नांदेड : पुण्यात स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपीला शिताफीने पकडण्यात आले आहे. त्याला योग्य ती शिक्षा होईलच; परंतु त्याच्यात ही विकृती आली कशी, याचा विचार केला पाहिजे. शिवराय, फुले-शाहू-आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात महिला-भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजेत. पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता कायद्यानुसार कर्तव्य बजावावे, अशा रोखठोक शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याचे गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे शुक्रवारी येथे कान टोचले. महायुती सरकारमध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या पक्षाच्या विस्ताराच्या निमित्ताने अजित पवार प्रथमच नांदेडमध्ये आले होते. नांदेड विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यानंतर विमानतळ ते गुरूद्वारापर्यंत त्यांचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. सहा वेगवेगळ्या ठिकाणी क्रेनच्या माध्यमातून त्यांना अतिभव्य पुष्पहार घालण्यात आले. त्यानंतर ओम गार्डन मंगल कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आपल्या सुमारे ३५ मिनिटांच्या भाषणात अजित पवार यांनी पक्षाच्या नेते, कार्यकर्त्यांसह प्रसिद्धीमाध्यमांनाकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या. आपल्या बातम्यांमुळे आरोपी पकडण्यास मदत व्हावी, आरोपीला पळून जाण्याची संधी मिळू नये, असे वार्तांकन करण्याचा सल्ला त्यांनी माध्यमांना दिला. तर नेते व कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, महाराष्ट्र हा नेहमीच सुसंस्कृत राहिला आहे. विरोधकांना देखील सन्मानाने वागवण्याची आपली परंपरा आहे. कालच मराठी भाषा दिन साजरा झाला. प्रत्येक मराठी माणूस विचाराने कोणीही असला तरी तो महाराष्ट्राच्या हिताचाच विचार करणार, याची खूणगाठ प्रत्येकाने कायम मनाशी बांधली पाहिजे.
३ मार्च रोजी विधीमंडळाचे अधिवेशन सुरु होते आहे. यात दि. १० रोजी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. विरोधक लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करीत आहेत. परंतु लाडक्या बहिणींसह सर्व समाजघटकांना मी आश्वस्त करतो की, गरीबांच्या हिताच्या कोणत्याही योजना बंद पडणार नाहीत, असे निसंदिग्धपणे सांगून पवार म्हणाले की, जे लोक आपल्या उत्पन्नातून कुटुंबाच्या गरजा भागवू शकत नाहीत, त्यांच्या मदतीसाठी सरकारचे प्रयोजन असते आणि सरकार आपले कर्तव्य चोखपणे बजावेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी गरजू समाज घटकांसाठी असंख्य योजना राबवत आहेत. कोट्यवधी लोकांना घरकुल देण्यात आले. तरुणांना रोजगार देणाऱ्या अनेक योजना आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सरकार काम करत आहे.
मराठवाडा तहानलेला राहणार नाही
बाभळी बंधाऱा बांधताना अडचणी येत होत्या. परंतु लोकांचे हित लक्षात घेऊन आपण पुढाकार घेत तो मार्गी लावला. यापुढेही मराठवाड्याला पाण्याची कमतरता भासणार नाही, यासाठी आपले प्रयत्न असतील. नाशिक भागात पश्चिमेकडे पडणारे पावसाचे पाणी वाहून समुद्राला जाते, ते वळवून पूर्वेकडे महाराष्ट्रात आणले जाईल. त्यासाठी एक लाख कोटी रुपयांची योजना प्रगतीपथावर आहे.
मुंबईत हेलपाटे मारु नका
राजकारणातील लोकांचे पाय कायम जमिनीवर राहिले पाहिजेत. लोकशाहीत जनता जनार्दन सर्वस्व आहे. विनाकारण मुंबईत हेलपाटे मारु नका, त्यापेक्षा लोकांच्या संपर्कात राहा, त्यांची कामे करा तरच पक्ष वाढेल. सर्व समाज घटकांकडे सारख्या नजरेने पाहिले पाहिजे. सर्वांची कामे आपल्या माध्यमातून व्हावीत.- अजित पवार, उपमुख्यमंत्री