Maharashtra Breaking News Update : एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु आहे. अशातच एक ओपिनियन पोल समोर आला आहे. यामध्ये शिंदे गट व अजित पवार गटासाठी अनपेक्षित अंदाज वर्तवण्यात आला आहे. एबीपी माझा-सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार, महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी महायुतीला लोकसभेच्या ३० जागा तर शिवसेना ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसला १८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असे असतानाच महायुतीच्या काही जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटत नसल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरुन महायुतीमधील पक्षात रस्सीखेच सुरु आहे. दुसरीकडे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे नेते विशाल पाटील हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्येही बिघाडी होण्याचे चित्र आहे. यासह राज्यातील इतर अनेक घडामोडी वाचण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश करा.

Live Updates

Marathi News Live Today, 17 April 2024 : महायुतीचे जागावाटप का रखडले? नाशिक, छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरुन रस्सीखेच

20:44 (IST) 17 Apr 2024
सांगलीवाडी तपासणी नाक्यावर साडेदहा लाखाची रोकड जप्त

सांगली : सांगली शहरात प्रवेश करताना सांगलीवाडी तपासणी नाक्यावर गस्ती पथकाने बुधवारी साडेदहा लाखाची रोकड एका वाहनातून जप्त केली. वाहन चालक ज्योतिबा गोरे यांच्याकडे या रकमेबाबत कोणतीही कायदेशिर माहिती नसल्याने प्राप्तीकर विभागाला याची माहिती देण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

वाचा सविस्तर...

20:43 (IST) 17 Apr 2024
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल

वसई : उपचारासाठी आलेल्या २२ वर्षीय तरुणीवर नालासोपारा येथील एका स्वयंघोषित वैद्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी ६० वर्षीय स्वयंघोषित वैद्याच्या विरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

वाचा सविस्तर...

20:28 (IST) 17 Apr 2024
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज

टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क हे पंतप्रधान नरेंद्र यांच्या भेटीसाठी पुढील आठवड्यात दिल्ली दौऱ्यावर येत असून, कंपनीकडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा होणे अपेक्षित आहे.

वाचा सविस्तर...

20:05 (IST) 17 Apr 2024
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन

ठाणे : जांभळीनाका येथे आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने चैत्र नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री या उत्सवासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी उपस्थिती दर्शविली. रश्मी ठाकरे यांना पाहण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.

वाचा सविस्तर...

20:01 (IST) 17 Apr 2024
नाशिक : काळाराम मंदिरात राजकीय नेत्यांची लगबग

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज्याचे मंत्री, लोकप्रतिनिधी, इच्छुक उमेदवार आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी रामनवमीच्या निमित्ताने बुधवारी पंचवटीतील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात दर्शन घेतले.

वाचा सविस्तर...

19:55 (IST) 17 Apr 2024
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित

पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत बहुजन विकास आघाडीकडे सर्वच पक्षांनी पाठिंबा मागितला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पक्षाचे अध्यक्ष ठाकूर यांनी मलाच सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा अशी गुगली टाकली आहे.

वाचा सविस्तर..

19:14 (IST) 17 Apr 2024
वाकोला पुलावरील अपघातात एकाचा मृत्यू, तिघे जखमी; तीन मोटरींचे नुकसान

मुंबईः वाकोला पुलावर बुधवारी पहाटे मोटरगाडीने टॅक्सीला दिलेल्या धडकेत ३४ वर्षीय टॅक्सीचालकाचा मृत्यू झाला. या अपघातात मोटरगाडी चालवणाऱ्या चालकासह तिघे जखमी झाले असून या अपघातात तीन मोटरगाड्यांचे नुकसान झाले. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वाकोला पुलावर बुधवारी पहाटे ३.४५ च्या सुमारास हा अपघात झाला. वांद्रे येथून सांताक्रुझच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या अर्टिगा मोटरगाडीच्या चालकाचा ताबा सुटला आणि मोटरगाडी दुभाजक ओलांडून विरूद्ध दिशेच्या मार्गिकेवर गेली. अर्टिगा मोटरगाडीने विरूद्ध दिशेने येणाऱ्या टॅक्सीला धडक दिली. त्यात टॅक्सीचालक अजयकुमा विद्याप्रसाद मिश्रा (३४) गंभीर जखमी झाला. त्याला व्ही.एन. देसाई रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. टॅक्सीच्या मागे असलेल्या वॅगनार मोटरगाडीचेही या अपघात नुकसान झाले.

