Maharashtra Political Crisis Updates : मंगळवारी ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ने प्रकल्प गुजरातमध्ये उभारत असल्याचं जाहीर करत गुजरात सरकारसोबत सामंजस्य करार केले. यावरुनच राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. तर अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रित करा असा खोचक सल्ला फडणवीस यांनी १ लाख ६६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवरुन टीका करणाऱ्या शिवसेनेला दिला आहे.

विदर्भ व मराठवाडा विकास मंडळांना मुदतवाढ दिली नाही म्हणून अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवणारा भारतीय जनता पक्ष सत्तेत येऊन अडीच महिने झाले तरी मंडळाबाबत काहीही निर्णय घेत नसल्याने विरोध पक्षांनी भाजपावर टीका करायला सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रातील अशा विविध राजकीय आणि महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…

Live Updates

Maharashtra Latest News Updates, 15 September 2022 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

21:16 (IST) 15 Sep 2022
सात हजार जनावरांचे लंपी प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण; लंपीची लागण झालेल्या जनावरांची संख्या २६ वर

जिल्ह्यातील लंपी आजाराची लागण झालेल्या जनावरांची संख्या २६ इतकी झाली आहे. यामध्ये भिवंडी, शहापूर आणि बदलापूर तालुक्यातील जनावरांचा समावेश आहे. लंपीची लागण झालेले जनावर आढळून आलेल्या परिसरातील पाच किलोमीटरच्या परिघातील जनावरांना पशुसंवर्धन विभागाकडून प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे.

सविस्तर वाचा

20:56 (IST) 15 Sep 2022
कल्याण शहराचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद

कल्याण पूर्व, पश्चिम शहराचा पाणी पुरवठा मंगळवारी (ता.२०) सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत कल्याण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बारावे येथील जलशुध्दीकरण केंद्रात देखभाल आणि दुरुस्तीचे काम केले जाणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी दिली.

सविस्तर वाचा

20:52 (IST) 15 Sep 2022
पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरणार; कोकण, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस सरी

मोसमी पावसाची आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे मूळ जागेवर सरकतानाच अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा झाल्याने राज्यात गेल्या आठवड्यात अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. मोसमी पावसासाठी पोषक असलेली ही स्थिती हळूहळू क्षीण होत आहे.

सविस्तर वाचा

20:45 (IST) 15 Sep 2022
लम्पीवरील औषधे, लस खरेदीसाठी ५० लाखांचा निधी

लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पुणे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पुणे यांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून (डीपीडीसी) औषधे आणि लस खरेदीसाठी प्रत्येकी २५ लाख याप्रमाणे ५० लाखाच्या खर्चाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मान्यता दिली.

सविस्तर वाचा

20:36 (IST) 15 Sep 2022
इंजिनियर्स डेच्या दिवशीच अंबरनाथमध्ये सरकारी अभियंत्यांची शिंदे गटाच्या आमदाराकडून खरडपट्टी

कल्याण बदलापूर राज्य मार्गावर नादुरूस्त पेव्हरमुळे होणारे अपघात, शहरात वाहने उभी करण्यासाठी नसलेली जागा आणि इतर अनेक रखडलेल्या प्रकल्पांवरून आज अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी अंबरनाथ नगरपरिषदेच्या अभियंत्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. यावेळी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळही उपस्थित होते.

सविस्तर वाचा

20:24 (IST) 15 Sep 2022
‘११ हफ्ते ग्राहकांचे १२ वा आमचा’ योजनेच्या नावाखाली ठाण्यातील ज्वेलर्सने घातला ५७ कोटींचा गंडा

जादा परताव्याचे अमीष दाखवून १ हजार २१६ जणांची ५७ कोटी ८९ लाख ३७ हजार ३७१ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने श्रीकुमार पिल्लई याला अटक केली असून त्याची बँक खाती गोठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. फसवणूकीची रक्कम ७० कोटीपर्यंत जाऊ शकते. अशी माहिती पोलिसांनी दिली.

