Marathi News Update : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या प्रचारसभा सुरु आहे. आज अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा पार पडणार आहे. तर अमरावतीमधील सायन्स कोर मैदानावरुन प्रहारचे नेते बच्चू कडू आणि रवी राणा, नवनीत राणा यांच्यात वाद सुरु आहे. याबरोबरच महायुतीचा नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप सुटत नसल्याचे चित्र आहे. छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेतून माघार घेतली असली तर राष्ट्रवादीने या जागेचा दावा सोडला नसल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. यासह राज्यातील इतर अनेक घडामोडी वाचण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश करा.

Live Updates

Marathi News Live Today, 24 April 2024 : अमरावतीत अमित शाहांच्या सभेआधी राजकारण तापलं; बच्चू कडू रॅली काढणार

20:01 (IST) 24 Apr 2024
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. विदर्भातील यवतमाळ-वाशीम, अमरावती, बुलडाणा, अकोला आणि वर्धा, परभणी, हिंगोली, नांदेड या मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे.

18:54 (IST) 24 Apr 2024
पत्राचाळीतील पुनर्वसित इमारतीचे ८५ टक्के काम पूर्ण, मेअखेरीस काम पूर्ण करण्याचे म्हाडाचे नियोजन

मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसित इमारतींचे काम अंतिम टप्प्यात आहे. या इमारतींचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम मे अखेर पूर्ण करण्याचे म्हाडाच्या मुंबई मंडळाचे नियोजन आहे.

सविस्तर वाचा...

18:53 (IST) 24 Apr 2024
शीव-पनवेल महामार्गावरील रात्रीच्यावेळी प्रवास सुरक्षित आहे का ?

पनवेल: ओला अ‍ॅपवरुन बूक केलेल्या मोटारीतून शीव पनवेल महामार्गावरील रात्रीच्या वेळेस प्रवास सुरक्षित आहे का असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. ओला अ‍ॅपवरुन बूक होणाऱ्या मोटारींचे चालक रात्रंदिवस पाळी करुन या मोटारी चालवित असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही.

सविस्तर वाचा...

18:52 (IST) 24 Apr 2024
काँक्रीटीकरणामुळे ‘पामबीच’वर वाहतूककोंडी

नवी मुंबई : पालिकेने पामबीच मार्गावरील सायन पनवेल महामार्गाखालील वाशी जवळील उड्डाणपुलाखालील कामाला मागील काही दिवसांपासून सुरुवात केली असून या ठिकाणी सुरु असलेल्या कामामुळे या भागात सातत्याने वाहतूकोंडीला सामोरे जावे लागत आहे.

सविस्तर वाचा...

18:51 (IST) 24 Apr 2024
उरण : चिरनेरमध्ये दीड एकरात २५ टन कोकणी उसाचे उत्पादन

उरण : तालुक्यातील चिरनेर हे शेतीसाठी प्रसिद्ध गाव असून सध्या सुरू असलेल्या उन्हाच्या लाटेत गावात कोकणातील जमिनीत ऊस उत्पादन करून त्याचा ताजा रस काढून विकला जात आहे. दीड एकरावर हा ऊस पिकवला जात आहे.

सविस्तर वाचा...

18:50 (IST) 24 Apr 2024
स्फोटातील दगड लागल्याने महिलेला बारा टाके, बांधकामांच्या ठिकाणी स्फोटांचा प्रश्न गंभीर

नवी मुंबई : शहरात नव्या बांधकामांबरोबरच पुनर्विकासातील कामांबाबत मोठ्या प्रमाणात शहरात स्फोट घडवण्यात येत असून या स्फोटांमुळे बसणाऱ्या हादऱ्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा कळीचा मुद्दा ठरत आहे.

सविस्तर वाचा...

18:49 (IST) 24 Apr 2024
शरद पवारांनी आधी शेतकरी विधवांची माफी मागावी, गृहमंत्री अमित शाह यांची टीका

अमरावती : यापूर्वी नवनीत राणा यांना पाठिंबा देऊन आपली चूक झाली, आपण अमरावतीकरांची माफी मागतो, असे राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार म्‍हणाले होते, पण ते मुख्‍यमंत्री असताना देशाचे कृषीमंत्री असताना विदर्भासाठी त्‍यांनी काय केले.