19:13 (IST) 17 Apr 2024
तळोजात शुक्रवारी पाणी पुरवठा बंद राहणार

पनवेल : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणातून तळोजा वसाहतीला पाणी पुरवठा केला जातो. परंतू गुरुवारी (ता.१८) रात्री बारा वाजल्यापासून ते शुक्रवारी (ता.१९) दिवसभरात बारवी धरण क्षमतेच्या मुख्य जलवाहिनीवर आणि जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने तळोजात शुक्रवारी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती सिडको महामंडळाने दिली आहे. शनिवारी (ता.२०) कमी दाबाने व कमी प्रमाणात नियमित वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा सूरु राहील, असेही सिडकोने कळविले आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन सिडकोने केले आहे.

18:57 (IST) 17 Apr 2024
सांगली : म्हैसाळ तपासणी नाक्यावर ११ लाख ६० हजाराचा गुटखा जप्त

सांगली : कर्नाटकातून सांगलीत विक्रीसाठी आयात केला जात असलेला ११ लाख ६० हजाराचा गुटखा म्हैसाळ सीमा नाक्यावर बुधवारी पकडण्यात आला. याप्रकरणी वाहन चालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

वाचा सविस्तर...

18:57 (IST) 17 Apr 2024
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ

मुंबई : कोट्यवधी रुपये खर्चून पर्जन्य जलवाहिन्यांची कामे केली असली तरी गेल्यावर्षीच्या पावसाळ्याच्या तुलनेत यंदाही मुंबईतील पाणी भरण्याची ठिकाणे वाढल्याचे आढळून आले आहे. येत्या पावसाळ्यात पाणी उपसा करण्यासाठी तब्बल ४८१ उदंचन संच (पंप) मुंबई महापालिका भाड्याने घेणार आहे.

वाचा सविस्तर...

18:56 (IST) 17 Apr 2024
शिरोळ, हातकणंगले तालुक्यात गाऱ्यांसह वळिवाची दमदार हजेरी; उन्हात गरव्याची सुखद अनुभूती

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व भागाला वळीव पावसाने झोडपून काढले. शिरोळ, हातकणंगले तालुक्यात अनेक ठिकाणी बुधवारी सायंकाळी गाऱ्यांसह वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. कडक उन्हामुळे लाहीलाही झालेल्या लोकांना या पावसात चिंब भिजत गारव्याची अनुभूती घेतली.

वाचा सविस्तर...

18:52 (IST) 17 Apr 2024
मुख्यमंत्री शिंदेंच्या शहरात ४० टक्के भागात बत्तीगुल

कळवा येथे महावितरणकडून ठाणे शहरात केला जाणाऱ्या विद्युत वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे शहरातील ४० टक्के भागात विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. ऐन उन्हाळ्यात विद्युत पुरवठा बंद झाल्याने नागरिकांचे हाल झाले.

वाचा सविस्तर....

17:50 (IST) 17 Apr 2024
प्रकाश आंबेडकर यांना ओवेसीचा पाठिंबा का?

छत्रपती संभाजीनगर : भले आमची वंचितबरोबर आता युती नाही. तरीही दलित नेतृत्व विकसित व्हावे ही इच्छा आहे. म्हणूनच अकोला लोकसभा मतदारसंघात एमआयएमने प्रकाश आंबेडकरांना जाहीर पाठिंबा दिला. त्यांच्या या कृतीचे आता राजकीय विश्लेषण केले जात असून औरंगाबाद लोकसभेच्या मतविभाजनात ते दडले असल्याचे सांगण्यात येत आहे.

