केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या जनसंपर्क कार्यालयात सकळी धमकीचे तीन फोन आल्याची माहिती समोर आली आहे. या तीन फोन कॉल्सनंतर पोलिसांनी नितीन गडकरींचं जनसंपर्क कार्यालय आणि निवासस्थान या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे. हा फोन नेमका कुणी केला याचा तपास आता पोलीस करत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे तीन फोन आल्याची बातमी एबीपी माझाने दिली आहे. जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा या गुन्हेगाराच्या नावाने नितीन गडकरींना धमकी देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलग तीन फोन आल्याने खळबळ

नागपूरमधल्या ऑरेंज सिटी रूग्णालयाच्या समोर नितीन गडकरी यांचं जनसंपर्क कार्यालय आहे. या जनसंपर्क कार्यालयात नितीन गडकरींना मारण्याची धमकी देणारे दोन फोन आले. त्यानंतर तिसरा फोनही आला. तिसरा फोन आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. नागपूरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे फोन आल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. धमकी देणाऱ्याने आपलं नाव जयेश पुजारी असल्याचं सांगितलं. हा जयेश पुजारी उर्फ जयेश कांथाच होता का? त्याने फोन नेमके कुठून केले याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी २१ मार्चला सकाळी दोन वेळा गडकरी यांच्या नागपुरातील खामला येथे असलेल्या जनसंपर्क कार्यालयातील लँडलाईन क्रमांकावर हे धमकीचे फोन आले. या कॉलवरून गडकरींकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी गडकरी यांच्या कार्यालयाने नागपूर पोलीसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गडकरींच्यासुरक्षेत वाढ केली आहे.

जनसंपर्क कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात

पोलिसांचा मोठा ताफा यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर तैनात करण्यात आला असून फोन करणाऱ्या आरोपीबाबत माहिती घेणे सुरू आहे.
दरम्यान जयेश पुजारीने नितीन गडकरी यांना या पूर्वीही कार्यालयात फोन करुन धमकी दिली होती. पुजारी हा हत्येच्या प्रकरणात बेळगाव तुरुंगात शिक्षा भोगत आहे. शिवाय त्याने तुरूगातून अशाच पद्धतीने अनेकवेळा अधिकारी आणि इतरांना धमकी देणारे फोन केल्याची माहिती आहे. यापूर्वी २०१६ मध्ये तो तुरूंगातून पळून गेला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra news union minister nitin gadkari receives threat call again nagpur office scj