Maharashtra News Updates , 08 June 2022 : राज्यसभेची निवडणूक भाजपने लादली असून राज्यात एक षडयंत्र सुरू आहे. त्या षडयंत्राला बळी पडू नका, असे आवाहन करत बंगालमध्ये तृणमूलने भाजपला गाडले. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीकडे पूर्ण संख्याबळ असून आघाडीच्या चारही उमेदवारांचा विजय निश्चित आहे. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत एकजूट दाखवून विजय मिळवू आणि नंतर विजयोत्सव साजरा करू, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला. तर आपल्याकडे पूर्ण संख्याबळ असल्याने चारही उमेदवारांची विजय निश्चित आहे, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. आमदारांच्या बैठकीत शक्तिप्रदर्शन करीत महाविकास आघाडीने विजय निश्चित असल्याचा संदेश दिला.
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि जीवितहानीसारखे गंभीर गुन्हे वगळता शेतकरी आंदोलनांतील शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिली. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदानाचे वाटप १ जुलै- कृषीदिनापासून सुरू करण्यात येणार असून, कृषीमूल्य आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूकही लवकरच करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.
Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबाद याठिकाणी जाहीर सभा सुरू आहे. या सभेच्या व्यासपीठावर संभाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरे औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याबाबत घोषणा करू शकतात, असा तर्क- वितर्क लावला जात होता. याच मुद्द्यावरून बोलताना उद्धव ठाकरे यांनी नामकरणाबाबत सूचक विधान केलं आहे. औरंगाबादचं नामकरण होणार हे नामकरण मीच करणार असं त्यांनी म्हटलं आहे. सविस्तर बातमी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबाद याठिकाणी जाहीर सभा होणार आहे. या सभेला शिवसेनेच्या नेत्यांसह अनेक पदाधिकारी आणि हजारो शिवसैनिक हजर राहिले आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांची सभा सुरू होण्यापूर्वी जनतेला संबोधित करताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे. सविस्तर बातमी
मागील काही दिवसांत महाराष्ट्रासह देशात करोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. करोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता डीजीसीए अर्थातच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नवीन नियमावली जारी केली आहे. आता विमानातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मास्क वापरणं अनिवार्य केलं आहे. तसेच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर योग्य ती कारवाई करण्याचा आदेश डीजीसीएकडून देण्यात आला आहे. सविस्तर बातमी
आज दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावीचा निकाल जाहीर झाला. अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन करून आपला आनंद साजरा केला. दरम्यान पुण्यातील गरवारे महाविद्यालयात बारावी वाणिज्य शाखेत शिक्षण घेणाऱ्या एका तरुणानं टोकाचं पाऊल उचललं आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून त्यानं आत्महत्या केली आहे. सविस्तर बातमी
भाजपाने विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस (संगठन) श्रीकांत भारतीय, प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड आणि माजी मंत्री राम शिंदे, उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपाने आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्राम संघटनेने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर
केरळात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन झाल्यानंतर मान्सूनने कर्नाटक किनारपट्टीच्या बहुतांशी भागात मजल मारली आहे. त्यानंतर गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगाळला आहे. वेळेआधीच महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, हा हवामान खात्याचा अंदाज देखील चुकला आहे. आता १२ ते १३ जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, अशी नवीन माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान पुढील काही दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सर्वत्र पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. सविस्तर बातमी
मोदी सरकारने देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. एकूण १७ पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने आज (बुधवार) हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२२-२३ पीक वर्षासाठी पिकांचा एमएसपी १०० रुपयांनी वाढवून २,०४० रुपये प्रति क्विंटल केला आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक खरीप पिकांवरही एमएसपी वाढवण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी...
भाजपातून निलंबित करण्यात आलेल्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यासंदर्भात एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर सुरु झालेला वाद अद्याप थांबताना दिसत नाही आहे. इस्लामिक देशांकडून नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नुपूर शर्मा म्हणजे भारत नव्हे असं सांगताना छगन भुजबळ यांनी इस्लामिक देशातील लोक सहकार्य करतील अपेक्षा बोलताना व्यक्त केली आहे.
भाजपाकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे. तर, पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना मात्र संधी मिळालेली नाही, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे की पंकजा मुंडे यांच्या जागी पक्षाने उमा खापरे यांना संधी दिली आहे. दरम्यान, पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमा खापरे यांनी या पार्श्वभूमीवर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर बातमी...
विधानपरिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी बुधवारी भाजपाने आपले पाच उमेदवार जाहीर केले आहेत. विधानपरिषदेसाठी भाजपातर्फे पंकजा मुंडे यांना संधी दिली जाणार असे सांगण्यात येत होते. मात्र ऐनवेळी त्यांना डावलण्यात आले आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांना संधी न मिळाल्यामुळे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी पंकजा शिवसेनेत आल्या तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर
केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांची अवस्था मांजरांच्या पिल्लांसारखी झाली असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावर आता शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सविस्तर बातमी
राज्यात विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच प्रमुख पक्षांकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी यादी जाही करण्यात येत आहे. भाजपाने उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर, काँग्रेसकडूनही आपले उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. वाचा सविस्तर बातमी...
वाशिम जिल्ह्यात रिसोड शहरातील इंगोले बाल रुग्णालयात काम करणाऱ्या महिला नर्सने डॉक्टरांनीच अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. आरोपी डॉक्टरचं नाव गोपाल इंगोले असं आहे. वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे रिसोडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आरोपी डॉक्टरविरोधात रिसोड पोलिसांनी अत्याचाराच्या गुन्ह्यासह विविध गुन्हे दाखल केले आहेत.
राज्यसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपली असताना गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्यावर आपली दावेदारी सांगण्यासाठी भाजप-सेना समोरासमोर उभे ठाकले आहेत. वाचा सविस्तर
नागपूर : नागपूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नवीन अध्यक्षाची नेमणूक करुन गटबाजीला वाव मिळू नये म्हणून या निवडणुका होईफर्यंत आमदार विकास ठाकरे यांनाच नागपूर शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम ठेवण्यात येणार आहे. तसा निर्णय महाराष्ट्र काँग्रेसने घेतला आहे. वाचा सविस्तर
देशात मागील काही दिवसांपासून करोना संसर्गामध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांतही रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसत आह. दरम्यान, बुधवारी देशात ५२३३ नव्या करोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारच्या तुलनेत ही रुग्णसंख्या ४१ टक्क्यांनी जास्त आहे. या रुग्णवाढीमुळे आता चिंता व्यक्त केली जात असून खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. वाचा सविस्तर
उत्तर प्रदेशमधील अनेक तरुण महाराष्ट्रात नोकरीसाठी येतात. तर अगोदर भूमिपुत्रांचा विचार व्हावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केली जाते. असे असताना आता भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांनी उत्तर प्रदेशमध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी मराठीचा पर्यायी भाषा म्हणून समावेश करण्याची विनंती केली आहे. वाचा सविस्तर
ज्ञानवापी मशीद प्रकरणामुळे देशात मागील काही दिवसांपासून वातावरण तापलेले आहे. वाराणसी येथील दिवाणी न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. दरम्यान, या खटल्याची सुनावणी घेणार रवी कुमार दिवाकर यांना पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे. तसा दावा दिवाकर यांनी केला असून त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात अली आहे. वाचा सविस्तर
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांना उमेदवारी दिल्यानंतर लगेच भाजपाने विधानपरिषदेसाठी अमरावतीकर असलेले श्रीकांत भारतीय यांना संधी दिली आहे. या निर्णयानंतर भाजपाने पश्चिम विदर्भावर लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपाने जिल्ह्यातील दोन नेत्यांना अचानकपणे राज्यसभा, विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यामागे आगामी निवडणुकांच्या गणितांची जुळवाजुळव असल्याचे मानले जात आहे. वाचा सविस्तर