वाचा सविस्तर...

17:48 (IST) 17 Apr 2024
'विरोधकांना बीड लोकसभेला उमेदवारही मिळत नव्हता'; पंकजा मुंडेंचा टोला

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आज माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर टीका केली. 'विरोधकांना बीड लोकसभा मतदारसंघात उमेदवारदेखील मिळत नव्हता. विरोधी उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच (अजित पवार गट) तिकडे गेले आहेत, अन्यथा त्यांना उमेदवारही मिळत नव्हता', असा खोचक टोला पंकजा मुंडे यांनी लगावला.

17:30 (IST) 17 Apr 2024
राज्यात उष्माघाताचे पाच नवे रुग्ण सापडले, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ८२ वर

राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ८२ वर पोहोचली आहे.

सविस्तर वाचा...

17:22 (IST) 17 Apr 2024
धारावी पुनर्विकास प्रकल्प : महिन्याभरात सुमारे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण; सर्वेक्षणासाठी १०० पथके तैनात करणार

धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत बांधकामांचे सर्वेक्षण आणि रहिवाशांची पात्रता निश्चिती करण्याचे काम सध्या सुरू आहे.

सविस्तर वाचा...

17:15 (IST) 17 Apr 2024
कशासाठी ? हंडाभर पाण्यासाठी…

नाशिक : जनावरांपेक्षाही वाईट असे आमचे जगणे झाले आहे. सकाळी पहिले पाणी कुठून आणि कसे मिळेल ते पाहायचे, मग स्वयंपाक आणि बाकी काम. कधी कधी संपूर्ण दिवसच पाण्यासाठी थांबावे लागते, पाण्यासाठीच दिवस घालवला तर मजुरीचे काय ? कामावर न गेल्यास खाणार काय…

वाचा सविस्तर...

17:13 (IST) 17 Apr 2024
आरटीई प्रवेश प्रक्रियेतील बदलांनंतर पहिल्यांदाच नोंदणी प्रक्रिया सुरू… कसा आहे पालकांचा प्रतिसाद?

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेतील अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.

सविस्तर वाचा...

17:01 (IST) 17 Apr 2024
पुणे : रिंगरोडमध्ये परदेशी कंपन्यांना रस

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाकडून वर्तुळाकार रस्ता हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

16:51 (IST) 17 Apr 2024
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट

नाशिक : एप्रिलच्या मध्यावर उच्चांकी तापमान नोंदवणाऱ्या नाशिकचा पारा दुसऱ्या दिवशी आणखी उंचावत ४०.७ या नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. दिवसा उन्हाच्या चटक्यांबरोबर प्रचंड उकाड्याला तोंड द्यावे लागत आहे.

सविस्तर वाचा...

16:51 (IST) 17 Apr 2024
“कुणीतरी श्रीरंग बारणेंना सांगा माझे वडील…”, संजोग वाघेरेंचा पुन्हा एकदा बारणेंवर निशाणा

बारणे यांनी विरोधी उमेदवाराला ओळखत नाही, असं विधान केलं होतं.

सविस्तर वाचा...

16:50 (IST) 17 Apr 2024
“निवडून येण्याची गॅरंटी नाही, मग जनतेला कसली गॅरंटी देताहेत,’’ संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवर टीका, म्हणाले…

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः निवडून येतील, याची गॅरंटी नाही, मग ते जनतेला कसली गॅरंटी देत आहेत. त्यांनी कितीही सभा घेतल्या तरी विजय हा इंडिया आघाडीचाच होणार, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला.

सविस्तर वाचा...

16:49 (IST) 17 Apr 2024
रश्मी बर्वे यांना मिळणाऱ्या सहानुभूतीमुळे शिवसेनेपुढे आव्हान; रामटेक लोकसभा मतदारसंघाचे चित्र

नागपूर : काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याने निर्माण झालेली सहानुभूती आणि काँग्रेसमधून आलेल्या राजू पारवे यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेत असलेल्या नाराजीमुळे रामटेक लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसमोर काँग्रेसचे आव्हान उभे ठाकले आहे.

