे उकळणाऱ्या एका टोळीला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पकडले आहे. माळशिरस येथे ही कारवाई करण्यात आली.

छाया नानाजी माने (वय ५०) आणि धनाजी विठ्ठल काळे (वय २८, रा. दोघे पाणीव, ता. माळशिरस) या दोघांना अटक करण्यात आली आहे. छाया हिचा मुलगा व अन्य नातेवाइकांसह तिघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांचा शोध माळशिरस पोलीस घेत आहेत.

14:26 (IST) 15 Apr 2025

आधी पुनर्वसन, मगच प्रभादेवी पुलाचे पाडकाम, मनसेची मागणी, प्रभादेवी येथे आंदोलन

एमएमआरडीए शिवडी-वरळी उन्नत रस्ता बांधत असून त्यासाठी प्रभादेवी रेल्वे पूल पाडून त्या जागी नवीन द्विस्तरीय पुलाची बांधणी केली जाणार आहे. ...अधिक वाचा
14:16 (IST) 15 Apr 2025

एनडीए प्रवेश परीक्षेत पुण्यातील ऋतुजा वऱ्हाडे मुलींमध्ये देशात पहिली

युपीएससीतर्फे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या प्रवेशासाठीची प्रक्रिया राबवण्यात येते. यंदाही सुमारे दीड लाख मुलींनी अर्ज केला होता. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. ...अधिक वाचा
14:05 (IST) 15 Apr 2025

Maharashtra News LIVE Updates: "...तर त्यांना तुरुंगात पाठवले पाहिजे", मुंबईतील मराठीच्या वादावर उत्तर प्रदेशच्या मंत्र्याचे विधान

मराठी भाषेच्या वादावरून घडलेल्या कथित घटनांवर उत्तर प्रदेशचे मंत्री रघुराज सिंह म्हणाले, "अशा घटना घडू नयेत, परंतु आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्यातील भाषा आपल्याला माहित असली पाहिजे. मला आठ भाषांचे ज्ञान आहे. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे पण जर आपण इथे राहत असलो तर आपल्याला मराठी भाषा माहित असली पाहिजे. पण कोणीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये. जर कोणी असे केले तर त्यांना तुरुंगात पाठवले पाहिजे."

13:54 (IST) 15 Apr 2025

कल्याणमधील ज्येष्ठ नागरिक पाॅवर लिफ्टींग स्पर्धेत १०२ सुवर्ण पदकांचा मानकरी

कल्याणमधील ज्येष्ठ नागरिक अशोक दीक्षित (६३) यांनी पाॅवर लिफ्टींग स्पर्धेत मागील ४४ वर्षाच्या कालावधीत १८९ पाॅवर लिफ्टींग स्पर्धांच्या माध्यमातून एकूण १०२ सुवर्ण पदके पदके पटकावली आहेत. ...सविस्तर वाचा
13:16 (IST) 15 Apr 2025

Maharashtra News LIVE Updates: भाजपाचे १२ नेते संपर्कात असल्याचा ठाकरे गटाचा दावा

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते आनंद दुबे यांनी भाजपाचे काही नेते त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, "महायुती सरकारमधील असंतोषामुळे महाराष्ट्र भाजपाचे १२ हून अधिक नेते आमच्या संपर्कात आहेत. पण, सध्या आमचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद आहेत. लवकरच तुम्हाला भाजपाला भगदाड पडलेले दिसले आणि महायुतीमध्ये बंड."