भाजपाने सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिकांना मैदानात उतरवल्यानंतर चुरस वाढली आहे. यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपाने आपल्या आमदारांना एकत्र ठेवले आहे. मत फुटू नये यासाठी सर्वच पक्षांकडून काळजी घेण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिवसेना व भाजपामध्ये आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. दरम्यान मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील नेमकं कोणाला मतदान करणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. सविस्तर बातमी
“भाजपाने राज्यसभा निवडणूकीत जास्त उमेदवार दिले आहेत. मात्र आघाडीचे उमेदवार निवडून येतील. आता विधानपरिषदेच्या निवडणुकीचीही तयारी करावी लागेल. कंबर कसावी लागेल. महाविकास आघाडीचे उमेदवार राज्यसभेवर सर्व निवडून येतीलच आणि त्याच पावलावर पाऊल टाकून विधानपरिषदेतही आघाडीचे उमेदवार निवडून येतील,” असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
“सहावी जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी भाजपाने घोडेबाजार मांडला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विधानसभा सदस्य कॉ. विनोद निकोले या घोडेबाजारापासून कटाक्षाने दूर असून ते या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील”., असे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी सांगितले. वाचा सविस्तर बातमी...
बियाण्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या अनेक घटना राज्यात घडताना दिसत आहेत. यामुळे एकीकडे करोनाचे संकट पुन्हा येत असताना, आता शेतकऱ्यांसमोर बोगस बियाणांचे संकट देखील निर्माण होत आहे. याचा फटका शेती उत्पादनावर दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज बियाणे विक्रेत्यांना एक आवाहन केले आहे. वाचा सविस्तर बातमी...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. सभेसाठी शिवसेनेने पूर्ण तयारी केली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता असताना दुसरीकडे भाजपा नेते मात्र यावरुन टोलेबाजी करत आहेत. यादरम्यान औरंगाबादमधील शिवसेना नगरसेवकाने केलेली जाहिरातबाजी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही असं सांगत नगरसेवकाने भाजपावर जोरदार टीका केली आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने यादी जाहीर केली असून, पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र पंकजा मुंडेंना यामध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. यामध्ये प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे. याबाबत बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्ही प्रयत्न केला होता असे म्हटले होते. मुंबईत पत्रकरांशी बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर...
भाजपाकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे. तर, पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना मात्र संधी मिळालेली नाही, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवाल्या आहेत. वाचा सविस्त बातमी...
महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली असून या पार्श्वभूमीवर शहरात पाच ठिकाणी नवीन करोना चाचणी केंद्रे उभारली आहेत. या केंद्रांवर आरोग्य विभागाच्या पथकाने चाचण्या करण्याचे काम सुरू केले आहे.
डोंबिवलीत गेल्या आठवड्यात रिपब्लिकन रिक्षा चालक मालक संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने मनमानीने रिक्षा प्रवासी भाडे वाढ करून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या प्रस्तावित भाडे दर पत्रकाला आव्हान दिले होते. याविषयीची वातावरण निवळत नाही, तोच बुधवारी सकाळी आयरे प्रभागातील शिवसेनेच्या तीन नगरसेवकांनी रिक्षा भाड्याचे सुधारीत दर जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेला हुंकार सभा असं देखील शिवसेनेकडून संबोधलं जात आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेकडे सर्वांचेच लक्ष्य आहे. दरम्यान, या सभेवरून विरोधकांकडून टीका, टिप्पणी सुरू आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटद्वारे टीका केली असून, भाजपाकडून ही उद्धव ठाकरेंच्या या सभेबद्दल टीकात्मक टिप्पणी करण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातमी...
MSBSHSE 12th Result 2022 Live Updates: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) बारावीचा निकाल आज बुधवारी ८ जून २०२२ रोजी जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल जाहीर केला जाईल. निकालासंदर्भातील सर्व अपडेट्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.
दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर वाचू शकता.