सविस्तर वाचा...

16:48 (IST) 17 Apr 2024
‘ते’ आले अन् भाजप उमेदवारासह सहकाऱ्यांना हायसे वाटले! निवडणूक व्यवस्थापनात हातखंडा असलेले…

वर्धा : मजबूत पक्ष यंत्रणा, तगडी उमेदवारी, सक्षम साधनसामग्री एवढे असून भागत नाही. या सर्व गोष्टीत ताळमेळ ठेवून मार्गी लावणारा एक कुशल व्यवस्थापक निवडणुकीत आवश्यक ठरतो. अन्यथा सर्व पाण्यात, असे जाणकार म्हणतात. हॅटट्रिक साधायला निघालेले भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या सध्याच्या प्रचारस्थितीबाबत असेच बोलल्या जाते.

सविस्तर वाचा...

16:47 (IST) 17 Apr 2024
मनधरणीचे प्रयत्न… नवनीत राणा यांनी अभिजीत अडसूळ यांची घेतली भेट, पण…

अमरावती : भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांच्‍या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर राणा दाम्‍पत्‍याने आनंदराव अडसूळ यांच्‍या येथील निवासस्‍थानी पोहचून त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांची भेट घेत मनधरणी करण्‍याचा प्रयत्‍न केला.

सविस्तर वाचा...

16:46 (IST) 17 Apr 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रामटेकच्या प्रचारासाठी तळ का ठोकला?

नागपूर: रामटेक हा शिवसेनेचा गड. पण तो एकीकृत शिवसेनेचा. शिवसेनेत फूट पडली. कट्टर सैनिक उध्दव ठाकरेंसोबत तर इतर सत्तेसोबत गेले. जागा वाटपात भाजपने ही जागा बळकावण्याचा प्रयत्न केला. शिंदेंनी जागा वाचवली पण भाजपने आयात करून दिलेला उमेदवार ( राजू पारवे) त्यांनी स्वीकारला. आता ही जागा शिंदेसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.

सविस्तर वाचा...

16:39 (IST) 17 Apr 2024
मुंबई : सराईत मोबाइल चोरांना अटक, ३० मोबाइल हस्तगत

मुंबई : मोबाइल चोरणाऱ्या दोन सराईत चोरांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३० मोबाइल हस्तगत करण्यात आले. आरोपींविरोधात मुंबईसह इतर परिसरात अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वाचा सविस्तर...

16:34 (IST) 17 Apr 2024
अहमदाबाद-वडोदरा महामार्गावर भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू

अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात १० जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. भरधाव वेगात येणाऱ्या कारने एका ट्रेलरला धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

16:24 (IST) 17 Apr 2024
मेट्रो १ मार्गिका लवकरच एमएमआरडीएकडे, ‘एमएमओपीएल’विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली

मुंबई : मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडविरोधातील (एमएमओपीएल) दिवाळीखोरीची याचिका अखेर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने नुकतीच निकाली काढली आहे. त्यामुळे वर्सोवा – अंधेरी – घाटकोपर मेट्रो १ मार्गिका ताब्यात घेण्याचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) मार्ग मोकळा झाला आहे.

वाचा सविस्तर...

16:16 (IST) 17 Apr 2024
पिंपरी : ‘मावळ’चा खासदार चिंचवड, पनवेलकर ठरविणार?

निवडणुकीत दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील मतदार निर्णायक ठरणार असून मावळचा खासदार ठरविणार आहेत.

सविस्तर वाचा...

Mahavikas Aghadi

महाविकास आघाडी

एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु आहे. अशातच एक ओपिनियन पोल समोर आला आहे. यामध्ये शिंदे गट व अजित पवार गटासाठी अनपेक्षित अंदाज वर्तवण्यात आला आहे. एबीपी माझा-सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार, महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी महायुतीला लोकसभेच्या ३० जागा तर शिवसेना ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसला १८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Story img Loader