13:12 (IST) 15 Apr 2025

मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार अल्पवयीनाचा मृत्यू, येरवड्यातील गोल्फ क्लबर रस्त्यावर अपघात

याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...अधिक वाचा
13:02 (IST) 15 Apr 2025

डोंबिवली कोपर गावमध्ये बेकायदा चाळींच्या उभारणीसाठी खाडीत डेब्रिजचे ढीग

खाडी किनाराचा मुख्य भाग आणि अंतर्गत प्रवाहांवर दिवसा सिमेंट, विटा, तुटलेल्या लाद्यांचा मलबा आणून टाकला जातो. त्यानंतर रात्रीच्या वेळेत हा मलबा जेसीबीच्या साहाय्याने सपाट करून त्यावर बेकायदा चाळी उभारण्याचे प्रकार भूमाफियांनी सुरू केले आहेत. ...अधिक वाचा
12:30 (IST) 15 Apr 2025

कोयनेवरील केबल पुलाचे काम प्रगतिपथावर, पर्यटन विकासाबरोबरच दुर्गम भागातील दळणवळणही सुधारणार

या पुलाच्या बांधकामामुळे दुर्गम कांदाटी खोरे जोडले जाणार आहे. कुंभरोशी, कळमगाव, तापोळा, अहिर रस्ता जोडला जाणार असून, यामुळे या भागातील अनेक गावांना पडणारा मोठा वळसा कमी होणार आहे. ...सविस्तर बातमी
12:24 (IST) 15 Apr 2025

Maharashtra News LIVE Updates: माजी प्रशिक्षणार्थ आयएएस अधिकारी पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाचे अटकेपासूनचे संरक्षण कायम

२०२२ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी पात्रता मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण देण्याचा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कायम ठेवला आहे.

12:16 (IST) 15 Apr 2025

खेड तालुक्यात महाविद्यालयीन युवतीचा खून, पसार झालेला आरोपी गजाआड

युवतीचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर गावात शोककळा पसरली. युवतीचा खून करणाऱ्या आरोपी मांजरे याला कठोर शिक्षा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...वाचा सविस्तर
12:04 (IST) 15 Apr 2025

सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावर धावती एसटी बस आगीत जळून खाक, चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी बचावले

सोमवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास ही घटना घडली. ...सविस्तर बातमी
11:55 (IST) 15 Apr 2025

सोलापूरचे तापमान ४२.२ अंशांवर

सोलापूर : येत्या आठवडाभर राज्यात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला जात असताना इकडे सोलापुरात तापमानाचा पारा ४२.२ अंश सेल्सिअस इतका वाढला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात हे तापमान सर्वाधिक असल्याचे दिसून आले.गेल्या ७ एप्रिल रोजी सोलापुरात ४२ अंश सेल्सिअस तापमान मोजण्यात आले होते. त्यानंतर आज सोमवारी त्यात आणखी वाढ झाल्यामुळे सोलापूरकरांच्या अंगाची लाही लाही होत आहे.

एरवी, उन्हाळ्याची चाहूल मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होळीच्या आसपास होते. परंतु यंदा फेब्रुवारीपासूनच उष्मा जाणवला. गेल्या १५-२० दिवसांपासून तापमान चाळिशीच्या पुढे असल्यामुळे उन्हाचा त्रास चांगलाच वाढला आहे. सोमवारी सकाळपासून उन्हाची धग वाढली होती. दुपारच्या रखरखत्या उन्हात रस्त्यावरील वर्दळ रोडावली होती. दुपारनंतर आकाशात ढगाळ वातावरण दिसून आले, तरीही उष्मा कमी झाला नव्हता. सायंकाळी ढग दाटून आले असता अवकाळी पावसाची चाहूल लागली होती.

11:54 (IST) 15 Apr 2025

महालक्ष्मीच्या नगर प्रदक्षिणेसाठी गर्दी

कोल्हापूर : ढोल-ताशाच्या गजर, फुलांचा गालिचा, आकर्षक रांगोळ्या आणि भक्तांचा आई अंबाबाईच्या नावान चांगभलंचा जयघोषात अशा मंगलमय वातावरणात करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीच्या रथोत्सव संपन्न झाला. रात्री साडेनऊ वाजता सुरू झालेला हा सोहळा मध्यरात्रीपर्यंत रंगला.