सविस्तर वाचा...

18:40 (IST) 24 Apr 2024
बदलापूर, अंबरनाथमध्ये शुक्रवार, शनिवारी पाणीबाणी; तातडीच्या कामांसाठी बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र १२ तास बंद

बदलापूर: बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीवरील बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रात येत्या शुक्रवारी नवीन पंपिंग यंत्रणा आणि विद्युत पुरवठा सुधारणा करण्याच्या कामासाठी १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवार २६ एप्रिल सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील.

सविस्तर वाचा....

17:55 (IST) 24 Apr 2024
काँग्रेसच्या निष्ठावंतास बाहेरचा रस्ता; कोल्हापुरातील बंडखोर उमेदवार बाजीराव खाडे पक्षातून निलंबित

कोल्हापूर : कोल्हापुरातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाजीराव खाडे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी ही कारवाई केली आहे.

सविस्तर वाचा...

17:50 (IST) 24 Apr 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापूरसह माढ्यात दोन प्रचार सभा

सोलापूर : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांत दोन जाहीर सभा होणार आहेत. २९ एप्रिल रोजी सोलापुरात तर ३० एप्रिल रोजी माळशिरसमध्ये मोदी प्रचारासाठी येणार आहेत.

सोलापूर आणि माढ्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कडवी झुंज होत आहे. विशेषतः सोलापुरात महायुतीचे सहापैकी पाच आणि माढ्यात सर्व सहापैकी सहा आमदार महायुतीचे असूनही सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी भाजपचे राम सातपुते यांना आणि माढ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना तगडे आव्हान दिले आहे. या पार्श्वभूमीवर जोखीम टाळण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या सभांचे आयोजन केले जात आहे.

मोदी यांची जाहीर सभा सोलापुरात २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता होम मैदानावर होणार आहे. दुस-या दिवशी सकाळी माढा लोकसभेसाठी भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचाराकरिता माळशिरसमध्ये येत आहेत. मागील २०१९ सालच्या माढा लोकसभा निवडणुकीत प्रचारसभेसाठी मोदी अकलूजमध्ये आले होते.

17:49 (IST) 24 Apr 2024
नाशिक : जप्त एक कोटीचा मुद्देमाल पोलिसांकडून तक्रारदारांना परत

नाशिक : वेगवेगळ्या कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला एक कोटीचा मुद्देमाल ७५ तक्रारदारांना परत करण्यात आला. चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याने तक्रारदारांनी पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

वाचा सविस्तर...

17:16 (IST) 24 Apr 2024
भाषण रंगात आले अन् अचानक गडकरी भोवळ येऊन पडले…

यवतमाळ : पुसद येथे महायुतीच्या सभेत भाषण देत असताना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भोवळ येवून पडले. या घटनेने सभास्थळी एकच खळबळ उडाली. ही घटना आज बुधवारी दुपारी घडली. प्रचंड उन्हामुळे गडकरी यांना भोवळ आल्याचे सांगितले जात असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आयोजकांनी सांगितले.

वाचा सविस्तर...

16:48 (IST) 24 Apr 2024
नितीन गडकरींना सभेत भोवळ, आराम करून पुन्हा भाषणास सुरुवात

यवतमाळच्या पुसदमध्ये महायुतीची सभा सुरु होती. या सभेत भाषण करत असताना भाजपाचे नेते नितीन गडकरी यांना भोवळ आली होती. यावेळी त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांना सावरले. त्यानंतर काहीवेळ नितीन गडकरी यांनी आराम केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली. यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या भाषणाला सुरुवात केली.

16:44 (IST) 24 Apr 2024
ठाणे : कोंडीस कारणीभूत बंद केलेला कापूरबावडी- ढोकाळी मार्ग खुला करण्याचा निर्णय

ठाणे : घोडबंदर मार्गालगत असलेल्या महत्त्वाचा कापूरबावडी ते ढोकाळी हा बंद मार्ग अखेर ठाणे महापालिकेने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक ते दोन दिवसांत हा मार्ग खुला होणार आहे.