सविस्तर वाचा

20:14 (IST) 15 Sep 2022
परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्तीधारकांची संख्या दोनशे करण्याची मागणी

परदेशांत शिक्षण घेण्यास जाण्यासाठी अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना दिली जाणारी शिष्यवृत्ती त्वरित वितरित करावी, तसेच शिष्यवृत्ती धारकांची संख्या ७५ वरून २०० करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रथमेश आबनावे यांनी केली. विद्यार्थ्यांना प्रवेश, व्हिसा मिळवण्यात अडचणी येत असल्याने तातडीने कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

सविस्तर वाचा

20:08 (IST) 15 Sep 2022
फी अभावी १८ विद्यार्थी वर्गाबाहेर; विद्यार्थ्यांच्या आईवर मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळ

येथील उरण एज्युकेशन सोसायटी(यूईएस) या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील इयत्ता ६ वी ते १० वीतील १८ विद्यार्थ्यांनी फी भरली नाही म्हणून वर्गाबाहेर काढून अपमानास्पद वागणूक संतप्त झालेल्या पालक शिक्षक संघ आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात गुरुवारी शाळा व्यवस्थापनाचा निषेध करीत विद्यार्थ्यावर अशी वेळ आणणाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.

सविस्तर वाचा

20:00 (IST) 15 Sep 2022
साखळी ओढून ट्रेन थांबवण्यासाठीची पुणेकरांची कारणं वाचून थक्क व्हाल; ८ महिन्यात ७७३ जण गेलेत तुरुंगात

स्थानकावर पोहोचण्यास उशीर झाला किंवा थांबा नसलेल्या ठिकाणी मध्येच उतरायचे आहे, अशा किरकोळ कारणांसाठी रेल्वे गाड्यांमधील आपत्कालीन साखळी ओढून रेल्वे गाडी थांबविण्याच्या प्रकारांमध्ये पुणे रेल्वेत वाढ झाली आहे. रेल्वे पोलिसांनी याबाबत कठोर भूमिका घेतली असून, गेल्या आठ महिन्यांमध्ये अशा घटनांमध्ये ७७३ जणांना अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

19:48 (IST) 15 Sep 2022
‘बेकायदा शाळा चालवणाऱ्या संचालकांवर कारवाई करा’; पालिका आयुक्तांकडे मागणी

पालिकेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी अनधिकृत शाळांचे सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर, पालिकेकडून अनाधिकृत शाळा घोषित केल्या जातात. मात्र, या शाळांना नोटीस बजावणे, दंडात्मक कारवाई करणे, या शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश घेऊ नये असे जाहीर करण्यापलिकडे शिक्षण विभागाने काहीही केले नाही.

सविस्तर वाचा

19:40 (IST) 15 Sep 2022
लोअर परेल उड्डाणपुलासाठी आजपासून चार दिवस मध्यरात्री ‘ट्रॅफिक ब्लॉक’

लोअर परळ रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या डिलाइल रोड उड्डाणपुलावर दुसरा गर्डर बसवण्यासाठी पश्चिम रेल्वेने १५ सप्टेंबरच्या मध्यरात्री चार तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेतले. आणखी चार ब्लॉक घेण्याचे नियोजन असून १६ सप्टेंबरच्या मध्यरात्रीही १.१० ते १७ सप्टेंबर रोजी पहाटे ५.१० पर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सविस्तर वाचा

18:06 (IST) 15 Sep 2022
मुंबई : एक हजार लिटर भेसळयुक्त दुध जप्त ; सहा जणांना अटक

दूधामध्ये अशुद्ध पाणी मिसळून त्याची विक्री करणाऱ्या सहा जणांना गुन्हे शाखेच्या नियंत्रण कक्षाने गुरूवारी अटक केली. आरोपींकडून एक हजार लिटरहून अधिक भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले.

