Mumbai Maharashtra News Live Update : महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये राज्यातील बहुसंख्या जागांवर एकमत होऊन जागावाटप झाले असले तरी मुंबईतील दक्षिण मुंबई या मतदारसंघात अद्याप महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालक मंत्री मंगलप्रभात लोढा आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते यशवंत जाधव हे दक्षिण मुंबईसाठी इच्छुक आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रामटेकमध्ये सभा (१० एप्रिल) झाल्यानंतर त्यांनी प्रचाराची दिशा ठरविली असून काँग्रेसच्या संविधानावरील टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Maharashtra Breaking News Live Updates 11 April 2024
मुंबई : काळाचौकी येथील अभ्युदयनगर वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून ‘कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंट एजन्सी’मार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास करण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. या अभ्यासासाठी आचारसंहिता संपल्यानंतर जूनमध्ये सल्लागार निवडीसाठी निविदा मागविण्यात येणार आहेत. हा प्रकल्प व्यवहार्य ठरल्यानंतर पुढे बांधकामासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत.
मुंबई : ओशिवरा येथील ‘सुरभी’ या आजी-माजी न्यायाधीशांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठी ‘म्हाडा’ने पहिल्यांदाच घरविक्रीच्या नियमित प्रक्रियेत बदल केला. अंतर्गत सजावट न करता या सोसायटीला सदनिकांची विक्री करता येईल. याबाबतच्या प्रस्तावाला प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता मिळाली.
न्यायाधीशांच्या सोसायटीच्या उभारणीसाठी म्हाडाने सुरुवातीला १६० कोटींच्या खर्चाला प्रशासकीय मंजुरी दिली होती. नव्या ठरावानुसार हा खर्च १०२ कोटी होणार आहे. अंतर्गत सजावट करून दिल्यानंतरही त्यात फारशी वाढ होणार नव्हती. त्यामुळे म्हाडाने भरमसाठ प्रशासकीय मंजुरी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या बाबत ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम वृत्त दिले होते. त्यानंतर म्हाडाने सुधारीत कमी खर्चाची प्रशासकीय मंजुरी घेतली होती.
चंद्रपूर : ज्या काँग्रेसने काश्मीरला संविधानापासून वंचित ठेवले, त्या काश्मीरला संविधान बहाल करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीबद्दल काँग्रेस केवळ अपप्रचार करीत आहे. यावर विश्वास न ठेवता महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना निवडून देऊन मोदींचे हात बळकट करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भद्रावती येथील पिपराळे सभागृहाच्या बाजूला झालेल्या विशाल विजय संकल्प सभेत केले.
महाराष्ट्रात आमच्या विरोधात तीन पक्ष एकत्र आले आहेत. एक नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि अर्धी उरलेली काँग्रेस पक्ष आमच्याविरोधात लढत आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना अर्धी उरली, शरद पवारांची राष्ट्रवादी अर्धी उरली आणि या दोन अर्ध्यांनी मिळून काँग्रेसलाही अर्धे केले, अशी टीका केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नांदेड येथील प्रचार सभेत केली.
मालेगाव : धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांची उमेदवारी जाहीर करुन पाच आठवड्याचा कालावधी उलटल्यानंतर काँग्रेसने त्यांच्या विरोधात नाशिकच्या माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना रिंगणात उतरविण्याचा निर्णय जाहीर केला.
गडचिरोली : मागील दहा वर्षात लाखो श्रीमंत हिंदू कुटुंबांनी देश सोडले, वादग्रस्त निवडणूक रोखे प्रकरण, बंदी घातलेल्या औषध कंपन्यांना पुन्हा परवानगी देणे, देशातील अराजक वातावरण अशा मुद्द्यांवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते मोदींविरुद्ध का बोलत नाहीत, असा सवाल करीत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज काँग्रेस आणि भाजपात मॅच फिक्सींग असल्याचा घणाघाती आरोप केला.
पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्राची जबाबदारी प्रशासकांच्या खांद्यावर असल्याने महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी कामाची सूत्रे हाती घेऊन पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामाची सूचना विभाग अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्यावर बुधवारी प्रत्यक्ष नालेसफाई सुरु असताना अचानक आयुक्त डॉ. रसाळ यांनी भेट देऊन काम करणाऱ्या कंत्राटदाराला धक्का दिला.
वसई- रायगड लोकसभा मतदारसंघातील हजारो मतदार वसई विरार शहरात राहत असून त्यांची मते मिळविण्यासाठी तटकरे यांच्या कन्या आणि महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी बुधवारी नालासोपार्यात सभा घेतली. या सभेला मोठ्या संख्यने रायगडमधील ग्रामस्थ उपस्थित होते.
नाशिक : एसव्हीईईपी अंतर्गत आतापर्यंत जिल्हा स्तरावर शाळा, महाविद्यालयांमध्ये पथनाट्य, जनजागृती फेरी यासह वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. सध्या शाळेत वार्षिक परीक्षा सुरू आहेत. परीक्षा सुरू असतांनाही विद्यार्थ्यांनी या उपक्रमात घेत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी भित्तीपत्रक, घोषवाक्य, निबंध तसेच वेगवेगळे उपक्रम सुरू ठेवले आहेत.
भंडारा : भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज छाननीनंतर समर्थनाची भूमिका जाहीर करणार असल्याचे विकास फाऊंडेशनचे संस्थापक चरण वाघमारे यांनी जाहीर केले होते. मेळावा घेऊन गुप्त मतदान पद्धतीने कार्यकर्त्यांची मते जाणून कार्यकर्त्यांचा मतांचा आदर ठेऊन काँग्रेसला पाठिंबा देत असल्याची माहिती विकास फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष माजी आमदार चरण वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबईः मालावणी येथे दुचाकी चोरत असल्याच्या संशयावरून २५ वर्षीय तरुणाला झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी एका अनोळखी व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कल्याण : येथील बारावे येथील पालिकेच्या घनकचरा विभागाला गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत केंद्रात साठवण केलेला सुका कचरा जळून खाक झाला. गेल्या दहा दिवसाच्या कालावधीत बारावे घनकचरा प्रकल्पाला लागलेली ही दुसरी आग आहे.
सोलापूरमधील माढा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला मिळाला आहे. भाजपाकडून माढ्यात रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील मोठे नेते मोहिते-पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांच्या कुटुंबातील धैर्यशील मोहिते-पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असून त्यांना उमेदवारी दिली जाईल, असे सांगितले जाते.
ठाणे : ठाणे पोलिसांच्या हाती काही दिवसांपूर्वी एक निनावी पत्र आले. या पत्रामध्ये एका मुलीचे छायाचित्र होते. या मुलीची हत्या करून तिला मुस्लिम समाजाच्या दफनभूमित पुरण्यात आल्याचे त्यामध्ये म्हटले होते. पोलिसांच्या पथकाने गांभीर्याने याप्रकरणाचा तपास सुरू करून दफन केलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढला.
बुलढाणा: ९ एप्रिलला झालेल्या वादळी अवकाळी पाऊस व गारपिटीचा जिल्ह्याला जबर तडाखा बसला आहे. बुधवारी संध्याकाळी उशिरा कृषी व महसूल यंत्रणांनी जिल्हा प्रशासनाला नुकसानीचा अहवाल सादर केला. यानुसार ६ तालुक्याना अवकाळीचा फटका बसला आहे.
गडचिरोली : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. यात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असा दावा केल्याने ऐन निवडणुकीत खळबळ उडाली आहे.
पुणे : व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए, बीएमएस), संगणक उपयोजन पदवी (बीसीए) अभ्यासक्रम अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) अखत्यारित जाण्यापासून वाचवण्यासाठी शिक्षण संस्थांनी शक्कल लढवली आहे.