देवस्थान समितीमार्फत महाद्वार येथे नव्या सागवानी रथात आई जगदंबेची उत्सव मूर्ती विराजमान करण्यात आली. रथाचे पूजन आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत पार पडले . स्वागत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. देवस्थान सचिव शिवराज नाईकवाडे व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते .

घोडे, शाही लवाजमा आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत महाद्वारवरून आई जगदंबेच्या रथोत्सवास सुरुवात झाली. डोळे दिपवणारा लेझर किरणांचा शो आणि आकर्षक आतषबाजीने करवीरनगरी भक्तीरसात रमून गेले होते. शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी हा सोहळा डोळ्यात साठवून ठेवला.

11:53 (IST) 15 Apr 2025

डोंबिवलीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालण्यावरून दोन गटांमध्ये हाणामारी, रामनगर पोलीस ठाण्यात ४४ जणांवर गुन्हे

दोन्ही गटातील २० ते २४ जण एकमेकांना भिडल्याने शिवीगाळ, मारहाण, दगडफेक, काचा फेकून एकमेकांना जखमी करण्यात आले. या हाणामारीच्यावेळी काही वाहनांचे नुकसान झाले. ...अधिक वाचा
11:51 (IST) 15 Apr 2025

अहिल्यानगरजवळ तरुणाचा मृतदेह, घातपाताचा संशय

अहिल्यानगर : एमआयडीसी लगतच्या निंबळक चौक ते कल्याण बाह्यवळण रस्ता दरम्यान एका ३५ वर्षांच्या अनोळखी तरुणाचा मृतदेह आज, सोमवारी एमआयडीसी पोलिसांना आढळला. पोलिसांनी तरुणाच्या घातपाताचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण उघड होईल. यासंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी ही माहिती दिली. दुपारी निंबळक शिवारात रस्त्याच्या कडेला एकाला मृतदेह दिसला. त्याने पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच एमआयडीसी पोलीसही घटनास्थळी आले. मृतदेह सात-आठ दिवसांपूर्वीच घटनास्थळी टाकल्याची शक्यता वर्तवली जाते.

मृताच्या शरीरावर जखमा आढळल्या आहेत. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान, खून करून मृतदेह बाह्यवळण रस्त्यावर आणून टाकले जात असल्याचे प्रकार घडत आहेत. मागील महिन्यात अहिल्यानगर शहरातील उद्योजक दीपक परदेशी यांचा खून करून मृतदेह निंबळक बाह्यवळण शिवारात टाकण्यात आला होता. आताही त्याच परिसरात मृतदेह आढळला आहे.

11:43 (IST) 15 Apr 2025

बुधवारपासून मेट्रो गाड्यांची चाचणी, डायमंड गार्डन ते मंडाले दरम्यान पहिल्यांदाच गाडी धावणार; पहिला टप्पा डिसेंबरअखेरीस सेवेत

आता डिसेंबरअखेरीस मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले मार्गिका, टप्पा १ वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे सुरु आहे. ...वाचा सविस्तर
11:40 (IST) 15 Apr 2025
Maharashtra News LIVE Updates: "लाडक्या बहिणींच्या विकत घेतलेल्या मतांची किंम्मत शून्य होईल", ठाकरे गटाकडून महायुती सरकारवर टीका

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) राज्यसभा खासदार संजय राऊत लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकारवर टीका केली आहे. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांना लाडकी बहीण योजनेबाबत विचारण्यात आले होते. याला उत्तर देताना राऊत म्हणाले, "ज्या लाडक्या बहिणींकडून १५०० रुपयांच्या बदल्यात मते विकत घेतली, त्याची किंम्मत आता ५०० रुपये झाली आहे. पुढे ती शून्य होईल."

11:12 (IST) 15 Apr 2025
Maharashtra News LIVE Updates: कोल्हापुरात ठाकरे गटाला धक्का, माजी आमदार करणार भाजपात प्रवेश

कोल्हापुरातील कागल विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) माजी आमदार संजय घाटगे हे आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.