सविस्तर वाचा

17:41 (IST) 15 Sep 2022
अकोला : सराफा व्यावसायिकाला मारहाण आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचार प्रकरणी पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे

अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशान्वये बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चोरीचे सोने खरेदी केल्याच्या आरोपावरून शेगाव येथील सराफा व्यावसायिकाला अटक करून स्थानिक गुन्हे शाखेतील पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

सविस्तर वाचा

17:03 (IST) 15 Sep 2022
अंबरनाथ : चिखलोलीच्या कचराभूमीला पर्याय नाहीच आहे त्या जागेवर उपाययोजना करण्याचे निर्देश

चिखलोली येथील कचराभूमी सुरू करताना नियमांचा भंग झाला असला तरी पर्याय नसल्याने ही कचराभूमी इथेच राहील, असे सांगत अंबरनाथ नगरपालिकेने या कचराभूमीवर दुर्गंधी, सांडपाणी याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश हरित लवादाने दिले आहेत.

सविस्तर वाचा

16:49 (IST) 15 Sep 2022
ठाणे शहरात ज्येष्ठांसह महिलांना स्वाइनची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक ; घोडबंदर परिसर रुग्ण संख्येत आघाडीवर

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत आतापर्यंत पाचशेच्या आसपास स्वाइन फ्लुचे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजेच ३८२ रुग्ण आढळून आलेल्या ठाणे शहरात ज्येष्ठांसह महिलांना स्वाइनची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती पुढे आली आहे.

सविस्तर वाचा

16:13 (IST) 15 Sep 2022
मुंबई : दंड चुकवण्यासाठी मोटरसायकलला स्कूटरचा क्रमांक ; दोघांविरोधात गुन्हा दाखल

वाहतुकीचा नियम मोडल्यानंतर दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करण्यासाठी मोटरसायकलला स्कूटरच्या क्रमांकाची पाटी लावून बेकायदेशीरपणे दुचाकीवरून ठिकठिकाणी फिरणाऱ्या तिघांविरोधात आरे पोलिसानी गुन्हा दाखल केला.

सविस्तर वाचा

16:06 (IST) 15 Sep 2022
मुंबई : भायखळ्यात उड्डाणपुलाची उभारणी सुरू

भायखळा आणि सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकांदरम्यान १९२२ मध्ये बांधण्यात आलेला भायखळा उड्डाणपूल पाडून त्याजागी नवीन पद्धतीच्या केबल स्टेड पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (एमआरआयडीसी) या पुलाच्या बांधकामाला सुरुवात केली आहे.

सविस्तर वाचा

15:56 (IST) 15 Sep 2022
पुणे शहर ३३ ठेकेदारांमुळे खड्ड्यात

शहरातील रस्त्यांची चाळण होण्यास ३३ ठेकेदार जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. देखभाल दुरुस्ती दायित्व कालावधीत (डिफेक्ट लायबिलिटी पीरियड) रस्त्यांची दुरवस्था झाल्यापैकी ७५ ठेकेदारांना नोटिस बजाविण्यात आल्या असून यातील ३३ ठेकेदारांनी पाचपेक्षा जास्त रस्त्यांची कामे केल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे.

सविस्तर वाचा

13:21 (IST) 15 Sep 2022
कल्याण जवळील नेवाळी पाडा येथे महावितरण कर्मचाऱ्यावर ग्रामस्थाचा हल्ला

कल्याण पूर्व विभागातील मलंग गड भागातील नेवाळी नाका येथे महावितरणच्या तंत्रज्ञाला नेवाळी पाडाच्या स्थानिक ग्रामस्थाने किरकोळ कारणावरुन बेदम मारहाण करुन त्यांच्यावर लोखंडी वस्तुने हल्ला केला. या हल्ल्यात कर्मचारी गंभीर जखमी होऊन त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

सविस्तर वाचा

13:03 (IST) 15 Sep 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय मंत्री पियुष गोयलांना पाठवले पत्र, म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवले आहे. नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच, शुल्क व करपरतावा माफीचा लाभ सुध्दा वाढविण्याची विनंती त्यांनी केली आहे. वाचा सविस्तर बातमी...