वाचा सविस्तर...

16:44 (IST) 24 Apr 2024
अकोल्यात निवडणुकीतील प्रचार शिगेला, शेवटच्या काही तासांत मतदारांपर्यंत पोहोचण्याची चढाओढ; तुल्यबळ तिरंगी लढतीची रंगत

अकोला : अकोला मतदारासंघात लोकसभा निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचला आहे. जाहीर प्रचारासाठी शेवटचा काही तासांचा कालावधी शिल्लक असून मतदारांपर्यंत पोहोचण्याची उमेदवारांमध्ये चढाओढ लागली आहे. तुल्यबळ तिरंगी लढतीमुळे निवडणुकीत चांगलीच रंगत आल्याचे चित्र आहे.

वाचा सविस्तर...

16:38 (IST) 24 Apr 2024
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून ७३ कोटींच्या मालमत्तेवर टाच, खासदार संजय राऊत यांचे विश्वासू प्रवीण राऊत यांच्या मालमत्तांचा समावेश

मुंबईः सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी ७३ कोटी ६२ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली. या मालमत्तेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे विश्वासू प्रवीण राऊत आणि त्याच्या जवळच्या साथीदारांच्या पालघर, दापोली, रायगड आणि ठाणे परिसरातील जमिनींचा समावेश आहे.

सविस्तर वाचा...

16:37 (IST) 24 Apr 2024
धाराशिव : वंचितचे कुकर, एमआयएमचा पतंग आणि बीएसपीचा हत्ती, कोणाला होणार लाभ, कोणाची गुल होणार बत्ती?

धाराशिव – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये प्रमुख लढत आहे. प्रमुख लढतीचे चित्र जरी स्पष्ट झाले असले तरी वंचितचे कुकर, एमआयएमचा पतंग आणि बीएसपीचा हत्ती निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेला आहे.

सविस्तर वाचा...

16:36 (IST) 24 Apr 2024
पुणेकरांचा हवाई प्रवास सुसाट! विमानतळावरून तब्बल ९५ लाख प्रवाशांचे ‘उड्डाण’

पुणे : पुणे विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षात ९५ लाखांहून अधिक प्रवाशांनी हवाई प्रवास केला आहे. यात ९३ लाखांहून अधिक प्रवाशांनी देशांर्तगत आणि १ लाख ६९ हजार प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे.

सविस्तर वाचा...

16:34 (IST) 24 Apr 2024
मुंबईतील १७ भूखंडांच्या ई-लिलावाच्या निविदेला मुदतवाढ ? एक – दोन दिवसात निर्णय

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील विविध वापरासाठीच्या १७ भूखंडाच्या ई – लिलावासाठी निविदा मागविल्या आहेत. निविदा सादर करण्याची मुदत शुक्रवारी संपुष्टात येत आहे. त्यामुळे या भूखंडांसाठी निविदा सादर करण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

सविस्तर वाचा...

16:33 (IST) 24 Apr 2024
मुंबई : खार भुयारी मार्गावरील प्रस्तावित पुलाला स्थानिकांचा वाढता विरोध, निवासी भागातील पुलाच्या अरेखनाला विरोध

मुंबई : खार भुयारी मार्गात (खार सबवे) होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने एक उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला असून स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.

सविस्तर वाचा...

16:32 (IST) 24 Apr 2024
माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह बाराजणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : घर बळकावल्याप्रकरणी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर आणि वानवडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंयज पिंगळे यांच्यासह बाराजणांविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला .

सविस्तर वाचा...

16:32 (IST) 24 Apr 2024
उपकरप्राप्त इमारतींसाठीच महाराष्ट्राचा कायदा! सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

मुंबई : जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतीतून बाहेर पडण्याची भाडेकरूंची तयारी नाही आणि इमारत मालकांकडे दुरुस्तीसाठी निधी नाही, अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाने या इमारती संपादित करण्यासाठी कायदा आणला आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी नोंदविले.

सविस्तर वाचा...