ठाणे : नाल्याच्या कामात बाधित होत असलेली मुख्य जलवाहीनी स्थलांतरित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे उथळसर आणि नौपाड्यातील काही भागांना होणारा पाणी पुरवठा येत्या सोमवारी बंद ठेवण्यात येणार आहे.
नागपूर : भाजपचे खासदार रामदास तडस आणि त्यांचे कुटुंबिय सातत्याने पूजा तडस हित्यावर अन्याय करत आहेत. त्यानंतरही भाजपने त्यांना वर्धा लोकसभेची उमेदवारी दिली. या कुटुंबाची सून व पीडित पूजा तडस मोदी परिवारात नाही काय?
धुळे – धुळे लोकसभा मतदारसंघासाठी कॉंग्रेसकडून माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याचे पडसाद कॉंग्रेस अंतर्गत उमटले आहेत.
पुणे : घरातील मत्स्यालयात ठेवल्या जाणाऱ्या सकर या शोभिवंत माशाला नदी, तलावात सोडल्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. सकर मासा अन्य माशांची अंडी, पिले खात असल्याने नदी, तलावातील अन्य माशांचा अधिवासच धोक्यात आला असून, प्रदूषित पाण्यातही सकर मासा तग धरत असल्याचे समोर आले आहे.
वसई विरार आणि मिरा रोड मध्ये वेगवेगळ्या घटनेत ४ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २ महिला आणि दीड वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश आहे.
ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघाच्या जागेसाठी महायुतीकडून उमेदवार जाहीर झालेला नसला तरी माजी खासदार व भाजपचे इच्छूक उमेदवार संजीव नाईक यांनी प्रचाराला सुरूवात केली असून त्यापाठोपाठ आता त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्त्यांना महत्वाच्या सुचना देत केवळ सेवाभावी आणि विधायक उपक्रमांच्या माध्यमातूनच साजरा करण्यास सांगितले आहे.
ईद निमित्त रस्ता अडवून नमाज अदा करण्याची प्रथा यंदा मोडीत काढत मिरारोडच्या मुस्लिम बांधवानी नवा आदर्श ठेवला आहे. ईदची नमाज अदा करण्यासाठी सर्व मशीदीमध्ये दोन किंवा तीन भागात जमातीची सोय करण्यात आली आहे.
नागपूर : शहरात ‘डेटिंग ॲप’च्या नावावर हायप्रोफाईल देहव्यापाराचा नवा ‘ट्रेंड’ सुरू झाला असून यामध्ये हिंदी-भोजपुरी चित्रपट, टीव्ही मालिका, जाहिराती आणि मॉडेलिंग क्षेत्रातील तरुणींसह उच्चशिक्षित तरुणींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ‘डेटिंग ॲप’द्वारे श्रीमंत घरातील मुलांसोबत मोठमोठ्या हॉटेलमध्ये ‘डेटिंग’च्या नावावर हा देहव्यापार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सध्या पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. चंद्रपूर येथे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. त्यानंतर कन्हान येथे विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील दुसरी सभा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचे जनतेत प्रचंड आकर्षण आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
गोंदिया : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. चंद्रपूर लोकसभेचे भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी महिलांबद्दल वापरलेल्या अपशब्दावरून त्यांनी टीका केली. हा भाजपाचा डीएनआय आहे, यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
सांगली : रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देण्यासाठी सांगलीतील ईदगाह मैदानावर लोकसभेच्या सर्व उमेदवारांनी हजेरी लावली. भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील, मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील, कॉंग्रेकडून उमेदवारी साठी इच्छुक असलेले विशाल पाटील यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा देत प्रचाराची संधी साधली.
"महात्मा फुले यांनी १८८३ मध्ये शेतकऱ्याच्या अवस्थेचे एवढे प्रभावी व वास्तवदर्शी चित्रण केले असून त्याला तोड नाही. वर्तमानात यात किंचीतही बदल झालेला नाही” असे मत खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.