13:00 (IST) 15 Sep 2022
“…अन्यथा निवडणुका, नोकरभरती होऊ देणार नाही”, आरक्षण परिषदेनंतर मराठा समाजाची आक्रमक भूमिका

मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा मोर्चा, संभाजी ब्रिगेडसह मराठा सेवा संघाच्यावतीने सोलापुरात जिल्हास्तरीय मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा या परिषदेत देण्यात आला.

सविस्तर वाचा...

12:54 (IST) 15 Sep 2022
पुणे : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टरवर नुकसान ; २० हजार कोंबड्या मृत; ८३ घरांची पडझड

जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आठ तालुक्यांमध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील साडेपाच हजार हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले असून ८३ घरांची पडझड झाली आहे. याशिवाय एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून रस्ते, बंधारे वाहून गेले आहेत. तसेच नऊ जनावरांच्या मृत्यूची नोंद झाली असून तब्बल २० हजार कोंबड्या दगावल्या आहेत.

सविस्तर वाचा

12:34 (IST) 15 Sep 2022
डोंबिवली एमआयडीसीत सांडपाणी चेंबर फुटल्याने रसायनयुक्त पाणी रस्त्यावर

डोंबिवली एमआयडीसीतील सांडपाणी वाहून नेणाऱा एक चेंबर बुधवारी एमआयडीसी टप्पा दोन विभागात फुटल्याने या चेंबरधील रसायनयुक्त सांडपाणी परिसरातील रस्त्यावर आले. या भागातील नाल्यात काही पाणी वाहून गेल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. प्रक्रिया केलेले पाणी वाहून जात असताना चेंबर फुटले यामध्ये कोणाही कंपनी चालकाचा सहभाग नाही.

सविस्तर वाचा

12:26 (IST) 15 Sep 2022
पुणे : जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध सरपंच पदाच्या ५५ जागांसाठी २१० जण रिंगणात

जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू असून त्यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर, एका ग्रामपंचायतीसाठी एकही अर्ज आलेला नाही. परिणामी सरपंच पदांच्या ५५ जागांसाठी २१० उमेदवार रिंगणात आहेत.

सविस्तर वाचा

12:14 (IST) 15 Sep 2022
डोंबिवली एमआयडीसीतील आईस फॅक्टरी-मानपाडा पोहच रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला प्रारंभ

डोंबिवली एमआयडीसीतील आईस फॅक्टरी ते मानपाडा रस्ता या पोहच रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला बुधवारी मध्यरात्री पासून सुरुवात करण्यात आली. हे काम सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत या रस्त्यावरील वाहतूक बंद ठेऊन ती अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

12:14 (IST) 15 Sep 2022
यवतमाळ : भयंकर…पोलीस मुख्यालयाच्या आवारातच पोलिसाची हत्या! ; लोखंडी पाईपने मरेपर्यंत मारहाण

यवतमाळ येथील पोलीस मुख्यालयाच्या आवारात एका तरुण पोलीस कर्मचाऱ्याची लोखंडी पाईपने मारहाण करून हत्या करण्यात आली. बुधवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली. निशांत खडसे (३५) रा. अकोला ह.मु.मुख्यालय, पोलीस वसाहत, असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

सविस्तर वाचा

12:13 (IST) 15 Sep 2022
मुंबई : राज्य सरकारच्या विरोधात शिवसेनेची स्वाक्षरी मोहीम

महाराष्ट्रात येऊ घातलेला वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे राज्य सरकारवर टीका होत असून आता शिवसेनेने राज्य सरकारच्या विरोधात निषेध स्वाक्षरी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.सध्या ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्पावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

सविस्तर वाचा

Maharashtra Latest News Live | Maharashtra- Mumbai live news updates today

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज अपडेट, महाराष्ट्र न्यूज अपडेट