16:16 (IST) 24 Apr 2024
भाजपा नेते नितीन गडकरी यांना भाषणादरम्यान भोवळ

यवतमाळच्या पुसदमध्ये महायुतीची सभा सुरु होती. या सभेत भाषण करत असताना भाजपाचे नेते नितीन गडकरी यांना भोवळ आली. यावेळी त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांना सावरले. सध्या नितीन गडकरी यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात यते आहे.

15:43 (IST) 24 Apr 2024
लग्नाचे निमित्त झाले अन्… पतीने कुऱ्हाडीने सपासप वार करून पत्नी व मुलीला संपवले

अकोला : कौटुंबिक वादातून पतीने पत्नी व नऊ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शहरातील हनुमानवस्ती परिसरात बुधवारी सकाळी घडली. गेल्या आठ दिवसांत दुहेरी हत्याकांडाची ही दुसरी घटना असल्याने शहर हादरले आहे.

वाचा सविस्तर...

15:43 (IST) 24 Apr 2024
भाजपच्या बालेकिल्यातच शिंदे सेनेची दमछाक, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाशीममध्ये बाईक रॅली

वाशीम : महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील महाले पायाला भिंगरी लावून मतदार संघ पिंजून काढत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ मंगरुळपीर शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच जाहीर सभा पार पडली. परंतु या सभेला नागरिकांचा पाहिजे तसा प्रतिसाद लाभला नाही. गावागावात गाठीभेटीच्या माध्यमातून त्या मतदारांपर्यत पोहचत असल्या तरी भाजपचा बालेकिल्ला असतांनाही शिवसेना शिंदे गटाची चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे.

वाचा सविस्तर...

15:14 (IST) 24 Apr 2024
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे हे निवडणूक लढवत आहेत.

14:40 (IST) 24 Apr 2024
मोदींना शेतकरी नेत्याचा सवाल; म्हणाले, “किती काळ अमेरिका दर…”

नागपूर : अमेरिकेतील बाजारपेठ शेतमालाच्या चढ-उतारावर भारतीय कृषी मालाचे दर ठरतात. हे असे किती काळ चालणार, असा सवाल कृषी अभ्यासक व शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रातून केला आहे.

वाचा सविस्तर...

13:43 (IST) 24 Apr 2024
रेल्वेच्या वक्तशीरपणात ‘एसी’चा खोडा; गोरेगाव-चर्चगेट जलद लोकल रद्द करण्याचा घाट

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची गर्दी वाढत असून, सामान्य उपनगरी रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र, पश्चिम रेल्वे प्रशासनाने सामान्य उपनगरी गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्याचा घाट घातला आहे.

वाचा सविस्तर...

13:26 (IST) 24 Apr 2024
ससूनमध्ये वाद पेटला! आयुक्तांच्या निर्णयाच्या विरोधात अधिष्ठात्यांची थेट भूमिका

पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयातील अधीक्षकपुराण संपत नसल्याचे पुन्हा समोर आले आहे. गेल्या वर्षभरात पाच अधीक्षक नेमण्याचा विक्रम रुग्णालयाच्या नावावर नोंद असताना आता नवीन अधीक्षकांच्या नियुक्तीला आक्षेप घेण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

13:06 (IST) 24 Apr 2024
नागपूर : गतवर्षीच्या तुलनेत धरणांतील जलसाठ्यात घट

नागपूर : एप्रिल महिन्यात उन्हाच्या झळासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उन्हाळ्यात पावसाळ्यासारखी स्थिती निर्माण झाली. परंतु, अजूनही उन्हाळ्याचे दोन महिने शिल्लक असून नागपूर जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्यात घट झाली आहे.

वाचा सविस्तर...

प्रहारचे नेते, आमदार बच्चू कडू यांना अमरावतीमधील सायन्स कोर मैदानावर सभा घेण्याची परवानगी नाकारल्यानंतर ते थोड्या वेळात कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका मांडणार आहेत. तसेच दुपारी ते रॅली काढणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. याबरोबरच त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.

Bachchu Kadu

आमदार बच्चू कडू (फोटो-संग्रहित छायाचित्र)

Story img Loader